गावोगावच्या रंजक किश्शांचे साप्ताहिक सदर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय अर्थसंकल्पात औरंगाबादचा माणूस म्हणून अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे भारी कौतुक. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या  वेळी ते सतत टीव्हीवर झळकत होते व त्याच औरंगाबादकरांना कौतुक. उद्योजकांच्या एका कार्यक्रमात सूत्रसंचालकांनी तसा उल्लेख केला. केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका झाली. भक्तांनी कौतुकही केले, पण अर्थ राज्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक काही थांबत नाही.  अर्थसंकल्प कसा तयार होतो याची  इत्थंभूत  माहिती ते वारंवार सांगतात.  अगदी सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बैठकांपासून ते अर्थसंकल्प सादर होईपर्यंत. त्यांचं ते सारे पुराण हे अर्थसंकल्पापेक्षाही जरा अधिकच लांबत; पण त्यातील रेल्वेचे तपशील विचारले की ते शांत होतात. रावसाहेब दानवे आमचे नेते आहेत. ते त्यांना विचारा, असं सांगतात आणि थांबतात. त्यामुळे ते  अर्थसंकल्पपूर्व तयारीचं बोलू लागले की रेल्वेचं कोणी तरी विचारत आणि  आणि डॉ. कराड यांचे अर्थसंकल्पाचे कौतुक थांबते.

रामटेक, नोईडा आणि गोंदिया.. 

मलबार हिल परिसरातील ‘रामटेक’ हा सरकारी बंगला, उत्तर प्रदेशातील नोईडा आणि गोंदिया जिल्हा यांचा तसा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही, पण तिन्हींमध्ये एक नव्यानेच साम्य निर्माण झाले. समुद्रकिनारी असलेल्या ‘रामटेक’ बंगल्याचे सर्वच मंत्र्यांना आकर्षण; पण या बंगल्यात राहणाऱ्याच्या मागे शुक्लकाष्ठ लागते हे छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यावरून अनुभवास येते. भुजबळ तुरुंगवारी करून आले, तर नाथाभाऊ खडसे सध्या ‘ईडी’च्या खेपा घालत आहेत. उत्तर प्रदेशातील नोईडामध्ये भेट दिल्यावर मुख्यमंत्रिपद जाते हे चार मुख्यमंत्र्यांवरून अनुभवास आल्यावर मुलायमसिंह, कल्याणसिंह, राजनाथ सिंह, अखिलेश यादव या मुख्यमंत्र्यांनी नोईडाला जाण्याचे टाळले होते. अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ नवाब मलिक हे गोंदियाचे लागपोठ दोन पालकमंत्री ‘ईडी’च्या कोठडीत गेले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी गोंदियाचा इतका धसका घेतला की नको रे बाबा गोंदियाचे पालकमंत्रिपद असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.

लोकशाही रुजविणारे गाव 

गावातील एक बुजवलेली विहीर पुन्हा उकरायची की नाही यासाठी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या गावात चक्क मतदान घेण्यात आले आणि बहुमताने विहीर उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. विहीर उकरण्याच्या प्रश्नावर मतदान घेतले गेल्याची ही दुर्मीळ घटना असावी. भंडारदरा धरणाच्या परिसरात वसलेल्या राजुर गावात नळ योजना नव्हती. तेव्हा गावातील महादेव मंदिराजवळ असणारी ‘घमंडी’ नावाची विहीर गावाची तहान भागवत होती. पुढे गावात नळ योजना आली आणि या विहिरीचा हळूहळू वापर होणे बंद झाले. दुर्लक्षित झालेली ही विहीर ११ वर्षांपूर्वी बुजविण्यात आली. ही विहीर पुन्हा सुरू करावी यावर एकमत न झाल्याने अखेर मतदान घेण्यात आले.

संकटमोचक गिरीशभाऊ

भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पुन्हा एकदा नाशिकच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. भाजपमध्ये सुरू झालेली गळती  विद्यमान प्रभारी आमदार जयकुमार रावल यांना रोखता आली नाही. त्यामुळे भाजपने त्यांच्याऐवजी पुन्हा महाजनांच्या हाती सूत्रे देत संकट घोंघावत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. अलीकडेच भाजपच्या माजी उपमहापौरासह तीन नगरसेवकांनी शिवबंधन बांधले.  पक्षात फाटाफूट होऊ न देता सत्ता कायम राखण्यासाठी महाजन यांना व्यूहरचना करावी लागणार आहे. गेल्या वेळी त्यांनी मंत्रिपदाच्या प्रभावाने सर्वपक्षीय नगरसेवकांना मोठय़ा संख्येने भाजपमध्ये सामावून घेतले होते. महापालिकेत एकहाती सत्ता प्राप्त केली. राज्याची सत्ता हाती असताना संकटमोचन करणे फारसे अवघड नसते. सत्ता नसताना संकटांचे निवारण करण्यात महाजन कितपत यशस्वी होतात हे महत्त्वाचे. 

टाळय़ांसाठीही खडेबोल 

शिवसेनेच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या अमरावतीत झालेल्या मेळाव्यात अनेक नेत्यांची भाषणे झाली. शिवसेनेत ‘आवाज’ महत्त्वाचा; पण टाळय़ांचा आवाज बेपत्ता होता. व्यासपीठावरील वक्ते अस्वस्थ होते. अखेरीस शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. टाळय़ा म्हणजे केवळ कौतुक नसते, तर ती व्यक्त होण्याची भावना असते, हे त्यांना सांगावे लागले. जाणिवा मृत होतात, तेव्हा पक्षच काय कुटुंबही पुढे जाऊ शकत नाही, अशी व्यथा रावतेंनी व्यक्त केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिवसैनिकांनी टाळय़ा वाजवून प्रतिसाद देणे सुरू केले.

(सहभाग – अनिकेत साठे, सुहास सरदेशमुख, प्रकाश टाकळकर,  मोहन अटाळकर)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi political interesting stories from maharashtra zws
Show comments