स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सोमवारी रात्री रवाना झाले. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय साहाय्यकांसोबतच मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यादीत जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रा. नितीन लालसरे यांचा समावेश आहे. अशा नावाचे अधिकारी कोणीच नसल्याने हे जनसंपर्क अधिकारी कधी झाले? असा अनेकांना प्रश्न पडला. तेव्हा हे प्राध्यापक मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले. हे महाशय परदेशी निघाल्याने मनमाड या त्यांच्या मूळ गावी त्यांना शुभेच्छा देणारे फलकही झळकत आहेत.
अजितदादांच्या नागपूर कार्यालयाची चर्चा तर होणारच !
उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजनमंत्री अजित पवार यांचे नागपूरमधील नवीन कार्यालय रविभवनमधील शासकीय बंगल्यात सुरू झाले. उपजिल्हाधिकारी संवर्गातील एका अधिकाऱ्याची उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नागपूर व अमरावती विभागांतील नागरिकांनी आपले प्रश्न, समस्या, अडीअडचणी वा मंत्रालयाशी संबंधित कामांच्या संदर्भात या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. अजितदादांकडे असलेल्या अर्थ व नियोजन या खात्यांचा नागरिकांशी येणारा संबंध तसा कमीच. तरीही नागपूरमध्ये कार्यालय कशासाठी? नागपूर जिल्हा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला. दुसरे म्हणजे नागपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकदही तशी मर्यादितच. नागपूरमधील नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्क कार्यालयांबरोबरच भाजपची कार्यालये आहेत. यामुळेच अजित पवार यांच्या नागपूरमधील नवीन शासकीय कार्यालयाची चर्चा तर होणारच !
हेही वाचा >>> “आधी ५० खोके अन् ५० लोक दावोस दौऱ्यावर”, आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंत प्रत्युत्तर देत म्हणाले…
‘भावी मुख्यमंत्री’पदाचा धसका?
काँग्रेसचे युवा नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा वाढदिवस अपेक्षेप्रमाणे मोठया थाटात साजरा झाला. या निमित्ताने कडेगावमध्ये आयोजित केलेल्या युवा मेळाव्यासाठी कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडूराव, कन्हैय्याकुमार, खासदार मोहमंद प्रतापगडी या नेत्यांसह मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही आमदारांना पाचारण करून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व सिद्ध करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी आमदार कदम यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. हाच धागा पकडत आमदार कदम म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून नाव जरी चर्चेत आले तर भाजप राहिल बाजूला आणि काँग्रेसमधूनच ‘कार्यक्रम’ सुरू होईल. वडील डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाबाबत घडलेल्या प्रकाराचा बहुधा धसका विश्वजीत यांनी घेतला असावा.
छोटयांचे मोठे दु:ख
महायुती एकवटली असल्याने सत्ता संपादन करणे इतकेच काय ते उरले आहे असे एकंदरीत वातावरण बैठकांवेळी पुन:पुन्हा पाहायला मिळत असते. वरकरणी मामला ठीकठाक असला तरी कळ आतल्या वेदनेची सल मात्र अजूनही बोचत असल्याचे दिसते. कोल्हापुरात रविवारी महायुतीच्या तमाम बडया नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात हे दुखरे अस्तर उलगडले गेले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित त्यांचेच समर्थक माजी आमदार के. पी. पाटील यांनी अंतरंग कथन केले. ‘महायुतीत आमचा पक्ष छोटा आहे. पक्ष छोटा असला तरी आम्हाला गृहित धरून कामकाज करू नका. समजून घेऊन पुढे चला,’ असा चिमटा काढला. यानंतर शिरोळचे माजी राज्यमंत्री व अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यावर कढी केली. ‘तुमचा पक्ष तरी आहे, आम्ही अपक्ष आहोत. आम्हाला बेरजेत तरी धरा. विश्वासात घ्या,’ अशा शब्दांत कोंडलेल्या वेदनेला वाट करून दिली खरी. यालाच म्हणतात छोटयांचे मोठे दु:ख !
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आणि भाजप आमदाराचा ‘नेम’
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-मुरबाड या शहरी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येणारे भाजपचे ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांच्या एका मागणीमुळे नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उपस्थित भाजप आमदार, खासदारांचीही पंचाईत झाली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण पट्टयातील प्रश्नांचा बारीक अभ्यास असणारे आमदार म्हणून कथोरे ओळखले जातात. नियोजन समितीच्या बैठकीत कथोरे यांनी जिल्ह्याचा तुम्हाला खरा विकास हवा असेल तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन करा, अशी मागणी मांडली. या मागणीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाईही आवाक झाले. या जिल्ह्याचे एकदा विभाजन होऊन पालघर हा नवा जिल्हा तयार झाला आहे. आता कल्याण पलिकडे नवा ‘कल्याण’ जिल्हा करा, अशी मागणी कथोरे यांनी केली. सलग चार वेळा आमदार होऊनही कथोरे यांची मंत्री होण्याची इच्छा काही पूर्ण झालेली नाही. नव्या जिल्ह्याची मागणी करून थेट पालकमंत्री होण्याचे स्वप्न तर कथोरे पहात नाहीत ना, अशी चर्चा रंगली.
(संकलन : दयानंद लिपारे, संतोष प्रधान, दिगंबर शिंदे जयेश सामंत, संजय बापट )