लोकसभा निवडणुकीची वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे. इच्छुकांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संधी मिळेल तिथे सांगायला सुरुवात केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदारांची प्रतिमा लक्षात घेऊन महायुतीतील अनेकांनी आपल्या उमेदवारीचे घोडे दामटायला सुरुवात केली आहे. ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने माजी कृषी राज्य, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत हे इचलकरंजीत आले असता त्यांनी मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक आणि २०१४ साली लोकसभा निवडणूक लढवलेले उमेदवार सुरेशदादा पाटील यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. विषय लोकसभा निवडणुकीचा आला तेव्हा सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच सुरेशदादा पाटील हेही प्रचारात असतील, असे सांगितले. त्याच क्षणी सुरेशदादा पाटील यांनी, अहो, मीच लोकसभा निवडणूक मराठा क्रांती संघटनेकडून लढणार आहे, असे उत्तर दिले. त्यावर भाऊंचा चेहरा कसानुसा झाला. इकडे उपस्थितांमध्ये मात्र हास्याची लकेर उमटली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा