उपमुख्यमंत्री अजित पवार हे तसे ‘आधी करावे मग सांगावे’ या बाण्याचे. राज्यातील करोना निर्बंध  एप्रिलपासून शिथिल केले तरी  उपमुख्यमंत्री पवार हे करोना नियमांचे काटेकोर पालन  करण्यात आघाडीवर असतात. मुखपट्टीची सक्ती गेल्याने साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला पण अजितदादांची मुखपट्टी कायम राहिली.  दादांचे अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यात दोन कार्यक्रम झाले. बांधकामविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्यांनी पूर्णवेळ मुखपट्टीचा वापर केला होता. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी ते सासरवाडीला गेले होते. तेव्हा ‘मला कोणी मुखपट्टी काढायला सांगितली तरी मी ऐकत नाही.’ बीड सासुरवाडी असल्यामुळे इकडच्या मंडळींचे ऐकावं लागते, असे मिश्कील विधान करत पवार यांनी पहिल्यांदा मुख्यपट्टी काढून भाषण केले. पाठोपाठ कोल्हापुरात असेच भाषण केले. उद्घाटन संपल्यानंतर संयोजकांनी समूह छायाचित्र  काढण्याचा आग्रह धरल्याने दादांना मुखपट्टी काढावी लागली. याची विचारणा केली असता अजितदादांनी ‘करावं लागतं बाबा एखाद्या वेळेस’ असे म्हणत वेळ निभावून नेली खरी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या सांगता समारंभात शनिवारी ते पुन्हा मुखपट्टी शिवाय दिसले. एरव्ही मुख्यपट्टीवरून ते भलतेच आग्रही आणि परखड. मुखपट्टीचा वापर केला नाही तर इतरांवर डाफरणारे अजितदादासुद्धा अध्येमध्ये कधीतरी मुखपट्टीविना दिसतात ते हे असे.

मदिरा आणि मते

..मागच्या पिढीपासून पंढरीच्या पांडुरंगाची नाळ जोडलेली. कार्यालयात मातापित्यांच्या तसबिरी सोबत करकटी असलेला विठ्ठल आणि रुखमाईसुद्धा आहे. रोज पूजा होतेच. वारकरी नसले तरी विठ्ठल भक्त असल्याचे जाणवण्याइतपत सोवळं. सामिष जेवणावळ असेल तर शुद्ध शाकाहारी म्हणून वेगळा पंक्तीप्रपंच ठरलेला. असे शाकाहारी नेतृत्व तीन वेळा लाभले म्हणून अख्ख्या मतदारसंघाला अप्रूप. मतदारसंघाबरोबर कंपनीच्या कामाचा व्याप एवढा वाढला की मनशांतीसाठी  मदिरेची मात्रा उपयुक्त ठरू लागली. आठवडय़ात कधीतरी जवळ केलेल्या मदिरेने तनाबरोबर मनाचाही ताबा घेतला. रोजची गरज निर्माण झाली. मनाचा ताबा घेतलेल्या मदिरेमुळे घरात वाद सुरू झाले. पतीचे मदिराप्रेम आणि त्यातून रात्रीच्या वेळी होणारी भांडणे, शिवीगाळ क्वचित मारझोड नित्याची झाल्याने देवभोळी सहचारिणी अस्वस्थ झाली. यावर उपाय शोधण्यासाठी धर्मपत्नीने मदिरेची झालेली बाधा दूर करण्यासाठी मंदिरातील बुवा शोधलाय. बुवाने उतारा सांगितला आहे. आता सहचारिणीला प्रतीक्षा आहे ती अमावास्येची. कारण मतदारांना याची कानोकान खबर मिळायला नको. नाही तर मतदानादिवशी मदिरेचा पुरवठा कमी होण्याची अफवा विरोधकांनी पसरवली तर मतात घट व्हायची.

भाजपचे दुखणे वेगळेच

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणाने महाराष्ट्रात वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपचे अमरावतीचे कार्यकर्ते मात्र कमालीचे अस्वस्थ झालेयत. खरे तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपला आवाज जाणवायला हवा. पण, राणा दाम्पत्य आणि त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला अधिक ‘फुटेज’ मिळतेय, ही भाजपची खंत आहे. भाजपमध्ये वरून आदेश येतात, त्याप्रमाणे आपल्याला वागावे लागते. सारे काही यंत्रवत. राणा दाम्पत्य मात्र थेट शिवसेनेला आव्हान देत देशभर प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही बाह्या सरसावल्या. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती  केली. युवा स्वाभिमानला त्याचा किती फायदा होणार, याचे आडाखे बांधले जात असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र, आमच्यासाठी थोडे तरी काम राहू द्या, असे म्हणू लागले आहेत.

कानामागून आली..!

संमेलन मोठं दणक्यात झालं. म्हणजे भाषणांच्या पातळीवर हो. त्यात एक मात्र दिसून आलं. राज्यात महाविकास आघाडी असली तरी संमेलन आयोजनात राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचा समन्वय उत्तम. तसे दोन हात दूर राहिले सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख. मग खास शैलीत ते त्यांनी व्यक्त केलं- ते म्हणाले, ‘उदगीर साहित्य संमेलनाने काय साधले गेले?’  तसा त्यांचा हा सवाल रोकडा., पण त्याचा संदर्भ मात्र स्थानिक. राज्यमंत्री संजय बनसोडे जरा माध्यमांमध्ये जास्त झळकले. त्यांना मिरवताही आलं. सांस्कृतिक कार्यातून अमितराव तसे लांब राहिले. संमेलनात उदगीर जिल्हानिर्मितीची चर्चा झाली तेव्हाही त्यांनी चेंडू राष्ट्रवादीकडं ढकलला. त्यांचं हे सारं वागणं उदगीरकरांना कळत होतं. त्यांना ती म्हण आठवत असावी, कानामागून आली..!

पोलीस नेमकं ऐकतात कुणाचे ?

अमरावतीच्या राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई, मुंबईतील पोलीस ठाण्यालगत शिवसैनिकांनी भाजप नेत्याच्या वाहनावर केलेली दगडफेक, अशा घटनांनी पोलीस दलाविषयी निर्माण झालेले समज-गैरसमज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलनात दादा प्रथमच उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचा निसर्गरम्य परिसर, शिस्तबद्धता पाहून ते चकीत झाले. एका इमारतीसाठी या संस्थेला लागणारा निधी क्षणाचाही विलंब न करता मंजूर केला. या वेळी त्यांनी नवोदित पोलीस उपनिरीक्षकांचा अभ्यासवर्ग घेतला. सार्वजनिक जीवनात आपले वर्तन कसे असावे, यापासून ते काम करताना कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, इथपर्यंतचे सल्ले दिले. विरोधकांना वाटते की, पोलीस केवळ सत्ताधाऱ्यांचे ऐकतात. आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्हालाही तसेच वाटायचे. कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेत असले तरी राज्यकारभार करताना सगळीकडे शांतता नांदायला हवी, अशी इच्छा असते, असे त्यांनी नमूद केले. पोलीस नेमकं ऐकतात कुणाचे, याचा उलगडा मात्र अखेपर्यंत झाला नाही. 

लोकसभेच्या उमेदवारीची लालसा!

आता काही युती नाही. त्यामुळे औरंगाबादच्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मलाच मांडावे लागतील असं सांगत डॉ. भागवत कराड यांनी त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी आपणच उमेदवार असू असे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडले. तीन हजार कोटींच्या रस्त्याचे लोकार्पण नुकतेच नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा त्यांनी माजी खासदार व शिवसेना नेत्यांवर टीकाही केली. कोणतेही विकासाचे काम पूर्णत्वाला गेले की, त्याचा पाठपुरावा मी केला होता हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना सांगण्याची सवय. त्याची खिल्ली उडवताना डॉ. कराड म्हणाले, त्यांनी नुसताच विचार केला. पण पुढे कोणी शोधलं नाही. त्यांनी विकासाचे काही एक केले नाही.’ हे सांगताना लोकसभा मतदारसंघातील प्रश्नही त्यांनी मांडले. त्यासाठी गडकरींनी लक्ष घालावे अशी विनंतीही त्यांनी केली. डॉ. कराड हे लोकसभेची त्यांची लालसा आता जाहीर व्यासपीठावरूनही व्यक्त करू लागले आहेत.

(सहभाग : दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, सुहास सरदेशमुख, मोहन अटाळकर प्रदीप नणंदकर, अनिकेत साठे )

Story img Loader