उपमुख्यमंत्री अजित पवार हे तसे ‘आधी करावे मग सांगावे’ या बाण्याचे. राज्यातील करोना निर्बंध एप्रिलपासून शिथिल केले तरी उपमुख्यमंत्री पवार हे करोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात आघाडीवर असतात. मुखपट्टीची सक्ती गेल्याने साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला पण अजितदादांची मुखपट्टी कायम राहिली. दादांचे अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यात दोन कार्यक्रम झाले. बांधकामविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्यांनी पूर्णवेळ मुखपट्टीचा वापर केला होता. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी ते सासरवाडीला गेले होते. तेव्हा ‘मला कोणी मुखपट्टी काढायला सांगितली तरी मी ऐकत नाही.’ बीड सासुरवाडी असल्यामुळे इकडच्या मंडळींचे ऐकावं लागते, असे मिश्कील विधान करत पवार यांनी पहिल्यांदा मुख्यपट्टी काढून भाषण केले. पाठोपाठ कोल्हापुरात असेच भाषण केले. उद्घाटन संपल्यानंतर संयोजकांनी समूह छायाचित्र काढण्याचा आग्रह धरल्याने दादांना मुखपट्टी काढावी लागली. याची विचारणा केली असता अजितदादांनी ‘करावं लागतं बाबा एखाद्या वेळेस’ असे म्हणत वेळ निभावून नेली खरी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या सांगता समारंभात शनिवारी ते पुन्हा मुखपट्टी शिवाय दिसले. एरव्ही मुख्यपट्टीवरून ते भलतेच आग्रही आणि परखड. मुखपट्टीचा वापर केला नाही तर इतरांवर डाफरणारे अजितदादासुद्धा अध्येमध्ये कधीतरी मुखपट्टीविना दिसतात ते हे असे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा