एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे वा त्यांच्या समर्थक आमदारांवर पूर्णपणे बहिष्कारच घातला. राष्ट्रवादीत मात्र तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीचे सारे बंडखोर मंत्री आणि आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनातही ही कटुता तेवढी जाणवत नाही. जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या गळाभेटीचे छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसारित होताच जयंतरावांना मी शरद पवारांबरोबरच खुलासा करावा लागला. राष्ट्रवादीच्या वतीने तळ मजल्यावर दररोज दुपारी भोजन आयोजित केले जाते. यात सर्वपक्षीय आमदार व पत्रकारांचा तेथे राबता असतो. जयंत पाटील वा जितेंद्र आव्हाड हे दोघे गप्पा मारण्यासाठी तेथे सहभागी झाले होते. साहजिकच मग चर्चा सुरू होते. दोन्ही गट एकत्र येणार का ? शिवसेनेएवढी कटुता राष्ट्रवादीत अजून तरी जाणवत नाही.

चर्चा तर होणारच .

बेडग कमानप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक कार्यकर्त्यांशी मुंबईत चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील हा विषय असल्याने या बैठकीस पालकमंत्री म्हणून सुरेश खाडे यांची उपस्थिती आवश्यक होती. त्यात हा प्रश्न खाडे यांच्या मतदारसंघातीलच असल्याने त्यांच्या मतालाही महत्त्व होते आणि आहेच. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच आंदोलक कार्यकर्त्यांनी जर बैठकीस खाडे थांबणार असतील तर चर्चेला आमची तयारी नाही असे सांगितले. यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. आता ही घटना पालकमंत्री म्हणून खाडे यांचा अवमान होता, की पक्षाची ती गरज होती, हे कळायला मार्ग नसला तरी कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याच्या प्रश्नात हस्तक्षेप अथवा चर्चेतच सहभागी होण्यावर प्रतिबंध कशासाठी की आगामी निवडणुकीची ही पूर्व तयारी म्हणायची याचीच चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.

 फोटो आहे साक्षीला!

शाळांमधील विकासाचे काम पूर्ण न करताच धनादेशाद्वारे पैसे उचलण्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजी महापालिकेत घडला आहे. याप्रकरणी महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या बोगस आहेत असा मुद्दा पुढे करून या प्रकरणाची धग काढून टाकण्याचा प्रयत्न एका पातळीवर सुरू झाला आहे. आता हे प्रकरण प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी धसास लावण्याचे ठरवले आहे. परिणामी महापालिकेत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी हा कळीचा मुद्दा बनला आहे. यावरून तापलेले राजकारण, कायदेशीर प्रक्रिया पाहून अधिकारीही आता सावध झाले आहेत. त्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांवर, विशेषत: देयकांच्या कागदपत्रावर होणाऱ्या सह्यांच्या प्रतिमा आपल्या मोबाइलमध्ये टिपण्यास सुरुवात केली आहे. उद्या एखादा वादाचा, कायद्याचा मुद्दा उद्भवलाच तर खरे काय ते स्पष्ट करण्यासाठी हे फोटो उपयोगाला आणायचा अशी ही नामी शक्कल! महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हा सावध बाणा जितका वेगळा तितकाच सावधानतेचा प्रत्यय देणारा. त्याची कुजबुज होऊ लागली आहे.

दोन राजे आणि साप.. 

साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बाजार समितीच्या इमारतीच्या भूमिपूजनावरून दोघे समोर समोर आले होते. त्यांच्यामध्ये वाद झाला होता. दरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर होते. त्या दोघांतील नेहमीच्या वादावरून त्यांनी दुसऱ्या दिवशी दोघांनाही एकत्र बोलावून एकत्र बसून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे उदयनराजे  यांनी आता बसावे लागेल, कोण आले बसायला तर ठीक नाहीतर माझा मीच बसणार आहे असे जाहीर करून टाकले. यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेत स्वत:चा पराभव दिसायला लागला आहे. त्यामुळे आता पालिकेत आपली सत्ता टिकावी म्हणून त्यांच्याकडून चर्चेचा साप सोडायचं उद्योग चालू आहे.आता चर्चेचा साप कसला असतो याचीच चर्चा साताऱ्यात रंगली आहे.

(सहभाग : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, विश्वास पवार)