राजकारणात काही जण कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे प्रस्थ कायम असते. शिवसेनेत असताना मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र घेऊन गेले, काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या वॉर रुममध्ये निवडणुकांच्या नियोजनाचे काम केले, भाजपमध्ये दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय झाले, महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मोहिमेत सक्रिय, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपमध्ये समन्वयकाची जबाबदारी. एखाद्या पक्षात वरिष्ठांचा विश्वास संपादन केल्यास आश्चर्य वाटत नाही. पण शिवसेना, काँग्रेस वा भाजप, जेथे जेथे गेले तेथे नेतृत्वाच्या विश्वासातील बनले. ही किमया साधली आहे ती आशीष कुळकर्णी यांनी. अगदी अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण हे दोघे कुळकर्णी यांच्या निवासस्थानी गणेशाच्या दर्शनाला एकत्र आले आणि अशोकरावांच्या भाजप प्रवेशाच्या वावडय़ा उठू लागल्या.
देशमुखांची वाट वाकडीच
स्वपक्षाच्याच एका तरुण महिला पदाधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार करून पुन्हा तिच्यावर पैशासाठी ब्लॅक मेलिंगचा आळ घेणारे भाजपचे तत्कालीन सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर अखेर दीड-पावणे दोन महिन्यांनी रिक्त जिल्हाप्रमुखपद अक्कलकोटचे तरुण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मिळाले. साहजिकच पक्षाच्या व्यासपीठावर त्यांचा सत्कार झाला. त्या वेळी माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूर-मंगळवेढय़ाचे आमदार समाधान अवताडे आदी मंडळी झाडून उपस्थित होती. परंतु ज्यांच्या विधानसभा मतदारसंघात हा सत्कार सोहळा झाला, तेथील माजी मंत्री, आमदार विजय देशमुख हे अजिबात फिरकले नाहीत. अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आपल्या स्वत:च्या संपर्क कार्यालयात हजर राहूनही विजय देशमुख फिरकले नाहीत. आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार विजय देशमुख दोघेही वीरशैव लिंगायत समाजाचे. त्यांच्यात पुन्हा शीतयुद्ध सुरू. एकमेकांचे तोंडही न पाहणारे सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यातील गटबाजी नवीन नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सुभाष देशमुख गटाचे. मग सांगायलाच नको. संपूर्ण सत्कार सोहळय़ावर सुभाष देशमुखांचा प्रभाव असताना विजय देशमुखांची वाट सरळ कशी? ती वाकडीच राहणार हे ओघानेच आले.
मोह आवरेना..
सांगली महापालिकेचे आयुक्त निवास म्हणजे एक पंचतारांकित महल आहे. या महालात अनेक सुखसुविधा महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आल्या आहेत. तात्पुरते निवासस्थान असले तरी या सुविधा तयार करण्यासाठी मावळत्या आयुक्तांनी कोटय़वधींचा निधी खर्च केला. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची अवस्था एखाद्या खेडेगावाहून भयानक असताना महापालिकेच्या तिजोरीतील सार्वजनिक पैशांची वारेमाप उधळपट्टी या आयुक्त निवासासाठी झाली. एरवी पूरपट्टय़ात असलेल्या रहिवाशांना नित्य नियमाने मे-जूनमध्येच नोटिसा बजावणाऱ्या महापालिकेला आयुक्त निवास पूरपट्टय़ात असूनही कोटय़वधींचा खर्च कसा केला गेला? आता एवढा खर्च करूनही राज्यात सत्ताबदल होताच बदली झाली. होणारच होती, मात्र आपणच मनासारख्या तयार केलेल्या आयुक्त निवासाचा मोह मात्र अद्याप सुटलेला नाही. आता विघ्नहत्र्यांचा मुक्काम संपल्यावर तरी आयुक्त निवास रिक्त व्हावे, अशी अपेक्षा.
अशीही ही कोंडी
जनहिताची कामे लोकप्रतिनिधींनी करावी ही सामान्य नागरिकांची अपेक्षा. तसा प्रयत्न लोकप्रतिनिधींचाही असतो पण विकासकामांचा पाठपुरावा करूनही प्रतिकूल प्रतिसाद येत असेल तर करायचे काय, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने समीकरण आकाराला आल्यानंतर िशदे गटाच्या पाठीशी राहिलेल्या लोकप्रतिनिधींना हा अनुभव सातत्याने येत आहे. शिवसेनेतून फुटलेल्या लोकप्रतिनिधींवर समाजमाध्यमातून उद्धार केला जातो. कोल्हापुरात शनिवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य िशदे यांचा दौरा झाला. त्यांच्याकडे झालेल्या बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी जिल्ह्यातील विमानतळांचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला याबाबतची माहिती, छायाचित्रे त्यांनी समाजमाध्यमात प्रसिद्ध केली. इतके करायचा अवकाश. या कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल पाठ थोपटणे राहिले बाजूलाच. उलट पुन्हा एकदा शिवसैनिकांनी गद्दार, पुन्हा निवडून येणार नाही, राजकीय आत्महत्या केली अशा भाषेत टीकेचा भडिमार सुरू ठेवला. कामे करावी तर एक न करावे तर भलते अशी लोकप्रतिनिधींची कोंडी झाली आहे.
झाले मनोमीलन तरी..
इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक तोंडावर आलेली. अन्य पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने पहिला महापौर करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. पण त्यात गुंता आहे तो पक्ष स्थापन झाल्यापासून पाचवीलाच पूजलेल्या गटबाजीचा. विधान परिषदेचे माजी सदस्य अशोक जांभळे व प्रांतिक सदस्य मदन कारंडे या विधानसभेच्या मांडवाखालून गेलेल्या दोघा प्रमुखांकडे नेतृत्वाची धुरा असली तरी उभयतांची तोंडे विरुद्ध दिशेला. त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले. बंद खोलीत गुप्त चर्चा झाली. मतैक्य घडवण्यात ते यशस्वी ठरले खरे. इतका मोठा कार्यक्रम असूनही त्याची माध्यमांना खबर लागणार नाही याची पुरेशी दक्षता घेतली गेली. कारण मनोमीलन घडणार की नाही याविषयी नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत साऱ्यांच्याच मनात शंका होती. नंतर हातात हात गुंतलेली छायाचित्रे समाजमाध्यमात फिरू लागली. पाठोपाठ हे मनोमीलन आपल्याच पुढाकाराने कसे झाले याचा माध्यमांना सांगावा देण्याची जणू स्पर्धाच लागली. इतके झाले तरी हा मनोमीलनाचा कार्यक्रम किती काळ चालणार यावरही राष्ट्रवादीतच वेगवेगळे सूर उमटले.
(सहभाग : एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)