शंभूराजे देसाई साताऱ्याचे पालकमंत्री असल्याने व उदयनराजे यांची खास दोस्ती असल्यामुळे दोघेही एकमेकाला वरचेवर भेटत असतात. त्या वेळी हास्यविनोदही रंगत असतात. नुकतेच शंभूराज देसाई खासदार उदयनराजे यांची भेट घेण्यासाठी जलमंदिर निवासस्थानी आले होते. दोघात अर्धा तास जिल्ह्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. परत जाताना ‘अरे, देसाईसाहेबांची चप्पल कोणी चोरली का बघा नाही तर ते आपल्यातील कोणाची चप्पल बदलतील,’ असे खासदार उदयनराजे मिश्कीलपणे म्हणाले. त्यावर मंत्री देसाईंनी चप्पल घालतच माझी चप्पल साडेतीनशे रुपयांची असून ती खेड शिवापूर येथून घेतली आहे. मुंबईत गेल्यावर बदलणार आहे, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. देसाई त्यांच्या गाडीत बसण्यास निघाले, त्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. या वेळी शंभूराज म्हणाले, मी आता जातो चालत. तुम्हाला इथून पाठवण्यासाठी दरवाजा उघडला, असे उदयनराजे म्हणताच पुन्हा हशा पिकला. उदयनराजेंना मुजरा करत त्यांचा निरोप घेत देसाई रवाना झाले.

हेही वाचा >>> चावडी: मशालीची धग कुणाला?

नारी शक्तीचा..!

संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने महिलांना संसद आणि विधिमंडळात आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मंजूर केले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात या धोरणाची मुहूर्तमेढ रोवल्याचं सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. महिलांमध्ये पवारांनी राजकीय जागृती निर्माण केली, असंही या वेळी ठासून सांगण्यात आलं; पण दोन दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये त्यांच्याच गटाच्या झालेल्या मेळाव्यात या जागृतीचा आयोजकांना चांगला झटका बसला.

हेही वाचा >>> चावडी : खासदाराची विभागणी

त्याचं झालं असं की, शहरातील बेडेकर सभागृहात शरद पवार समर्थक गटाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी प्रास्ताविक सुरू केलं. त्याच वेळी काही महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, ‘सत्काराचा कार्यक्रम थांबवा आणि जिल्हा मेळाव्यामध्ये व्यासपीठामागे असलेल्या बॅनरवर महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांचं छायाचित्र का नाही, याचं उत्तर द्या,’ अशी मागणी केली. त्यामुळे मान्यवरांचं स्वागत होण्यापूर्वीच सभागृहात महिला जिल्हाध्यक्ष चव्हाण समर्थक आणि व्यासपीठावरील पुरुष पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. महिला कार्यकर्त्यांनी पाहुण्यांच्या साक्षीने संयोजकांना चांगलंच धारेवर धरलं.

दरम्यान, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी या विषयावर भूमिका मांडताना पुन्हा काहीशी कडक भाषा वापरली. त्यामुळे महिला आणखीच आक्रमक झाल्या. अखेर जिल्हा प्रभारी पाटील यांनी याबाबत खुलासा करताना, काही गोष्टी नजरचुकीने होतात. पक्षाध्यक्ष पवार यांनीच प्रथम महिलांना सन्मान दिला आहे, याची जाण आम्हाला आहे, असे सांगून यापुढे चुका सुधारल्या जातील, अशी हमी देत वादंग शमवलं.

प्रदेशाध्यक्षांपुढे गाऱ्हाणे

इचलकरंजी महापालिकेतील कार्यक्षेत्रात आठवडय़ातून एखाददुसरा दिवस नळाला पाणी येत असते. तेथील लोकांना असा दिवस म्हणजे जणू सणाइतका आनंद  देणारा. महिला वर्ग तर पाणी आले म्हटले की सारे काही बाजूला ठेवून पदर खोचून पाणी भरण्याकडे अवघे लक्ष केंद्रित करतात. हेच पाणी येणे राज्यस्तरीय नेत्यालाही अडचणीचे ठरावे? त्याचे झाले असे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इचलकरंजी येथे लोकांशी संवाद साधत होते. एका दुकानात ते बाहेर येत असताना समोर एक सामाजिक कार्यकर्ता त्यांना भेटला. त्याने आपली व्यथा साहेबांच्या कानावर घातली. तो म्हणाला, साहेब, तुम्ही येणार होता म्हणून १०० महिला गोळा केल्या होत्या. दहा दिवस झाले पाणी आले नव्हते. नेमके आजच पाणी येणार होते. म्हणून बायकांना आणू शकलो नाही. पाण्याअभावी १०० महिला न आल्याचे दु:ख काय ते जणू प्रदेशाध्यक्षच जाणोत! पाण्याने राज्यस्तरीय नेतृत्वाची कोंडी केली ती ही अशी. याच दरम्यान प्रदेश अध्यक्ष पदयात्रेने पुढे जात होते. त्यांची आलिशान मोटार रिकामी असल्याने संधी साधून त्यात बसण्याचा आनंद कार्यकर्ते घेत होते. एका चौकात थांबलेल्या लोकांनी मोटार समोर आल्यावर अध्यक्षांच्या गाडीवर फुलांची उधळण केली. मोटारीतून कार्यकर्ते बाहेर आल्यावरही उधळण सुरूच राहिली. नंतर लोकांच्या लक्षात आले की, हे बावनकुळे नव्हेत तर कार्यकर्तेच आहे. मग मात्र त्यांचा भलताच हिरमोड झाला.

हेही वाचा >>> चावडी : राजेंमधील दिलजमाई ?

नुसतीच मलमपट्टी

स्वच्छ पाणी, चांगली दळणवळणाची सोय आणि ही सांगलीकरांची अगदी नगरपालिका असल्यापासूनच अपेक्षा. महापालिकेवर निवडून जाणारे लोकप्रतिनिधी या सोयीसुविधा देण्यासाठी आग्रही असावेत, ही माफक अपेक्षा शहरवासीयांनी बाळगली तर त्यात चुकीचे काहीच नाही. महापालिकेत समाविष्ट असलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर एखादी ग्रामपंचायत बरी म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्यासाठी महापालिकेचा कोटय़वधींचा निधी दरवर्षी खर्च होतोच, पण आमदार, खासदार निधीतूनही खर्च केला जातो. मात्र, या करण्यात आलेल्या खर्चाला पाय फुटतात आणि रस्ते वरून चकाचक आणि आतून तकलादू असतात हे रविवारी स्पष्ट झाले. सांगलीतील हरभट रोड हा तसा कायम वर्दळीचा आणि शहरातील प्रमुख बाजारपेठेतील रस्ता. हाच वर्दळीचा रस्ता अचानक खचला. यामुळे रस्त्यावरून जात असलेले महापालिकेचे कंटेनर या खड्डयात अडकले. महापालिकेच्या कामांचा दर्जा तर दिसून आलाच; पण प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यासाठी दिवसाउजेडी समोर आला. आता याची ना चौकशी होणार, ना ठेकेदाराची बिले थकणार, कारण सब गोलमाल है भाई. सहभाग: सतीश कामत, विश्वास पवार, ऐजाजहुसेन मुजावर, दिगंबर शिंदे , दयानंद  लिपारे

Story img Loader