संपूर्ण कुटुंबाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागूनही उद्धव ठाकरे यांच्या गटाशी निष्ठावान राहिलेले राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा गेल्या रविवारी वाढदिवस साजरा झाला. यंदाच्या या वाढदिवसाचं वैशिष्टय़ म्हणजे, आदल्या दिवसापासून शहरात अनेक ठिकाणी असे बॅनर लागले होते, – रत्नागिरीत वाघाची दमदार एन्ट्री ! आता हा वाघ अर्थात ठाकरे गटाचा, हे सांगण्याची गरज नाही. कारण कोण आला रे कोण आला.., या घोषणेचं पेटंट ठाकरे गटाकडे आहे. पण ही एन्ट्री कशासाठी? तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आमदार साळवी सध्या जरी राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी जुना, निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. याच पक्षातर्फे साळवी यांनी रत्नागिरीत नगरसेवक आणि नगराध्यक्षपद भूषवलं आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून साळवी राजापूर याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रदीर्घ निष्ठावान कारकीर्दीमुळेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून साळवींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत २००४ पासून या मतदारसंघातून सलगपणे विजयी होत आले असून त्यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. या पार्श्वभूमीवर साळवी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून जनमताचा कानोसा घेण्यासाठी ही बॅनरबाजी केली असल्याची चर्चा आहे. यावर मंत्री सामंत यांनी मात्र, साळवी यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशी कोपरखळी मारली आहे.
आहे मंत्रीपद तरी
राज्याचे सत्ताकारण फिरले आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे मंत्रीपद चालून आले. चार दिवसांनंतर ते कोल्हापुरात दाखल झाले. जल्लोषी स्वागत करण्यात आले. गाठीभेटी वाढल्या. दोन-तीन दिवस झाले सतत कोणी ना कोणी भेटत आहे. पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जात आहे. प्रलंबित काम करण्याची आग्रही गळ अशाही गडबडीत घातली जाते. असे सारे उत्साहाचे वातावरण. याच वेळी भेटणाऱ्यांची आपापसात चर्चा होत राहते. साहेबांना खाते कोणते? याचे ठाम उत्तर अजून कोणाकडेच नाही. आपल्या परीने कोणते खाते मिळणार याची शक्यता बोलून दाखवले जाते. आठवडा उलटला तरी खातेवाटप झालेले नसल्याने मंत्रीपद असूनही त्याची अडचण वेगळीच.
भावी आमदाराच्या स्वप्नाला सुरुंग आषाढी वारीचे निमित्त साधून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) सर्व आमदार, खासदारांसोबत पंढरपुरात विठ्ठलाची पूजा केली. यात त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केसीआरपाठोपाठ आणि आषाढी एकादशीअगोदर पंढरपूर वारी नियोजनाचा आढावा घेण्याच्या निमित्ताने आले होते. सोलापूर व पंढरपूर भेटीतून शिंदे यांनी स्वत:चे प्रतिमामंडन करण्यासह सोलापुरात पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसून आले. यातून काहीजणांना आमदार होण्याचे स्वप्न पडू लागले. शिवसेनेच्या बैठकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत याचे नाव नेटाने पुढे आले असता एका विभागाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी उमेदवारीसाठी दावा केला. शहरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी विविध रस्त्यांवर भावी आमदार म्हणून काळजे यांचे फलकही उभारले होते. पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर काळजे स्वत:च्या नावाचा रेटा लावत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कामाचा दांडगा अनुभव असल्याचा दावा करू लागले. तेव्हा मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आमदारकीच्या स्वप्नाला जागेवरच सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. बारावी परीक्षाही उत्तीर्ण नसताना त्यांना मिळालेल्या डॉक्टरेटची मग चर्चा सुरू झाली.
(सहभाग : सतीश कामत, दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर)