‘दत्ता खानविलकर एज्युकेशन ट्रस्ट’ने २००३-०४मध्ये अलिबाग येथे ‘चिंतामणराव केळकर विद्यालया’ची स्थापना केली. त्यावेळी शाळेत १९ विद्यार्थी होते. आज शाळेत १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेने विविध उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. अक्षर, भाषा सुधार कार्यक्रम नियमित राबविले जातात. दरवर्षी २५ मुलींचा शैक्षणिक खर्च शाळा उचलते.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारी धोरणाची वाट न पाहता शाळेतील मुलांकरिता शाळेने काही निर्णय जाणीवपूर्वक घेतले. शाळेत २०० पानी वह्य़ा वापरण्यास बंदी आहे. प्रत्येक वर्गात एक कपाट असून यात गृहपाठ, निबंधाच्या वह्य़ा व इतर विषयांची पुस्तके ठेवण्याची सोय करून दिली आहे.
शाळेत मुलांमध्ये लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे संस्कार केले जातात. विविध उपक्रमांद्वारे मुलांना सामाजिक प्रश्नाची जाणीव करून दिली जाते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचे भान शाळेतील विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी नाम फाऊंडेशनला ६१ हजार रुपयांची मदत दिली आहे. विशेष म्हणजे हा निधी मुलांच्या पालकांनी दिलेला नसून तो मुलांनी साठवलेल्या निधीतून जमा करण्यात आला आहे. राज्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाणी समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करते आहे. ही बाब लक्षात घेऊन गेले सहा महिने विद्यार्थ्यांना पाणी आणि वीजबचतीची प्रतिज्ञा दिली जाते आहे. सुजाण नागरिक म्हणून पाणी आणि विजेचा बेजबाबदार वापर करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली जाते.
विज्ञान, भूगोल दिन
मुलांमध्ये विज्ञानाबद्दल रुची तयार व्हावी, त्यांच्यातील प्रयोगशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यात पाचवी ते नववीतील विद्यार्थी विज्ञानावर आधारित विविध प्रयोगांचे सादरीकरण करतात. केलेल्या प्रयोगांवर मुलांना १० मिनिटे बोलणे अपेक्षित असते. विज्ञान दिवसाबरोबरच दरवर्षी भूगोल दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुले भूगोलावरील प्रयोग सादर करतात. यावर्षी शाळेतील दहावीच्या १५ विद्यार्थ्यांनी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ला भेट दिली. संस्थेतील वैज्ञानिकांची भेट घेऊन येथे सुरू असलेल्या संशोधनाविषयी जाणून घेतले. मुलांची अभिरुची लक्षात घेऊन हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवण्याचे शाळेने ठरविले आहे.
भाषा-गणितावर मेहनत
गणित विषयासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे गणितातील कठीण संकल्पना रंजकपणे समजून घेता येतात. मूर्त साधनांचा वापर करून गणितातील अमूर्त संकल्पना समजून घेणे, हा त्यामागील उद्देश असतो. भाषेचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन शब्द देऊन त्याच्यावर आधारित दररोज एक वाक्य तयार करण्यास सांगितले जाते. दर शनिवारी प्रत्येक वर्गात भाषा सुधार कार्यक्रम राबविला जातो. यात व्याकरण, लेखन, शुद्धलेखन, श्रुतलेखन आणि वाचन यांचा समावेश असतो.
इंग्रजी शिकविण्यावरही भर
राज्यातील इतर भागांप्रमाणेच मराठी शाळा टिकवणे इथेही आव्हान आहे. इंग्रजी ही भाषा म्हणून शिकली गेली पाहिजे. पण पालकांना ती माध्यम म्हणून हवी असते. यामुळे इंग्रजी शाळांकडे त्यांचा ओढा असतो. शाळेत येणाऱ्या पालकांची समजूत काढल्यानंतर ते मराठी शाळेत दाखला घ्यायला तयार होतात. आमच्या शाळेतील मराठी माध्यमाचे विद्यार्थी चांगले इंग्रजी लिहू आणि बोलू शकतात, असे संस्थेचे अध्यक्ष अमर वार्डे अभिमानाने सांगतात.
स्पर्धा परीक्षांची तयारी
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणातील मुले स्पर्धा परीक्षांना फारसे बसत नाहीत. त्यामुळे शालेय स्तरावरच मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचे शाळेचे प्रयत्न आहेत. आठवी-नववीपासूनच मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याचे मार्गदर्शन केले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. आयकर म्हणजे काय, शेअर बाजार म्हणजे काय, त्याचे काम कसे चालते, आíथक गुंतवणूक कशी करावी याबाबत मुलांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम शाळेत आयोजित केले जातात.
शिक्षकांचेही मूल्यांकन
शाळेतील शिक्षक प्रश्नपत्रिका तयार करीत नाहीत. दहावी-बारावीप्रमाणे परीक्षांच्या प्रश्नपत्रिका बाहेरून मागविल्या जातात. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन करता यावे हा यामागचा उद्देश असतो. यामुळे परीक्षेचा दर्जा राखण्यासही मदत होते. सलग तीन वर्षे शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागतो आहे. याशिवाय शाळेत क्रिकेट, कबड्डी, खोखो, कराटे आणि बुद्धिबळ या खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. शाळेत मुलांचा वाढदिवस साजरा करण्यास मनाई आहे. प्रत्येक पालकाची आíथक कुवत वेगवेगळी असल्याने मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. शाळेकडून मुलांना फलक लावून शुभेच्छा दिल्या जातात. शाळेच्या प्रत्येक कृती किंवा उपक्रमामागे अशी सामाजिक भावना जोडली गेलेली असते. म्हणूनच केवळ विद्यार्थ्यांशीच नव्हे तर पालकांशीही शाळेची नाळ जुळली गेली आहे.
हर्षद कशाळकर
संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia. Com