रेश्मा भुजबळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वारली समाजात जन्मलेल्या आणि डहाणूच्या आदिवासींच्या खेडय़ात राहणाऱ्या चित्रगंधा सुतार यांना ‘ जे. जे. स्कू ल ऑफ आर्ट’मधील उच्च शिक्षण घेण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा रेल्वे प्रवास घडला. अत्यंत प्रतिकू ल परिस्थितीत त्यांनी हे शिक्षण प्रथम वर्गात पूर्ण के ले आणि आपल्या वारली आदिवासी समाजाच्या चित्रकलेचा वारसा सशक्तपणे सर्वदूर पसरावा म्हणून त्यात विविध प्रयोगही के ले. सध्या त्या कलामहाविद्यालयात प्राध्यापकीच्या माध्यमातून ज्ञानार्जन करीत आहेतच, पण त्याचबरोबरीने आपल्या समाजातल्या असंख्य आदिवासी मुलांना चित्रकलेचे धडे देत त्यांना थेट दिल्लीपर्यंत नेले आहे. कलेतून समाजभान जपणाऱ्या या आदिवासी कन्या आहेत आपल्या यंदाच्या दुसऱ्या दुर्गा.
चित्रगंधा सुतार
डहाणू पट्टय़ातील वारली आदिवासी समाजात जन्मलेल्या चित्रगंधा यांनी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत डहाणू परिसराच्या बाहेर पाऊलही टाकलं नव्हतं. रेल्वेनं प्रवास करून मुंबईला जाणं हे तर स्वप्नवतच, पण आपल्या चित्रकलेतील उच्च शिक्षणाच्या स्वप्नांसाठी त्यांनी तो के ला. त्यांचा पहिला रेल्वे प्रवास, डहाणू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चित्रकारांसाठी पंढरपूर असलेल्या ‘जे. जे. स्कू ल ऑफ आर्ट’साठीचा. अत्यंत प्रतिकू ल परिस्थितीत वाढलेल्या या आदिवासी कन्येला तो रोज करणे अशक्य होते, शिवाय शिक्षण इंग्रजीतून.. पण मार्ग निघत गेले. आज चित्रगंधा आपल्या वारली चित्रकलेतील विशिष्ट रंगलेपनासाठी ओळखल्या जातातच, परंतु आपला कलेचा वारसा समाजातल्या इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून प्राध्यापक होऊन विद्यार्थी घडवण्याचे कामही त्या करीत आहेत. दरम्यान, जहांगीर कलादालनातील चित्र प्रदर्शने आणि विविध पुरस्कारांनी त्यांच्या यशावर मोहोर उमटवली आहेच. त्यांचं एक चित्र तर थेट राजभवनात लावलं गेलं आहे.
चित्रगंधा यांना चित्रकलेचा वारसा मिळाला तो वडील हरेश्वर वनगा यांच्याकडून. आपल्या लेकीच्या हातातली कला पाहून त्यांनी लहानपणापासूनच चित्रगंधा यांना धडे द्यायला सुरुवात के ली. चित्रगंधा यांचा चित्रकलेतील ओढा लक्षात घेऊन यातलं उच्च शिक्षण कु ठे घेता येईल या प्रश्नाचा शोध ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’पाशी थांबला खरा, परंतु रोजचा डहाणू-मुंबई प्रवास सोपा नव्हता. जगाची अजिबात माहिती नसलेल्या आपल्या लेकीला एकटीला पाठवणे या बाबांना शक्य झाले नाही. ते चित्रगंधाबरोबर रोज जाऊ लागले आणि तिच्याबरोबरच परतू लागले, परंतु त्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवणे कठीण झाले. चित्रगंधा यांनाही अभ्यासासाठी वेळ मिळेना. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांची सोय वसई येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये केली. प्रश्न काही प्रमाणात सुटेल असं वाटलं, परंतु उलट वाढले. एका शेतातील बंगल्यात हे वसतिगृह होते. तिथे दिवे संध्याकाळी जात ते रात्री दीड वाजता येत. त्यामुळे त्यांना रात्री दीड ते पहाटे चार वाजेपर्यंत अभ्यास करावा लागायचा. वेळेअभावी असाइन्मेंट अपूर्ण राहायच्या, सरावासाठी वेळ मिळायचा नाही. कॉलेजला जाण्यासाठी हॉस्टेलहून सकाळी ६ वाजता निघावं लागे. बसने वसई स्टेशन गाठायचे आणि तेथून लोकल ट्रेनने मुंबईपर्यंतचा प्रवास. निकृष्ट अन्नामुळे जेवणाचीही आबाळ व्हायची. शिक्षणासाठीच पुरेसा वेळ मिळेनासा झाला तेव्हा प्रचंड प्रयत्न करून त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. प्रवासाचा वाचलेला वेळ त्यांना अभ्यास आणि सरावासाठी मिळू लागला. तत्पूर्वी आणखी एक समस्या सुरू होतीच. जे.जे.तील वातावरणाचं त्यांच्यावर दडपण यायचं. चित्रगंधा यांचं शिक्षण मराठीत झालेलं, त्यामुळे इंग्रजीतून होणारी लेक्चर्स समजतील का, इंग्रजीतून बोलता येईल का, ही भीती सतत असायची. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या लक्षात आलं की, बहुतांश विद्यार्थी हे महाराष्ट्रातले आणि मराठी बोलणारे आहेत. त्यामुळे त्या हळूहळू रुळत गेल्या. तसेच काही प्राध्यापक मराठी, हिंदीतून शंकांचं निरसन करायचे. त्यामुळे आकलन होत गेलं.
या सर्वात त्यांचा बुजरेपणा नाहीसा झाला तो मात्र त्यांच्या कलेमुळे आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासामुळे. प्रथम वर्षांला असताना वार्षिक प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी लहानशी रांगोळी काढली होती. ती रांगोळी पाहून त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना आवर्जून ‘युथ फेस्टिवल’मध्ये रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्यास सांगितलं. लहानपणापासून वडिलांनी प्रत्येक दिवाळीत पहाटे उठवून करून घेतलेला रांगोळीचा सराव त्यांना त्या वेळी उपयोगी पडला. ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये रांगोळीचं सुवर्णपदक मिळवलंच, पण पुढे २००५ ते २०११ या काळात त्यांनी एकूण १७ पारितोषिके मिळवली आणि ज्यासाठी त्यांना आपलं घर सोडून मुंबईला यावं लागलं होतं त्या चित्रकलेत त्यांनी बॅचलर्स आणि २०१० मध्ये मास्टर्स डिग्री प्रथम वर्गात मिळविली. शिकवण्यांमुळे हळूहळू चित्रकलेमध्ये ‘मास्टरी’ येत गेली आणि २०१३ मध्ये वारली चित्रकलेत निष्णात असलेल्या या चित्रकर्तीनं ‘वारली जमातीचे जीवन’ अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन जहांगीर कलादालना’मध्ये पहिलं प्रदर्शन भरवलं. आतापर्यंत त्यांची दोन प्रदर्शने जहांगीर कलादालनात झाली आहेत.
सध्या चित्रगंधा मुंबईतील एका कलामहाविद्यालयात प्राध्यापक आहेत. दरम्यान, आदिवासी मुलांकडे गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांची कला, गुणवत्ता दुर्लक्षित राहते, त्यांचा विकास खुंटतो हे त्यांना स्वत:च्या उदाहरणावरून लक्षात आलं होतं. त्यासाठी आपल्या चित्रकार मित्रमैत्रिणींना घेऊन त्या डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, विक्रमगड येथील आदिवासी पाडय़ांजवळच्या आश्रमशाळांमध्ये विविध विषयांच्या कार्यशाळा घेऊ लागल्या. आदिवासी मुलांना वस्त्रकला, हस्तकला, मातीकाम यांचे मार्गदर्शन देण्याबरोबरच चित्रकला स्पर्धा परीक्षांसाठी शनिवारी-रविवारी मार्गदर्शन वर्ग सुरू केले. रंगसाहित्य न परवडणाऱ्या या मुलांना रंग साहित्य मिळवून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील असतात. आज त्यांची आदिवासी पाडय़ातील मुले दिल्लीपर्यंत पोहोचली आहेत. आपल्या पगारातील ठरावीक रक्कम त्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. अर्थात या सगळ्या उपक्रमांना पती सागर यांची मोलाची साथ आहे. त्यामुळेच मुलगा, घर, नोकरी आणि सामाजिक उपक्रम यांचा समतोल साधता येतो, असे त्या सांगतात.
याच माध्यमातून त्यांना आदिवासी समाजातील बालविवाह, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करायचे आहे. शहरीकरणाच्या विळख्यात आदिवासी समाजातील अनेक पारंपरिक गोष्टी लुप्त होत चालल्याची खंत त्यांना वाटते. आपल्या चित्रांच्या माध्यमातून त्याचे जतन करायचे त्यांनी ठरवले आहे.
त्यात त्यांना यश येत राहो हीच सदिच्छा.
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
यश कार्स : राष्ट्रीय केमिकल्स अॅड फर्टिलाइजर्स लि.