डॉ. गुरुनाथ थोन्टे
शेती व्यवसायात सर्वांत महत्त्वाची ही त्यासाठी लागणारी जमीन असते. मात्र या शेतजमिनीकडेच सातत्याने दुर्लक्ष होते. केवळ उत्पादनाकडे लक्ष दिल्याने काही वर्षांतच या जमिनी क्षारपड होऊन शेतीसाठी नापीक होतात. जगभर वेगाने पसरत असलेल्या या समस्येवरील उपायांविषयी…
मागील लेखात आपण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या क्षारपड जमीन प्रश्नाच्या गांभीर्याची चर्चा केली. या दुसऱ्या भागात आपण आता शेती व्यवसायात महत्त्वाच्या ठरणाऱ्या जमीन घटकाचे संवर्धन कसे करायचे या विषयी जाणून घेऊयात. शेतजमिनीकडेच सातत्याने दुर्लक्ष करणे, त्यातून केवळ अधिकाधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करणे यातून शेत जमिनीचा दर्जा हा घसरत जातो. काही वर्षांतच या जमिनी क्षारपड होऊन शेतीसाठी नापीक होतात. या जमिनी पुन्हा पीकदार करायच्या असतील तर त्यासाठी करावे लागणारे उपाय आणि कष्टही मग थोडे आपला त्या जमिनीविषयी असलेला ओलावा तपासणारे ठरतात.
आता हे उपाय कसे योजायचे, त्याचा वापर -फायदा काय होतो, हेही जाणून घेऊयात.
● अपविष्ट पदार्थांचा वापर
शेती पिकामध्ये जो भाग मानवासाठी उपयुक्त नसतो त्यास अपविष्ट पदार्थ म्हणतात. त्यात उसाचे पाचट, उसाचे जमिनीतील बुडके, केळीचे पान व जमिनितील बुडके, सर्व पिकांचे पीक अवशेष ज्यात भुसा काड, टरफल, पाने, फांद्या, मुळे इत्यादीचा समावेश होतो. क्षारपाड जमिनीत क्षार साचलेले असतात. यामुळे मातीच्या समूह कणाचे स्थैर्य बिघडते. ते टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थ म्हणजे अपविष्ट पदार्थांचा वापर उपयुक्त ठरतो.
उसाचे पाचट हेक्टरी दहा टन निघते. या व्यतिरिक्त जमिनीतील बुडखा १०९ टन मिळतो. म्हणजे हेक्टरी १० टन पाचट अधिक १०९ टन बुडखा असे एकूण ११९ टन सेंद्रिय पदार्थ मिळतात. यापेक्षा जास्त केळीमध्ये (काढणीनंतर) अपविष्ट पदार्थ मिळतात. अशाच प्रकारे कोरडवाहू/ बागायती पिकांची बुडके जमिनीत ठेवली व पुढील पिकाची पेरणी शून्य मशागतीतील पेरणी यंत्राचा वापर करून केली तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण आपण वाढवू शकतो. या पदार्थांचा ओलाव्याशी संपर्क आला की कुजण्याची क्रिया चालू होते. या प्रक्रियेत सेंद्रिय आम्ल तयार होतात. त्यात क्षार विरघळतात. परिणामी क्षाराचे प्रमाण कमी होते.
या व्यतिरिक्त भुईमुगाच्या टरफलाने ४८.८ टक्के क्षारतेत सुधारणा होते. करडईच्या टरफलाने ५१.२५ टक्के होते. तर चिंचोकेच्या पुडने ६१.०१ टक्के सुधारणा होते. भाताच्या भुसाने ३०.९ टक्के तर प्रेसमडणे १८.५ टक्के सुधारणा होते. लाकडाचा भुसा वापरूनही ३७.५ टक्के सुधारणा करता येते. या व्यतिरिक्त पिवळा धोतरा या तनाचा हिरवळीचा खत म्हणून वापर करावा. या तणात नत्र स्फुरद व कॅल्शियमचे प्रमाण बरेचसे आहे. जमीन सुपीकतेत वाढ होते. तसेच चोपणपणा कमी होतो.
● जैविक पद्धती
जमिनीत अनुकूलता असल्यास जिवाणू कार्यक्षम होतात. अझोटोबॅक्टेरसारखे सूक्ष्म जीवाणू क्षारपड जमिनीत सुद्धा संप्रेरक तयार करू शकतात. यामुळे वनस्पतीची अन्नद्रव्य व शोषण क्षमता वाढते. हे जिवाणू वनस्पतीत इथलीन निर्मितीसाठी बाधा आणतात. त्यामुळे कायिक वाढीत सुधारणा होते. मायकोरा-हाझासारखी मित्र बुरशी जमिनीतील अन्न शोषण करते व ते पिकास देते. सुडोमोनस मेंडोसीना जिवाणूमुळे मातीच्या कणाचे समूहिकरण वाढते. परिणामी निचरा प्रणाली सुधारते. पेनिसिलियम मायसेलियम रेसिडयूचा वापर केल्यास जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. काही सूक्ष्मजीवाणू कमी वजनाचे अमिनो आम्ल व कर्बोदके तयार करतात. त्यामुळे पेशीच्या बाहेर व आत अस्मोटिक दाब संतुलित राहतो.
● कृषी संजीवन पद्धत
वसुंधरा बायोटेक पुणे या संस्थेने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ही पद्धत विकसित केली आहे. अमृता या औषधी वनस्पती अर्क वापरला जातो. यात सौरऊर्जा साठवलेली असते. तिचा वापर गांडूळ व सूक्ष्म जीवाणू करतात. यात सेंद्रिय आम्ल तयार होतात. त्यात कॅल्शियम विरघळतो. नंतर तो सोडियमला ढकलून त्याची जागा घेतो. यामुळे सामू कमी होतो. हिरवळीच्या खताचा वापर, ताग, अंबाडीसारखी पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत दोन वेळा गाडतात. त्यावर अमृता फवारतात. यामुळे कुजण्याची क्रिया वेगाने होते. त्याचे सेंद्रिय खत तयार होते. यानंतर गव्हाचं पीक घ्यायचे. ते दहा-बारा दिवस झाल्यावर जमिनीत गाढायचे. गव्हाच्या पानात सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात साठविलेली असते. त्यामुळे सूक्ष्मजीवाणूची कार्यक्षमता वाढते.
● सेंद्रिय खताचा वापर
सेंद्रिय खताचा वापर अमृताबरोबर करायचा. अमृतामध्ये ह्युमस व सूक्ष्म अन्नद्रव्य असतात. त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. यामुळे जमिनीत निचराप्रणाली सुधारते. सूक्ष्मजीवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढते.
● विद्याुत चुंबकीय ऊर्जेचा वापर
यात डायव्हर्टर्स आणि ऑक्सिजनेटर या उपकरणाचा वापर करतात. जमिनीच्या पोटात विद्याुत चुंबकीय लहरी निर्माण होतात. त्याचा विपरीत परिणाम पीक वाढीवर होतो. तसेच पाण्यावर व कीड रोग प्रतिकार क्षमतेवर होतो. वरील उपकरणामुळे जमिनीत रेडिएशन उदासीन होतात. यामुळे पीक वाढीचा वेग वाढतो तसेच पिकाची कार्यक्षमता वाढते.
● रासायनिक पद्धती
या ठिकाणी जिप्सम, गंधक, आयर्न पायराइटचा वापर करतात. जिप्सम पाच ते दहा टन प्रती हेक्टर शेणखतात मिसळून द्यावा. चुनखडीयुक्त जमिनीत गंधक एक टन किंवा आयर्न पायराइट दोन टन वापरावे .भरपूर पाणी द्यावे. यामुळे क्षार वाहून जातात. या व्यतिरिक्त आम्लयुक्त खतांचा वापर फायदेशीर ठरतो. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी.
● निचरा व्यवस्था सुधारणे
सूक्ष्म भोके असलेला पाईपचा वापर करावा. हा पाईप बारा ते अठरा इंच खोलीवर गाडावा. यामुळे निचरा व्यवस्था गतिमान होते. परिणामी पीक उत्पादनात वाढ होते. यामुळे जमिनीचे भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म सुधारतात. उघड्या चराद्वारेही निचरा व्यवस्था सुधारता येते मात्र दुरुस्तीचा खर्च वारंवार करावा लागतो.
● सहनशील पिकांची लागवड
क्षारता सहन करण्याची क्षमता काही पिकात जास्त असते. त्याची लागवड करून आर्थिक लाभ घेता येतो. यात धैचा पीक २.५ टक्के पर्यंत क्षार सहन करू शकतात. कांदा १.८८ टक्के पर्यंत क्षार सहन करू शकतात. भात १.८४ टक्के गहू १.७८ टक्के, सूर्यफूल १.५४ टक्के, लसूण १.२६ टक्के व कोथिंबीर १.२२ टक्के क्षार सहन करू शकतात. धैच्या या पिकामुळे क्षारता कमी होते.
● सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर
जादा पाण्यातील क्षारांमुळे जमीन क्षारपाड होऊ नये म्हणून गरजेएवढेच पाणी जमिनीला द्यावे. त्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादीचा वापर करावा. यामुळे गरजेएवढेच पाणी पिकाला दिले जाते. ज्या पाण्याचा सामू ७.५ पेक्षा जास्त असेल त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करू नये. पाण्याचा सामू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करावी.
● शेती पद्धतीत बदल
शेती नांगरणे, रोटर करणे, हॅरो वापरणे, आंतरमशागत करणे याबाबतीत भविष्यात बदल करावा लागेल. पूर्वी सेंद्रिय खताची/सेंद्रिय पदार्थाची उपलब्धता भरपूर होती. त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्ब पातळी स्थिर ठेवणे शक्य होते. सेंद्रिय खत तयार करून त्याचा वापर आता कालबाह्य झालेला आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब पातळी स्थिर ठेवण्यासाठी जमीन उघडी करणे हे धोकेदायक असते. कारण सूर्यप्रकाशामुळे सेंद्रिय कर्ब उडून जातो.
भविष्यात सेंद्रिय खताला पर्याय म्हणून मागील पिकांच्या बुडख्याचा वापर करावा लागेल. पिकातील तने, तणनाशकाने मारून त्याच्या बुडक्याचा वापरही करता येतो. याबाबतीत प्रथम कृषी तज्ज्ञ, कृषी विस्तारक व नंतर शेतकरी यांचे प्रबोधन मोठ्या प्रमाणावर करावे लागेल. यासाठी शून्य मशागतीत पेरणी करणारे यंत्राचे पीक प्रात्यक्षिक कृषी विद्यापीठ, शासकीय तालुका बीजगुणन केंद्र व प्रगतशील शेतकरी यांचे प्रक्षेत्रावर आयोजित करावे लागतील. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटी आयोजित कराव्या लागतील. ही मोहीम व्यापक प्रमाणावर हाती घ्यावी लागेल. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढल्यास निचरा प्रणाली सुधारण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय कर्ब तयार होतो. जमिनीतील सूक्ष्मजीवाणूचे तो ऊर्जा स्राोत आहे. यातील काही प्रजाती क्षारपडपणातही पीक वाढीस मदत करतात उदा. अझोटोबॅक्टर.
सबब पूर्वीप्रमाणे जमीन उघडी करून चालणार नाही. वातावरणाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपण उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोडतो यामुळे जमीन उघडी केली की ती अधिक गतीने नाश पावतो. तणाचे नियंत्रण कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निश्चित पडेल. त्यासाठी वेगवेगळ्या पिकात उगवणीपूर्व अणि पश्चात मारावयाची तननाशक बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून तणाचे नियंत्रण करता येते. सेंद्रिय पदार्थाने जेवढी जमीन जास्त वेळ झाकता येईल तेवढी जास्त वेळ झाकणे अधिक हिताचे ठरते. यामुळे नांगरणी वखरणी अंतर्मशागत इत्यादी कामे जैविक पद्धतीने होतात. अशाप्रकारे विविध उपाययोजना करून जमिनीत वाढत असलेल्या क्षारांचे प्रमाण कमी करता येते. त्यासाठी सब-सोईलर वापर करण्याची आवश्यकता नसते.
क्षारपड जमीन सुधारणा करायचे असतील तर पुढील उपाय तातडीने करावे लागतात ● अपविष्ट पदार्थांचा वापर, ● जैविक पद्धती, ● कृषी संजीवनी पद्धत, ● निचरा व्यवस्था सुधारणे, ● सेंद्रीय/ हिरवळीच्या खताचा वापर, ● विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वापर, ● रासायनिक पद्धत, ● क्षार सहनशील पिकाचा अंतर्भाव, ● शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, ● शेती पद्धतीत बदल
gurunaththonte@rediffmail.com