आपापल्या मातृभाषेवर ‘निस्सीम’ प्रेम करणं म्हणजे दुसऱ्याही भाषा शिकणं, पण  प्राथमिक शिक्षणापासून विद्यापिठीय शिक्षणापर्यंत किंवा त्यापुढल्या ज्ञानव्यवहारात मातृभाषेचा उपयोग करणं.. तिच्यासोबत आपणही समृद्ध होणं. मराठीत अशा शिक्षणाची गरज वारंवार प्रतिपादन करणाऱ्या एका विद्वानानं, जगभरातल्या भाषांमधल्या प्रयोगांचा आणि लिखाणाचा आधार घेऊन काढलेलं हे विचार-सार..
पाकिस्तानचे गव्हर्नर  जनरल महमद अली जीनांनी २१ फेब्रुवारी १९४८ रोजी, ‘यापुढे पाकिस्तानात (पूर्व पाकिस्तान, आता बांगलादेश धरून) उर्दू ही एकमेव अधिकृत भाषा असेल,’ असा आदेश काढला. खरं तर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील लोकसंख्या जवळजवळ सारखीच होती. आणि बहुसंख्यांची भाषा बंगालीच असलेल्या बांगलादेशातील जेमतेम सात टक्के जनतेला उर्दू येत होती. पश्चिम पाकिस्तानच्या जनतेनं या दंडेलीचा निषेध करून उठाव केला. आणि ढाक्याच्या विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी संप घडवला. सरकारनं संचारबंदी लागू केली. शांततापूर्ण सत्याग्रह चिरडण्याकरिता केल्या गेलेल्या गोळीबारात चार विद्यार्थ्यांचे जीवही गेले. या प्रसंगाच्या स्मृत्यर्थ प्रतिवर्षी २१ फेब्रुवारी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून साजरा केला जावा, असं १९९९ मध्ये युनेस्कोनं अधिकृतपणे घोषित केलं आणि २००० पासून हा दिवस जगभर साजरा होता. पुढे १६ मे २००७ रोजी ठराव करून भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याला, बहुभाषिकतेला, उत्तेजन मिळण्याकरिताही प्रतिवर्षी २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जावा, असं ठरवलं.  बालकांचा शिक्षणाचा अधिकार या दृष्टिकोनातूनही मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित करून सर्वच देशांनी मातृभाषेतून शिकवण्याला उत्तेजन द्यावं, असं आम्ही सांगू इच्छितो, असंही युनेस्कोनं म्हटलं आहे.
बालकांचं प्रारंभीचं शिक्षण मातृभाषेतूनच होणं इष्ट असतं, याबद्दल तज्ज्ञांत कसलेही मतभेद नाहीत. जी भाषा समजतच नाही, तिच्यातून लिहावाचायला लावणं अनिष्ट आहे. उलट, जर आपण एका भाषेवर (आपल्याच) प्रभुत्व मिळवलं असेल तर दुसऱ्या भाषा शिकणं तुलनेनं सोपं जातं, असंही युनेस्कोचं म्हणणं आहे.
या पाश्र्वभूमीवर आपल्या देशात काय अवस्था आहे, हे पाहणंही आवश्यक ठरावं. काहींना वाटतं, आपल्या युवकांना चांगलं इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळं ते मुलाखतीत आपली छाप पाडू शकत नाहीत. काहींना वाटतं, इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही. त्याकरिता आपलं सरकार वनवासींनाही इंग्रजी माध्यमातून शिकवू पाहत आहे. काहींना वाटतं आपल्या भाषा विज्ञानाकरिता अजून सक्षम नाहीत. त्यामुळं माध्यम म्हणून त्यांचा अवलंब करता येणार नाही. स्वातंत्र्याची ६५ र्वष उलटून गेल्यावरसुद्धा आपल्या भाषा सक्षम का झाल्या नाहीत? एखादी भाषा विज्ञानाकरिता सक्षम आहे किंवा नाही हे ठरवण्याची गमकं कोणती? एखादी भाषा सक्षम आहे की नाही, हे कुणाच्या वाटण्यावर ठरतं काय?
एक स्वानुभव. मी एम.एस्सी.च्या वर्गाना अनेक र्वष गणित शिकवलं. वर्गात पुण्याबाहेरीलही विद्यार्थी असत. मुलांना शंकाही येणारच. मुलांनी वर्गात शंका विचारल्याच पाहिजेत. कारण तो त्यांचा अधिकार आहे, असं एक शिक्षक म्हणून माझं स्पष्ट मत आहे. पण, शंका विचारायला ती मुलं बुजत असावीत. म्हणून मी त्यांना सांगत असे, ‘तुम्ही अगदी मराठीत शंका विचारल्यात तरी चालेल.’ मुलांनी याचा लाभ घेतलाही. पदव्युत्तरसुद्धा गणित मराठीत बोलता येतं हे मला जाणवलं. त्यानंतर मी काही पुस्तकांचा मराठीत अनुवादही केला. त्यांपकी एकातलं गणित तर एम.एस्सी.च्याही पलीकडचं आहे. तरीही अनुवादात मला कसलीही अडचण जाणवली नाही.
या संदर्भात आणखीही दोन अनुभव नोंदले पाहिजेत. (अ) माझे एक मित्र डॉ. अरिवद बुचे नागपूर विद्यापीठाचे सांख्यिकी विभागप्रमुख होते, त्यांची पीएच.डी. रशियन विद्यापीठाची! मी त्यांना विचारलं, ‘रशियन शिकायला तुम्हाला किती र्वष लागली?’ ते हसले, ‘र्वष कुठली? सहा आठवडय़ांत शिकलो.’ (आ) १९६०-६१ या वर्षांत मी फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम केला. एकूण २६ ते २८ आठवडे. आठवडय़ांत चार तासिका म्हणजे इन मिनतीन तास.  ८० तासच फ्रेंच शिकूनसुद्धा मला त्या भाषेतील गणिताची पुस्तकं वाचता येऊ लागली. फ्रेंचमधील इतर विषय मी कशाला वाचावेत? मूळ विषय पक्का असल्यावर आपल्या विषयापुरती नवीन भाषा, प्रौढ वयात समजणं कठीण जात नाही.
इतर साऱ्या देशांत आपापल्या मातृभाषांतूनच सर्व शिक्षण दिलं जात असून आपल्या भाषांना तशी संधीसुद्धा न देता केवळ इंग्रजीलाच वाव देऊन वर मराठी सक्षम नाही असं निर्लज्जपणे म्हणतात! यामुळं आपली प्रगती इतरांच्या जवळपासही जाणार नाही इतकी नगण्य असल्याचं अलीकडेच (४ ऑक्टोबर २०१२ आणि १४ डिसेंबर २०१२ ला) लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतून मी मांडलंही होतं.
मातृभाषेतून शिकवण्याचे काही लाभ होतात किंवा हानी होते, याबद्दलचं कसलंही संशोधन न करता, तथाकथित शिक्षणतज्ज्ञ मंत्री आणि शिक्षित पण अज्ञानी पालक इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करून आपल्याच बालकांचा छळ का करीत आहेत? सगळे अताíकक, अशास्त्रीय आणि निराधार निष्कर्षांचा जोरदार पुरस्कार का करीत आहेत? त्यातून अप्रत्यक्षपणे, एकीकडे आपल्या मातृभाषांची अवहेलना आणि दुसरीकडे मुलांचं, परिणामत: राष्ट्राचं नुकसान का करीत आहेत? पण, संशोधनाला किंमत न देता लोकप्रिय लाटेबरोबर वाहत जाणंच आपण स्वीकारतो, असं दिसतं.
मी आणखी तीन पुरावेही देतो. (अ) १९१६ साली मुंबई विद्यापीठानं इतिहासाची परीक्षा मातृभाषांतून देण्याला अनुमती दिली. १९१९ साली आढावा घेण्यासाठी नेमलेल्या डॉ. म. रा. परांजपेंच्या समितीनं परीक्षकांना प्रश्नावली पाठवली. ‘ज्यांनी मातृभाषेत उत्तरं लिहिली त्यांना विषय कळला होता. आणि इंग्रजीत लिहिलेल्यांनी घोकंपट्टी केली होती,’ असं परीक्षकांनी एकमुखानं सांगितलं. (आ) डॉ. अ. रा. कामत यांनी केलेलं पदवीपूर्व परीक्षांच्या दहा वर्षांच्या परीक्षाफलांचं संशोधन गोखले राज्यअर्थशास्त्र संस्थेनं १९६९ मध्ये ‘वेस्टेज इन कॉलेज एज्युकेशन’ नावानं प्रसिद्ध केलं. पान १८९वरील कोष्टक पाहिलं तर, केवळ अर्थशास्त्र विषय आणि मुलींचा गट वगळता मातृभाषेत उत्तरं लिहिणाऱ्या मुलामुलींची टक्केवारी सर्वत्र अधिक असल्याचं दिसेल. (इ) १९७१ साली मा. शा.परीक्षा मंडळानं व्यवसायपूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या, मागील दोन परीक्षांतील कामगिरीचा शोध घेतला. मातृभाषेत शिकलेली मुलं टक्केवारीत शालान्त परीक्षेत पुढं होती. पदवीपूर्व परीक्षेत मागं पडली.. पण व्यवसायपूर्व परीक्षेत पुन्हा पुढं गेली! उच्च शिक्षणही मातृभाषेत असतं तर ही मुलं सदैव पुढंच राहिली नसती का?
आकलनाच्या मज्जाविज्ञानातील संशोधन पाहता ‘मानवाची लघुस्मृती अधिकतम १२ सेकंदच राहते,’ असं शिक्षणतज्ज्ञ हेलन अब्दाझींनी दाखवलं आहे. म्हणून एखादं व्याकरणदृष्टय़ा संपूर्ण वाक्य समजून घेऊन, त्याचं वर्गीकरण करून ते स्मृतिकोशामध्ये साठवण्यासाठी कुणालाही ते १२ सेकंदांतच वाचता यायला हवं. कार्यक्षम वाचनाकरिता माणसाला एका सेकंदात किंवा फार तर दीड सेकंदात एक शब्द, इतक्या वेगानं वाचता यायलाच हवं, असंही अब्दाझी आपल्या एका अन्य लेखात सांगतात. अधिक वेळ लागला तर, वाक्याच्या शेवटाला पोचेपर्यंत बालकाला आरंभाचाच विसर पडतो.
अपरिचित भाषेतील अक्षरांचा अन्वयार्थ लावण्याकरिता बालकांना कष्ट होतात, ते यामुळे. आवश्यक तितक्या वेगानं वाचता आलं नाही, तर अर्थबोधाऐवजी अक्षरबोध होण्यातच सगळी मानसिक शक्ती वाया जाते. अर्थाचं आकलन राहून जातं.
अब्दाझी झांबियातला अनुभव सांगतात :  पहिलीत मुलांना, स्थानिक भाषेसह इंग्रजीही शिकवलं जाई. काही शाळांनी पहिल्या इयत्तेत तोंडी आणि दुसरीपासून लेखी अशा प्रकारे इंग्रजी शिकवून पाहिलं. निष्कर्ष?
पहिलीची सरासरी, सपाटय़ात ५७५ टक्क्यांनी वर सरकली, दुसरीची २,४१७ टक्क्यांनी आणि तिसरीची ३,३०० टक्के इतकी वर गेली! त्याबरोबरीनं स्थानिक भाषेतील प्रगतीही सुधारल्याचं दिसून आलं. भारताकरिता हा प्रभावी वस्तुपाठ ठरावा.
(म्हणून इंग्रजी येणं महत्त्वाचं वाटलं तरी मातृभाषेत चांगलं वाचन-लेखन येणं त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे. विशेषत: स्पेिलग आणि उच्चार या बाबतीत तर्काला पूर्ण फाटा असलेल्या अशास्त्रीय इंग्रजीपेक्षा ध्वनिप्रधान भारतीय भाषा आकलनासाठी शेकडो पटीनं श्रेष्ठ होत. – लेखक)
आशियातील सामाजिक भाषासमूहांमधील अडसर निवारण्याकरिता काम करणारे कर्क पर्सन आणि सेना ली २१ डिसेंबर २०१२च्या ‘बँकॉक-पोस्ट’ मधील लेखात म्हणतात : परिसराचं आकलन सहजपणे होण्याकरिता प्रत्येक बालकाच्या दृष्टीनं मातृभाषेचं महत्त्व अनन्य आहे. आरंभीच्या काळात मुलांना मातृभाषेतून शिकवण्यामुळं त्यांचं विषयाचं आकलन सर्वोत्कृष्ट होतं, असाच जगभरातील अनुभव आहे. तरीही पुष्कळदा, त्यांना माहीत नसणाऱ्या भाषेतून शिकवण्याचाच हट्ट धरल्याचं (आपल्यासारखा?) आढळतं. परकीय असली तरी बालकांनी त्याच भाषेतून शिकावं अशी सक्ती असते. पण, अपेक्षेनुसार गुण मिळू शकणाऱ्या मुलांची संख्या त्या परिस्थितीत, १५ टक्केसुद्धा नसते. बहुसंख्य बालकं, शरीरानं ती शाळेत असली तरी भाषेच्या अडसरामुळं खऱ्या शिक्षणाच्या बाहेरच फेकली जातात.
युनेस्को, युनिसेफ, विकासात सहभागी इतर संस्था, बहुभाषक राष्ट्रांना, शिक्षणात मातृभाषेचाच अवलंब करण्याची जोरदार शिफारस करतात. भाषिक अल्पसंख्याकांच्या बालकांनाही मातृभाषांतूनच शिकवणं ही चन नसून शैक्षणिक सोयीसवलती मिळण्याचा तो त्यांचा मूलभूत अधिकार होय. त्यातही दुसरी आणि आणखी काही भाषा शिकण्याकरिता सुद्धा मातृभाषेवर पुरेसं प्रभुत्व मिळण्याचाही त्यांचा अधिकार आहे. सारांश राष्ट्रभाषेवर (संपर्कभाषेवर) प्रभुत्व मिळवण्याकरितासुद्धा मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणं हाच राजमार्ग होय. इति युनेस्को.
विनंती : स्वतला, राष्ट्राला आणि साऱ्या जगाला मातृभाषेमुळं किती तरी महत्त्वाच्या संधी मिळतात, हे आंतरराष्ट्रीय मातृभाषादिनानिमित्त लक्षात घेऊन आणखीही भाषा शिका. आपल्या भाषांत इतरांना सहभागीही करून घ्या. पण आपापल्या मातृभाषेची महती कधीही विसरू नका. तिची कधीही उपेक्षा करू नका, अनादर वा अवहेलनाही करू नका.
 लेखकाचा विरोप-पत्ता:
railkar.m@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contemplation of mother tongue day
Show comments