– गिरीश कुबेर
AliExpress या नावावरनं तसा काही फार अर्थबोध होणार नाही. करोनाची साथ आल्यापासून ही अलीएक्स्प्रेस भलतीच सुसाट धावतीये. आपल्या देशात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे धापा टाकतायत. सरकार एकदा म्हणतं त्यांना व्यवसायाची परवानगी देणार. मग म्हणतं नाही. या गोंधळात आपल्याकडे अनेक रुतून बसलेत. पण अलीएक्स्प्रेसचं मात्र तसं नाही.
खुद्द इंग्लंडबरोबर रशिया, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, पोर्तुगाल, टर्की, पोलंड, इस्रायल, झालंच तर इकडे आशियात जपान, कोरिया, थायलंड, व्हिएतनाम, सौदी अरेबिया अशा अनेक देशांत अलीएक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झालीये. इतकी लोकप्रिय की अनेक नागरिक आता आपल्या पारंपरिक अॅमेझॉनला घटस्फोट देत या अलीएक्स्प्रेसचा हात धरू लागलेत. काय कारण असेल?
एक म्हणजे अलीएक्स्प्रेसवर सर्व काही स्वस्त आहे. अॅमेझॉन किंवा वॉलमार्टपेक्षाही स्वस्त. आणि स्वस्ताई ही अशी सुंदरी आहे की भले भले विवेकी विश्वामित्रसुद्धा तिच्या प्रेमात पडतात. आणि अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना, नोकऱ्या नसताना आणि असल्या तर वेतन कपातीची टांगती तलवार डोक्यावर असताना चार पैसे वाचत असतील तर नाही कोण म्हणेल? त्यामुळे अलीएक्स्प्रेस सध्या पाश्चात्त्य जगात अतिलोकप्रिय होण्याचं हे एक कारण.
आणि दुसरं आणि पहिल्यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या जगात अत्यावश्यक असलेल्या चीजवस्तू फक्त अलीएक्स्प्रेसवर मिळतात. उदाहरणार्थ मुखपट्टय़ा. गावात अचानक करोनाची साथ आलीये आणि नेमका या मुखपट्टय़ांचा तुटवडा निर्माण झालाय. घरच्या घरी बनवायच्या तर शिलाई मशीन वगैरे नाही. मग अशा वेळी सोपा पर्याय म्हणजे अलीएक्स्प्रेस.
परत त्यात या मुखपट्टय़ांबाबत एकवेळ वेळ मारून नेता येईल. पण पर्सनलाइज्ड प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, म्हणजे सध्याचा चलनी शब्द म्हणजे पीपीई किट्सचं काय? हे म्हणजे जगणं आणि मरणं यातलं अंतर वाढवणारे तीन थर. ते अंगावर चढवले की जीव गुदमरतो, पाणीही पिता येत नाही.. वगैरे जरी खरं असलं तरी या पीपीईस करोना विषाणू भेदू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस वगैरेंसाठी हे फार महत्त्वाचे असतात. पण महत्त्वाच्या गोष्टींची नेहमीच टंचाई असते. आणि या पीपीई किट्सची तर जगात टंचाई आहे. थोडय़ा वेळापूर्वी रशियाचे सर्वशक्तिमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही या पीपीई टंचाईविषयी नाराजी व्यक्त केली.
आणि ही अलीएक्स्प्रेस पीपीई किट्ससुद्धा विनासायास पुरवते. मार्च महिन्यात जगात करोनाचा आगडोंब उसळल्यापासून या अलीएक्स्प्रेसद्वारे किती पीपीई साधनं जगभरात विकली गेली असावीत?
अलीएक्स्प्रेसनं १५० देशांत चार कोटींपेक्षा अधिक पीपीई किट्स आणि त्या प्रकारची साधनं विकलीयेत. याखेरीज खुद्द जागतिक आरोग्य संघटनेला १० कोटी ११ लाख किट्स देण्याची घोषणाही अलीएक्स्प्रेसनं केलीये. स्पेन आणि इटली हे युरोपातील सर्वाधिक करोनाबाधित देश. या देशांत त्यामुळे अलीएक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झालीये. या देशातून अलीएक्स्प्रेस वापरणाऱ्यांच्या संख्येत त्यामुळे २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं आकडेवारीतून दिसतंय.
साहजिकच अलीएक्स्प्रेसतर्फे या आणि अशा युरोपीय देशांत आपल्या मोठमोठय़ा जाहिराती केल्या जातायत. त्या देशातली वर्तमानपत्रं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, समाजमाध्यमं अशा अनेक मार्गानी अलीएक्स्प्रेस लोकांपर्यंत पोचतीये. तिची उपयुक्तता अनेकांना पटू लागलीये.
पण प्रश्न असा की जगात अन्य कोणाला काहीही जमत नसताना या एकटय़ा अलीएक्स्प्रेसला हे कसं काय जमतं? आणि मुख्य म्हणजे इतका स्वस्त दर सगळ्यासाठी देणं त्यांना कसं परवडतं? प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर त्याहून अधिक.
चीन हे त्याचं उत्तर. अलीएक्स्प्रेसनं आपल्या सगळ्या गरजांसाठी चिनी उत्पादकांना बांधून ठेवलंय. चीन जगात सर्वात स्वस्त उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेच. त्यामागे त्या देशाचं व्यापार धोरण, भव्य आणि अत्यल्प मोबदल्यात उत्पादनं तयार करणारी व्यवस्था अशी अनेक कारणं आहेत. त्याची चर्चा करण्याचं हे स्थळ नव्हे. पण याच कारणांमुळे जगातल्या जवळपास सर्व बलाढय़ कंपन्या चीनमध्ये आपले कारखाने काढतात. भारतातल्या एका लोकप्रिय घडय़ाळ निर्मात्यानंही आपला कारखाना गुजरातमधून चीनला हलवल्याचं माहीत असेलच. तर ही सर्व यंत्रणा अलीएक्स्प्रेसच्या मागे आहे.
आणि सगळ्यापेक्षाही महत्त्वाचा आहे तो जॅक मा आणि त्याची अलिबाबा ही कंपनी. अलीएक्स्प्रेस ही अलीबाबा या कंपनीची उपकंपनी आहे. करोनाकाळचा सर्वाधिक फायदा अलीबाबाला झाल्याचं अनेक पाहण्यांतून दिसतंय. लवकरच ही कंपनी जगातल्या सर्वाधिक बलाढय़ कंपन्यांत गणली जाईल.
ही खरी कमाल. आजाराची साथ पसरली चीनमध्ये आणि या साथीचा सर्वात मोठा नफेकरीही चीनच.
संकटातली नाही तर संकट हीच संधी असं चीन वागतोय आणि आपण ‘संकटातील संधी’ या विषयावर गप्पा मारू या..
@girishkuber