– गिरीश कुबेर
काही चक्रांची गती बदलणं अजून तरी कोणाला शक्य झालेलं नाही. म्हणजे एखाद्याकडे रग्गड पैसा आहे म्हणून त्याच्या कुटुंबीयांसाठी नऊ महिन्यांची गर्भावस्था कमी करता येते, असं काही होत नाही. किंवा महासत्ताधीश आहे म्हणून काही त्याला अमावास्या-पोर्णिमा यातलं अंतर कमी करता येतं असं नाही. म्हणजे काही काही गोष्टींना वेळ लागतो तो लागतोच. तो काही कमी करता येत नाही.
लस.. एखाद्या आजारावरची लस.. हा एक असा पदार्थ आहे की त्याला हवा तितका वेळ द्यावाच लागतो. ‘‘मी खूप मोठा माणूस आहे, मला लगेच अमुकतमुकवर लस तयार करून हवी,’’ असं काही करायची सोय नाही.
एडवर्ड जेन्नर यानं जेव्हा १७९६ साली देवीच्या लसीचा प्रयोग केला, तेव्हा एकाच्या अंगात देवीचे जंतू टोचल्यानंतर दुसऱ्यावर त्याचा प्रयोग करण्याआधी पहिल्याचं काय झालं हे पाहण्यात त्यानं दोन वर्ष वाट पाहिली. साध्या गालगुंडावर लस तयार करायला एकूण चार वर्ष लागली. साथीच्या आजारात तुलनेनं ताज्या असलेल्या एबोलाची लस तयार होईपर्यंत पाच वर्ष लागली. असे अनेक दाखले देता येतील.
ही प्रक्रिया किमान तीन टप्प्यांत होते. प्रथम प्राण्यांत आजाराचे जंतू टोचायचे, त्यांची प्रतिक्रिया पाहायची, नंतर काही माणसांत, मग प्रतिपिंडांचा (अॅण्टिबॉडीज) माग घ्यायचा, नंतर साधारण पण किमान १०० जणांना संभाव्य लसीचा पहिला आराखडा टोचायचा, त्यांचं निरीक्षण करायचं आणि त्यात काही दगाफटका झाला नाही तर हजारो -किमान १० हजार वा तत्सम- जणांना हे औषध टोचून त्याचा शास्त्रशुद्ध पाठपुरावा करायचा.. त्यांच्या सर्व नोंदी ठेवायच्या. आणि इतकी सगळी माहिती जमल्यावर सगळ्या दस्तावेजाच्या, शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे सर्वासाठी ‘लस’ बनवण्याचा परवाना मागायचा. तो मिळायला काही काळ जाणार. अमेरिकी एफडीए सर्व तपासणार. आणि मग कुठे ही लस बनवायची परवानगी मिळणार. अलीकडच्या काळात गर्भाशयमुख कर्करोगावर लस आली. तिच्यासाठी चाचण्या झाल्या ३० हजार. बालकांत एक प्रकारे अतिरेकी हगवण ज्यामुळे होते त्या रोटाव्हायरस विरोधातल्या लसीसाठी ७० हजार चाचण्या घेतल्या गेल्या.
हा तपशील अशासाठी समजून घ्यायचा कारण सध्याच्या करोनाला रोखण्यासाठी इतक्या चाचण्या केल्या जाण्याची शक्यताच नाही. आणि त्या करायच्या म्हटल्या तर लस विकसित करायला आणखी विलंब होणार. म्हणजे त्यामुळे आणखी जीव या लसीच्या प्रतीक्षेत जाणार.
पण याबरोबर या करोना लसीच्या निर्मितीत आणखी एक धर्मसंकट आहे. ते असं की आतापर्यंत अशा आजारांसाठी लसी शोधल्या गेल्या की ज्यांच्या आजारांवर कोणते ना कोणते उपचार उपलब्ध आहेत. हा मुद्दा समजून घ्यायला हवा. लस ही प्रतिबंधासाठी असते. म्हणजे आजार होऊ नये यासाठी. पण तो आजार समजा झालाच तर त्यावर उपचार असतो. करोनाच्या लसनिर्मितीत हीच खरी अडचण आहे. त्यावर नक्की उपाय काय हेच अजून निश्चित झालेलं नाही. या मुद्दय़ावर सगळेच चाचपडतायत. त्यामुळे धर्मसंकटकारी मुद्दा असा की, ज्या आजारावर उपचार नक्की नाही त्या आजारासाठी लस तयार करणे हे धोकादायक तर नाही? प्रश्न फार महत्त्वाचा. कारण करोनावर लस तयार करायची म्हणजे तो आजार कोणाच्या तरी शरीरात टोचायचा. म्हणजे त्या व्यक्तीस करोनाची बाधा होईल अशी व्यवस्था करायची. त्याप्रमाणे ती बाधा त्याला झाली, त्याचा आजार बळावला आणि त्यावर उपचारच नाही असं झालं तर? परत नेहमीच्या परंपरेप्रमाणे त्या रसायनास ‘लस’ असा दर्जा द्यायचा असेल तर हजारो जणांच्या अंगात करोनाचे विषाणू सोडायला हवेत. म्हणजे हजारो जीव धोक्यात घालायचे? मानवजातीच्या कल्याणासाठी अशा लसनिर्मितीत सहभागी होणाऱ्यांतील काही स्वयंसेवकांचे जीव यात नक्की जाणार असं संबंधित आताच म्हणतायत. तेव्हा हे ‘जाणारे’ स्वयंसेवक कोण कसं ठरवायचं?
मध्यंतरी, २०१६ साली, झिका नावाच्या विषाणूला रोखण्याच्या प्रयत्नात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या विषाणूच्या बाधेनं ताप यायचा, अंगदुखी व्हायची, डोळे आल्यासारखं व्हायचं. काहींच्या अंगावर पुरळ वा चट्टे यायचे. पण हा विषाणू करोनाइतका जीवघेणा धोकादायक नव्हता. त्याच्यासाठीही सुरुवातीला करोनाप्रमाणे औषध नव्हतं. आणि करोनाप्रमाणेच औषध नसताना त्याला रोखण्यासाठी लसनिर्मितीचा प्रयोग झाला. पण यात सहभागी होणाऱ्यांच्या जिवाला धोका आहे असं लक्षात आल्यावर अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण यंत्रणेनं परवानगीच दिली नाही. आधी औषध विकसित करा, मगच लस. तेव्हा करोनासारख्या धोकादायक आजाराच्या बाबत अशी परवानगी कशी मिळेल, हा साधा प्रश्न.
पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या सगळ्याच्या वर आहेत. त्यांना हे मुद्दे काही लागत नाहीत. पुढच्या १८ महिन्यांत करोनाची लस येईल, असं ते सांगतायत. आज इस्रायलनंही घोषणा केलीये लस लवकरच येत असल्याची. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना जसं २००५ साली कळलं होतं बर्ड फ्लूची साथ येणार असल्याचं. तसंच काही आहे का हे? आजाराआधीच उपचार माहीत असायची दूरदृष्टी असते काही जणांना.. पण आजार आला म्हणजे लसही लगेच धावून येते असे कधी होते का..?
@girishkuber