– गिरीश कुबेर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंडच्या नील फर्ग्युसन आणि तत्समांच्या करोनाबळींच्या अंदाजाने सगळेच कसे बदलले ते आपण पाहिले. अमेरिकेसह अनेक देश या अंदाजाच्या दडपणाखाली चिरडून जात असताना एक देश मात्र त्याविरोधात ठामपणे उभा राहिला. युरोपातला असूनही अन्य युरोपीय देशांप्रमाणे तो अजिबात तसा वागला नाही. या संभाव्य मरणाच्या अंदाजाचे कोणतेही दडपण त्या देशाने घेतले नाही.
स्वीडन हे त्या देशाचे नाव. उत्तर ध्रुवाच्या जवळ असलेला हा देश बोफोर्स आणि वोल्वो या दोन मोठय़ा नावांमुळे आपल्याला परिचित. आसपासच्या सर्व देशांत करोनाची साथ धुमाकूळ घालत होती त्या वेळी स्वीडनने त्या देशांच्या तालावर नाचायला पूर्ण नकार दिला. या देशाच्या धुरीणांनी करोना थमानाचे जे प्रारूप अन्य देश सादर करीत होते, तेच अव्हेरले. अशा प्रकारच्या साथी जेव्हा येतात त्या वेळी प्रयोगशाळेत अंदाज बांधत बसणाऱ्यांना, संगणकावर प्रारूपांच्या समीकरणांची आकडेमोड करीत बसणाऱ्यांना वाटते त्यापेक्षा किती तरी लवकर नागरिकांत ‘सामुदायिक प्रतिकारशक्ती’ तयार होते, हे त्या देशाचे अभ्यासपूर्ण निरीक्षण. त्यामुळे अन्य देशांप्रमाणे स्वीडन टाळेबंदीच्या लाटेत एक दिवसही अडकला नाही की नागरिकांच्या स्वातंत्र्यावर त्या देशाने गदा आणली नाही.
आज स्वीडन अनेकांच्या मते रास्त ठरतो आहे. आजच्या तारखेपर्यंत त्या देशातल्या करोनाबाधितांची संख्या आहे २६,३२२ आणि त्यातले ३,२२५ इतके जण प्राणास मुकले. त्या देशाची लोकसंख्या आहे जेमतेम सव्वा कोटी. म्हणजे आपल्या मुंबईइतकी. तेव्हा त्यामानाने ही बळींची संख्या जास्तच म्हणता येईल. पण आपला आकार केवढा, आपण शहाणपणा दाखवतो कोणत्या मुद्दय़ावर याची जराही काळजी न करता स्वीडन आपल्या मतावर ठाम राहिला.
आज परिस्थिती अशी आहे की निम्म्यापेक्षा जास्त जग शोकाकुल असताना आणि उरलेले, टाळेबंदी सुरू ठेवावी की मागे घ्यावी या द्वंद्वात गोंधळलेले असताना स्वीड नागरिक वसंताचा आनंद घेत आहेत. त्या देशातल्या बागा फुललेल्या आहेत, रेस्टॉरंट्स ओसंडून वाहात आहेत आणि जनजीवन करोनाछायेबाहेर आहे.
हे त्या देशाला कसं जमलं?
करोनाचा मुकाबला करण्यासाठी स्वीडनचं धोरण इतरांसारखं अजिबात नव्हतं. म्हणजे ‘‘चला करोनाचा पराभव करू या’’, ‘‘करोनावर मात करू या’’ किंवा ‘‘घरी बसा, देश वाचवा’’ अशा प्रकारच्या कोणत्याही हास्यास्पद घोषणा स्वीडिश राज्यकर्त्यांनी दिल्या नाहीत. त्यांनी केले ते इतकेच. जे या आजाराला बळी पडू शकतात..
म्हणजे वयस्कर, मधुमेह/ रक्तदाब/ मूत्रिपड विकार असे जे नागरिक होते, त्यांना यांपासून वेगळे ठेवले आणि दुसऱ्या पर्यायाचा तर आपण विचारच करू शकत नाही.
हा पर्याय म्हणजे त्यांनी निरोगी, तरुण आणि धट्टय़ाकट्टय़ा नागरिकांत करोना पसरू दिला. हे असे करणे धोक्याचे होते. पण त्या देशातील सार्वजनिक आरोग्य विभाग धुरीणांचा विज्ञानावर विश्वास होता. मुख्य म्हणजे ते कोणत्याही प्रकारे कसल्याही प्रचाराला बळी पडत नव्हते. ‘‘या आमच्या धोरणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. राजधानी स्टॉकहोममधला करोना प्रसाराचा आलेख आता सपाट झाला आहे आणि तो उताराकडे निघाला असल्याच्या स्पष्ट खुणा दिसू लागल्या आहेत,’’ असे त्या देशाचे मुख्य साथविकारतज्ज्ञ डॉ. आंद्रेस टेग्नेल यांचे म्हणणे. स्वीडनमध्ये सुरुवातीला जोर होता तो स्टॉकहोममध्ये. अन्यत्र देशात करोनाचा इतका प्रसार नाही.
यातील सर्वात महत्त्वाची बाब अशी की त्या देशात करोनास तोंड देण्यासाठी ‘सामुदायिक प्रतिकारशक्ती’ तयार झाली ती फक्त २० टक्के नागरिकांना या विषाणूची बाधा झाल्यानंतर. यामुळे या संदर्भातील गृहीतकालाच मोठा तडा गेला आहे. याचे कारण असे की तोपर्यंत किमान ६० टक्के नागरिकांत या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तोवर सामुदायिक प्रतिकारशक्ती तयार होत नाही, असे मानले जात होते. परिणामी या ६० टक्क्यांच्या भीतीनेच सरकारांनी नागरिकांना घराघरांत कोंडले आणि करोनाचा वारा लागणार नाही अशी व्यवस्था केली. सुरुवातीच्या काळात खरे तर स्वीडनमध्ये करोना प्रसाराचा वेग आणि मृत्यूचे प्रमाण हे शेजारील देशांच्या तुलनेत जास्त होते. यात प्राधान्याने बळी गेले ते स्वीडिश वृद्धाश्रमांत. ‘‘त्यामागच्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत,’’ असे डॉ. टेग्नेल सांगतात. पण एरवी आजाराची लक्षणे दिसल्याखेरीज उगाच भरमसाट चाचण्याही त्या देशाने केल्या नाहीत. अलीकडच्या काळात मात्र त्यांची संख्या स्वीडनने वाढवली. कारण वैद्यकीय कार्यकत्रे, रुग्णांचे नातेवाईक यांच्यात संसर्ग वाढू नये म्हणून. पण स्वीडनला खात्री आहे, आपण योग्य मार्गावर आहोत याची.
दुसरी एक आकडेवारी स्वीडनचे धोरण किती योग्य आहे ते दाखवते. ही आकडेवारी आहे विविध देश/शहरांतल्या अतिरिक्त मृत्यूंची. म्हणजे करोनामुळे जे अधिक दगावले त्यांची. या काळात मरण पावलेल्यांचे प्रमाण बेल्जियममध्ये होते ६०%, नेदरलँडमध्ये ५१%, न्यूयॉर्क शहरात २९९%, लंडन शहरात ९६% आणि स्वीडन देशात अवघे १२%.
याचा अर्थ सरळ आहे. जितकी टाळेबंदी कठोर तितके बळींचे प्रमाणही अधिक.
आता यातून आपण काही शिकणार.. की केवळ लढण्याचीच भाषा करणार..?
@girishkuber