– गिरीश कुबेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लशीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. जगभरात कोण-कोण या लशीसाठी प्रयत्न करतायत आणि भारतात त्याबाबत काय स्थिती आहे, याचाही विषय बैठकीत चर्चिला गेला. आपल्याकडेही तीन-चार कंपन्या करोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या कामाला लागल्यात. या बैठकीत पंतप्रधानांना लस बनवण्याच्या तिसेक प्रयत्नांची माहिती दिली गेली.
आजमितीला जगभरात शंभराहून अधिक देश/संस्था करोनाला रोखण्यासाठी लस बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. खरं तर प्रत्येकालाच ही लस तातडीनं हवी आहे. पण या शंभरभरातल्या साधारण ३० जणांच्या प्रयत्नांना काही एक निश्चित दिशा आहे आणि त्यांना गतीही आलीये. म्हणून पंतप्रधानांना या ३० अशा ठोस प्रयत्नांचा तपशील दिला गेला.
या बैठकीच्या दिवशीच इस्रायलमधनं बातमी आली. त्या देशाचे संरक्षणमंत्री नफ्ताली बनेट यांनी आपला देश करोनाला रोखणारी लस तयार करण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यावर असल्याची ती घोषणा होती. बनेट यांनी याबाबत संशोधन करणाऱ्या ‘इस्रायल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च’ या गुप्त संस्थेला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. ही संस्था थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संलग्न आहे. म्हणजे अन्य कोणा मंत्र्याकडे तिची जबाबदारी नाही. याचा अर्थ या संस्थेत काय सुरू असेल हे सांगायची गरज नाही. अनेक देशांच्या अशा संस्था असतात. सगळ्यांचं एक समान वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या कारभारातली गुप्तता. असो. तो काही आजचा विषय नाही.
तर बनेट यांच्या भाषणानं १९८४ सालच्या भाषणाची आठवण आली. ते केलं होतं मार्गारेट हेक्लर यांनी. त्यावेळी त्या अमेरिकेच्या आरोग्यमंत्री होत्या. त्यावेळी एका नव्या विषाणूच्या आगमनाची चर्चा सुरू होती. दबक्या आवाजात त्याची चर्चा होत असे आणि या विषाणूचा संसर्ग म्हणजे जगाचा निरोप असंच मानलं जात असे. परत त्या विषाणूच्या बाधेत लाज वाटावी असा एक ‘गुण’ होता.
हा विषाणू म्हणजे ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम’.. एचआयव्ही.. म्हणजे ‘लोकप्रिय’ असा एड्स घडवून आणणारा. या विषाणूनं आपले रंगढंग दाखवायला सुरुवात केली होती आणि त्याला रोखायचं कसं हा जगापुढचा प्रश्न होता. ते आव्हान होतं.
अमेरिकी शास्त्रज्ञ ते आव्हान जास्तीत जास्त दोन वर्षांत पूर्ण करतील अशी घोषणा हेक्लर यांनी त्यावेळी केली. ‘‘अमेरिकी संशोधकांना या विषाणूचा शोध लागला असून पुढच्या दोन वर्षांत यास प्रतिबंध करणारी लस निश्चितपणे तयार होईल,’’ ही हेक्लर यांची घोषणा.
त्यानंतर साधारण ३६ वर्ष आणि ३ कोटींहून अधिकांचे बळी गेल्यावरही ही लस काही अजून तयार होऊ शकलेली नाही. त्याही वेळी आणि त्यानंतर अमेरिकेप्रमाणे अनेक मोठे देश या लस निर्मितीच्या मागे हात धुऊन लागले होते. ती लस काही अजून तयार होऊ शकलेली नाही. पण एड्स हे काही एकमेव उदाहरण नाही.
जगात सर्वत्र प्रचंड छळणारा आजार म्हणजे नागीण. हे त्याचं खास भारतीय, घाबरवणारं नाव. घाबरवणारं अशासाठी की या ‘नागिणी’ची दोन टोकं जोडली गेली की खेळ खलास.. अशा प्रकारची अंधश्रद्धा अजूनही आपल्याकडे आहे. तर २०१६ साली जगात जवळपास ३२० कोटी जणांना ही नागीण डसल्याची नोंद आहे. हर्पिस नावानं ओळखला जाणारा हा आजारही असाच विषाणूजन्य. जगातले वैद्यकतज्ज्ञ गेली तब्बल ४० वर्ष झगडतायत. पण या आजाराला रोखणारी लस अजूनही काही तयार होऊ शकलेली नाही.
अलीकडची अशी मोठी साथ म्हणजे ‘सार्स’. ‘सिव्हियर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ हा खरं तर सध्या आपल्याला ग्रासणाऱ्या ‘करोना’चा भाऊ. त्यावरही लस बनवण्याचा प्रयत्न झाला. पण तो अंगाशी आला. झालं असं की त्या मूळ विषाणूपेक्षा या आजारावरची लसच अधिक जीवघेणी ठरली. बरं व्हायच्या ऐवजी ती लस दिल्यानं माणसं आजारी पडली आणि दगावली. त्यामुळे तो प्रयत्नच सोडून दिला गेला.
डेंग्यू या आजारावरही लशीचे प्रयत्न गेली कित्येक वर्ष सुरू आहेत. अजून काही त्यात एकाही देशाला यश आलेलं नाही.
तात्पर्य : प्रयत्न सुरू आहेत म्हणून लस तयार करण्यात यश येतंच असं नाही.
ऐंशीच्या दशकात एका प्रायोगिक नाटकातला एक प्रसंग खूप गाजला होता. ‘‘बस आली, बस आली, बस आली,’’ असं त्यातला मुलगा म्हणायचा. आणि त्यावर आई विचारायची : कुठे आहे ती बस.. आपली नाही ती बस..
यात बस या शब्दाच्या जागी लस हा शब्द घालायचा.. बाकी सर्व तेच.
@girishkuber