गिरीश कुबेर

सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत. त्यांना शक्यतो मोठे उद्योग, प्रकल्प मनापासून आवडतात. लघू, सूक्ष्म उद्योगांसाठी काही करण्यापेक्षा एखादा भव्य प्रकल्प.. तोही आपल्या मतदारसंघात.. सुरू करून देता आला की राजकारणी कृतकृत्य. तसं बरोबरच त्यांचं. मोठय़ा प्रकल्पातनं सगळंच काही मोठं ‘मिळतं’. परत कोनशिला वगैरे.

आजारांचंही तसं आहे. सर्व सत्ताधाऱ्यांना मोठे आजार आवडतात. एड्स, एबोला, सार्स, मार्स, करोना असे एकापेक्षा एक भारदस्त नावं असलेले. साधी सर्दीपडशी, पोटाचे विकार, हत्तीरोग किंवा कुष्ठरोग वगैरेसाठी काम करण्यात इतकी मजा नाही. त्यापेक्षा एड्स प्रतिबंधात्मक कार्यक्रम हाती घेणं, त्यासाठी ‘जनजागृती’ (?) करणं, देहविक्रय करणाऱ्यांच्या वस्त्यांत कंडोम वाटपाचे पुरोगामी फोटो छापून आणणं वगैरेतला आनंदच वेगळा. साध्या सर्दीपडसं प्रतिबंधासाठी काम केल्यावर कोणी काही दखलही घेत नाही. ‘एबोला’ किंवा सार्स प्रतिबंधक उपाय योजले तर किती गवगवा होतो. औषध कंपन्या मदतीला येतात, जागतिक आरोग्य संघटना पाठीवर थाप मारते, प्रसारमाध्यमं कौतुक करतात.. आणि मुख्य म्हणजे आपण प्रजेच्या आरोग्याची किती काळजी करतो.. असं मिरवता येतं या मोठय़ा आजारांची बडदास्त ठेवली की. किती मोठेपणा सांगावा या मोठय़ा आजारांचा.

तो सगळा मोठेपणा मिरवायची संधी आपल्याला या करोनानं दिलीये. पण आज ना उद्या करोना जाईल. ‘महापुरे झाडी जाती’.. तसा हा करोनोत्सव संपेल. पण ‘तेथे लव्हाळी वाचती’ या उक्तीप्रमाणे आपले नेहमीचे आजार होते तिथेच असलेले दिसतील. या इतक्या आरोग्य- जागृती वगैरेंच्या काळातही त्यांच्याबाबत आपण काहीही केलेलं नाही.. खरं तर त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं.. असं लक्षात येईल. तेव्हा याबाबत पुढे काय होणार आहे याच्या खुणा आताच दिसू लागल्यात.

दरवर्षी साधारण या महिन्यात ओरिसा राज्यात पावसाळ्यातल्या खबरदारीची कामं हाती घेतली जातात. साधारण ४० हजार आरोग्यसेवक त्या राज्यातली सगळी जंगलं, पाणथळ जागा, मानवी वस्त्या वगैरे पिंजून काढतात. हे सगळं पडू लागलेल्या पावसाबरोबर घोंघावू लागणाऱ्या डासांचा प्रतिबंध करता यावा यासाठी. सर्वसाधारणपणे पाहू जाता जून ते सप्टेंबर हे चार पावसाचे महिने. पण ओरिसात जूनपासून ऑक्टोबपर्यंतचा काळ पावसाबरोबरीने हिवतापाचा.. म्हणजे मलेरियाचा. या आजारानं या पाच महिन्यांत ओरिसा ग्रासलेला आणि म्हणून त्रासलेला असतो. ते पूर्वेकडचं राज्य. परत समुद्रकिनाराही अविकसित. त्यामुळे डासांची स्वप्नभूमी.

म्हणून दरवर्षी ओरिसात आगामी हिवतापासाठी उपाय योजले जातात. म्हणजे मुंबईत पावसाळ्याच्या आधी नालेसफाई किंवा रस्ताखड्डेभरणी केली जाते, तसं ओरिसा करतो. या दोघांतला फरक असा की ओरिसाच्या या उपायांचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत. त्या राज्यातल्या हिवतापाचं प्रमाण गेली काही वर्षे सातत्यानं कमी होतंय. २०१६ पासून गेल्या वर्षीपर्यंत ओरिसानं हिवतापात आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत थेट ९० टक्क्यांनी कपात करून दाखवलीये. गेल्या वर्षी या आजारानं ३,३४,६९३ इतके आजारी पडले. आणि त्यातल्या फक्त ५० जणांना प्राण गमवावे लागले. आपल्याकडे वर्षभरात सरासरी १० हजार जणांना या हिवतापात मुक्ती मिळते. ही संख्या लक्षात घेता ओरिसाचं यश निश्चितच कौतुकास्पद.

ते मिळावं यासाठी त्या राज्यानं शास्त्रशुद्ध प्रयत्न केले. एप्रिल-मे महिन्यात राज्य या ४० हजारभर कार्यकर्त्यांनी पिंजून काढणं, पाणथळ जागी डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी फवारणी करणं, काही भागांत मच्छरदाण्यांचे वाटप, गप्पी माशांच्या पैदाशीला उत्तेजन असे अनेक उपाय या राज्याने गेली काही वर्षे सातत्याने योजले. आणि इतकं करूनही हिवताप येणारच असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना आवडलेलं आणि दोस्तीखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भरभरून दिलेलं हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे औषध आहेच. या सगळ्या उपायांमुळे त्या राज्यानं हिवताप यशस्वीरीत्या नियंत्रणात आणला.

पण हे सगळं मुसळ यंदा केरात जाण्याची शक्यता आहे. कारण हे ४० हजार हिवताप कार्यकर्ते करोनाच्या दिमतीला यंदा दिले गेलेत. त्यामुळे ओरिसात अजूनही हिवताप प्रतिबंधाची कामं सुरू होऊ शकलेली नाहीत. सर्व काही करोनामय आणि सगळी सूत्रं केंद्राकडे. त्यामुळे ओरिसात अनेक आरोग्य समाजसेवी संस्थांनी हिवतापाच्या साथीसाठी तयार रहा, असा इशारा दिलाय. आपण गेल्या चार वर्षांत हिवताप नियंत्रणात जे काही कमावलं ते सर्व आता गमावून बसणार आहोत.. असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञाचं म्हणणं आहे. हिवताप पुन्हा पहिल्यासारखा बळावला तर पुन्हा त्यावर नियंत्रण मिळवायला बरेच कष्ट पडतील, असा या तज्ज्ञांचा इशारा. तेव्हा करोना वगैरे आहेच, पण आपल्या नैमित्तिक आरोग्य आवाहनांना सामोरं जायची तयारी करू या.. असं त्यांचं म्हणणं.

या छोटय़ा पण महत्त्वाच्या गोष्टी ऐकायला वेळ आहे का कुणाला, हा प्रश्न. शेवटी सगळ्यांनाच.. ‘बडे’ अच्छे लगते है..

@girishkuber