विरोधी पक्षावर टीका करण्याचा जन्मसिध्द हक्क प्रत्येक पक्षाला असतोच, असतो. लोकशाहीने समाजात वेगवेगळे विचार प्रवाह मान्य केले आहेत. टीका केली जात असताना ती समाजोपयोगी आहे, की वैयक्तिक पातळीवरील आहे हे आता दूरच राहिले. जो तो राजकीय नेता विरोधी विचारांनाच शत्रू या भूमिकेतून पाहत असल्याचे चित्र राजकारणात पाहण्यास मिळते. एखाद्या घराण्याला सत्तेची संधी मिळाली, की त्याचेच वारसदार पुढील हंगामात मैदानात उतरत असतात. यातूनच लोकशाहीतील संस्थानिके बनली असल्याची टीका वारंवार होते. घराणेशाहीचा आरोप तर भाजपकडून हमखास करून विरोधी पक्षाला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न प्रचारादरम्यान केले जातातच. अशीच टीका भाजपचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर हेही करीत असतात. ही टीका करीत असताना त्यांनी केवळ आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायाने पवार घराण्याला लक्ष्य केले आहे. मात्र, घराणेशाहीचा आरोप करणारे आमदार पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे जिल्हा परिषदेमध्ये सभापती होते. आता पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत. म्हणजे माझा तो ‘बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे हेच खरं..
पालकमंत्री बदलला तरी ते चित्र कायम
जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याच्या विकासासाठी आराखडा तयार करणारी, जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारी समिती. आमदार, खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश असतो. सध्या जिल्हा परिषद, बहुसंख्य नगरपालिकांच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे समितीमधील सदस्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यात पुन्हा नवीन पालकमंत्र्यांनी अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती अद्याप केलेल्या नाहीत. त्यामुळेही केवळ आमदार, खासदार सदस्य राहिले आहेत. त्यातूनच समितीच्या सभांना पक्षीय राजकारणाची लागण झाली आहे. नगरचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नगरच्या समितीची सभा झाली. त्यामध्ये बहुसंख्यपणे भाजपचेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अपवाद वगळता राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी त्याकडे पाठ फिरवली. हसन मुश्रीफ पालकमंत्री असताना वेगळे चित्र नव्हते. सभेला आमदारांच्या अल्प उपस्थितीकडे भाजपचे पालकमंत्री विखे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी लोकप्रतिनिधी सभेला उपस्थित राहत नसले तरी या सर्वाचा विकासाला पाठिंबा आहे, असे उत्तर देत वेळ मारून नेली.
उपोषण की राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न ?
सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी मिळालेल्या शासकीय जागेतील जुन्या इमारती अज्ञाताकडून पाडून येथील भंगार चोरी होत आहे. या चोरीची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी उपोषण सुरू केले होते. आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे उपोषणस्थळी भेटण्यास गेले. दोघांची एकाच वेळी त्या ठिकाणी भेट झाली. दोघे राजकीय शत्रू एकाच ठिकाणी आल्याने उपस्थितांच्या भुवया उचावल्या. पण उपोषणस्थळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडालीच. नंतर यावेळी महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उबाळे यांना जास्त उपोषण करू नका त्रास होईल, तुम्हाला मधुमेह आहे असे सांगत वडाचे झाड भेट दिले. हे झाड आणि फुलांचा गुच्छ देताना महेश शिंदे यांना रमेश उबाळे यांनी चिमटा काढला. तुम्ही वडाचे झाड देतानाचे फोटो काढताय पण तुमच्या पक्षात प्रवेश केलाय अशा बातम्या देऊ नका अशी कोपरखळी उबाळे यांनी महेश शिंदे यांना मारली. याला महेश शिंदे यांनी आमच्या पक्षात आल्यावर भारी असते, असे मिश्किलपणे उत्तर दिले.
(सहभाग : दिगंबर शिंदे, मोहनीराज लहाडे, विश्वास पवार)