अवघ्या आठवडय़ावर आलेल्या दहीहंडीसाठी वर्गणी गोळा करायला आधीच सुरुवात झाली आहे. ठाणे- मुंबईतील लाखोंच्या हंडय़ा फोडण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा,  स्पीकरच्या भिंती,  तरुण-तरुणींचे बीभत्स नृत्य, दारूचा मुक्त वापर, मंडळांमधील ईर्षां, बॉलीवूडचे तारे-तारका आणून केले जाणारे सेलिब्रेशन याचा जनतेला उबग आला आहे.ध्वनिप्रदूषणाची पातळी अतिधोक्याच्या पातळीपलीकडे जात असल्याची ओरड होत असल्याने न्यायालयाने जी आवाजाची पातळी आखून दिलेली आहे, ती पाळावी  असे सांगत उत्सवांना कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी ठाणे पोलिसांनी पहिले पाऊल तरी टाकले  आहे. मात्र या वाटेवरचा पुढचा प्रवास त्यामुळेच खडतर ठरणार आहे.
आवाऽऽऽज नीचे!
ठाणे पोलीस आयुक्तालयात इनमीन सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेले सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी एक फतवा काढला आणि श्रीस्थानक ठाणे नगरीत मोठा गहजब झाला. लक्ष्मीनारायण यांचे म्हणणे एवढेच होते, की ध्वनिवर्धक ठेकेदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखावा. न्यायालयाने आवाजाची पातळी आखून दिलेली आहे, ती पाळावी. अन्यथा कारवाईला तयार राहावे. तसे यात काही नवे नाही. सर्वसामान्य लोकांना उपद्रव होईल, अशा पद्धतीने उत्सव साजरे करणे हे बेकायदाच आहे; पण स्वत:ला संस्कृतिरक्षक म्हणविणारे काही राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे यांना या कायद्याची काय तमा? त्यांच्या झुंडशाहीपुढे शासन यंत्रणा आणि सुसंस्कृत समाज जणू हतबल झाला आहे. यंदा मात्र उत्सवांच्या आडून चालणाऱ्या या मुजोरीला पोलिसांनी घाम फोडला आहे. तेही तसे सोपे नव्हते.  संस्कृती, परंपरेची ढाल पुढे करत उत्सवांच्या आडून राजकीय दुकानदारी चालविणारे नेते राज्यात महामूर. त्यांचे हातही बरेच वपर्यंत पोचलेले. तेव्हा लक्ष्मीनारायण यांनी गनिमी कावा अवलंबिला. मतपेटय़ांच्या या ठेकेदारांना हात घालण्याऐवजी त्यांनी ध्वनिवर्धक ठेकेदारांच्याच मुसक्या आवळल्या. त्यामुळे नेत्यांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी झाली आहे. खरे तर उत्सवांच्या तोंडावर मंडळांच्या बैठका घेऊन नियम वगैरे पाळा यांसारख्या सूचना पोलीस दरवर्षीच देत असतात; पण त्यानंतरही पोलिसांच्या नाकावर टिच्चून कायदे वाकवून सण, उत्सव साजरे होतात. या वर्षीही ठाण्यात असेच काहीसे होईल, असे अनेकांना वाटले होते. होतेय मात्र नेमके उलटे. लक्ष्मीनारायण यांनी यंदा उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलेच नाही. त्यांनी आमंत्रित केले ध्वनिवर्धक बसविणाऱ्या ठेकेदारांना. सर्वोच्च न्यायालयाने आवाजाची पातळी राखण्यासंबंधी काही नियम आखून दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी करा. आम्ही गुन्हे दाखल होईपर्यंत थांबणार नाही, आधी तुमचे सामान जप्त करू आणि मग पुढले सोपस्कार पार पाडू, अशी तंबी त्यांनी दिली. केवळ इशाऱ्यांवरच हे प्रकरण थांबले नाही, तर ठेकेदारांच्या हातात त्यांनी थेट नोटिसाच ठेवल्या. उत्सवांच्या नावाखाली ठाण्यातील चौकाचौकांमध्ये प्रदूषण करणाऱ्या मंडळांना आणि ठेकेदारांना हे सगळे अनपेक्षित होते. पोलीस दलात कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून लक्ष्मीनारायण ओळखले जातात. ठाणे पोलीस दलात रुजू होताच येथील बारमालकांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. ध्वनिवर्धकांच्या बाबतीतही त्यांनी हेच केले. त्यांच्यामुळे शहरातील एक बोलबच्चन राजकीय नेता सध्या मेटाकुटीला आला आहे. याचे किस्सेही पोलीस दलात मोठय़ा चवीने चर्चिले जात आहेत. त्यामुळे लक्ष्मीनारायण यांनी सुरू केलेल्या या मोहिमेविरोधात ब्र उच्चारण्याचीही िहमत अद्याप तरी ठाण्यात एकाही राजकीय नेत्याला दाखविता आलेली नाही. उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही, पण नियम पाळण्यात गैर काय, हा त्यांचा साधा सरळ सवाल आहे. आधीच नियोजनाच्या अंगाने तीनतेरा वाजलेल्या या शहरात एखादा रस्ता जरी अडविला गेला तरी वाहतुकीची अवस्था होत्याची नव्हती अशी होते. अशा स्थितीत उत्सवांचे शहर असे बिरुद मिरविण्यात काय हशील, हा प्रश्न उरतोच. या प्रश्नाला उत्तर देण्याची िहमत नसलेली मंडळी मग लोकभावना आणि धार्मिकतेचा रंग लावत लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची कोंडी करू पाहात आहेत.
१८ वर्षांखालील गोविंदांवर बंदी हवी!
शांतता.. गोंगाट चालू आहे!
उत्सवांच्या निमित्ताने अनेक लोकांचे समूह एकत्र यावेत, त्यांच्यातले ताणतणाव कमी होऊन सामाजिक एकजीनसीपणा वाढावा, अशी अपेक्षा असते. राजकीय नेते स्वप्रसिद्धीसाठी उत्सवांचा वापर करू लागले आहेत. तसे नसते तर उत्सवांचे पावित्र्यभंग करण्याचे प्रकार घडले नसते. दहीहंडीमध्ये नट-नटय़ा नाचविणे, उत्तान नृत्याचे कार्यक्रम करणे हे कशाचे लक्षण आहे? मुळात आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी असा उत्सव आयोजनाचा मार्ग धरल्याशिवाय पर्याय नाही, असा ठाणे-डोंबिवलीतील अनेकांचा समज झाला आहे. त्यातूनच उत्सवांना लोकभावनेशी आणि धार्मिकतेशी बांधून घ्यायचे आणि सरकारी यंत्रणांचे हात बांधून टाकायचे, असे प्रकार वर्षांनुवर्षे सुरू आहेत. लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची कोंडी करण्यासाठी असेच भावनिक मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. आवाजाच्या मर्यादा ओलांडून सर्वसामान्यांना हैराण करून सोडणाऱ्या या उत्सवांना कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी ठाणे पोलिसांनी पहिले पाऊल टाकले असले, तरी या वाटेवरचा पुढचा प्रवास त्यामुळेच खडतर ठरणार आहे. यावर लोकांचा प्रश्न मात्र साधा आहे, कमी आवाजात उत्सव साजरे करता येत नाहीत काय? नेतेगण आणि त्यांचे गणंग यांना याचे उत्तर आज ना उद्या द्यावेच लागणार आहे.
जयेश सामंत

पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या घरचा उत्सव
ठाण्यात आचारसंहितेचे काय?
उत्सव राहतो बाजूला आणि..
पर्यावरणाची उत्सवी ‘वाट’!
पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या घरचा उत्सव
भव्य व्यासपीठावर कर्णकर्कश आवाजाच्या तालावर थिरकणारी सेलिब्रेटींची पावले, मध्येच डीजेचा कानफाडू ढणढणाट, पाण्याची फवारणी आणि त्यामुळे मैदानात झालेल्या पाऊलभर चिखलातच रचले जाणारे गोविंदा पथकांचे थर, हे वरळीच्या जांबोरी मैदानातील दरवर्षीचे चित्र. पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांचा हा जंगी दहीहंडी उत्सव. मुंबईत पहिल्यांदा आठ थर रचले गेले ते याच मैदानात. येथील उत्सवाच्या जंगी आयोजनामुळे दक्षिण मुंबईच नव्हे, तर उपनगरांतील मोठी गोविंदा पथके येथे हजेरी लावल्याशिवाय ठाण्याला जात नाही, असा दंडकच बनून गेला आहे.
जांबोरी मैदानाच्या आसपास तीन शाळा, एक प्रसूतिगृह असल्यामुळे हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. असे असतानाही या परिसरात दहीहंडीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत डीजेंचा धुमाकूळ सुरू असतो. यामुळे आसपासच्या रहिवाशांना तर उत्सव नको, पण प्रदूषण आवरा असे झाले आहे. जांबोरी मैदानाबाहेरच्या डॉ. डी. एम. भोसले मार्गावरची पूर्णपणे ठप्प होणारी वाहतूक, गोविंदा पथकांच्या लहान-मोठय़ा वाहनांची या परिसरात लागणारी रीघ, कोलमडणारी वाहतूक आणि विस्कळीत होणारा दिनक्रम अशा अनेक कारणांमुळे रहिवाशी त्रस्त आहेत. एकंदर उत्सवी गोंधळामुळे या परिसरातील रहिवाशांचा श्वास गुदमरू लागला आहे. कधी एकदा त्यातून सुटका होते, अशीच प्रतिक्रिया या दिवशी ही मंडळी व्यक्त करीत असतात.
ध्वनिप्रदूषणामुळे झालेली ओरड, बाल हक्क संरक्षण आयोगाने बाल गोविंदांवर घातलेली बंदी, १८ वर्षांखालील तरुणांवर बंदीबाबत न्यायालयाने राज्य सरकारला केलेली सूचना, या पाश्र्वभूमीवर आता आयोजक सचिन अहिर यांनीही सावध भूमिका घेतली आहे.
दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामुळे राजकीय फायदा होत असल्याची टीका होते; परंतु तसे अजिबात नाही. उत्सव आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र आता बाल गोविंदांच्या सहभागावरून वादळ निर्माण झाले आहे; पण सरकार या संदर्भात जो आदेश
काही देईल तो सर्वाना पाळावाच
लागेल. कायद्याची बंधने आल्यानंतर उत्सवातील आवाजावर नियंत्रण ठेवले जाईल, तसेच बाल गोविंदांबद्दल घालण्यात येणाऱ्या अटींचेही पालन करावे लागेल.
 मात्र उत्सव बंद करून चालणार नाही. त्यामुळे परंपरा आणि संस्कृती लोप पावेल. त्यामुळे आताच्या तुलनेत हा उत्सव अत्यंत साधेपणाने करावा लागेल, असे सचिन अहिर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
प्रसाद रावकर
ठाण्यात आचारसंहितेचे काय?
ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त आर. ए. राजीव यांनी काही वर्षांपूर्वी उत्सवांची आचारसंहिता शहरात आखून दिली होती. उत्सवांच्या मंडप आणि कमानींसाठी रस्ते खोदले तर संबंधित मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. उत्सवांसाठी एक तृतीयांशापेक्षा जास्त रस्ता अडवू दिला जाणार नाही. आठ फुटांपेक्षा कमी जागा असलेल्या रस्त्यांवर मंडप, स्टेज उभारणीसाठी परवानगी मिळणार नाही. ध्वनिप्रदूषण आणि उत्सवांविषयी न्यायालये आणि अन्य सरकारी यंत्रणांनी आखून दिलेल्या निकषांचे पालन करावेच लागेल, अशी मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी आखून दिली होती. लोकांना उपद्रव होईल अशा पद्धतीने उत्सवांसाठी परवानगी देण्याचे अधिकार कुणालाही नाहीत. ठाण्यात मात्र अरुंद चौकातही रस्त्याच्या मधोमध मंडप टाकून उत्सव साजरे होतात. रस्ते आणि पदपथ अडवणाऱ्या या उत्सवांमुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण तसेच वेळ, पैसा आणि इंधनाचा अपव्यय होतो. रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक वाजवून सभोवताली राहणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्याला वेठीस धरले जाते. आजारी व्यक्तींचे हाल होतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. सुरक्षेची कोणतीही ठोस यंत्रणा उभी न करता हे उत्सव अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी साजरे होतात. राजीव यांनी हे चित्र बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड, एकनाथ िशदे यांच्यासारख्या बडय़ा राजकीय नेत्यांची मंडळे उत्सवांसाठी नवे-कोरे रस्ते खोदू लागले तेव्हा राजीव त्यांच्याविरोधात उभे ठाकले. या मंडळांना त्यांनी दंड केला. राजीव यांची बदली होताच हे चित्र पालटले आहे. त्यांनी आखलेली आचारसंहिता केराच्या टोपलीत गेली आहे.
उत्सव राहतो बाजूला आणि..
पुण्याला आता उत्सवांचे वेध लागतील. अवघ्या आठवडय़ावर आलेल्या दहीहंडीसाठी वर्गणी गोळा करायला आधीच सुरुवात झाली आहे आणि मंडळांकडून गणेशोत्सवाच्या मंडपांचीही उभारणी सुरू झाली आहे. या उत्सवांची एकंदर परिस्थिती पाहिली की उत्सव राहिला बाजूला आणि नाही त्या गोष्टींनाच अतिरेकी महत्त्व आल्याचे लक्षात येते. दहीहंडीसारख्या उत्सवात तर ही गोष्ट प्रकर्षांने जाणवते. दहीहंडी राहिली बाजूला आणि स्पीकरच्या भिंती, मंडळापुढे हजारो तरुण-तरुणींचे बीभत्स नृत्य, दारूचा मुक्त वापर, मंडळांमधील ईर्षां, त्यातून लाखो रुपयांचा खर्च करण्याची स्पर्धा, बॉलीवूडचे तारे-तारका आणून केले जाणारे सेलिब्रेशन असे स्वरूप आता पुण्यातल्याही दहीहंडीला आले आहे. गणेशोत्सव असो किंवा नवरात्रात काढल्या जाणाऱ्या तोरण मिरवणुका असोत; या सर्व उत्सवांमध्ये मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते आणि त्याची पातळी धोक्याच्याच नव्हे, तर अतिधोक्याच्या पातळीपलीकडे गेलेली असते. त्यातून नागरिकांना, त्या त्या भागातील रहिवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना, रुग्णांना होणारा त्रास हा मुद्दा गंभीर असला, तरी तो जाणीवपूर्वक दुर्लक्षित ‘ठेवला जातो.’
पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत स्पीकरवर गाणी लावून दहीहंडी साजरी होत होती. मात्र नंतर गणेश पेठेच्या परिसरातील काही मंडळांनी डीजेंना बोलवायला सुरुवात केली आणि पुण्यातील दहीहंडीचे स्वरूपच बदलून गेले. अनेक मंडळांमध्ये आता डीजेंशिवाय दहीहंडीच साजरी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर ध्वनिवर्धकांना बंदी असल्यामुळे दहीहंडीच्या दिवशी दुपारी तीन-चारपासूनच मुंबई, दिल्ली, बंगलोर, गोवा येथून आलेले डीजे त्यांची ‘कला’ रस्तोरस्ती सादर करायला सुरुवात करतात आणि रात्रीपर्यंत स्पीकरच्या भिंती अक्षरश: दणाणत राहतात. ध्वनिवर्धकबंदी आदेशाच्या पालनातही पुण्यात वेगवेगळ्या भागांतील परिस्थिती वेगळी दिसते. मध्य पुण्यात दहानंतर डीजे आणि ध्वनिवर्धकांचे प्रमाण खूपच कमी असते; पण उपनगरांमध्ये मात्र रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी दणदणाट सुरू असतो. कात्रज, धनकवडी, कोथरूड, बाणेर, वडगावशेरी, टिंगरेनगर अशा अनेक उपनगरांमध्ये त्यामुळे दहीहंडी फारच जोरात साजरी होऊ लागली आहे. या दहीहंडय़ांमध्ये मराठी, हिंदीतील तारे-तारका आणण्याचेही प्रमाण आता वाढले आहे. पूर्वी हा प्रकार पुण्यात नव्हता; पण आता अनेक नगरसेवक आणि गल्लोगल्लीतील दादा दहीहंडय़ासाठी बॉलीवूडचे कलाकार आणतात. त्यांच्यावर आणि डीजे व साऊंड सिस्टीमवर लाखो रुपयांचा खर्चही केला जातो आणि या सर्व गोंगाटात मुख्य जो दहीहंडीचा उत्सव असतो तो राहतो बाजूला आणि डीजेंच्या तालावर थिरकत राहणे हाच मग मुख्य उत्सव होऊन बसतो. पुण्यात आता महिलांसाठी, युवतींसाठी दहीहंडी असाही नवा फंडा सुरू झाला आहे. शेकडो तरुणींना आणि महिलांना डीजेंच्या तालावर मनमुराद नाचता यावे यासाठी या दहीहंडय़ा आयोजित केल्या जातात. गणेश विसर्जन मिरवणूक हा पुण्याचा जिव्हाळ्याचा विषय. या मिरवणुकीतही रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत ध्वनिवर्धक बंद असतात; पण उर्वरित वेळेत मात्र जे ध्वनिप्रदूषण होते, ते असह्य़ असेच असते. एकुणातच स्पीकरच्या भिंती, डीजेंच्या तालावर नाचणे आणि धिंगाणा घालणे म्हणजे उत्सव अशी धारणा होत चालली आहे.
विनायक करमरकर
पर्यावरणाची उत्सवी ‘वाट’!
ग्लोबल वार्मिगचा धसका संपूर्ण जगानेच घेतलेला असताना त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषणाचे आगमन पुन्हा एकदा सणासुदीच्या निमित्ताने सुरू झाले आहे. गणपती अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला असतानाच त्यानिमित्ताने होणाऱ्या ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणाचा कहर पुन्हा एकदा होणार, हे नक्की! गणेशोत्सव येताना जेवढा आनंद घेऊन येतो, तेवढेच जलप्रदूषणसुद्धा. एकटय़ा नागपूर शहरात फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर, सोनेगावसह सुमारे आठ तलाव आणि विहिरी व नद्यांमध्ये गणपती विसर्जन केले जाते. सुमारे १५ हजार गणपती दरवर्षी येथे विसर्जित केले जातात. मात्र, पीओपींच्या मूर्ती आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या रंगांमुळे जलजीवांवर त्याचा नक्कीच परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी एकटय़ा गांधीसागर तलावात सुमारे एक हजार मासे मृत्युमुखी पडले होते. थोडय़ाफार प्रमाणात शहरातील सर्वच तलावांवर हीच परिस्थिती होती. या सर्व तलावांमधून तब्बल आठ ते दहा टन निर्माल्य बाहेर काढण्यात आले. निर्माल्यांमुळे फारसे जलप्रदूषण होत नाही, पण मूर्तीना दिले जाणारे रासायनिक रंग जलजीवांसाठी घातक ठरत आहेत. सर्वसामान्य फटाक्यांमध्ये १५ टक्के कार्बन, ७५ टक्के पोटॅशियम नायट्रेट, १० टक्के सल्फर, अशी घातक रसायने असतात. त्यापेक्षा मोठय़ा फटाक्यांमध्ये हे प्रमाण किती तरी अधिक असते. गेल्या वर्षी १२८ डेसिबलपर्यंतच्या फटाक्यांचा वापर गणपती आणि इतरही सणांमध्ये करण्यात आला. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा हा आलेख चढताच राहिला आहे. गणपती विसर्जनाला येणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर जेवढा हवेतील प्रदूषणासाठी घातक आहे, किंबहुना त्याहूनही अधिक गुलालांची उधळण दिवसेंदिवस हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढवत आहे. गुलालांमध्ये असणारे सल्फर म्हणजे हे एक प्रकारचे विषच आहे. त्यामुळे गणपती विसर्जन झाल्यानंतर आरोग्याच्या तक्रारीतही वाढ झाल्याचे नागपुरात पाहायला मिळाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवात एका मंडळाच्या आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल इतकी आहे, मात्र या निर्णयाला सर्रासपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. या आवाजामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे.
राखी चव्हाण