अवघ्या आठवडय़ावर आलेल्या दहीहंडीसाठी वर्गणी गोळा करायला आधीच सुरुवात झाली आहे. ठाणे- मुंबईतील लाखोंच्या हंडय़ा फोडण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा, स्पीकरच्या भिंती, तरुण-तरुणींचे बीभत्स नृत्य, दारूचा मुक्त वापर, मंडळांमधील ईर्षां, बॉलीवूडचे तारे-तारका आणून केले जाणारे सेलिब्रेशन याचा जनतेला उबग आला आहे.ध्वनिप्रदूषणाची पातळी अतिधोक्याच्या पातळीपलीकडे जात असल्याची ओरड होत असल्याने न्यायालयाने जी आवाजाची पातळी आखून दिलेली आहे, ती पाळावी असे सांगत उत्सवांना कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी ठाणे पोलिसांनी पहिले पाऊल तरी टाकले आहे. मात्र या वाटेवरचा पुढचा प्रवास त्यामुळेच खडतर ठरणार आहे.
आवाऽऽऽज नीचे!
ठाणे पोलीस आयुक्तालयात इनमीन सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेले सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी एक फतवा काढला आणि श्रीस्थानक ठाणे नगरीत मोठा गहजब झाला. लक्ष्मीनारायण यांचे म्हणणे एवढेच होते, की ध्वनिवर्धक ठेकेदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखावा. न्यायालयाने आवाजाची पातळी आखून दिलेली आहे, ती पाळावी. अन्यथा कारवाईला तयार राहावे. तसे यात काही नवे नाही. सर्वसामान्य लोकांना उपद्रव होईल, अशा पद्धतीने उत्सव साजरे करणे हे बेकायदाच आहे; पण स्वत:ला संस्कृतिरक्षक म्हणविणारे काही राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे यांना या कायद्याची काय तमा? त्यांच्या झुंडशाहीपुढे शासन यंत्रणा आणि सुसंस्कृत समाज जणू हतबल झाला आहे. यंदा मात्र उत्सवांच्या आडून चालणाऱ्या या मुजोरीला पोलिसांनी घाम फोडला आहे. तेही तसे सोपे नव्हते. संस्कृती, परंपरेची ढाल पुढे करत उत्सवांच्या आडून राजकीय दुकानदारी चालविणारे नेते राज्यात महामूर. त्यांचे हातही बरेच वपर्यंत पोचलेले. तेव्हा लक्ष्मीनारायण यांनी गनिमी कावा अवलंबिला. मतपेटय़ांच्या या ठेकेदारांना हात घालण्याऐवजी त्यांनी ध्वनिवर्धक ठेकेदारांच्याच मुसक्या आवळल्या. त्यामुळे नेत्यांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी झाली आहे. खरे तर उत्सवांच्या तोंडावर मंडळांच्या बैठका घेऊन नियम वगैरे पाळा यांसारख्या सूचना पोलीस दरवर्षीच देत असतात; पण त्यानंतरही पोलिसांच्या नाकावर टिच्चून कायदे वाकवून सण, उत्सव साजरे होतात. या वर्षीही ठाण्यात असेच काहीसे होईल, असे अनेकांना वाटले होते. होतेय मात्र नेमके उलटे. लक्ष्मीनारायण यांनी यंदा उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलेच नाही. त्यांनी आमंत्रित केले ध्वनिवर्धक बसविणाऱ्या ठेकेदारांना. सर्वोच्च न्यायालयाने आवाजाची पातळी राखण्यासंबंधी काही नियम आखून दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी करा. आम्ही गुन्हे दाखल होईपर्यंत थांबणार नाही, आधी तुमचे सामान जप्त करू आणि मग पुढले सोपस्कार पार पाडू, अशी तंबी त्यांनी दिली. केवळ इशाऱ्यांवरच हे प्रकरण थांबले नाही, तर ठेकेदारांच्या हातात त्यांनी थेट नोटिसाच ठेवल्या. उत्सवांच्या नावाखाली ठाण्यातील चौकाचौकांमध्ये प्रदूषण करणाऱ्या मंडळांना आणि ठेकेदारांना हे सगळे अनपेक्षित होते. पोलीस दलात कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून लक्ष्मीनारायण ओळखले जातात. ठाणे पोलीस दलात रुजू होताच येथील बारमालकांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. ध्वनिवर्धकांच्या बाबतीतही त्यांनी हेच केले. त्यांच्यामुळे शहरातील एक बोलबच्चन राजकीय नेता सध्या मेटाकुटीला आला आहे. याचे किस्सेही पोलीस दलात मोठय़ा चवीने चर्चिले जात आहेत. त्यामुळे लक्ष्मीनारायण यांनी सुरू केलेल्या या मोहिमेविरोधात ब्र उच्चारण्याचीही िहमत अद्याप तरी ठाण्यात एकाही राजकीय नेत्याला दाखविता आलेली नाही. उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही, पण नियम पाळण्यात गैर काय, हा त्यांचा साधा सरळ सवाल आहे. आधीच नियोजनाच्या अंगाने तीनतेरा वाजलेल्या या शहरात एखादा रस्ता जरी अडविला गेला तरी वाहतुकीची अवस्था होत्याची नव्हती अशी होते. अशा स्थितीत उत्सवांचे शहर असे बिरुद मिरविण्यात काय हशील, हा प्रश्न उरतोच. या प्रश्नाला उत्तर देण्याची िहमत नसलेली मंडळी मग लोकभावना आणि धार्मिकतेचा रंग लावत लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची कोंडी करू पाहात आहेत.
१८ वर्षांखालील गोविंदांवर बंदी हवी!
शांतता.. गोंगाट चालू आहे!
उत्सवांच्या निमित्ताने अनेक लोकांचे समूह एकत्र यावेत, त्यांच्यातले ताणतणाव कमी होऊन सामाजिक एकजीनसीपणा वाढावा, अशी अपेक्षा असते. राजकीय नेते स्वप्रसिद्धीसाठी उत्सवांचा वापर करू लागले आहेत. तसे नसते तर उत्सवांचे पावित्र्यभंग करण्याचे प्रकार घडले नसते. दहीहंडीमध्ये नट-नटय़ा नाचविणे, उत्तान नृत्याचे कार्यक्रम करणे हे कशाचे लक्षण आहे? मुळात आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी असा उत्सव आयोजनाचा मार्ग धरल्याशिवाय पर्याय नाही, असा ठाणे-डोंबिवलीतील अनेकांचा समज झाला आहे. त्यातूनच उत्सवांना लोकभावनेशी आणि धार्मिकतेशी बांधून घ्यायचे आणि सरकारी यंत्रणांचे हात बांधून टाकायचे, असे प्रकार वर्षांनुवर्षे सुरू आहेत. लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची कोंडी करण्यासाठी असेच भावनिक मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. आवाजाच्या मर्यादा ओलांडून सर्वसामान्यांना हैराण करून सोडणाऱ्या या उत्सवांना कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी ठाणे पोलिसांनी पहिले पाऊल टाकले असले, तरी या वाटेवरचा पुढचा प्रवास त्यामुळेच खडतर ठरणार आहे. यावर लोकांचा प्रश्न मात्र साधा आहे, कमी आवाजात उत्सव साजरे करता येत नाहीत काय? नेतेगण आणि त्यांचे गणंग यांना याचे उत्तर आज ना उद्या द्यावेच लागणार आहे.
जयेश सामंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा