|| अ‍ॅड्. जयदेव गायकवाड

आंबेडकरी चळवळ नेतृत्वातील अस्थिरतेमुळे सध्या गटातटांत विखुरली आहे. नेत्यांतील मतभेदांमुळे जातिव्यवस्थेविरुद्ध लढणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत परिवर्तनवादी लढाईची नवी रणनीती शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, ही भूमिका मांडणारे टिपण!

Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
‘गतिशक्ती’ परिवर्तनशील उपक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, पायाभूत सुविधांमध्ये क्रांतीचा उद्देश
Dhammachakra Pravartan Day Absence of political leaders in Dikshabhoomi led to controversy on stage
धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीत राजकीय नेत्यांची अनुपस्थिती तरीही मंचावर झाला मोठा वाद…
Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
war Iran Israel
विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
freedom party Austria
ऑस्ट्रियामध्ये राजकीय भूकंप… ‘नाझी’वादाची पार्श्वभूमी असलेला अतिउजवा पक्ष सत्तेच्या वाटेवर… युरोपचा राजकीय रंगमंच बदलणार?
readers feedback on loksatta editorial readers reaction
लोकमानस : लोकशाहीविरोधी मानसिकतेला धडा

समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्ये असलेली लोकशाही निर्माण करणे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ सुरू केली. आंबेडकरी चळवळ ही बाबासाहेबांच्या व्यापक वैचारिक पायावर आधारलेली आहे. समतेवर आधारित आदर्श समाजाची निर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न होते. आज मात्र याविरोधी परिस्थिती पाहायला मिळते. आंबेडकरी चळवळीप्रमाणे त्याचे नेतृत्वदेखील अस्थिर असून आंबेडकरी जनता याकडे हतबलपणे पाहत आहे.

भावनात्मकता हे आंबेडकरी चळवळीचे वैशिष्टय़ आहे. सामाजिक जीवनात येणाऱ्या प्रतिकूल घटनांमुळे संघर्ष करण्याची वेळ आली, की ते वेगाने एकत्र येतात. खैरलांजी असो वा अलीकडची भीमा कोरेगावची दंगल. तेव्हा भावनांचा स्फोट होऊन त्याचा उद्रेक व्हावा, अशा प्रकारे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. मात्र आंबेडकरी जनतेने विशिष्ट घटनांपुरते एकत्र येणे योग्य नाही. अनेकदा कार्यकर्ते जातीयवादी भूमिका घेत आहेत. कळत-नकळत का होईना, त्यांच्यामध्ये जातीचा अहंकार पाहायला मिळतो, हा विसंवाददेखील लक्षात घ्यायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताची चळवळ केली, ती प्रत्येकाने समजून घ्यायला हवी.

केवळ मोर्चे आणि निषेध?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे सद्य:स्वरूप काय, हा विचारही महत्त्वाचा आहे. सध्या तरी केवळ अन्यायाविरुद्ध मोर्चे काढणे व निषेध करणे एवढेच कार्यक्रम आंबेडकरी कार्यकर्त्यांचे सुरू आहेत. त्यामुळे ही चळवळ म्हणजे प्रोटेस्ट मूव्हमेंट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आपण बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे चालतो आहोत का, हा प्रश्न आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. बाबासाहेबांच्या जातीत जन्मलो म्हणून आपण आंबेडकरवादी अशी भूमिका आंबेडकरवादामध्ये बसत नाही. डॉ. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेला नकार दिला होता. म्हणून प्रत्येक आंबेडकरी नेतृत्वामध्ये वा कार्यकर्त्यांमध्ये जातीचा अभिनिवेश असता कामा नये. डॉ. बाबासाहेबांनंतर ही चळवळ केवळ एकजातीय चळवळ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नकळतपणे बाबासाहेबांच्या विचारांना जातीच्या मर्यादा आल्या आहेत.

आंबेडकरी चळवळीचा नेता कोण?

खरे तर कुणी वारसाहक्काने आंबेडकरवादी होऊ शकत नाही. आंबेडकरवादी होण्यासाठी प्रथम बाबासाहेबांचे विचार आत्मसात करायला हवे. उच्चशिक्षण घेऊन पुढे आलेल्या आंबेडकरी विचारवंतांनी आंबेडकरी चळवळीला भरीव योगदान द्यायला हवे. मागासवर्गीयांच्या जीवनात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी भाष्य करायला हवे. मात्र, या चळवळीतील विचारवंत, लेखक केवळ परिसंवाद, चर्चासत्रे आणि व्याख्यानांमध्ये अडकले आहेत. ते समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्ष चळवळीत सहभाग घेऊन आंदोलने का करीत नाहीत?

या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचा नेता कोण, हा प्रश्न या जनतेसमोर उभा राहतो.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलितांना त्यांच्यासारखा नेता मिळाला नाही. बाबासाहेबांच्या निधनानंतर सन १९५७च्या निवडणुकीत शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे आठ खासदार आणि २१ आमदार निवडून आले होते. त्यानंतर सन १९५८ साली रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. परंतु एका वर्षांत पक्ष दुभंगला, बी. सी. कांबळे आणि दादासाहेब गायकवाड असे दोन गट झाले. त्यानंतरच्या काळात सन १९९६ पर्यंत फाटाफुटीचा प्रकार सुरूच राहिला. १९९८ मध्ये काँग्रेससोबत युती झाल्याने एकसंध रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून आले होते. यावरून आंबेडकरी चळवळ एकसंध असेल, तर चळवळीला यश मिळू शकते हे सिद्ध झाले. आजमितीस ही राजकीय चळवळ अनेक गटातटांत विभागली गेली आहे. आज या चळवळीचा अजेंडा काय, असा प्रश्न पडतो.    आज आंबेडकरी चळवळीत दोन राजकीय पक्ष प्रामुख्याने दिसून येतात. यामध्ये एक प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ आणि दुसरा रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोन पक्षांचा समावेश आहे.

प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या दंगलीचे वेळी योग्य वेळ साधून बंदची हाक दिली. तेव्हा उभ्या महाराष्ट्रातून परिवर्तनवादी संघटना आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. तेव्हापासून प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. मात्र अधूनमधून त्यांच्या विश्लेषणात व्यक्तिद्वेष दिसतो, तर कधी अतिशयोक्ती. त्यांच्या विचारात अलीकडे सुसंगती पाहायला मिळत असली, तरी कधी काही टोकाचे बोलतील याचा अंदाज नाही. काळानुसार आपल्या विचारांचा समतोल त्यांनी राखायला हवा, असे महाराष्ट्रातील जनतेला वाटते. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचा सध्या एकच आमदार आहे. ते स्वबळावर राजकारण करतात. बहुजनांना जोडण्याचा प्रयत्न त्यांनी अकोला जिल्ह्य़ात केला. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषदेत त्यांनी सत्ता मिळविली. मात्र आतापर्यंत सहा-सात वेळा लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढले आणि पराभूत झाले. केवळ सन १९९८ला काँग्रेससोबत युतीमध्ये ते निवडून आले.

आठवलेंचा आरपीआयही अपयशी

दुसरीकडे, रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गेल्या २५ वर्षांमध्ये एकही आमदार निवडून आला नाही. काँग्रेससोबत युती करूनही आरपीआयचे उमेदवार निवडून आले नाहीत, हे विदारक चित्र जनतेने पाहिले.  २०१४ साली देशात भाजप आणि मोदी लाट असतानाही आठवलेंना खासदारकीची वा आमदारकीचीही एकही जागा मिळाली नाही. भाजपकडे सत्ता आल्यानंतर आठवलेंनी विनवण्या करून त्यांनी एक राज्यसभा व मंत्रिपद स्वत:साठी मिळविले.

आठवलेंच्या आरपीआयला गेल्या २५ वर्षांत निवडणूक चिन्हदेखील मिळू शकले नाही. खुल्या चिन्हातून ऐनवेळी त्यांनी निवडणूक लढविल्या, परंतु उमेदवार निवडून येत नाहीत, हे वास्तव पाहून आठवलेंचे कार्यकर्ते मित्रपक्षाचे कमळ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढले. पुण्यात त्यांचे पाच नगरसेवक निवडून आले. सभागृहात ते भाजपचे असतात, तर बाहेर ते रिपाइंचे म्हणून सांगतात. अशी ही परिस्थिती आंबेडकरी जनता अपरिहार्यपणे पाहत आहे.

खरे तर आठवलेंनी दलितांच्या हितासाठी युती केली असेल, तर आपल्या मंत्रिपदाचा उपयोग दलितांच्या भल्यासाठी त्यांनी करायला हवा. दलितांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आठवले आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्यांच्या पक्षाचा कोणताही अजेंडा दिसत नाही. नुकत्याच पुण्यात झालेल्या अधिवेशनात त्यांनी दलितांसाठी एक ठरावही मांडला नाही. अलीकडे आठवलेंनी विचारवंतांचे सल्ले घेतले असे म्हणतात. तेव्हा चांगले कपडे घाला, रंगीबेरंगी घालू नका, कविता म्हणू नका, असे सल्ले विचारवंतांनी दिले. परंतु तुम्ही युती केलेला प्रतिगामी पक्ष सोडा, असा सल्ला कोणीही दिला नाही.

जातीच्या मर्यादा नकोच

खरे तर आंबेडकरी चळवळ चालविताना अत्यंत विचारपूर्वक आणि गंभीरपणे चालविली पाहिजे. आंबेडकरी चळवळ परिमाणकारक व्हायला हवी असेल तर त्यात जातीच्या मर्यादा येऊ  नये, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संसदीय राजकारणाच्या सिद्धांतावर चळवळ उभी करायला हवी. आजच्या जातिव्यवस्थेने फुले, शाहू, आंबेडकरांना एकेका जातीत मर्यादित केले आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेविरुद्ध लढणे अवघड झाले आहे. जातीच्या मर्यादा नष्ट करण्यासाठी परिवर्तनवादी लढाईची नवी रणनीती शोधण्याचा प्रयत्न आंबेडकरी चळवळीतून झाला पाहिजे.

आपण आंबेडकरवादी आहोत, म्हणजेच आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या दिशेने गेले पाहिजे. तसेच जीवनातील वाटचालीचे योग्य ते मूल्यमापन करायला हवे. बाबासाहेबांना जे परिवर्तन अभिप्रेत होते, ते त्यांना मतांच्या बळावर मिळवायचे होते. संसदीय लोकशाहीत एक मत एक मूल्य हा मंत्र त्यांनी दिला. त्या मतांचे मूल्य ओळखण्यासाठी जनता कमी पडली आहे.  आपल्याकडे मते मागायला येणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी ऐरणीवर घ्यायला हवे, असे बाबासाहेब म्हणत असत. तुम्ही आमच्यासाठी काय केले, हे प्रत्येक मतदाराने उमेदवाराला विचारायला हवे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्या उमेदवाराने आपला अजेंडा सांगितल्यास परिवर्तन घडेल, असा बाबासाहेबांचा दुर्दम्य आशावाद होता. त्यातूनच अस्पृश्यता दूर होऊन आपण शासनकर्ते बनू शकू, असे ते म्हणत असत.

दुर्दैवाने संघटनात्मक नेतृत्वाच्या अभावामुळे मतदारदेखील विखुरला गेला. कधी पुरोगामी तर कधी प्रतिगामी पक्षाकडे तो गेला. आंबेडकरी जनता आपले अस्तित्व गमावून बसली, त्यामुळेच मतांची अस्मिता मारली गेली. आता तरी डोळे उघडून चळवळीचे सद्य:स्थितीतील रूप कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे. त्यावर विचार करून पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील चळवळ उभारण्यासाठी एकत्रितपणे पुढे यायला हवे.

jaideogaikwad@gmail.com