भरकटलेल्या, घरापासून आणि समाजापासून दुरावलेल्या मुलांच्या आयुष्यातील अंधार पुसण्याच्या निर्धारानं विजय जाधव नावाच्या तरुणानं आठ वर्षांपूर्वी या मुलांच्या पुनर्वसनासाठी स्वत:ला झोकून दिलं. निर्मला निकेतनचा सोशल वर्कचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून युवा नावाच्या एका संस्थेत तो दाखल झाला. त्यानंतरच्या काही दिवसांतच, मुंबईत भरलेल्या जागतिक सामाजिक परिषदेत त्याने बालहक्क या विषयावरील कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले. मेधा पाटकरांसोबत काम करताना त्याने धरणग्रस्तांचे अश्रू पाहिले, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या, आणि त्याच्या मनात धुमसणाऱ्या अस्वस्थतेला वाट फुटली.. रस्त्यावरच्या मुलांची समस्या आणखीनच भीषण, वेगळी आहे, कारण ही समस्या त्या मुलांपुरती नाही. या समस्येतून नव्या सामाजिक समस्या निर्माण होणार आहेत. त्या वेळीच सोडवल्या नाहीत, तर भयंकर सामाजिक असमतोल निर्माण होईल या विचारानं तो बेचन झाला.. त्यातूनच समतोल फाऊंडेशन या संस्थेची निर्मिती झाली..
परिस्थितीला, बापाच्या व्यसनाला, भांडणांना आणि पिचलेल्या मानसिकतेचा राग काढत विनाकारण बदडणाऱ्या बापाला कंटाळून घर सोडलेली मुलं, भरकटत, हिंडत, एखाद्या रेल्वेगाडीत सीटखाली लपून प्रवास करत मुंबई गाठतात. कुणी मुंबईच्या आकर्षणापोटीही घरातून पळून येतात.. वांद्रे, कुर्ला, दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनसला गाडी थांबली, की ही मुलं मुंबईत पहिलं पाऊल ठेवतात आणि तेव्हापासून त्यांचं जगणं दिशाहीन होऊन जातं. मुंबईत दररोज अशी सरासरी २०० मुलं गावाकडून भरकटून दाखल होतात. नशीब चांगलं नसेल, तर तेच त्यांचं आयुष्य बनतं, आणि रेल्वे स्टेशन हेच घर बनतं. अशा टोळ्या तयार होतात आणि माणुसकीपासून दुरावलेली ही मुलं समाजाचा शत्रू बनून समाजाचा तिरस्कारही करू लागतात. शिस्तीच्या आणि घडय़ाळ्याच्या काटय़ानं बांधलेल्या मुंबईकराच्या आयुष्याशी या मुलांचं कोणतंच नातं नसतं. जगण्यासाठीच्या त्यांच्या संघर्षांला सुसंस्कृत समाजानं दिलेलं ‘गुन्हेगारी’ हे नावही या मुलांना मान्यच नव्हे, माहीतही नसतं. त्यांच्यासाठी तेच जगणं असतं.. या मुलांचं मुंबईत ओळखीचं कुणी नसतंच, आणि स्वत:ची ओळखही लपवायची असते. आसपास फिरून मुंबई पाहून झाली, की भुकेची, रिकाम्या पोटाची आणि रिकाम्या खिशाचीही जाणीव होते. मग गर्दीसमोर हात पसरला जातो.. भीक मागून साठलेल्या पशातून वडापाव, भेळ असं काहीतरी खाऊन भूक भागवायची, आणि भीक नाही मिळाली तर चोरी करायची. पकडलं गेलं तर मार खायचा. कधी काहीच हाती लागलं नाही, तर नशापाणी करून झोपून जायचं, नाहीतर मध्यरात्रीनंतर रस्त्यावरच्याच कुणाची तरी वखवख शमविण्यासाठी निमूटपणे सोसायचं.. रात्री फलाटाच्या कोपऱ्यात अंग मुडपण्यापुरती जागा मिळते. काम मिळालं नाही तरी हात पसरून चार पसे मिळतातच याची खात्री झालेली असते. दोनचार दिवसांत फलाटावरच्या किंवा रस्त्यावरच्या अशाच इतर मुलांचीही दोस्ती होते. भीक मागणारी, भंगार गोळा करणारी, खिसे कापणारी, चोऱ्या करणारी अशी अनेक मुलं या टोळक्यात असतात. आपल्याला धाक दाखवणारं इथं कुणीही नाही, आपण स्वतंत्र आहोत, आणि मनाला येईल तसं वागता येतं ही जाणीवच सुखाची वाटत असते. कधी पसे नसतात, पण भुकेची आग भडकलेली असते. मग हातभट्टी झोकून झोपून जायचं. ते परवडेनासं झालं, तर व्हाईटनर हुंगून नशेत बुडून जायचं, नाहीतर फलाटावरच्या बूटपॉलिशवाल्याच्या रिकाम्या डब्या जीव घुसमेपर्यंत नाकाशी धरून आत ओढायच्या. या नशेत भूक विसरायला होते आणि झोपही लागते.. अशी भरकटलेली मुलं हळूहळू घराची आठवणही विसरतात, आणि समाजाला नकोसा असा एक वर्ग तयार होऊ लागतो. सुसंस्कृत समाजाच्या दृष्टीनं, चोरी, पाकिटमारी. भीक मागणं, हे सारे गुन्हे असले, तरी या मुलांना इथल्या जगाच्या कायद्याची कल्पनाच नसते. कारण, त्यांच्यासाठी हे तर, जगण्याचं साधन असतं. व्हाईटनर, सोल्यूशन, किंवा पावडरच्या नशेत बुडालेला एखादा कुणीतरी, नशेतच स्वत:ची किडनीदेखील गमावून बसतो, आणि पुढे खंगत खंगत, एखाद्या दिवशी मरूनही जातो..
अशी अनेक मुलं समाजापासून दुरावताना दिसल्यानं, विजय जाधवनं त्यांना दिशा देण्यासाठी चळवळ सुरू केली. समता, ममता, तोहफा आणि लगाव-प्रेम. अशी चतु:सूत्री डोळ्यांसमोर ठेवून ‘समतोल’ ही संस्था स्थापन केली आणि भरकटलेल्या अशा मुलांचं आयुष्य पुन्हा त्यांच्या मूळ रुळांवर आणण्याचं काम सुरू केलं. आजवर अशी सहा हजारांहून अधिक मुलं ‘समतोल’मुळे पुन्हा आपल्या आईबापांच्या छत्राखाली दाखल झालीत. रेल्वे स्थानकात एकाकीपणानं फिरणारी अशी मुले टोळक्याच्या हाती लागण्याआधीच ताब्यात घ्यायची, त्यांना शेल्टर होममध्ये आणायचं, आणि दिवसभर आखीव पद्धतीनं त्यांना सांभाळायचं. ज्या मायेला ती मुलं पारखी झालेली असतात, ती माया त्यांना द्यायची, असं ठरवून सुरू झालेल्या समतोल फाऊंडेशनमध्ये सध्या २५ जण त्याच्यासोबत आहेत. सुरुवातीला नोकरी म्हणून रुजू झालेल्या त्यांना आता आपल्या कामाचं पावित्र्य उमगलं आहे. त्यामुळे, मुलांना माया देण्यात कुणीच कसूर करत नाही. काही दिवस त्यांच्यासोबत राहिलेली ही मुलं, एखाद्या सणाच्या दिवशी, कुणाच्या वाढदिवसाच्या दिवशी, अचानक हळवी होतात. घराच्या, भावंडांच्या. आईवडिलांच्या आठवणीनं व्याकुळतात.. तो क्षण पकडून त्याच्या आईवडिलांची, भावंडांची, गावाची माहिती त्याच्याकडूनच काढली जाते, आणि आईवडिलांना कळविले जाते.
घरदार सोडून वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांच्या आवारात दिवस ढकलणाऱ्या या मुलांनी आपल्या आठवणीही पुसून टाकलेल्या असतात. भीक मागत, चोऱ्या करत आणि व्यसनात बुडत जगताना एका वेगळ्याच स्वातंत्र्याची नशा त्यांना चढत जाते. अशा मुलांना ताब्यात घेऊन समतोलच्या शेल्टर होममध्ये दाखल केल्यानंतरचे काही दिवस, कार्यकर्त्यांची कसोटी पाहणारे असतात. जगाचा तिटकारा करणारी ही मुलं, जमेल तितकं फटकून वागत असतातच, पण नशेच्या सवयीत खंड पडल्यानं सुरुवातीचे काही दिवस त्यांची मानसिक अवस्थाही सरभरच झालेली असते. हे अंतर काही दिवस जाणीवपूर्वक असंच ठेवलं जातं. तोवर, अगोदर आलेल्या अशाच मुलांकडे पाहताना या नवख्या मुलांना काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागतं. फटकून राहणारी ही मुलं नकळतच इतर मुलांच्यात मिसळतात, आणि इथे आखलेल्या दिनक्रमाचा भाग बनून जातात. सकाळी साडेसहाला उठल्यानंतर सातच्या कवायती आणि योगासनांमध्येही सहभागी होतात, मग परिसर स्वच्छतेचा तास संपवून आंघोळी उरकतात. रस्त्यावर जगताना, आंघोळ हा प्रकार त्यांच्या दिनक्रमातून पुसला गेलेला असतो. इथे आंघोळ करताना अलगद मन मागे जातं.. घरी लहानपणापासून आंघोळ घालायची, त्याची एखादी हळवी आठवण हळूच जागी होते, आणि मनपरिवर्तनाची अपेक्षित प्रक्रिया आपोआपच सुरू होते.. प्रार्थना, चहा-नाश्ता झाल्यानंतच्या तीन तासांच्या अनौपचारिपक शिक्षणाच्या वेळी कार्यकत्रे असे बदल नेमके हेरून ठेवतात.. दुपारच्या जेवणानंतर तासभर आराम करून पुन्हा ही मुलं मदानी खेळात रमतात, आणि गावाकडे भावंडांसोबत, मित्रांसोबत खेळलेले अनेक खेळ त्यांना आठवू लागतात.. विसरू पाहात असलेल्या साऱ्या आठवणी अशा कुठल्या कुठल्या क्षणी जाग्या होत जातात.. संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम आटोपल्यानंतर गटचर्चा, गप्पाटप्पा होतात. दिवसभरात खेळताना, क्वचित भांडताना झालेल्या किरकोळ दुखापतींवर एखादा कार्यकर्ता मायेनं मलमपट्टी करतो, तेव्हा, आपण हेच सारं हरवून बसलो होतो. याची जाणीव त्या मुलाच्या मनात जागी होऊ लागते.. मनपरिवर्तनाची एक आगळी प्रक्रिया अशी दिनक्रमातून सहजपणे सुरू झालेली असते..
कल्याणजवळ मामणोली येथे अशा बदलू पाहणाऱ्या मुलांचं हळवेपण फुलवणारं खास शिबीर भरवलं जातं. आठएक दिवस तेथे राहिलेला प्रत्येक मुलगा मग घराच्या ओढीनं एवढा आतुर होऊन जातो, आणि समारोपाच्या समारंभात, समोरच्या गर्दीत कुठेतरी बसलेल्या आईवडिलांची दृष्टादृष्ट होऊन त्या हळव्या मनाचे बांध फुटून जातात.. आतुर होऊन तो आईच्या कुशीत शिरतो, आणि मायेचा एक आगळा सोहळा त्या क्षणी साजरा होऊ लागतो..
या सोहळ्याच्या आठवणीत मग बाकीची मुलंही हळवी होऊन जातात. असेच आणखी काही दिवस गेले, की ती भूतकाळाच्या आठवणींनी व्याकुळ होऊ लागतात, आणि एकटीएकटी होतात. तोच क्षण पकडून, त्याच्याशी प्रयत्नपूर्वक मत्री जोडलेला कार्यकर्ता त्याला जवळ घेतो, त्याच्या केसातून हळुवार हात फिरवतो, आणि मायेच्या त्या स्पर्शाला भुकेल्या मुलांची मनं मोकळी होऊ लागतात. आईवडिलांचं नाव, भावंडांची नावं, गाव, पत्ता आणि एखादा टेलिफोन नंबरही ती सांगून टाकतात. मग घाईघाईनं तिकडे संपर्क साधला जातो, आणि मनपरिवर्तन झालेल्या त्या मुलांचा आणि मुलाच्या आठवणीनं खंगलेल्या आईवडिलांच्या पुनभ्रेटीचा पुन्हा साजरा होणारा नवा सोहळा अनुभवणारा प्रत्येकजण हेलावून जातो.. हे काम असं, गेली जवळपास आठ वष्रे, अव्याहतपणे सुरूच आहे. वाट चुकलेल्या, भरकटलेल्या मुलांना आयुष्याचा अर्थ समजावून सांगण्याच्या विजय जाधव यांच्या कामाला आता सामाजिक जाणिवांची साथ हवी आहे. आयुष्य आणि भविष्य यांची ओळख व्हायच्या आधीच एखाद्या उतावीळ अपघाताने रस्त्यावर फेकल्या गेलेल्या या मुलांच्या भविष्यासमोरचा अंधार पुसण्याकरिता विजय जाधव आणि त्याचे सहकारी रात्रंदिवस अशा मुलांचा शोध घेत रेल्वे स्थानकं आणि रस्त्यांवर भटकत असतात. अशी मुलं ताब्यात घेताना कधी त्यांच्यावरच संशय घेतला जातो. प्रसंगी समाजाच्या रोषाचाही अनुभव घ्यावा लागतो. पण समजावून सांगितलं, आणि कामाची खात्री पटवून दिली, की लोकांनाही त्याचं महत्व पटतं. अशा प्रसंगांतूनही समतोलनं माणसं जोडली आहेत. अनेक चाहत्यांचं बळही समतोलला लाभलं आहे, आणि समतोलच्या रूपाने अशा असंख्य मुलांना आशेचा किरण गवसला आहे, आणि पुन्हा घराची सावली मिळालेल्या असंख्य मुलांशी समतोलचं नातं जडलं आहे. समतोलच्या मनपरिवर्तन शिबिरात, अनेक मुलांनी जगण्याच्या आव्हानांना सामोरे जायची हिंमत मिळविली आहे. नशेबाजी, चोरी, भीक मागणं हेच ज्यांचं जगणं होऊ पाहात होतं, अशा अनेक मुलांनी त्यामध्ये गुरफटण्याआधीच समतोलच्या साधनेतून मुक्ती मिळविली आहे, आणि रस्त्यावर येताच निर्माण झालेल्या संवेदनाहीन जाणिवांमुळे त्यांनी पुसून टाकलेला भूतकाळही पुन्हा जागा झाला आहे. माणसांच्या जगाबाहेर, रस्त्यावरच्या जगात जगणाऱ्या असंख्य मुलांची मरू घातलेली मनं पुन्हा जिवंत झाली आहेत..
भरकटलेल्या पाखरांना पुन्हा मायेचं छप्पर
अनेक दिवस थांगपत्ता नसलेलं आपलं मूल आता कायमचं दुरावलं, या समजुतीत एखादी आई मुलाच्या फोटोला हार घालून मूकपणे शोक करत असते, आणि अशाच एखाद्या शोकाकुल क्षणी, मुलाचा ठावठिकाणा सांगणारं पत्र दारी येऊन पडतं. अधीरलेले आईबाप इकडे धाव घेतात, आणि आपल्या दुरावलेल्या मुलाला पोटाशी धरताना अश्रूंचा बांध फुटतो..हा क्षण अनुभवणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घराची ओढ अनावरपणे उसळी घेते. त्या भावुक क्षणाच्या सावलीनं गहिवरलेली सारी मुलं मग पुढच्या काही दिवसांतच आपापल्या घरी परततात..भरकटलेल्या पाखरांना पुन्हा मायेचं छप्पर मिळतं..
समतोल फाऊंडेशन मुंबई
रागाच्या भरात तिरिमिरीत घर सोडून आलेल्या मुलांना आपलंसं करून त्यांना पुन्हा आपल्या घरटय़ाकडे जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘समतोल’ने गेल्या आठ वर्षांपासून हा वसा जपला आहे. फक्त गरज आहे मदतीच्या हातांची..
संस्थेपर्यंत कसे जाल?
ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर पश्चिम दिशेला बाहेर पडायचे. त्यानंतर पायी अथवा रिक्षाने दादोजी कोंडदेव स्टेडियमला पाच ते दहा मिनिटांत पोहोचता येते. स्टेडियममध्ये गाळा क्रमांक ५५ मध्ये समतोलचे कार्यालय आहे.
माझ्या मुलांना दोन वेळा जेवायला मिळावं, शिक्षण मिळावं, म्हणून मी इथे स्वयंपाक करण्याची नोकरी पत्करली.. आजवर सहा हजार मुलं माझ्या हातचं जेवून इथून बाहेर पडलीत.. इथे आल्यापासून मी माझ्या मुलांपुरती आई राहिले नाही.. उलट, माझा सगळा वेळ मी देऊ शकत नाही, याचीच खंत वाटते..
– ऊर्मिला कणसे, ‘समतोल’ च्या शेल्टर होममधील स्वयंपाकी.
धनादेश या नावाने काढावेत
समतोल फाऊंडेशन, मुंबई.
(देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत)
आपले धनादेश येथे पाठवा..
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४००००१, ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९. ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
आशिष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.