पाकिस्तानात परराष्ट्र धोरणाची सूत्रे सन्याच्याच हाती असतात आणि ‘चांगले आणि वाईट दहशतवादी’ अशी विभागणी हा त्यांच्या धोरणाचा अविभाज्य भाग आहे, हे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये नवा अध्याय कोण कसा लिहितो ते पाहणे मनोरंजक ठरेल.

गेल्या १८ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परदेशी कार्यभारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी धोकादायक नसलेल्या आतंकवाद्यांना निशाणा बनवण्याची मुळीच गरज नाही.’ अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा हिशोब चुकता करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला, तेव्हा मोठय़ा संख्येने अफगाणिस्तानातल्या प्रशिक्षित तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतला होता. त्यामधील काही दहशतवादी पाकिस्तानसाठी धोकादायक होते, तर काही नव्हते. अशा वेळी सर्व तालिबान्यांशी शत्रुत्व पत्करण्यात काय हंशील आहे? अमेरिकेच्या शत्रूंना आपलेही शत्रू बनवणे कितपत शहाणपणाचे ठरेल, असा विचार सरताज अझीझ यांच्या या विधानामागे होता. पुढे ते म्हणतात, ‘‘अफगाण तालिबान ही अफगाणिस्तानची समस्या असून हक्कानी नेटवर्क’ त्या समस्येचाच एक भाग आहे. त्यामुळे अफगाणी तालिबानशी चर्चा करणे हे अफगाण सरकारचे काम असून त्याबाबत पाकिस्तान तालिबानींना केवळ समजावून सांगू शकतो. आता १९९० सारखी परिस्थिती राहिलेली नाही.’’
अझीझ यांनी ही मुलाखत दिली तेव्हा पाकिस्तानी सन्यदल प्रमुख राहील शरीफ हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. उत्तर वजिरीस्तानमध्ये गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पाकिस्तानी फौजा दहशतवाद्यांना समूळ उखडून टाकण्यासाठी ‘ऑपरेशन जरबे-अज्ब’ ही मोहीम चालवत आहे. त्यात मोठय़ा संख्येने दहशतवादी ठार झाले आहेत.ऑक्टोबर २०१४ मध्ये अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने अमेरिकी कॉँग्रेसला ”Report on Progress Toward Security and Stability in Afghanistan’ हा १०० पानी अहवाल सादर केला. भारतात होत असलेल्या घातपाती कारवायांमध्ये पाकिस्तान सामील असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्या भूमीवर वारंवार होणारे दहशती हल्ले आणि घातपाती कारवाया यांच्या मागे पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि त्यांच्या संघटना यांचा हात असून त्यामुळे भारत-पाक-अफगाणिस्तान या क्षेत्रांतील शांतता व स्थर्य धोक्यात आले आहे. असे असताना पाकिस्तानने अधिकृतपणे अशा प्रकारे या कारवायांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण म्हणजे पाकिस्तानला खटकणारे भारताचे मजबूत सन्य वर्चस्व आणि अफगाणिस्तानमधील भारतीयांची विकास कामे, असे अहवाल नमूद करतो.
सध्या पाकिस्तान राजकीय अरिष्टातून जात असून नवाज शरीफ सरकार आणि सेनाप्रमुख राहील शरीफ यांच्यात प्रचंड बेबनाव आहे. अशा परिस्थितीत सेनाप्रमुख राहील शरीफ अमेरिकेत गेल्याची संधी साधून, पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी ‘चांगले दहशतवादी आणि वाईट दहशतवादी’ हा आमच्या अधिकृत धोरणाचा (परराष्ट्रीय) भाग असल्याचे जाहीर करून आपल्याच सेनाप्रमुखांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करून पाहिला. नवाज शरीफ यांचा अंदाज होता की अमेरिकेचे प्रशासन या मुद्दय़ावर पाकिस्तानी सेनाप्रमुखांचे कान उपटतील किंवा त्यांना शहाणपणाचा सल्ला देतील. परंतु अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची ही आशा फोल ठरली. मात्र, पाकिस्तानात परराष्ट्रीय धोरणाची सूत्रे सन्याच्याच हाती असतात आणि ‘चांगले आणि वाईट दहशतवादी’ अशी विभागणी हा त्यांच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य भाग आहे, हे या निमित्ताने उघड झाले.
पाकिस्तानात कार्यरत असलेल्या अनेक दहशतवादी संघटनांचा खुबीने वापर करून पाकिस्तानी सन्य आपले ईप्सित (विशेषत परराष्ट्रीय धोरणांची उद्दिष्टे) साध्य करत असते. त्यातील काही प्रमुख संघटनांचा आवाका जाणून घेऊ. ‘अफगाण तालिबान’ ही संघटना प्रामुख्याने अमेरिका आणि नाटो फौजांशी लढत असून त्यांना करक ही पाकिस्तानी गुप्तचर संघटना प्रशिक्षण देत असते. त्यांचा मुक्त वावर ‘फाटा’ (Federally Administrated Tribal Area), खैबरिखडीचा परिसर, तोर्खम गेट या प्रदेशाजवळ असतो. ‘तहरिक-ए-नफाझ-ए-शरियत-ए-मुहंमदी’ ही मौलाना फझल्उल्लाहनिर्मित संघटना असून तिने २००७ साली स्वात प्रदेश ताब्यात घेतला होता. २००२ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी या संघटनेवर बंदी घातली होती. ‘लष्कर-ए-तयबा’ या हाफिज सईदच्या संघटनेने आपले मुख्यालय लाहोरजवळच्या मुरिद्के या छोटय़ा शहरात हलवले असून २००८च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाच हाफिज सईद होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याने उघडलेल्या अनेक प्रशिक्षण केंद्रांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. ‘लष्कर-ए-जन्घावी’ (सिपाह-ए-सहबा) या संघटनेच्या दहशतवाद्यांच्या कारवाया पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू होत्या. याही संघटनेवर मुशर्रफ यांनी बंदी घातली होती.  ‘जैश-ए-मुहंमद’ ही संघटना मसूद अजहरच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त व भारतीय काश्मीरच्या एकीकरणाच्या मुद्दय़ावर लढत असून अमेरिकेशी त्यांनी खुले युद्ध पुकारले आहे. पाकिस्तानचे जमात-उलेमा-ए-इस्लाम या चळवळीचे तत्त्वज्ञान व तिचा प्रमुख फझल-उर-रहमान हे त्यांचे राजकीय आदर्श आहेत. सन २००२ मध्ये ‘जैश-ए-मुहंमद’वर बंदी आणली तेव्हा त्यांनी आपले नाव बदलून दोन संघटना बनवल्या : ‘खुदाम-उल-इस्लाम’ आणि ‘जमात-उल-फुरकान.’ त्याचबरोबर ‘हरकत-उल-मुजाहिदीन’ हा ‘हरकत-उल-जिहादी’ या संघटनेपासून फुटून निघालेला गट डॉ. बद्र मुनीर यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरच्या मुद्दय़ावर लढत असून त्याला करक या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा भक्कम पािठबा आहे. ‘अल्-काईदा’ आणि तिच्या संलग्न संघटना यांचा वावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे असून ओसामा बिन लादेन याच्यानंतरचा अल्-काईदाचा प्रमुख आयमन-अल-जवाहिरी हा तोरा-बोराच्या पहाडी इलाख्यातून येमेनच्या दिशेने निघून गेला आहे. पाश्चिमात्य संस्कृती नष्ट करणे हा त्यांचा उद्देश आहे. ‘इस्लामिक जिहाद युनियन’ हा प्रामुख्याने ‘इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उजबेकिस्तान’मधून फुटून निघालेला गट असून तो तोहीर युल्शिव याच्या नेतृत्वाखाली काम करतो.
इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशनमधील (ISPR) सन्यदलाच्या प्रवक्त्यानुसार पाकिस्तानात सध्या ६० ते ७० सशस्त्र दहशतवादी संघटना असून त्यापकी ‘तेहरीके तालिबान पाकिस्तान’ ((TTP) ही सर्वात प्रबळ संघटना आहे. या संघटनेतून फुटून बाहेर पडलेला संघटनेचा एकेकाळचा प्रवक्ता-नेता शाहीदउल्ला शाहीद याने तर सीरिया आणि इराक या देशांत इस्लामी खिलाफतसाठी जीवन-मरणाची लढाई लढणारा अबूबकर अल बगदादी याला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. उत्तर वजिरीस्तान आणि ‘फाटा’) या प्रदेशातून इसिससाठी अलीकडे मोठय़ा प्रमाणावर भरती सुरू झाली आहे. तशा आशयाची पत्रके व भिंतींवरील जाहिराती दिसू लागल्या आहेत. बन्नू शहरातील अनेक चौकांत (मिलिटरी कॅन्टोनमेंट भागांसह), तसेच डेरा इस्माईल खान आणि मीरानशाह रोडवर इसिसचे स्वागत करणारे फलक, भिंतीवर रेखाटलेले संदेश सहज दिसून येतात. बलुचिस्तान गृह मंत्रालयाच्या सूत्रानुसार, खुर्रम या आदिवासी भागातून आणि ङढङ प्रांताच्या (खैबर पखतुनवा प्रांत- जिथे सध्या इम्रान खानच्या पक्षाचे सरकार आहे-) हंगू जिल्ह्य़ातील १० हजार लढवय्यांनी इसिसमध्ये प्रवेश घेतला आहे. ‘खुरासान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण आणि मध्य आशिया इत्यादी प्रदेशांवर ताबा मिळवणे हे इसिसचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
दुर्दैवाने, परिस्थिती इतकी गंभीर असतानासुद्धा पाकिस्तानी सेना आणि राजकीय नेतृत्व यापासून थोडाही बोध घेऊ इच्छित नाही, असे दिसते. एकीकडे, पाकिस्तानी सेनेकडून चालवले जाणारे ‘ऑपरेशन जरबे-अज्ब’ अमेरिकेसाठी अत्यंत उपयुक्त आहे असा आभास निर्माण करून, पाकिस्तानी सन्यप्रमुख जनरल राहील शरीफ हे अमेरिकेकडून जास्तीत जास्त विदेशी आíथक मदत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नवाज शरीफ काठमांडूत अठराव्या सार्क संमेलनात दक्षिण आशियाविषयीचा आपला दृष्टिकोन  मांडत होते. त्यांना वाटते की संपूर्ण दक्षिण आशिया तंटामुक्त प्रदेश व्हावा. येथील देशांनी आपापसात भांडणे करण्याऐवजी, सर्वानी गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितता, कुपोषण, रोगराई यांच्याविरुद्ध लढा द्यावा. केवढा हा विरोधाभास! पाकिस्तानी सेना, राजकीय नेते, धार्मिक नेते आणि प्रशासन या चौकडीत पाकिस्तानची सर्वसाधारण जनता भरडली जाऊन दिशाहीन झाली आहे.
दहशतवादाचा सर्वात जास्त फटका पाकिस्तानला बसला आहे. अमेरिकेने तालिबान्यांविरुद्ध युद्ध पुकारल्यापासूनच्या गेल्या दहा-बारा वर्षांत अमेरिकेच्या सोबतीने पाकिस्तानला दहशतवादविरोधी कारवायांत सहभागी व्हावे लागले. पण यांत आतापर्यंत पाकिस्तानातील कमीतकमी ४० हजार पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत. आíथकदृष्टय़ा कमकुवत झालेल्या पाकिस्तानमधील परदेशी गुंतवणूक आटली आहे. सामान्य कायदा आणि सुव्यवस्था यांचाही अभाव असल्याने देशी उद्योजकांना देश सोडून मलेशिया, बांगलादेश यांसारख्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागत आहे. विजेच्या कंपन्या प्रचंड कर्जबाजारी झाल्या असून लोडशेिडग नित्याची बाब आहे. पाकिस्तानी रेल्वे, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स, पाकिस्तान स्टील मिल या कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपल्या आहेत.
या पाश्र्वभूमीवर, अमेरिकेहून परत आलेले जनरल राहील शरीफ कोणता संदेश घेऊन आले आहेत? कॅनडामधील धर्मगुरू ताहीर उल काद्री आता काय पवित्रा घेतात? तहरिक-ए-इन्साफ पार्टीचे इम्रान खान नवाज शरीफ सरकारला कसे घेरतात? थोडक्यात, येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये नवा अध्याय कोण कसा लिहितो ते पाहणे मनोरंजक ठरेल.
* लेखक  अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.