पंकज भोसले
राज्यभरात जिल्हा ग्रंथालयांमधील सभासद संख्येतील घट, ललित साहित्य विक्री करणाऱ्या पुस्तकांच्या दुकानात सदैव दिसणारी ग्राहकांची तुरळक संख्या किंवा हल्ली प्रत्येक मराठी पुस्तकांच्या प्रतींची संख्या बहुतांश प्रकाशकांनी हजारावरून पाचशेवर आणल्याची स्थिती लोकांचे कमी झालेले वाचन दर्शवणारी आहेच. पण यासोबत राज्यातील प्रत्येक शहरगावांची ओळख असलेल्या आणि नगर वाचनालयांना समांतर वाचनप्रवाह तयार करणाऱ्या ‘सर्क्युलेटिंग लायब्ररी’जचे युग आज झपाटय़ाने अस्तंगत होत चालले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील शहरगावांत अतिवेगात बंद पडत चाललेल्या या सांस्कृतिक केंद्रांमुळे मराठी वाचन विघटनाची आणखी एक बाजू समोर येत आहे..
मराठी लोकांच्या वाचनाची वृत्ती साठोत्तरीच्या दशकापासून बदलली त्यामध्ये मुख्य धारेतील कालहत लेखकांच्या मौलिक साहित्याचे जसे योगदान आहे, तितकाच आज विस्मृतीत गेलेल्या लोकप्रिय लेखकांचाही मोठा वाटा आहे. रोजगाराकरिता खेडय़ांतून मुंबई किंवा नजीकच्या शहरगावांत तरुणांची महास्थलांतरे घडविणाऱ्या १९६०-७०च्या दशकांतील नवनोकरदार वर्गाच्या सांस्कृतिक गरजांना रेडियोवरच्या संगीताने, सार्वजनिक उत्सवांतील उत्स्फूर्त कार्यक्रमांनी आणि सर्क्युलेटिंग लायब्ररीजनी संपृक्त केले. जिल्हा किंवा नगर वाचनालयांपेक्षा तत्पर सेवा आणि मुख्य धारेतील गाजणाऱ्या लेखकांच्या जोडीला डोक्याला ताण न देता मनोरंजन करणाऱ्या रहस्यकथा, साहसकथा, चटपटीत गोष्टी आणि थोडय़ा शृंगाररसपूर्ण कादंबऱ्यांची भरपूर रेलचेल असणाऱ्या सर्क्युलेटिंग लायब्ररीजचा वाचक एकेकाळी फार मोठा होता.
मुंबईतील उपनगरांपासून ते कोकण-घाटावर, मराठवाडय़ापासून विदर्भापर्यंत ८०-९०च्या दशकापर्यंत जोडधंदा किंवा मुख्य व्यवसाय म्हणून या खासगी वाचनालयांची उभारणी झाली होती. खपाऊ पुस्तकांच्या जोडीला मराठी, हिंदी मासिके कॉमिक्स, रीडर्स डायजेस्टसारखी वाचकप्रिय नियतकालिके या वाचनालयांमधून कित्येक प्रतींमध्ये उपलब्ध करून द्यावी लागायची, इतकी वाचकांची त्यांना मागणी होती. दादरच्या शिवाजी पार्काजवळ सध्या असलेल्या वसंत वाचनालयाच्या परिसरातच आठशेच्यावर सभासद असलेल्या डझनभर इतर सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या सन २००० पर्यंत शिल्लक होत्या. ठाणे स्थानकानजीक पॉप्युलर, प्रशांत लायब्ररी आणि ठाणे शहराच्या मध्यभागी जॉली लायब्ररी अगदी अलीकडेपर्यंत सुरू होत्या. पुण्यात सुसज्ज शासकीय ग्रंथालयांच्या जोडीला कित्येक खासगी वाचनालये होती. कोकणात रहस्य कथांसह हिंदूी उपन्यास संग्राहकांची हौशी खोतांची वाचनालये, नागपूरजवळ तालुक्याच्या बस स्थानकांजवळच्या दुकानांचे स्वरूप सर्क्युलेटिंग लायब्ररीसारखे होते. त्यात मराठी साहित्य कमी, पण गुलशन नंदा, समीर, ओम प्रकाश शर्मा यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या सर्वाधिक उडय़ा पडत. बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यात, अमरावती, यवतमाळमध्ये पाच ते दहा फुटांच्या टपऱ्यांमध्ये या सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या चालत. या सर्व वाचनालयांमध्ये बाबूराव अर्नाळकरांपासून ते रहस्यकथाकारांची मोठी फौज सर्वाधिक वाचली जाई. साधारणत: १९८० ते ९० या कालावधीमध्ये या वाचनालयांना पहिला धक्का टीव्ही आणि त्यावरच्या कार्यक्रमांमुळे वाचक घटण्यातून मिळाला. मनोरंजनाचा ताणहीन पर्याय म्हणून दूरदर्शनकडे कलत वाचन तोडणारी पहिली पिढी या वाचनालयांना पहिल्यांदा जाणवली. दादरच्या वसंत वाचनालयाचे वसंत सावरकर यांनी याबाबत गमतीशीर आठवण सांगितली. त्याकाळी दूरदर्शनवर आठवडय़ातून एकदा हिंदी चित्रपट लागे. तेव्हा रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे. त्यामुळे रामायण-महाभारत या टीव्ही मालिका आणि रविवारी संध्याकाळी लागणाऱ्या चित्रपटाच्या कालावधीत वाचनालयात कुणीच येत नसल्याने लायब्ररी बंद ठेवावी, असा निर्णय त्यांना घ्यावा लागला होता. त्यांच्याभोवती असलेल्या डझनभर सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या बंद पडल्या. वाचक पुढल्या दहा-पंधरा वर्षांत झपाटय़ाने घटला हे त्याचे प्रमुख कारण होते, तितकेच दादरच्या या मध्यवर्ती भागातील जागांचे भाव गगनाला गेल्याने सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या तोटय़ात चालविणे अवघड बनले, हाही महत्त्वाचा मुद्दा होता.
दादरमध्ये चार गुजराती व्यक्तींनी मराठी वाचनालये उभारली होती. अन् ठाण्यात १९७०च्या दशकात गोखले रोडजवळ ‘पॉप्युलर’ मराठी-इंग्रजी पुस्तके देणारी पहिली सर्क्युलेटिंग लायब्ररीही मुकेश देढीया या गुजरात्यानेच सुरू केली. काही वर्षांपूर्वी पॉप्युलर लायब्ररी ठाणे स्थानकानजीकच असलेल्या गावदेवी मंदिराजवळ हलविण्यात आली होती. वीसेक हजारांहून अधिक पुस्तके असणाऱ्या या लायब्ररीचे गेल्या दशकापर्यंत ८०० ते १००० सदस्य होते. लोकप्रिय आणि अभिजात अशी मराठी-इंग्रजीतील ताजी पुस्तके या लायब्ररीत उपलब्ध होती. वाचकांची गरज जाणणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असलेले हे वाचनालय दोन-अडीच वर्षांपूर्वी बंद झाले. वाचकांची संख्या हळूहळू १५०वर आल्यानंतर इतका मोठा पुस्तकपसारा सांभाळणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे कठीण बनल्याने देढीया यांनी ही लायब्ररी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता त्या जागेत एक सुसज्ज उपाहारगृह उभे राहिले आहे.
ठाणे शहरात नौपाडा येथे छाया कृष्णकांत ताटे यांनी १९७६ साली प्रशांत लायब्ररी सुरू केली. शहरातील ही दुसरी सर्क्युलेटिंग लायब्ररी. तिचे सदस्यही अगदी अलीकडेपर्यंत ६०० ते ८०० पर्यंत होते. तीन कर्मचारी ही लायब्ररी चालवत असत. तीन-चार वर्षांपूर्वी नौपाडय़ातील लायब्ररी बंद करण्यात आली. तिचे पाचपाखाडी या भागात स्थलांतर झाले. आज १५०-२०० पट्टीच्या वाचकांना धरून ठेवत ही लायब्ररी आम्ही सुरू ठेवली असल्याची माहिती या लायब्ररीचे मालक प्रशांत ताटे यांनी दिली. पूर्वी जागोजागी असणारे टेलिफोन बूथ माणसांची आत्यंतिक महत्त्वाची गरज होती, मोबाइल आल्यानंतर टेलिफोन बूथचे महत्त्व कमी झाले. तशाचप्रकारे मोबाइल आणि इतर वाचनाचे पर्याय आल्यानंतर पुस्तकाचे झाले, असे ताटे यांना वाटते. त्यांच्या मते वाचन कमी झाले नाही, तर लोक ईबुक्स, ऑनलाइन पुस्तक खरेदी आणि ऑडियो बुक्स या पर्यायांकडे वळले असल्याने पूर्वीसारखा पुस्तक वाचणारा दिसत नाही.
ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ ब्रह्मांड परिसरात प्रगती तुरेकर यांनी २००५ साली सुसज्ज अशी सलोनी लायब्ररी सुरू केली. सर्क्युलेटिंग लायब्ररीद्वारे घरपोच पुस्तके देण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबविली. पुढे या लायब्ररीच्या ठाण्यातील कोपरी आणि नवी मुंबईतील वाशी आणि खारघर येथेही शाखा तयार करण्यात आल्या. त्यांच्या संग्रहात मराठीतील पल्प फिक्शनपासून इंग्रजी ग्रंथांचा प्रचंड मोठा साठा होता. वाचकांच्या आरंभीच्या चांगल्या प्रतिसादामुळे या लायब्रऱ्या सुरळीत होत्या. पुढे नवी मुंबईतील वाचकांचा ओढा आटला आणि नंतर ठाण्यातील लायब्रऱ्यांमधूनही प्रतिसाद कमी झाला. तुरेकर यांनी वेगळा व्यवसाय निवडल्यामुळे त्यांनी या लायब्रऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला.
कळव्यातील पेडणेकर दाम्पत्याने निवृत्तीनंतर २०१२ साली मोठय़ा हौसेने ‘अक्षरधन’ ही लायब्ररी सुरू केली. मराठीतील विषयवार पुस्तके निवडून त्यांनी बदलत्या वाचकांशी एकरूप होणाऱ्या अकथनात्मक पुस्तकांचाही अफाट साठा आपल्या लायब्ररीत ठेवला. मराठी वाचक कथा कादंबऱ्यांसोबत जीवनशैलीशी निगडित पुस्तके अधिक वाचतो, असे लक्षात आल्यावर त्यांनी त्या पुस्तकांनाही लायब्ररीत खास जागा करून दिली. दहा-पंधरा हजार पुस्तकांची ही सुसज्ज लायब्ररी वाचकांच्या कडू-गोड अनुभवानंतर दोनेक वर्षांपूर्वी बंद झाली.
ठाण्यातील खोपट परिसरात असलेली विजय दावडा यांची जॉली लायब्ररी म्हणजे दुर्मीळ पुस्तकांचा खजिना होता. साठोत्तरी गाजविणारे सारेच महत्त्वाचे लेखक, बाबूराव अर्नाळकरांनंतर थांबलेली रहस्यकथांची लाट नव्याने सुरू करणारे गुरुनाथ नाईक आणि त्यांच्या सहलेखकांचे लोकप्रिय साहित्य, हिंदीतील नई कहानी लिहिणाऱ्या शिलेदारांपासून ते पॉकेटबुक्स कादंबऱ्यांचा, इंग्रजी-हिंदी कॉमिक्सच्या पहिल्यावहिल्या आणि आज खूप महत्व असलेल्या आवृत्त्या, ब्रिटिश-अमेरिकी लेखकांचे साहित्य असा जो मागेल, ते लाभू देणारी ही लायब्ररी भारतातील कित्येक प्रकाशकांना बाजारातून गायब झालेली पुस्तके नव्याने छापून देण्यास मदत करीत होती. गेली ३५ वर्षे अत्यंत उत्तमरीत्या चाललेल्या या लायब्ररीची सभासद संख्या १९९० ते २०१६ पर्यंत ५०० ते ८०० या दरम्यान होती. २०१७ साली त्यात घसरण झाली आणि लायब्ररी या वर्षांच्या फेब्रुवारी महिन्यात पूर्णपणे बंद झाली, तोवर तिचे सभासद अवघे ३५वर आले होते.
सगळ्या प्रकारचे मराठी साहित्य वाचणारे वाचक पाहिलेले दावडा यांचे निरीक्षण असे आहे की, २००५ नंतर नवीन वाचक तयारच झाला नाही. १९९० ते २००० या कालावधीपर्यंत टीव्ही, केबल आणि इतर मनोरंजनाच्या पर्यायकाळात देखील दरवर्षी सुट्टीत नवा तरुण वाचक सदस्य बनून पुस्तके मागायला येत असत. पण २००५ नंतर त्यात बदल झाला. जुने वयोवृद्ध वाचक, मध्यमवयीन वाचकही नंतर आपले वाचन कमी करायला लागले. २०१७ नंतर इतके वाचक घटल्यानंतर लायब्ररी चालवायची कशी, हा प्रश्न पडायला लागला. माझी स्वत:ची जागा असल्याने काही वर्षे ही लायब्ररी मी तोटय़ात चालवली. पण आता लायब्ररी चालविण्यापेक्षा ती जागा भाडय़ाने दिल्यास मला अधिक नफा होईल, हे दिसत असल्याने मी लायब्ररी बंद करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
नगरमधील ग्रंथप्रेमी आणि संग्राहक असलेल्या शिरीष बापट यांच्या अभिरुची वाचनालयाच्या तीन शाखा गाव आणि तालुक्यात होत्या. गेल्या दहा वर्षांपासून कमी झालेल्या वाचकांमुळे त्यांनी आपली एक लायब्ररी पूर्णपणे बंद केली. इतर दोन लायब्रऱ्यांमध्ये वाचक वाढविण्यासाठी नाही, तर टिकवून ठेवण्यासाठी सध्या त्यांची लढाई सुरू आहे. या खासगी लायब्रऱ्या माझ्या स्वत:च्या जागेत असल्यामुळे मला गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत हा व्यवसाय अवघड वाटत नव्हता. मात्र सभासद कमी झाल्यानंतर पुस्तक खरेदी, त्यांची जपणूक, लाईट आणि इतर खर्च निघेल इतकेही सभासद राहिले नाही, तेव्हा एक लायब्ररी बंद करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. लोकांनी लायब्रऱ्या बंद करू नये म्हणून त्यांनी वर्गणीदर सध्या निम्म्याने आणले आहेत. वाचक टिकवून ठेवण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नगरमधील शिरीष बापट यांच्यासारखीच स्थिती सध्या गावोगावातील सर्क्युलेटिंग लायब्ररीजची आहे. शहरगावांत आणि खेडेगावातही मोबाइलद्वारे मनोरंजनाचे अनंत पर्याय उपलब्ध झाले असताना वाचनाचा आनंद मिळविण्याची उत्सुकता तरुणांमध्ये राहिलेली नाही, असे अनेकांचे निरीक्षण आहे. याबाबत कुणीच काही बोलत नसल्याने आणि वाचनाचे महत्त्व पटवून देणारी यंत्रणा नसल्याने जिल्हा ग्रंथालयांहून अधिक वाईट दिवस सर्क्युलेटिंग लायब्ररीजना आले आहेत.
शहरे स्मार्ट झालीत, शहर गावेही प्रगतीच्या मागावर धावतायत, ओस पडलेली खेडी सध्या आर्थिक आणि अर्धशहरीकरणाच्या नादात सामाजिक समस्यांशी झुंजतायत. त्यात वाचनाची तहानभागविणाऱ्या आणि भाषा जतन करणाऱ्या ग्रंथपोया नष्ट होण्याचे पाहण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, ही सर्वात वाईट गोष्ट आहे.
थोडे अपवाद..
डोंबिवलीमधील पै काकांची फ्रेण्ड्स लायब्ररी ही त्यांच्या कल्पक उपक्रमांमुळे खासगी लायब्ररींमध्ये आज राज्यभरातील कोणत्याही जिल्हा वाचनालयांमध्ये नसतील त्याहून कैक पट सभासदसंख्या जपून आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथे घरपोच पुस्तकांची सुविधादेखील देणाऱ्या या लायब्ररीचे वाचक १२ हजार आहेत. १०४ कर्मचाऱ्यांद्वारे एखाद्या उद्योगासारखे या लायब्ररीचे कार्य उत्तम चालले आहे. त्याचप्रमाणे बोरिवलीमधील प्रथमेश लायब्ररीमध्ये प्रौढांसोबत बालवाचकांचेही प्रमाण वाढते राहिलेले आहे. या वाचनालयामध्ये अडीचशेच्यावर वाचक असून वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वाचक आणखी वाढविता येऊ शकतो, असा या लायब्ररीचे मालक मोरे यांचा विश्वास आहे. वसंत वाचनालयाचे वसंत सावरकर यांनी २००८ पर्यंत एकही इंग्रजी पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये ठेवले नव्हते. २००८ नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. टिकून राहण्यासाठी इंग्रजी पुस्तकांची आवश्यकता त्यांना वाटली. आज त्यांच्या लायब्ररीमध्ये ३३ टक्के इंग्रजी पुस्तके आहेत. आजूबाजूच्या सर्व सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या बंद पडल्या असल्या, तरी त्यांच्याकडचे ६०० सभासद निष्ठावंत वाचक आहेत. पण हल्ली तरुण वर्ग केवळ आई-वडिलांची पुस्तके बदलण्यासाठी वाचनालयात येतात. स्वत: वाचायला पुस्तक घेण्यासाठी नाही, ही त्यांची खंत आहे.
लोकप्रिय साहित्याचे वाहक..
* या सर्क्युलेटिंग लायब्ररीचे सर्वात मोठे योगदान लोकप्रिय साहित्याचे वहन हे होते. गुरुनाथ नाईक, दिवाकर नेमाडे, शरश्चंद्र वाळिंबे-हेमन कर्णिक, चिंतामणी लागू, सुहास शिरवळकर, चंद्रकांत काकोडकर यांनी लिहिलेल्या रहस्यकथा तडाखेबंद खपत आणि त्यांच्या प्रत्येक पुस्तकाची गावोगावच्या सर्क्युलेटिंग लायब्ररीजमध्ये दोन ते पाच प्रती असत.
* सुभाष शहा, एस.एम. काशीकर, बाबा कदम, अरुण ताम्हणकर, आत्माराम शेटय़े, अशोक थोरे, शरद दळवी, राजा पारगावकर, अनिल टी. कुलकर्णी, व्यंकटेश महाजन, राजा पारगावकर या लेखकांच्या रहस्यकथांच्या पुस्तकांना आणि नारायण धारपांच्या भयकथा-कादंबऱ्यांची या लायब्रऱ्यांमध्ये पारायणे केली जात.
* प्रदीप दळवी, प्रकाश कदम, हेमंत सावंत, रामचंद्र सडेकर, अशोक व्हटकर, जयवंत व्हटकर यांच्याही रहस्यकथांनी एक काळ गाजविला. गुन्हेगारी विश्वाचे सातत्याने विच्छेदन करणारे श्रीकांत सिनकर यांच्या कादंबऱ्या गुन्हेकथांनी पछाडलेले वाचक होते. विजय देवधर, रवींद्र गुर्जर यांच्या साहसकथांचे अनुवाद सर्वाधिक पसंतीच्या पुस्तकांत असत.
* आशू रावजी-दिनू कानडे, द. स. काकडे, बांदोडकर बंधूंच्या टायगर कथा यांतील शृंगाररसपूर्ण वर्णनांचा चाहतावर्ग होता. याशिवाय कुमुदिनी रांगणेकर, योगिनी जोगळेकर, शैलजा राजे, वसुंधरा पटवर्धन, सुमती क्षेत्रमाडे, गीता मंगेशकर, महिला सभासदांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होत्या, हे सगळ्याच सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या मालकांचे निरीक्षण आहे.
* यातील कित्येक लेखकांची पुस्तके आज विकत मिळत नाहीत. त्यामुळे सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या हाच या लेखकांना वाचण्याचा एक मार्ग होता. आज यातील निम्मेही लेखक नव्या पिढीतील वाचकांना माहिती नाहीत. ही वाचनालये जेव्हा संपतील, तेव्हा त्यासोबत अनेक लेखक विसरले जातील.
स्मृतिशिल्लक..
या लायब्रऱ्यांसोबत वाचणाऱ्यांची एक संस्कृती नष्ट झाल्याची जाणीवही आपल्याला सध्या नाही. प्रत्येकाच्या गावात, शहरगावांतील आड भागांत, आळी, गल्लीमध्ये हौसेने कुणी पुस्तकप्रेमी स्वत:चे वाचनव्यसन इतरांनाही व्हावे म्हणून स्वत:चे खासगी वाचनालय उभारत होता. वाचक वाढले की ग्रंथसंख्याही वाढवत होता. नागपूर शहरामध्ये आज एकही खासगी लायब्ररी उरलेली नाही. एकेकाळी मासिके आणि हिंदी उपन्यास यांचा ताजा पुरवठा वाचकांना करून देणारा हा मार्ग बंद झालेला आहे. शेगावमधील बस स्थानकाजवळ शर्माजी या व्यक्तीची कैक वर्षे चालणारी लायब्ररी त्यांची पुढची पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक नसल्याने त्यांच्या मृत्यूनंतर बंद झाली. गावागावातील सर्क्युलेटिंग लायब्ररीजनी वाचकांना घडविले. आज ऑनलाइन खरेदीच्या जमान्यात वाचन ही महत्त्वाची गरज नाही. त्यामुळे वाताहत झालेल्या सर्क्युलेटिंग लायब्ररीजच्या चांगल्या स्मृतीशिल्लक असलेलीही शेवटची पिढी आज उरलेली आहे.
pankaj.bhosale@expressindia.com