भंडारा येथील १९५४ सालच्या  पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव का झाला असावा, याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही. महामानवही निवडणुकीच्या राजकारणात हरतात ते का, याचे कोडेही कायम आहे. ते उलगडू पाहणारा हा पत्र-लेख..
भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेकरांची प्रदीर्घ अशी मुलाखत ३ फेब्रुवारी २०१३ च्या ‘लोकसत्ता’मध्ये वाचण्यात आली. त्यांच्या मुलाखतीतील इतर मुद्यांपेक्षा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मे १९५४ मधील भंडारा पोटनिवडणुकीतील पराभवाचे जे विश्लेषण केले त्याचा सविस्तर खुलासा करावासा वाटतो.
त्याआधी भंडारा लोकसभा मतदारसंघाचा परिचय करून देतो. लोकसभेवर या मतदारसंघातून सर्वसाधारण व राखीव अशा दोन्ही जागांवरून लोकसभा प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या वेळी सर्वसाधारण व राखीव मतदारसंघांतून दोन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाचेच निवडून आले होते. सर्वसाधारण जागेवरून चतुर्भुजभाई जसानी, तर राखीव जागेवरून खांडेकर नावाचे गृहस्थ निवडून गेले होते.
पराभूत उमेदवारांपैकी एकाने जसानी यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तिचा मार्च १९५४ मध्ये निकाल लागला, तो जसानी यांच्या विरोधात. त्यामुळे त्यांना राजीनामा  द्यावा लागला. परिणामी राखीव जागेवरून निवडून गेलेल्या खांडेकरांनाही पायउतार व्हावे लागले. त्यामुळे त्या जागांवर निवडणूक आयुक्तांना पोटनिवडणूक जाहीर करावी लागली.
मुंबईतून मुख्य निवडणुकीत बाबासाहेबांसोबत पराभूत झालेल्या अशोक मेहता यांना समाजवादी पक्षाने सर्वसाधारण जागेवरून भंडारा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार म्हणून घोषित केले, तर राखीव मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशनचे (शे. का. फे.) उमेदवार म्हणून उभे राहिले होते. (या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वसाधारण जागेवरून पूनमचंद राका यांना, तर राखीव जागेवरून भाऊराव बोरकर यांना उमेदवारी दिली होती. )
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पराभवाचे खापर येथील स्थानिक कार्यकर्त्यांवर फोडले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘बाबासाहेबांबरोबरचे कार्यकर्ते निष्ठावान होते, समर्पित होते, परंतु ते धोरणी नव्हते. ते कार्यकर्ते राजकीय डावपेचात कमी पडले असावेत म्हणून बाबासाहेबांना भंडारा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला,’ असे त्यांनी मुलाखतीत त्या पोटनिवडणुकीचे राजकीय विश्लेषण केले आहे, पण ते अपुऱ्या माहितीवर आधारित आहे.
२१ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेब प्रचारासाठी भंडारा येथे पोहोचले. दिनकरराव रहाटे या स्थानिक कार्यकर्त्यांने बाबासाहेबांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्याच दिवशी अशोक मेहता यांचे खासगी सचिव डॉ. शांतीलाल आणि त्यांचे प्रचार प्रमुख अ‍ॅड. ज्वालाप्रसाद दुबे बाबासाहेबांना भेटले व त्यांनी मुंबईप्रमाणेच या पोटनिवडणुकीत एकमेकांना साहाय्याची भूमिका मांडली. ती बाबासाहेबांना पसंत पडली म्हणून त्यांनी दोघांना सहकार्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर बाबासाहेबांनी शे.का.फे.चे भास्करराव निनावे, दिनकरराव रहाटे व इतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तेथील कार्यकर्ते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर समजतात तेवढे खचितच नेभळट नव्हते. ते बाबासाहेबांना म्हणाले, ‘बाबासाहेब! आम्ही निश्चितपणे सांगतो, शे.का.फे.च्या मतदारांचे दुसरे मत (सर्वसाधारण जागेसाठीचे) प्रजा समाजवादी पक्षाला मिळेल, परंतु प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत (राखीव जागेसाठीचे) तुम्हाला मिळण्याची अजिबात शक्यता नाही. याकरिता आपण हा समझोता करू नये. त्याऐवजी शे.का.फे.च्या मतदारांनीच आपले दुसरे मत गोठवून टाकावे. ते कोणालाही देऊ नये.’ असे झाले असते तर त्यांच्या अल्प ज्ञानाचे ठरले असते, कारण त्यामुळे बाबासाहेबांना मिळालेल्या १,३२,३८४ मतांमध्ये एका मतानेही वाढ झाली नसती. आधुनिक काळातील चालू कार्यकर्ते असते, तर त्यांनीही बाबासाहेबांना अ‍ॅड. आंबेडकर सांगतात तोच सल्ला दिला असता, पण तोही बाबासाहेबांनी न ऐकता धुडकावून लावला असता. हीच गोष्ट मात्र भाऊ बोरकरांनी केली असावी.
प्रत्यक्षात एक मत गोठवण्याचा सल्ला देणाऱ्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी फटकारले. त्यांना ते म्हणाले, ‘मी राज्यघटना बनविली आहे. मत गोठवणे हे घटनाविरोधी कृत्य आहे. माझे अनुयायी जर घटनेतील नीतिमूल्यांच्या विरोधात कार्य करणार असतील तर योग्य होणार नाही. मी निवडणुकीत पराभूत झालो तरी चालेल, परंतु तुमचे म्हणणे ऐकणार नाही.’
हाच मुद्दा त्यांनी मॅन्रो हायस्कूलच्या भव्य पटांगणातील जाहीर सभेत आपल्या अनुयायांना सांगितला. त्यांची ही सभा अलोट गर्दीमुळे एक माध्यमिक शाळेत शिकणारा मुलगा झाडावर चढून ऐकत होता. त्यांनी एक मत सर्वसाधारण जागेवरील अशोक मेहतांना व दुसरे मत आपल्याला देण्याचे आवर्जून सांगितले होते. बाबासाहेबांच्या पराभवाचे हे एक कारण होते. याखेरीज दुसरेही कारण होते .. रावसाहेब ठवरे यांच्या भंडारा येथील चोखामेळा वसतिगृहातल्या परिसरातील पालकांची मुले खाऊनपिऊन शिकत होती. ठवरे बाबासाहेबांचे विरोधक. त्यामुळेही त्यांना मते कमी पडली असावीत. त्यामुळे त्यांना ८,३८१ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. बाबासाहेबांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या प्रभावाने अशोक मेहता निवडून आल्याने काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अशोक मेहता यांच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारा मतदारसंघात जयप्रकाश नारायण, ना. ग. गोरे व एस. एम. जोशी हे (त्या वेळच्या प्रजा समाजवादी पक्षाचे)  नेते आले होते. बाबासाहेबदेखील भंडारा व आजच्या गडचिरोली जिल्ह्याच्या वरसा गावापर्यंत २५ एप्रिलपर्यंत प्रचारासाठी फिरले होते. वर्धा येथील गावकऱ्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी  पाच हजार रुपयांचा निधी त्यांना भंडारा येथे जाताना त्याच दिवशी दिला होता. तरीही त्यांचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. त्या वेळी शे.का.फे.चे स्थानिक नेते सहज बोलून गेले होते की, ‘बाबासाहेब भंडारा येथे आले नसते तरी त्यांना आम्ही निवडून आणले असतेच.’ पण बाबासाहेब संसदीय मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने विजयी होऊ पाहात नव्हते. म्हणूनच त्यांनी कार्यकर्त्यांना मते कुजवण्याचा दिलेला सल्ला मानला नव्हता. त्यांच्या या अलौकिक नीतिमत्तेमुळे त्यांचा पराभव झाला होता, कार्यकर्त्यांच्या राजकीय डावपेचांच्या अभावी नाही.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुलाखतीत असेही म्हटले होते की, ‘मुळातच बाबासाहेबांनी एक मत एकाच उमेदवाराला द्या, असा काही आदेश दिला होता का, याचा काही पुरावा कागदोपत्री अजून मला सापडलेला नाही.’ त्यांना सांगावेसे वाटते की, लेखात झाडावर चढून भाषण ऐकलेल्या मुलाचा जो उल्लेख आला तोच मुलगा शिकून मोठा झाल्यावर भंडारा येथील ‘जकातदार कन्याशाळे’त प्राध्यापक झाला. त्याचे नाव प्रा. वामन तुरिले असून त्यांचा एक छोटेखानी लेख माझ्या संग्रही आहे. तो लेख महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र ‘लोकराज्य’च्या ऑक्टोबर २००६च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा