‘लोकसत्ता’च्या ६८व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे जितेंद्र जोशी यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत! मुलाखतीचा विषयच ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ असा असल्याने उपस्थित श्रोत्यांनाही एक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस कसे आहेत, हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. मुलाखतीच्या सुरुवातीलाच जितेंद्र जोशी यांनी, ‘आता पुढील तासाभरासाठी तुम्ही मुख्यमंत्री नाही’, असे सांगत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
लहानपणापासूनच तुम्ही चळवळ्या स्वभावाचे होतात का, या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री नागपूरमधील त्यांच्या शाळेच्या आठवणींत हरवले. ‘लहानपणी किंबहुना लहानपणापासूनच मी शांत स्वभावाचा आहे. शाळेतही एक शांत विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती. म्हणजे, एखाद्या मित्राला शिक्षकांनी विनाकारण पकडले, तर तो माझी साक्ष काढायचा. म्हणजे, ‘सर, आपण खरंच काही केलेलं नाही. वाटल्यास देवेंद्रला विचारा!’, असं त्याचं उत्तर असायचं. मला आठवतं, माझा खूप चांगला मित्र आणि मी एका बेंचवर बसायचो. त्या वेळी इतर मुलं मस्ती करत असल्याने आमच्या वर्गशिक्षकांनी एक निर्णय घेतला. या निर्णयानुसार दोन मुलांच्या मध्ये एका मुलीला बसवण्यात आलं. पण माझ्या या मित्राने आम्हा दोघांच्या मध्ये बसलेल्या मुलीला इतका त्रास दिला की, शेवटी तिने शिक्षकांकडे जाऊन आपली जागा बदलून घेतली होती.’ या आठवणीवर प्रेक्षकांमध्येही हशा पिकला.
‘माझे वडील आमदार होते. त्यांचा लोकसंग्रह आणि लोकप्रपंचही प्रचंड होता. त्यामुळे ते कामानिमित्त सतत फिरत असायचे. रात्री कितीही उशिरा आले, तरी सकाळी लवकरच त्यांचा दरबार लागायचा. मग त्या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाला चहा आणि पाणी नेऊन देण्याचे काम माझ्याकडे होते. मग कधीतरी आम्हाला ते सांगत की, आज रात्री आपण सिनेमाला जायचं! आम्ही सगळे तयार होऊन बसायचो. सिनेमा रात्री नवाला असायचा आणि वडील रात्री दहाच्या सुमारास घरी यायचे. मग आमची वरात चित्रपटगृहात जायची आणि दहा मिनिटांत मध्यंतर व्हायचा. आई त्यांच्यावर खूप वैतागायची. म्हणायची, ‘कशाला उगाच मुलांना नसत्या आशा लावून ठेवता?’ त्यावर वडिलांचं उत्तरही ठरलेलं असायचं. ‘अगं, अशामुळे चित्रपटातला सस्पेन्स वाढतो.’, आपल्या वडिलांबद्दलची ही आठवण त्यांनी उलगडली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्या मुलीच्या हट्टापायी तुम्ही तिला शाळेत सोडायला गेलात, ते नेमकं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस यांनी एक वडील म्हणून स्वत: आणि त्यांचे वडील यांची तुलनाच केली. ‘आपण माझ्या वडिलांच्या १० टक्केही नाही. ते जनतेचा माणूस होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तुमचे वडील आमच्याकडे दर दिवसाआड यायचे, असे सांगणारे अनेक लोक आजही नागपुरात भेटतात,’ असे सांगताना ते पुन्हा आठवणींत हरवले.
आईबद्दल बोलताना त्यांच्या स्वरात आदर आणि कौतुक ओसंडून वाहत होतं. ‘लहानपणी वडील जवळ नसायचे, तेव्हा तिनेच दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या. तिचा माझ्यावर खूप विश्वास आहे. मुलगा जे काही करेल, ते चांगलंच करेल, असं तिला ठामपणे वाटतं. त्याचा गैरफायदा कधीच घेतला नाही. आईचं वैशिष्टय़ म्हणजे ती चालती बोलती टेलिफोन डिरेक्टरी आहे. तिला अक्षरश: शेकडो टेलिफोन नंबर पाठ होते. तसंच तिची राजकीय समज आणि तिने बांधलेले आराखडेही खूप बरोबर असतात. त्यामुळे आजही तिच्याशी बोलणं माझ्यासाठी ‘विचार कसा करावा,’ याचा वस्तुपाठ असतो,’ असे सांगत त्यांनी आपल्या यशातील आईचा वाटा किती मोलाचा आहे, हे अधोरेखित केलं.
‘महाविद्यालयीन दिवसांनीही मला आयुष्यातील खूप मोठा धडा दिला. माझी संभाषण कला तिथेच विकसित झाली. पण त्याचीही एक गंमत आहे. मी फर्स्ट इयपर्यंत एकाही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. एका स्पर्धेच्या वेळी माझा मित्र मुकुल कानेटकर याची नेहमीची पार्टनर नव्हती तेव्हा त्याने मला विचारलं. मीदेखील होकार दिला. ‘भाषावार प्रांतरचना’ वगैरे असा काहीतरी विषय होता. पाच दिवस चांगली भाषणाची तयारी वगैरे केली. स्पर्धेच्या दिवशी तिथे दोनच संघ आले होते. पहिले मुकुल बोलला. नंतर दुसऱ्या संघातील एक मुलगा बोलला. मग माझी वेळ आली. मी पाठ केलेलं भाषण दणक्यात सुरू केलं. पहिल्या दोन मिनिटांतच अपेक्षित ठिकाणी लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या कानात गेल्या आणि मी पुढलं भाषण विसरलो. चांगली ४०-४५ सेकंद तसाच स्तब्ध उभा होतो. प्रेक्षकांतील काहींनी आपली हुर्यो उडवायला सुरुवात केली. मग जे सुचेल, ते बोलत सुटलो. अर्थात आम्हाला दोन संघात दुसरं बक्षीस मिळालं, केवळ माझ्यामुळेच!
त्यापुढले दोन महिने मी अक्षरश: स्वत:ला कोंडून घेतलं. मला बोलता येत नाही, म्हणजे काय! बोलण्याची कला अवगत असलेल्या एक-दोन शिक्षकांना भेटून त्यांच्याशी बोललो. त्यापैकी एकांनी एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, ‘आपल्यासमोर बसलेले सगळे मूर्ख आहेत, असं समजून बिनधास्त बोलायचं.’ आता हा सल्ला अमलात आणत नाही. पण त्या वेळी हा सल्ला खूपच उपयोगी पडला आणि दोन महिन्यांच्या तयारीनंतर एका मोठय़ा स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट वक्त्याचं बक्षीस मिळवल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
वक्तृत्व कलेबद्दल बोलताना प्रमोद महाजन यांच्या एका सभेची आठवणही फडणवीस यांनी सांगितली. ‘त्या वेळी महाजन नावारूपाला येत होते. नागपुरात त्यांनी अटलजींबरोबरच्या सभेत भाषण केलं होतं. पण मला आठवतेय ती त्यांची नागपुरातील पहिली स्वतंत्र सभा! मी १३-१४ वर्षांचा होतो. ते आमच्याकडेच उतरले होते. भाषणाला निघाले तेव्हा मला म्हणाले की, टेपरेकॉर्डर असेल, तर भाषण रेकॉर्ड कर! मीसुद्धा टेपरेकॉर्डर घेऊन त्यांच्या मागोमाग गेलो आणि त्या भोंग्याच्या बरोबर खाली बसलो. आपल्या सभेला गर्दी होईल की नाही, याचं त्यांना दडपण होतं. त्या सभेत त्यांनी खूपच उत्तम भाषण केलं आणि सभा खिशात टाकली. त्या पहिल्या स्वतंत्र सभेचं ध्वनिमुद्रण असलेली कॅसेट त्यानंतर अनेक र्वष मी ऐकत होतो,’ असे ते म्हणाले.
राजकारणी झाला नसतात, तर.. या जितेंद्र जोशी यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘वकील’ असं उत्तर दिलं. पण त्याच वेळी तुम्ही मॉडेलिंगही केलं होतंत, हे आपल्याला माहिती आहे, असं जितेंद्रने विचारल्यावर तो किस्सादेखील त्यांनी अगदी तपशीलवार सांगितला. ‘विवेक रानडे नावाचा माझा मित्र नागपुरात फोटोग्राफी करतो. एका निवडणुकीनंतर त्याने मला तुझे फोटो काढायचे आहेत, असं सांगितलं. मीदेखील फार आढेवेढे न घेता त्याच्याबरोबर गेलो. मला चार-पाच वेगवेगळे कपडे घालायला देऊन त्याने माझे फोटो काढलेही. त्यानंतर एके दिवशी त्याने मला सांगितलं की, ते फोटोज एका शोरूमच्या जाहिरातींसाठी काढले होते. ते मला खरंच वाटत नव्हतं. ती जाहिरात नागपुरात सर्वत्र लागणार, त्याच दिवशी मी गाडी काढून नागपुराबाहेर पसार झालो. अनेक दिवस हिंडत होतो. तीन दिवस मोबाइल बंदच करून ठेवला. मग ज्या वेळी चालू केला, त्या वेळी दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. तो खूप कौतुक करत होता त्या जाहिरातीचं! ते ऐकून जरा हायसं वाटलं आणि नागपुरात परत गेलो,’ असे सांगून मुख्यमंत्रीही मिश्कील हसले.
आपल्या वेगाच्या वेडाबद्दलही त्यांनी जितेंद्र यांच्या प्रश्नाला भरभरून उत्तर दिलं. ‘वेगाने गाडी चालवणे, ही गोष्ट मला नेहमीच खूप आवडत होती. अजूनही आवडते. ८-१० र्वष मी नागपूरहून मुंबईला माझ्या उघडय़ा टपाच्या जीपनेच यायचो. संध्याकाळच्या सुमारास नागपूर सोडलं की, सकाळी नाश्त्याला मुंबईत हजर! पण त्या वेळी माझ्या या शौकाचा फटका माझ्या जवळच्या मित्रांना अनेकदा बसला होता. रात्रीच्या वेळी ४०-५० किलोमीटरची रपेट तर अगदीच ठरलेली. मग मी कोणाला तरी माझ्याबरोबर घेऊन जायचो. एकदा आम्हा दोन-तीन मित्रांचं कटकला जायचं ठरलं. मग आणखी एका मित्राला बरोबर घ्यायची टूम निघाली. कटकला जायचंय म्हटल्यावर तो नाही म्हणेल, म्हणून त्याला काही सांगायचंच नाही असं ठरलं. रात्री रपेट मारायची नेहमीची सवय म्हणून तोदेखील अगदी हसत-खेळत गाडीत येऊन बसला. शंभरएक किलोमीटर झाल्यानंतर त्याला जराशी कुणकुण लागली. त्याने विचारल्यावरही आम्ही ‘रायपूर’ असं उत्तर देऊन त्याला गप्पं केलं. पुढे रायपूरला पोहोचल्यानंतर त्याला आम्ही कटकबद्दल सांगितलं. असा त्रास माझ्या मित्रांना अनेकदा सहन करावा लागला आहे,’ असे सांगताच प्रेक्षकांमध्येही जोरदार हशा फुटला. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात राजकारणाबाबत काही प्रश्न विचारताना जितेंद्र यांनी मुख्यमंत्र्यांच्या शांतपणाबद्दल भाष्य केलं. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘राजकारणात शांत राहणं हा मोठा सद्गुण मानला जातो. काय बोलावं, यापेक्षाही ‘कुठे काय बोलू नये’, हे आमच्या क्षेत्रात महत्त्वाचं असतं,’ असा मंत्रही त्यांनी दिला. त्याचप्रमाणे राजकारणात आक्रस्ताळेपणापेक्षाही आक्रमकतेला महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टी भिन्न असून त्याचं भान बाळगलंच पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुलाखतीच्या शेवटी जितेंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आणखी एक पैलू लोकांसमोर मांडला. त्यांना दोन हजारांपेक्षा जास्त गाणी पाठ आहेत, असं सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. याच दोन हजारांमधील ‘जीना इसी का नाम हैं..’ हे गाणं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीची सांगता केली.

 

‘लोकसत्ता’चा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी नरिमन पॉइंट येथील ‘एक्स्प्रेस टॉवर्स’च्या हिरवळीवर उत्साहात साजरा करण्यात आला. याच सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली तसेच २०१५ मधील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या ‘वर्षवेध’ या वार्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. राजकीय, उद्योग, व्यापार, प्रशासन, पोलीस, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान व तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावली व ‘लोकसत्ता’ परिवाराला शुभेच्छा दिल्या. त्या सोहळ्याची  चित्रमय झलक..

Untitled-28

Untitled-30

– रोहन टिल्लू

Story img Loader