दिगंबर शिंदे
‘एक गाव- एक वाण’ या योजनेंतर्गत अग्रणीकाठच्या अग्रण धुळगावने मक्याचे गाव म्हणून नव्याने आपली ओळख निर्माण केली आहे. लागवडीच्या नवीन पद्धतीमुळे येथील शेतकरी एकरी साठ क्विंटल उत्पादन घेऊन चार महिन्यांत सव्वालाखाचे उत्पन्न घेत आहेत. याच प्रयोगाविषयी..
अग्रणी नदी पाण्यासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा वाळूसाठीच आजवर कुप्रसिध्द ठरली आहे. मात्र, चार पाच वर्षांपुर्वी राबविलेल्या नदी पुनरूज्जीवनानंतर बारमाही नसले तरी आठमाही पाण्याची शाश्वती नदीकाठी निर्माण झालेली. अशा या अग्रणीकाठच्या अग्रण धुळगावची ओळख मक्याचे गाव म्हणून नव्याने निर्माण होत आहे. ‘एक गाव- एक वाण’ या योजनेंतर्गत लागवडीच्या नवीन पद्धतीमुळे एकरी साठ क्विंटल उत्पादन घेऊन चार महिन्यांत सव्वालाखाचे उत्पन्न शेतकरी घेत आहेत.
एक गाव एक वाण योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या गावाने मका उत्पादनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन वर्षांपूर्वी मका पिकाकडे केवळ जनावरांसाठी चारा अशा दृष्टीने पाहिले जात होते. मात्र आता एक गाव एक वाण आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे गाव मका उत्पादनाचे हब बनले आहे.
अग्रण धुळगाव हे कवठेमहांकाळपासून आठ कि.मी. अंतरावर पूर्वेकडे असणारे गाव. गावाचे भौगोलिक क्षेत्र १८०९.८९ हेक्टर असून, १५८९ हेक्टर क्षेत्र वहिवाटीखाली येते. गावची ओळख तशी दुष्काळी गाव म्हणूनच. अग्रणी नदी पुनरुज्जीवित झाल्यानंतर गावात मका, बाजरी, उडीद, सोयाबीन, गहू, खपली, ऊस, भाजीपाला पिके घेतली जात. काही प्रमाणात फळबाग लागवडी घेतल्या जात होत्या. मका पिकाचे सरासरी उत्पन्न एकरी २० क्विंटल होते. कितीही कष्ट घेतले, तरी जास्तीत जास्त २५ ते ३० क्विंटल उत्पन्न मिळू शकेल असा लोकांचा समज झाला होता.
पीक पद्धतीत बदल
एक गाव एक वाण या योजनेचा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने एकरी ६० क्विंटल मका उत्पादन घेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी बेत आखला. यासाठी गावातील ज्या शेतकऱ्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांची निवड करण्यात येऊन अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची निवड करण्यात आली. शेती शाळा आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यातून मका पिकाची ६० बाय २० सेंमी अंतर ठेवून पेरणी करण्यात आली. पेरणी करण्याअगोदर बियाणास विटावॅक्स पावर या बुरशीनाशकाची गावचौ या कीटकनाशकाची आणि अझेटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करून जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी करण्यात आली. पेरणी वेळी मिश्र खत १०:२६:२६ – १०८ किलो, झिंक सल्फेट १० किलो आणि युरिया तीन किलो एकरी देण्यात आले. पेरणीनंतर ७२ तासांच्या आत ?ट्राझीन या तणनाशकाची फवारणी करण्यात आली.
खत व्यवस्थापन
मका पीक चार पानांवर असताना एकरी ३३ किलो युरिया, पीक ८ पानांवर असताना एकरी ४० किलो युरिया, तुरा अवस्थेत असताना एकरी २७ किलो आणि दाणे भरत असताना एकरी ७ किलो युरिया देण्यात आला. खत दिल्यानंतर पाठोपाठ पाणी देण्यात आले.
पाणी व्यवस्थापन
रासायनिक खताबरोबरच मका पिकाला पाणी देण्याचे व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे आहे. मका पिकासाठी पाणी देण्याच्या महत्त्वाच्या चार अवस्था (क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस) आहेत यानुसार रोप अवस्थेत (२५ दिवसांनी), तुरा बाहेर पडताना (४५ दिवसांनी), दाणे भरतेवेळी (७५ दिवसांनी) आणि पक्वता अवस्थेत (९०-९५ दिवसांनी) मका पिकाला पाणी देण्यात आले.
कीड व रोग व्यवस्थापन
पेरणीनंतर लष्करी अळी नियंत्रणासाठी एकरी चार कामगंध सापळे लावण्यात आले. लष्करी अळीच्या पतंगाचा अटकाव करण्यासाठी बांधावर नेपियर गवताची लागवड, मका पीक दोन ते तीन पानांवर असताना पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी, चार ते पाच पानावर असताना निंबोळी अर्क व क्लोरोपायरीफॉस आणि सायपरमेथ्रीची फवारणी व दहा ते बारा पानावर असताना दशपर्णी अर्क इमामेयिटन बेंजोएट फवारणी करण्यात आली. याबरोबरच दर पंधरा दिवसांनी अंडा अमिनो अॅसिड या संजीवकाची दोन वेळा फवारणी केल्यामुळे पानांचा आकार तसेच रोपांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने झाली.
विक्री व्यवस्थापन
सांगली जिल्ह्यात फूड इंडस्ट्रीसाठी मका खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची सुमारे ५० हजार टनाची मागणी आहे. ही गरज भागवण्यासाठी शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातून मका विकत घेतला जातो. पण आता एकाच वाणाची, कलरची, साईजची आणि क्वालिटीचा मका मोठय़ा प्रमाणात एकाच गावातून मिळणार असल्याने जिल्ह्यातील फूड इंडस्ट्रीसाठी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लक्ष अग्रण धुळगावाकडे लागले आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीनुसार अग्रण धूळगावच्या शेतकऱ्यांनी मका उत्पादनात आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांनी एकरी ५० क्विंटल उत्पादन घेतले आणि किमान २५ रुपये दर जरी मिळाला, तर चार महिन्यांत एक लाख २५ हजार रुपयांचे हमखास उत्पन्न मिळू शकते.
मका उत्पादन घेताना पंचसूत्रीचा अवलंब केल्यामुळेच एकरी ५९.५२ क्विंटल उत्पादन घेता आले. यापूर्वी शेणखतांचा वापर करूनही जास्तीत जास्त २५ क्विंटल उत्पादन होत होते. आता यामध्ये नियोजनबद्ध लागवड केली तर उत्पन्न वाढ होऊ शकते हा विश्वास निर्माण झाला आहे.
– रमेश खंडागळे, अग्रण धुळगाव.
एक गाव-एक वाण या योजनेअंतर्गत जास्त उत्पादन देणाऱ्या, मात्र उत्पादन खर्च कमी असलेल्या वाणांची निवड करण्याबरोबरच बाजारात मागणी कोणत्या उत्पादनाला अधिक आहे याचा विचार करून मका लागवडीची शिफारस अग्रण धुळगावसाठी केली. शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात कृषी विभाग यशस्वी ठरत आहे.