एका दिशेला वेकोलीच्या कोळसा खाणी, त्यातून निघालेल्या मातीचे उंचच उंच डोंगर, विरुद्ध दिशेला प्रदूषणकारी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, लागूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तर गावाच्या मुख्य रस्त्यालगत दूपर्यंत हिरवीगार डौलदार शेती आणि या सर्वामध्ये गावकरी, विद्यार्थी व शिक्षकांच्या हृदयस्पर्शी संघर्षांतून जन्मलेली तिरंवजाची (मोकासा) जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा. एखाद्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल इतकी शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती साधत आता या शाळेची वाटचाल समृद्धीकडे सुरू आहे.
भद्रावती पंचायत समितीच्या घोडपेठ केंद्राअंतर्गत येणारी चंद्रपूर जिल्ह्य़ातील सवरेत्कृष्ट शाळा, असा गौरवपूर्ण उल्लेख या शाळेचा केला जातो. शाळेला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती प्रथमदर्शनीच शाळेच्या प्रेमात पडते. त्याला कारणही तसेच आहे. शाळेला भेट देणाऱ्या प्रत्येकाचे मुख्याध्यापिका अलका ठाकरे रोप देऊन स्वागत करतात आणि विद्यार्थी मुलाखत स्वरूपात प्रश्न विचारून अतिशय बेमालूमपणे स्वत:च तुमचा परिचय करून घेतात आणि स्वत:चीही ओळख करून देतात. यामुळे शाळेशी इतके एकरूप होऊन जातो की, जणू काही ही तुमची स्वत:चीच शाळा आहे. कधी काळी अवघ्या दोन खोल्यांच्या पडक्या जागेत भरणारी ही शाळा आज शिक्षक, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आणि गावकऱ्यांच्या मदतीने परसबागेने फुललेल्या एका प्रशस्त इमारतीत सुरू आहे.
शाळेसाठी संघर्ष
जिल्हा प्रशासनाने शाळेच्या इमारत बांधकामासाठी वेकोलीची जागा दिली होती. तेथे शाळा इमारतीच्या कामाला सुरुवात होऊन ३० सिमेंट कॉलमचे बांधकामही उभे झाले होते. त्यावर २ लाख ९० हजाराचा खर्चही झाला होता. मात्र, ऐनवेळी वेकोलीने जागा देण्यास नकार दिल्यामुळे कंत्राटदार, सरपंचांचे वेकोली अधिकाऱ्यांशी कडाक्याचे भांडण झाले होते. बांधकाम तसेच पडून होते. नवीन शाळा उभी करायची असेल, तर वेकोलीने बंद पाडलेले काम पूर्ववत सुरू करावे लागेल आणि त्यासाठी सहकारी शिक्षक आणि गावकरी या दोघांना सोबत घेणे आवश्यक होते. सर्वप्रथम सहकारी शिक्षकांना विश्वासात घेतले. महिला दिनाच्या दिवशी कार्यक्रम घेऊन शाळेच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव ठेवला. तो सर्वानी उचलून धरला. प्रसंगी आंदोलन करण्याची तयारीही गावकऱ्यांनी दाखविली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोली अधिकारी, शाळा व्यवस्थापन व गावकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावूनही तोडगा निघाला नाही. वेकोली अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशही ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी, जिल्हाधिकाऱ्यांनीच वेकोलीच्या कोळशांचे ट्रक तुमच्या गावातून जातात, तेव्हा काही करता येत असेल तर बघा, असा सूचक इशारा केला. जिल्हाधिकाऱ्यांकडून इशारा मिळताच एप्रिलमध्ये वेकोलीविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय झाला. गावातून होणारी वेकोलीच्या कोळशाच्या ट्रकची वाहतूक बंद करण्यासाठी अख्खे गाव रस्त्यावर उतरले. या आंदोलनात महिलाच आघाडीवर होत्या. दोन-तीन दिवस कोळशाच्या ट्रक्सची वाहतूक अडवून धरल्याने वेकोलीचे कोटय़वधीचे आर्थिक नुकसान झाले. परिणामत: वेकोलीचे अधिकारी नरमले आणि जागेसह बांधकामाची परवानगी दिली.
गावकऱ्यांचे श्रमदान
वेकोलीने जागा दिल्यानंतर एकही कंत्राटदार बांधकामाचे काम घेण्यास तयार नव्हता. शाळा बांधकामाचा अर्धा निधीही खर्च झाला होता. शेवटी, गावातून लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे वर्गणी गोळा करण्याचे काम, तर दुसरीकडे लोकश्रमातून शाळेच्या जागेचे सपाटीकरण करून मैदान तयार केले. रेती, मुरूम, गिट्ट, टिना लोकांकडून जमेल ती मदत घेतली आणि अशा पद्धतीने अल्पावधीत शाळेची एक सुंदर इमारत उभी झाली.
अशी ‘वाढली’ शाळा!
ही शाळा पहिली ते आठव्या वर्गापर्यंत असली तरी तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. गावातील प्रत्येक घराला भेट देऊन आईवडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर एकेक करून शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. आज या शाळेत पहिल्या ते आठव्या वर्गापर्यंत १०० विद्यार्थी आहेत.
वाचन कट्टा
लोकसहभागातून वाचन कट्टय़ाची सुंदर झोपडी उभारण्यात आली आहे. शाळेत एक हजार पुस्तकांचे बाल वाचनालय आहे. आमदार फंडातून स्वच्छ पाणी, उत्कृष्ट मॉडेल स्कूल म्हणून मिळालेल्या एक लाखाच्या बक्षिसातून विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निग सुविधा करण्यात आली.
शाळेचा परिसर बनला निसर्गरम्य
विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन औषधी वनस्पती बाग तयार केली. यात विविध आजारांवर गुणकारी अश्वगंधा, खंडू चक्का, महारूप, बहावा, रिठा, पिंपळ, आवळा, कवठ, चिंच, जांभूळ, पेरू, जास्वंदी, गवती चहा, अइरसा आदी ३२ वनौषधींची झाडे आहेत. सातवीचे विद्यार्थी याची देखभाल करतात. केळीबाग व बांबू लागवड प्रकल्पही सुरू केला आहे. बांबू प्रकल्पातून निघालेल्या बांबूचेच शाळेला कुंपण आहे. परसबागेत मिरची, पालक, वांगी, मेथी, मुळा, टोमॅटोचे उत्पन्न घेतले जाते. तुळसबाग, फुलबाग, कंपोस्ट खत व गांडूळ खत प्रकल्प यामुळे शाळेचा परिसर नयनरम्य बनला आहे.
मन, मनगट आणि मेंदू
विद्यार्थ्यांच्या मन, मनगट व मेंदू अर्थात मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमतांचा पुरेपूर वापर होईल असे उपक्रम आखण्याकडे शाळेचा कल असतो. विद्यार्थ्यांचा शब्दसाठा इतका मोठा आहे की, समानार्थी शब्दांचा उपयोग करून त्यांच्या समयसूचकतेनुसार अवघ्या काही सेकंदात वाक्प्रचार करून दाखवितात. शालेय मंत्रिमंडळ, सुपर आर्मी, सीआयडी पथक, पर्यावरण मंडळ, जंगल सफारी, सुश्राव्य परिपाठ, गाईड कब बुलबुल पथक, बहुभाषिक गीत, हरित सेना, मुलींचे बॅन्डपथक या शाळेत आहे. ज्ञानरचनावाद, कृतियुक्त अध्यापन, प्रात्यक्षिक पद्धती, स्वयंअध्ययन पद्धती, प्रवास वर्णन पद्धती, कथाकथन व प्रयोग पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. शाळेतील एका विद्यार्थिनीची नवोदय शाळेत निवड होऊनही तिला शाळा सोडून जाण्याची मुळीच इच्छा नसल्याने ती आजही येथेच शिकत आहे.
ही शाळा डिजिटल स्कूल व्हावी, असे स्वप्न शाळेतील सर्व शिक्षकांनी उराशी बाळगले आहे. सोबतच आधुनिक प्रयोगशाळा, संगणक लॅब, सुसज्ज वाचनालय, संरक्षण भिंत आणि सुंदर बगीचा तयार करायचा आहे. ही शाळा ग्रामीण भागातील उत्कृष्ट मॉडेल स्कूल असून सांस्कृतिक व सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे.
मुख्याध्यापिका अलका ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक शिक्षिका भारती भरत मंथनवार, शशिकांत मधुकर रामटेके, डॉ. वैशाली बबनराव वडेट्टीवार, जयश्री महादेव कांबळे व ज्योती नगराळे या शिक्षिका शैक्षणिक संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत. ‘वनात भवती पर्जन्य:, पर्जन्यात अन्नसंभव, अन्नस्य संभवात संपद तस्मा वाणिज्य वर्धनम’, ‘वाणिज्यात विविधोद्योगा तस्मात सृष्टे निरामय, एतत्सर्वग साध्य हि वृक्ष संवर्धन विना’ या संस्कृत श्लोकांचा मराठीतील अर्थ पुढीलप्रमाणे आहे.. वनांमुळे पाऊस पडतो, पावसामुळे अन्नाचे उत्पन्न होते. भरपूर उत्पन्नामुळे पैसाही येतो. त्यातून उद्योग वाढतात. सगळीकडे आर्थिक समृद्धी येते. वृक्ष संवर्धनामुळे एवढय़ा सगळय़ा गोष्टी साध्य होतात. तेव्हा शिक्षणाचे अर्थात, शाळेचे रोपटे लावा, तुमच्या गावातील मुले शिक्षित होतील, त्यामुळे आर्थिक समृद्धी येईल आणि गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल.. आज तिरंवजा गावाची वाटचाल याच शैक्षणिक, आर्थिक प्रगतीतून सुरू असून एका शाळेने समृद्ध गावाची निर्मिती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा