मुक्त शब्द
नामवंत दिवाळी अंकांच्या गर्दीमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षवेधी अंक देण्याची परंपरा ‘मुक्त शब्द’ मासिकाचा दिवाळी अंक आवर्जून पाळत आहे. कसदार लेखक, वैविध्यपूर्ण विषयांवरील अकथनात्मक साहित्य आणि कथालेखकांचे ‘मास्टरस्ट्रोक्स’ या अंकाचे वैशिष्टय़ असते. यंदा कुमार अंबुज, ऋत्विक घटक, विवेक शानबाग, बाणी ओशू, भूपेन खक्कर यांच्या अनुवादित कथांचा आणि रमेश इंगळे उत्रादकर, नागनाथ कोत्तापल्ले, यशवंत मनोहर यांच्या दीर्घ कवितांचा विशेष भाग अंकात पहायला मिळतो. स्त्रीच्या लैंगिक जाणिवा, अभिरुची यांच्याबद्दल बेधडक आणि बेफाम बोलणाऱ्या प्राचीन भारतीय काव्याबद्दल आणि त्यावरील बंदीचा ऊहापोह करणारा मुकुंद कुळे यांचा लेख आजच्या पोर्नयुगातील वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा. निखिलेश चित्रे यांचा सिनेमाविषयक सूक्ष्मदर्शी लेखही उत्तम झालाय. पंकज भाब्रुरकर, अरुण खोपकर, मेघना पेठे आदी मान्यवरांचे लेख आहेत. जयंत पवार यांनी ‘तुझीच सेवा करू काय जाणे’ या कथेतून लालबागच्या जीवनाचा ताजा ‘मास्टरस्ट्रोक’ सादर केला आहे. यंदाच्या सर्वोत्तमातील एक म्हणून या कथेच्या अचाट मांडणीचा उल्लेख करता येईल. नीरजा, मनस्विनी लता रवींद्र, सुकन्या आगाशे यांच्यासोबत यावर्षी फॉर्मात असलेले प्रणव सखदेव यांची प्रयोगशील कथा व प्रवीण बांदेकर, अंजली जोशी यांच्या कादंबरीचा अंश वाचायला मिळेल.
मुक्त शब्द : संपादक –
येशू पाटील, किंमत २०० रुपये.
——–
अक्षरगंध
‘अक्षरगंध’च्या सहाव्या दिवाळी अंकाने यंदा दिलेली दिमाखदार साहित्याची मेजवानी अचंबित करणारी वाटते. तीन दिवंगत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि इतर दोन दिवंगत अन्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणांचा आणि लेखनाचा विशेष विभाग आहेच, पण त्याच सोबत एकूण सहा भरगच्च विभाग अखंड मेहनतीने सजविलेले दिसतात. व्यक्तिविशेषमध्ये रामदास भटकळांवर मुकुंद कुळे, किशोर आरस आणि अभय जोशी यांचे लेख सुंदर जमले आहेत.
वाचन संस्कार विभागात अमोल पालेकर, श्रीराम लागू, रवि परांजपे, सोनाली कुलकर्णी आदी मान्यवरांसोबत कसदार लेखन मिळविले आहे. राजस्थानी विजयदान देठांच्या पालेकरांनी जागविलेल्या आठवणी आवर्जून वाचाव्यात. तू माझा सांगाती या विभागात सहचराविषयी मोहन जोशी, गंगाराम गवाणकर, इब्राहिम अफगाण, विजयराज बोधनकर यांनी प्रांजळ विचार मांडले आहेत. पारंपरिक अंकाच्या रचनेला मोडूनही नेटका आणि सकस अंक म्हणून या अंकाकडे पाहावे लागेल.
अक्षरगंध : संपादक –
मधुवंती सप्रे, किंमत १३० रुपये.
——
आकंठ
दरवर्षी भारतीय भाषांमधील एका भाषेतील उत्तम साहित्यधन मराठीत आणण्याचा विडा ‘आकंठ’च्या संपादक मंडळाने उचलला आहे. कथा किंवा कादंबऱ्यांचा अनुवाद ही प्रत्येक दिवाळी अंकाची काही पाने व्यापते. आकंठमध्ये मात्र बहुतांश भाग उत्तम अनुवादाने सजलेला असतो. यंदा असमीया साहित्यावर अंकाने लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने २३ असमीया कथांचा अनुवादित नजराणा सादर झाला आहे. देवदत्त दास, अतुलानंद गोस्वामी, बंती शेनसोवा, वितोपन बरबोरा, मौसमी कंदली, शिवानंद काकाती, नगिन सकैया आदी नव्या जुन्या असमीया कथाकारांच्या समर्थ कथांचे कडबोळे आहे. आसामची साहित्यभूमी आणि संस्कृती यांचा परिचय करून देणारे अभ्यासू लेख यात वाचायला मिळतील. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य, इंदिरा गोस्वामी, नवकांत बरुआ आदी आपल्याला माहिती असलेल्या लेखकांविषयीही बरीच नवी माहिती वाचायला मिळेल.
आकंठ : संपादक –
रंगनाथ चोरमुले, किंमत १००.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा