नुकताच होऊन गेलेला जागतिक क्षयरोग दिन (२४ मार्च) व ‘मधुमेहाला नामोहरम करा’ असे घोषवाक्य असलेल्या आजच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या दोन्ही गंभीर आजारांची कारणे व त्यावर मात करण्याची जबाबदारी व्यक्तिगत कशी आहे हे सांगणारा लेख..
‘तीन हजारांहून अधिक जेनेरिक औषधांची दुकाने’, ‘राष्ट्रीय किडनी डायलिसिस कार्यक्रम’, ‘दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना एक लाखांवर आरोग्य विमा’ अशा काही योजना या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर झाल्या आहेत. मूळ आरोग्य समस्यांना हात न घालणाऱ्या व काहीशी वरवरची मलमपट्टी स्वरूपातील या योजना, तरीही ज्या देशात उत्पन्नाचा अगदी अल्प टक्का आरोग्य क्षेत्रावर खर्च होतो तेथे कोणत्याही आरोग्य उपक्रमांचे स्वागतच असते. तसेच या योजनांचेही व्हायला हवे; पण एक मात्र नक्की, औषधांच्या विक्रीचे विक्रमी आकडे व वरील नमूद केलेल्या आरोग्य योजना आपल्या देशाच्या अनारोग्याला अधोरेखित करतात. वाढलेल्या आयुर्मानासोबत वाढते आजारांचे ओझे, पण आता हे आजारांचे गाठोडे इतके समृद्ध व सर्वसमावेशक झाले आहे की, सर्व प्रकारच्या नव्या-जुन्या, संसर्गजन्य व जीवनशैलीने होणाऱ्या आजारांची इथे रेलचेल आहे. अॅनेमियापासून कॅन्सर आहे, तर डायरियापासून एड्स अन् नवीन स्वाइन फ्लूही आहे. या आजारांच्या गाठोडय़ाची प्रकर्षांने जाणीव व्हावी याचे कारण नुकताच होऊन गेलेला जागतिक क्षयरोग दिन (२४ मार्च) आणि ‘मधुमेहाला नामोहरम करा’ असे घोषवाक्य असलेला ७ एप्रिलचा जागतिक आरोग्य दिन.
क्षयरोग वा टीबी आणि मधुमेह वा डायबेटीस या दोन्ही आजारांत आपण अग्रेसर. आजारांचे गाठोडे वजनदार करण्यात यांचा सिंहाचा वाटा. पूर्ण जगातील टीबीचे साधारण एकचतुर्थाश तर मधुमेहाचे साधारण एकपंचमांश ओझे घेऊन वाकलाय आपला ‘स्वस्थ’ भारत. दोन्ही आजार तसे परस्परविरोधी. एक जंतूने होणारा संसर्गजन्य तर दुसरा चुकीच्या जीवनशैलीची देणगी. ढोबळमानाने पाहिल्यास एक कुपोषण, दारिद्रय़ाचा शाप, तर दुसरा सुखासीनता, सुबत्तेची देणगी. जरी हे आजार तसे विरोधाभासी, तरी त्यात काही समान धागे, काही ‘सख्य’ असल्याचे आढळून आले आहे. मधु(मेह)-क्षयाची आपापसातील मैत्री आता लपून राहिलेली नाही व त्यामुळे दोन्ही रोगनियंत्रण प्रयत्नांना कुठे तरी खीळ बसत आहे. म्हणूनच टीबी व डायबेटीसचा स्वतंत्रपणे व एकत्रितपणेही विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
टीबी तसा आपला जुना परिचित आजार. टीबी हा संसर्गजन्य. खोकताना, थुंकताना, बोलताना, शिंकताना रुग्णांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हवेतून पसरणारा हा आजार. उपचार न घेतलेला असा रुग्ण वर्षभरात जवळच्या सान्निध्यातील १० ते १५ व्यक्तींना टीबीची लागण करतो. त्यामुळे टीबीने खोकणाऱ्या व्यक्तीचा आजार हा त्याच्यापुरता मर्यादित प्रश्न नसतो, तर ती सर्व समाजाची समस्या ठरते. घनदाट लोकवस्ती, दारिद्रय़, कुपोषण, कोंदट घरे, सार्वजनिक वाहतुकीत तुडुंब वाहणारी गर्दी, कोठेही थुंकणे, कसेही खोकणे अशा सवयी, व्यसने अशा पोषक वातावरणात टीबीचा फैलाव हवेतून एकाकडून दुसऱ्याकडे सहजतेने होत जातो आणि मग ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी, तो अॅक्टिव्ह टीबीचा शिकार होतो. लक्षणे दिसू लागतात. टीबीचा जंतू महाचिवट, त्यामुळे ३/४ औषधांचा एकत्रित मारा कमीत कमी ६ ते ८ महिने करावा लागतो. टीबीचे उपचार खासगी व सार्वजनिक क्षेत्र दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत. शासकीय रुग्णालयातून निरीक्षणाखाली संपूर्ण मोफत ‘डॉट्स’ उपचार टीबीसाठी आहेत; पण ५० ते ६० टक्के रुग्ण खासगी क्षेत्रात जातात. मग ते केवळ टीबी तज्ज्ञाकडेच तर काही सोयीस्कर, उपलब्ध कोणत्याही डॉक्टरकडे जातात. अर्धवट उपचार घेणे, उपचारात धरसोड करणे, अतार्किक उपाययोजना अशा काही कारणांनी टीबीचे जंतू प्रबळ व बंडखोर होऊन रेसिस्टंट टीबीची बीजे रोवली जातात. महागडी, अधिक साइड इफेक्ट असलेली व कमीत कमी दोन वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात.
शासन, अनेक संस्था यांची टीबीसोबत युद्धपातळीवर लढाई चालू असली तरी ‘देश जितेगा, टीबी हारेगा’ हे स्वप्न अजून दूरच आहे. दरवर्षी साधारण २२ लाख नवीन केसेस टीबीच्या असतात. रेसिस्टंट टीबीचे प्रमाण वाढत आहे. अजूनही दर तीन मिनिटाला दोन मृत्यू टीबीने होतात. मुंबईतील एका पाहणीत असे आढळून आले की टीबीचा एक रुग्ण योग्य उपचारांवर यायला लक्षणे दिसू लागल्यापासून सरासरी (६२) दिवस जातात. असे म्हणणे तो जर फुफ्फुसाचा टीबी रुग्ण असेल तर या दोन महिन्यांत किती जणांना टीबीची लागण करीत असेल? मुंबईसारख्या ठिकाणी इतके डॉक्टर्स, शासकीय रुग्णालये, केमिस्टची दुकाने सर्व सोयी आहेत. तरीही ही स्थिती. याचा अर्थ अजून जनजागरणाची आवश्यकता आहे. लक्षणे कोणती व ती दिसताच नेमके काय करावे, कुठे जावे, वेळ का दवडू नये हे अगदी प्रत्येक व्यक्तीस माहिती असणे आवश्यक आहे. टीबीसाठी कोणताही ‘स्टिग्मा’ मनात नसावा, योग्य उपचारांनी टीबी बरा होतो, याची खात्री असावी व हे जनमानसात रुजणे महत्त्वाचे. टीबी जंतूंचा आपण वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रतिबंध करू शकतो, आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवून त्यासाठी समतोल आहार, व्यायाम, व्यसनांच्या नादी न लागणे, स्वच्छतेच्या सवयी या बाबींचे महत्त्व असाधारण आहे. उघडय़ावर सार्वजनिक ठिकाणी साधे खोकताना रुमाल, टिश्यू तोंडावर धरावा वा ते शक्य नसेल तर कोपरापासून हाताची घडी करून त्यात खोकावे, अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. याची माहिती शालेय वयापासूनच असली पाहिजे.
मधुमेह हा काही टीबीसारखा आपला पुरातन शत्रू नाही. गेल्या काही दशकांपासून मधुमेहाचे अस्तित्व तीव्रतेने जाणवू लागले व विशेषत: गेल्या पाच वषर्र्त मधुमेहींची संख्या झपाटय़ाने वाढली. अक्षरश: साथ यावी याप्रमाणे घराघरांत या ‘गोड’ आजाराची कटुता शिरली व जो तो ‘शुगर’बद्दल बोलू लागला. जगात साधारण ३५ कोटी मधुमेही आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे ५० टक्के लोकांना आपण मधुमेहाचे धनी आहोत याची अजून जाणीवच नाही. म्हणजे ७ कोटींहून किती अधिक रुग्णांची संख्या भारतात आहे याची कल्पनाच केलेली बरी. चीनला मागे सारून पुढील काही वर्षांत आपणास ‘मधुमेहाची राजधानी’ हा नामुश्कीचा किताब मिळणार आहे. आबालवृद्ध, शहरी-ग्रामीण असा काही भेदभाव आता मधुमेह करीत नाही. मूत्रपिंडे निकामी होणे, नेत्रविकार, हृदयविकार, हातापायातील संवेदना नष्ट होणे अशी गुंतागुंत मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास होते.
मधुमेहाची त्सुनामी खरेतर आपणच ओढवून घेतली आहे. जवळजवळ ९० टक्के मधुमेहींना ‘टाइप टू’ (Non Insulin Dependent किंवा Maturity onset) प्रकारचा मधुमेह असतो व तो चुकीच्या जीवनशैलीचीच देणगी आहे. वाढते वजन, चुकीचा आहार व बैठा सुस्त दिनक्रम मधुमेहाला आमंत्रण देण्यास पुरेसे ठरतात.
आधुनिकीकरणाने, शहरीकरणाने आपल्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत अनेक अपरिहार्य बदल होत गेले. उदा. स्वयंपाकघरात सोयी-सुविधेसाठी अनेक उपकरणे, जिन्यांच्या जागी लिफ्ट, हातात ‘रिमोट कंट्रोल’, एका जागी खिळवून ठेवणारे विविध स्क्रीन्स मग तो टी. व्ही. असेल, कॉम्प्युटर्स किंवा स्मार्ट फोन्स. नवीन तंत्रज्ञानाने आणलेल्या या सर्व सोयी आपण आवडीने व वेगाने स्वीकारल्या, पण बदलाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपसूक होणारी ऊठ-बस, हालचाली कमी झाल्या. त्यातच फास्टफूड, जंकफूड संस्कृतीने आपला ताबा घ्यायला सुरुवात केली. मुळातच कमी असलेले आपले आरोग्यभान अधिकच सुटले व आरोग्याचा तोल ढळला. स्पर्धा, मानसिक ताणतणाव व जीवनशैलीने होणाऱ्या आजारांकडे कल असलेल्या आपल्या जीन्स, या घटकांचीही भर पडली. परिणामी मधुमेह- हृदयविकारांसारखे आजाराचे आलेख उंचावत गेले. ‘हरी, वरी व क्युरी ’ ही आधुनिक आरोग्य समस्यांची महत्त्वाची कारणे ठरली. आपले काही तरी चुकत आहे हे आपल्याला जाणवते, पण म्हणून सर्वानीच विचारपूर्वक आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब केला असे नाही. ‘व्यायाम/ डाएट ना, हो उद्यापासून चालू’ म्हणणाऱ्या अनेकांचा उद्या उगवतच नाही. जिमची हौस काही दिवसांपुरतीच असते. खाण्यावर तर नियंत्रण नसतेच व आहारभान पूर्णपणे ऑप्शनला टाकलेले असते. ‘वेळ नाही’अशा सबबी स्वत:ला व मित्रमंडळींना सांगत वजनाच्या खुणावणाऱ्या काटय़ाकडे व वाढणाऱ्या पोटाच्या घेराकडे दुर्लक्ष होते. बहुतांशी लहान मुलांनाही आहाराच्या चुकीच्या सवयी लागतात. अनेक आधुनिक मातांचाच स्वत:चा आहार मुळात योग्य नसतो, परिणामी पुढच्या पिढीतही तेच उतरते. लहान मुलांमधील लठ्ठपणा ही एक फार मोठी समस्या आता आपल्याला जाणवू लागली आहे व भविष्यातील मधुमेही तयार होण्याची ही सर्व प्रक्रिया आहे.
आपल्याकडे माहिती खूप उपलब्ध आहे. साध्या रक्ताच्या चाचणीवरून मधुमेह आहे की नाही ते कळू शकते, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. मधुमेह हा चोरपावलांनी काम करणारा आजार आहे. त्यावर मात करण्यासाठी योग्य आहार, रोज व्यायाम करणे व नियमित अंतराने रक्ताची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. आरोग्यासाठी शासन योजना आखत राहील, पण आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हातात आहे. त्यातूनच ‘स्वस्थ भारत’ निर्माण होईल.
लेखिका औषधनिर्माण शास्त्राच्या प्राध्यापक आहेत. ई-मेल symghar@yahoo.com
क्षयरोग, मधुमेहाकडे दुर्लक्ष नको!
टीबीसोबत युद्धपातळीवर लढाई चालू असली तरी ‘देश जितेगा, टीबी हारेगा’ हे स्वप्न अजून दूरच आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 07-04-2016 at 05:52 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not ignore tuberculosis and diabetes