ठाणेकरांना तरणतलावासह अद्ययावत अशा सोयी-सुविधांनी सज्ज असे एखादे क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने उभारलेल्या आणि महापालिकेकडेच मालकी असलेल्या प्रबोधनकार क्रीडा संकुलाचा लाभ घेण्यासाठी आता येथील रहिवाशांना ठेकेदाराशी झगडावे लागत आहे. मेसर्स गणेशानंद डेव्हलपर्स हे या क्लबचे ठेकेदार असून महापालिकेने त्यांच्याशी केलेल्या करारानुसार क्लबच्या सदस्यत्वासाठी वर्षभरासाठी १८ हजार रुपये आकारले जावेत, असे ठरले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने ही शुल्क रचना गुंडाळून ठेवत या ठिकाणी मनमानी सुरू केली आहे. ‘लोकसत्ता’ने काही महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वाचा फोडताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस पाठवली. याठिकाणी स्पर्धा सरावासाठी येणाऱ्या जलतरणपटूंना दहा हजार रुपये वार्षिक दराने सदस्यत्व द्या, असे फर्मान सोडले. त्यानंतरही क्लबच्या ठेकेदाराने या जलतरणपटूंची सातत्याने अडवणूक सुरू ठेवली आहे. पालकांच्या संघर्षांमुळे जलतरणपटूंचा सराव रोखणे क्लब व्यवस्थापनास शक्य झाले नसले तरी सततची टांगती तलवार मात्र कायम आहे.
ठाण्यातील तीन हात नाका येथील मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेने काही वर्षांपूर्वी हे क्रीडा संकुल उभारले आहे. महापालिकेने मेसर्स गणेशानंद डेव्हलपर्स या ठेकेदारास हे संकुल चालविण्यास दिले आहे. सुरुवातीला या तरणतलावाचे व्यवस्थापन अॅक्वाटिक रिक्रिएशन क्लब ऑफ नायर्स या संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेने जलतरणाच्या सुविधेसाठी वर्षांला सात हजार रुपये इतके वार्षिक शुल्क सदस्यांना आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बराच काळ हे ठिकाण हौशी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांत स्वारस्य असणाऱ्या जलतरणपटूंसाठी हक्काचे बनले होते. गेल्या सहा महिन्यांपासून मात्र हे चित्र बदलले आहे. येथील नव्या व्यवस्थापनाने तरणतलाव आणि सदस्यत्वासाठी वर्षांला ६० हजार रुपयांची मागणी केली आहे. पती-पत्नींसाठी ही रक्कम ८० हजार करण्यात आली. ठाणे महापालिकेने ठेकेदारासोबत केलेल्या करारानुसार क्लबच्या सदस्यत्वासाठी शुल्क रचना ठरविण्याचा अधिकार अर्थातच महापालिकेस आहे. असे असताना महापालिकेस विश्वासात न घेता नवी शुल्क रचना ठरविण्यात आली आहे. हा सगळा कारभार बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात काही सदस्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पोहण्यासाठी सविनय सत्याग्रह
‘लोकसत्ता’ने या प्रकरणाला वाचा फोडताच बळ आलेल्या सदस्यांनी सविनय सत्याग्रहाचा मार्ग धरत येथील तरणतलाव स्पर्धक जलतरणपटूंसाठी खुला करून घेतला आहे. या आंदोलनानंतर महापालिकेने मध्यस्थी करत तलावाची शुल्क रचना अद्याप ठरली नसल्याचे कारण पुढे करत सदस्यांकडून १० हजार रुपये इतके शुल्क स्वीकारले जावे, असे पत्र ठेकेदाराला दिले आहे. या पत्रानुसार सुमारे ४२ सदस्यांनी १० हजारांचे शुल्क व्यवस्थापनाकडे जमा केले. मात्र काही दिवसांमध्येच व्यवस्थापनाकडून हे शुल्क पोस्टाने परत करण्यात आले. तक्रार घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ठाणेकरांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊ दिली जात नाही, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
माजी सदस्यांना दमदाटी..
गेली अनेक वर्षे या तरणतलावामध्ये सराव करणारे ठाणेकर खेळाडू आणि हौशी जलतरणपटू महापालिकेच्या पत्रानुसार १० हजारांचे शुल्क भरण्यास तयार आहेत. हे शुल्क ठाणे क्लब प्रशासनाने नाकारले असून या तलावामध्ये पोहण्यासाठी येणाऱ्या काही माजी सदस्यांना दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. बळजबरीने क्लबच्या आवारात शिराल तर पोलिसांकरवी अटक करवू, असा दमही या सदस्यांना भरला जात आहे. महापालिकेच्या मालकीच्या वास्तूमध्ये ठेकेदाराचा असा मनमानी कारभार सुरू असताना प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ठाण्यातील बडे राजकीय नेते मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र आहे.
मनमानी ठेकेदाराची
ठाणेकरांना तरणतलावासह अद्ययावत अशा सोयी-सुविधांनी सज्ज असे एखादे क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने उभारलेल्या..
First published on: 23-08-2015 at 01:23 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domination of contractor