प्रचाराला लोक भुलतात हा इतिहास आहेच, पण दरवेळी नवे रूप घेऊन प्रचार होत असतो, लोकांच्या कोणत्या भावनांशी कसे खेळायचे याचे हिशेब बदलत राहतात.. या बदलत्या समीकरणांची ओळख प्रचाराच्या इतिहासातून करून घेता-घेता माणसांच्या सामूहिक आणि वैयक्तिक विचारशक्तीकडे निरखून पाहणारं हे नवं सदर.. आजपासून दर सोमवारी
‘डोनाल्ड ट्रम्प हे भंपक आहेत. ते खूप श्रीमंत आहेत. पण त्यांनी अनेक कंपन्या बुडविल्यात. महिलांबाबत ते बरेसचे सल आहेत, कारण महिला म्हणजे वापरून फेकून देण्याची वस्तू असे त्यांचे मत आहे. एकंदर त्यांचे विचार अत्यंत विकृत आहेत. गोरेतर स्थलांतरितांच्या संदर्भातील त्यांची मते फॅसिस्ट आहेत. त्यांना राज्यकारभाराचा काहीही अनुभव नाही. तेव्हा ते काही अमेरिकेचे अध्यक्ष होणार नाहीत. अमेरिकी जनता तेवढी सुजाण आहे, विचारी आहे. ती काही अशा वेडपट गृहस्थास निवडून देणार नाही,’ असे म्हणता ऐकता निवडणुकीचा निकाल लागला आणि ट्रम्प विजयी झाले. सगळ्यांसाठीच हा धक्का होता. एकविसाव्या शतकातला ऐतिहासिक धक्का. ब्रेग्झिटइतकाच मोठा.
कोणाला काही समजतच नव्हते, की हे कसे झाले? अमेरिकी मतदारांनी असे कसे केले? काय विचार करून त्यांनी ट्रम्प यांना मते दिली? हा मनुष्य बोलतो एक आणि करतो एक, त्याच्या भूमिकांत संगती नाही हे समजण्याची अक्कलही त्यांना नव्हती काय? असेल तर मग असा मूर्खपणा त्यांनी केला तरी कसा?
आपणांस नको तो निकाल लागला की मतदारच मूर्ख, त्यांना त्यांच्या लायकीचेच राज्यकत्रे मिळणार म्हणत आपणच तेवढे खरे शहाणे असा समज करून घेणे सोपे असते. बिहारमधील गतवर्षीच्या विधानसभा निकालानंतर ते आपण पाहिले आहे. आता अमेरिकी मतदारांबद्दलही अनेक जण तसेच बोलताना दिसतात. ज्यांनी ट्रम्प यांना मते दिली, ते सारे खरोखरच बुद्धिहीन आहेत काय? त्यांना साधा विचारही करता येत नाही काय?
तर ते तसे नाही. अमेरिकी मतदारांनी विचार नक्कीच केला होता. फरक एवढाच की ट्रम्प यांच्या विरोधकांना जे ट्रम्प दिसत होते, त्याहून वेगळे ट्रम्प त्यांच्यासमोर होते. अमेरिकेत ‘गेल्या कित्येक वर्षांत काहीच झाले नाही’, असे या मतदारांना वाटत होते. ओबामा आणि त्यांच्या सहकारी िक्लटन यांनी भले केले ते केवळ श्रीमंतांचे. बँका आणि उद्योगपतींना त्यांनी खिरापत वाटली. त्यातून ‘गरीब अधिक गरीब झाले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत’. या लोकांनी तयार केलेल्या उच्चभ्रूंच्या व्यवस्थेला नीट वठणीवर आणण्याची ताकद असणारे असे ट्रम्प त्यांच्यासमोर होते. माणूस असेल वाह्य़ात, पण श्रीमंत असतातच असे. त्यात काय विशेष? असेही त्यांना वाटत होते. ट्रम्प हे अमेरिकेला ‘पुन्हा एकदा थोर’ बनविणार याबद्दल त्यांना खात्री होती. अमेरिकी मतदारांनी मत दिले ते या ट्रम्पना. विद्यमान राजकीय व्यवस्थेला विटलेल्या, त्याबद्दल भ्रमनिरास झालेल्या आणि त्याचबरोबर मनात अपेक्षांचे डोंगर असलेल्या नागरिकांना ट्रम्प भासले ते या व्यवस्थेच्या बाहेरच्या, तिच्या नीतिनियमांना झुगारून देऊन तिला वठणीवर आणू शकण्याची ताकद असलेले. ‘पोलिटिकली अनकरेक्ट’.
आता प्रश्न असा आहे, की ट्रम्प यांची ही अशी प्रतिमा त्यांच्या मनात तयार झाली कशी? उत्तर साधे आहे. प्रचारातून. पण मग हिलरी िक्लटन यांनी प्रचार केला नव्हता की काय? एवढी सर्व वृत्तपत्रे, एवढय़ा वाहिन्या हिलरी यांच्या बाजूने प्रचार करीतच होत्या. ट्रम्प यांनी कितीही प्रयत्न केले तरी अखेर निवडून येतील त्या िक्लटनच अशी हवा पहिल्यापासून तयार करण्यात आली होती. पण या हवेवर, या प्रचारावर, या पत्रकारांवर, सर्वेक्षणतज्ज्ञांवर, सगळ्या उदारमतवाद्यांवर ट्रम्प यांनी मात केली. हे नेमके कसे झाले? त्यांची प्रचारमोहीम अधिक परिणामकारक कशी ठरली? हे समजून घेण्यासाठी ‘प्रचार’ ही बाब नेमकी कशी राबविली जाते आणि कार्य करते हे पाहणे आवश्यक आहे.
२०१४ नंतरच्या सध्याच्या प्रचारबेभान काळात तर ते अधिकच गरजेचे आहे. हा काळ आहे सत्योत्तरी. पोस्ट-ट्रथ. आभासी सत्याचा. प्रचारी छद्मतथ्यांचा. याचा अर्थ असा नाही की, प्रचार- ज्याला इंग्रजीत प्रपोगंडा म्हणतात तो- पूर्वी नव्हता. तो होतच होता. तो नसता तर जगात धर्म नावाची गोष्टच पसरली नसती. त्या प्रचाराची साधने वेगळी होती. मार्ग भिन्न होते. कर्मकांडे निराळी होती. प्रत्येक धर्म आपापल्या परीने प्रचार करीतच होता. लोकांना आपल्या कवेत घेतच होता. आणि हे मान्यच करायला हवे की, ज्या अर्थी धर्माचे आव्हान एवढी वष्रे टिकून आहे, एवढय़ा लोकांना ते आकर्षित करीत आहे, त्या अर्थी त्याचा प्रचार सर्वोत्तम आहे. बिनतोड आहे. या संदर्भात ख्रिस्ती धर्माच्या इतिहासाकडे पाहता येईल. अकराव्या शतकात मुस्लीम तुर्काच्या विरोधात पहिले क्रुसेड- धर्मयुद्ध- लढले गेले. त्या युद्धकाळात पोप अर्बन दुसरे यांनी प्रपोगंडाचा उत्तम वापर करून आपल्या अनुयायांना युद्धप्रेरित केले होते. ख्रिस्ती धर्म जगभरात पसरला याचे एक कारण हे आहे की, त्याने धर्मप्रचारास संस्थात्मक स्वरूप दिले. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात संतमंडळी आपापल्या परीने भजन-कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत धर्मविचार नेत होते, तेव्हा म्हणजे सतराव्या शतकाच्या प्रारंभी कॅथॉलिक चर्चने ‘प्रपोगंडाकरिताचे कॉँग्रेगेशन अर्थात धर्मसभा’ स्थापन केली होती. ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आठ वष्रे आधीची. या धर्मसभेचे काम होते बिगर कॅथॉलिक देशांत जाऊन कॅथॉलिक धर्मविचारांचा प्रचार करणे. यातूनच प्रपोगंडा हा मूळचा लॅटिन शब्द भाषेत रुळला. तेव्हा त्याला अर्थातच प्रतिष्ठा होती. शिष्ट अर्थाने तो वापरला जात होता. आज मात्र त्याला काळी छटा प्राप्त झाली आहे आणि तो धर्मनिरपेक्षही झाला आहे.
ऑक्सफर्ड शब्दकोश ही संकल्पना विशद करताना सांगतो, प्रपोगंडा म्हणजे राजकीय कार्य वा मत यांचा प्रचार करण्यासाठीची माहिती. म्हणजे त्यातील धर्मप्रचाराचा भाग उडाला. आता ही माहिती कशी तर खासकरून पक्षपाती वा भ्रामक स्वरूपाची. प्रपोगंडातून येत असलेली माहिती साधी नाही. ती वस्तुस्थितीला धरून असेलच असे नाही. किंबहुना जनतेला भुलवणे हेच तिचे कार्य असल्याने त्यात भ्रामकता अधिक असणे हेच अभिप्रेत आहे. आणि त्यामुळेच आजच्या काळात ही संकल्पना, तिचे कार्य आणि परिणाम नीट समजून घेणे आवश्यक आहे. याचे कारण पूर्वीपेक्षा आजच्या काळात त्याची दाहकता, परिणामकारकता अधिक आहे. अल्डस हक्सले यांनी त्यांच्या कादंबरीतून एका शूर नव्या जगाची मांडणी केली होती. हे जग लोकांचे विचार नियंत्रित करणाऱ्या सत्ताधीशांचे होते. जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘नाइन्टीन एटीफोर’ या कादंबरीतून एक युटोपिया मांडला होता. ज्यातील ‘बिगब्रदर’ सर्वसाक्षी आहे. ज्यात न्यू स्पीक नावाची नवी भाषा आहे. त्यातून सगळ्याच शब्दांना नवे अर्थ देऊन लोकांचे विचार हवे तसे वाकविण्यात येत आहेत. युटोपिया म्हणजे केवळ कल्पनेतील जग. पण आजच्या काळात या केवळ कल्पना राहिलेल्या नाहीत. आणि आपण या सगळ्यात इतके अविभाज्य आहोत, की वास्तव कुठे संपते आणि प्रपोगंडा कुठून सुरू होतो ती सीमारेषाही आपल्याला अनेकदा दिसत नाही. ती दिसत नाही, कारण आपणांस ती आहे याचेच अनेकदा भान नसते. अनेकांना ती समजून घ्यायचीच नसते. कारण त्यासाठी स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. लोकांना या स्वातंत्र्याची फार भीती असते.
प्रपोगंडा खेळतो तो अशा भावनांशी. ट्रम्प निवडून आले त्याचे कारण या प्रपोगंडामध्ये आहे. ते खोटीनाटी माहिती देत, खोटे आरोप करीत, अर्धसत्ये दणकून मांडत, विकृत विचार हा त्यांचा स्वभाव आहे, हे दिसत असूनही निम्मी अमेरिका त्यांनी जिंकली ती या प्रपोगंडाच्या बळावर. हा प्रपोगंडा- येथून पुढे त्याचा उल्लेख आपण केवळ प्रचार असा करू या- कसा असतो हे समजून घेणे हे आपला आत्मसन्मान टिकविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य हा अखेर विचार करणारा प्राणी आहे. ते आपले वैशिष्टय़ टिकविण्यासाठीही ते गरजेचे आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. पण समाज म्हणजे गर्दी नव्हे. समाजातही त्याला स्वत:चे अस्तित्व असते. आपले ते अस्तित्व पुसले जाऊन आपण गर्दीतले एक मेंढरू बनू नये याकरिता ते जरुरीचे आहे. या सदरातून या नव्या वर्षांत आपण विचार करू या तो या प्रपोगंडाबद्दल..
रवि आमले ravi.amale@expressindia.com