रविवार ,१० मार्च रोजीच्या अंकात ‘आंबेडकर  विरुद्ध  मूलनिवासी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, त्या अनुषंगाने लिहिलेल्या लेखावरील वाचकांच्या काही प्रतिक्रिया १७ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केल्या होत्या. त्या प्रतिक्रियांना लेखकाने दिलेले उत्तर व ‘मूलनिवासी’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणारा लेख..
आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी अशा शीर्षकाचा मधु कांबळे यांचा  १० मार्च रोजीचा लेख वाचला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध जगातला कोणताही विचार विरोधी जाऊ शकत नाही. तेथे मूलनिवासी विरोधी कसे? याबाबत ‘मूलनिवासी’ सत्यस्थिती विशद करणे, म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व मौलिक विचारांचे जतन करून प्रत्यक्ष कृतीचा अंमल करणे.  कांबळे यांनी आपल्या लेखात बामसेफच्या मूळ विचारधारेच्या लोकांसमोर संभ्रम निर्माण केला. तसेच बामसेफ, डॉ. आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व भगवान बुद्ध यांच्या मूळ विचारसरणीतला अर्थ वाचकांना पेचात पाडणारा वाटला. तो असा की, बामसेफ डॉ. आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी संघटना.  याचा अर्थ त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘जयभीम’ बोलले पाहिजे काय? बामसेफ संघटनेच्या निर्मितीत मूलनिवासी शब्द, घोषणा, कार्यक्रम नव्हता. तो मूलनिवासी शब्द कसा आला हे समजून घेणे अगत्याचे आहे. बामसेफच्या निर्मितीनंतर सखोल संशोधन झाले व चालू आहे. याच संशोधनात, मोहेंजोदाडो, हडप्पा, सिंधू संस्कृती, त्याची लिपी. ती उद्ध्वस्त कोणी व का केली? सन १९१९ ते १९२४ या सहा वर्षांत काय झाले? अमेरिकेतील ऊटाह् युनिव्हर्सिटीतील मायकल बामशाद या मानववंश- शास्त्रज्ञाने डी.एन.ए. संशोधन केले. २१ मे २००१ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार भारतातील मानव वंशाचे डी.एन.ए. तपासले आणि ते जाहीर केले. त्या अहवालानुसार ब्राह्मणांचा डी.एन.ए. युरेशिया (रशिया देशाच्या जवळील प्रदेश)मधील वंशाशी मिळतो. हा मानववंशशास्त्रज्ञाचा काल्पनिक शोध नसून, महात्मा फुलेंनी जसे परशुरामाला (काल्पनिक) पृथ्वीवर हजर राहण्यास सहा महिन्यांची नोटीस पाठविली. तसा, बामशाद (काल्पनिक) नाही. लेखक वा कोणीही ही माहिती इंटरनेटवरून मिळवू शकतात. असे अनेक पुरावे सादर करता येतील. अशा सत्य पुराव्याअंती बामसेफ ‘मूलनिवासी’ या विचाराशी ठाम झाला. ‘जय मूलनिवासी’ घोषवाक्य निर्माण झाले, ते निर्मितीच्या दहा वर्षांनंतर.
‘मूलनिवासी’ या शब्दात द्वेष मुळीच नाही. फक्त लपलेल्या इतिहासात लपविलेल्या इतिहासातील जागृती आहे. डॉ. आंबेडकरांनी शोध संशोधन करून दोन शोध प्रबंध लिहिले. १) शूद्र पूर्वी कोण होते? व २) अस्पृश्य मूळचे कोण? या प्रबंधाचा प्रयास होता, शूद्र पूर्वी कोण होते? अस्पृश्य मूळचे कोण होते हे सिद्ध करून शूद्रांना, अस्पृश्यांना मानवतेचा हक्क देणं. आज मूलनिवासी कार्यक्रम राबवून मानवतेचा हक्क मिळविण्यासाठी जनआंदोलनं करीत आहे. हे जनआंदोलन होत नाही, दिशा भरकटविली जाते. म्हणूनच वैचारिक फूट आणि म्हणून फूट न पडता जनआंदोलनासाठी ऐक्य करण्याचा प्रयत्न काही निष्ठावंत बामसेफ कार्यकर्ते करीत आहेत.
मधु कांबळे यांच्या लेखास प्रत्युत्तर देण्यासाठी बरेच साहित्य उपलब्ध आहे. उदा. लोकमान्य टिळकांचे ‘आर्टिक होम ऑफ वेदाज’, जवाहरलाल नेहरूंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि सावरकरांचे ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकांचा उद्देश व आशय काय, हे प्रत्येकाच्या विचार कुवीतनुसार लावला जाऊ शकतो. खरं तर या देशाचा इतिहास कोणी लिहिला? कसा लिहिला? कितपत खरा? हा एक स्वतंत्र विषय असून वादग्रस्त होऊ शकतो. तूर्त डॉ. आंबेडकरांनी इतिहास रचला, तो मुळात चिकित्सकपणे अभ्यासून. अस्पृश्य मूळचे कोण? या शोध प्रबंधात ते म्हणतात : विखुरलेल्या, पशुतुल्य जीवन जगण्यासाठी मोकाट सोडून दिलेल्या व मानवी स्पर्श विटाळ होणाऱ्या लोकसमूहाबाबतीत अन्य देशांत, असे लोक का, कशासाठी जगतात याचे संशोधन झाले असते. परंतु या भारतात आदिवासींचे नामाभिधान ‘वनवासी’ केले गेले. यातच सर्व लपले आहे! एरवी, डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले ६५ वर्षांत अनेक वेळा रस्त्यावर आले. परिणिती, बौद्ध, बौद्धेतर, बहुजनांची काय स्थिती? हे सर्व जग जाणते.
याच लेखाचे स्थूलमानाने दोन भाग करता येतील. लेखाच्या पूर्वार्धात बामसेफ काही करीत नाही, पदोन्नती घेऊन चार भिंतींत चर्चा व अधिवेशने करतात याचा ऊहापोह केला गेला. तो काही अंशी मान्य केल्यास वावगे ठरणार नाही.
मात्र बामसेफ निर्मितीनंतर या देशाचा खरा इतिहास सांगणारे विपुल सत्य साहित्य बामसेफने भारतभर प्रसारित करून, लोक जनजागृती होत आहे. मोर्चे, आंदोलने झाली पण, प्रसारमाध्यमांकडे कोणी पोहोचले नाही. जे पोहोचले त्यांची दखल घेतली गेली नाही. हे असे का व्हावे? हे समजणे कठीण! लेखाच्या उत्तरार्धात कांबळे यांनी जवळजवळ बुद्धिझमकडे आपला मोर्चा वळविला असे वाटते.
मूलनिवासी हा विचार लेखक कांबळेंना रुचला नाही, पटवून घेता येत नाही. म्हणून पटणार नाही असे वाटत नाही. बुद्धांपासून आंबेडकरांपर्यंतच्या सर्व तत्त्वज्ञानाची जिथे खिल्ली उडविली जाते, असे खेदाने म्हणावेसे वाटते. कारण ६५ वर्षांत समानतेची घटना देऊनही किती समानता नांदते, नांदविली जाते, हादेखील एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. मात्र मधु कांबळेंच्या मताचा विचार केल्यास सर्व भारतीय एक आहेत. एका वंशाचे आहेत. मग फक्त हिंदू धर्माच्या ८५टक्के लोकांची वाताहत का? याची कारणे एक स्वतंत्र विषय घेऊन कांबळेंनी समाजप्रबोधन करावे.
मूलनिवासी या शब्दात एक प्रेरणा आहे, एक अस्तित्व आहे. तो शब्द आपले हक्क मागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा