डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने संशोधन करत भाताची तीन नवीन वाणे नुकतीच विकसित केली आहेत. पुढील वर्षापासून ही वाणे शेतकऱ्यांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या जातींविषयी…

वामानात सातत्याने होणारे बदल, पावसातील अनियमिता, त्यामुळे होणारा कीड रोगाचा प्रादुर्भाव याचा भात पिकावर विपरित परिणाम होत असतो, त्यामुळे हवामानातील बदलांच्या आव्हानांना तोंड देऊ शकेल आणि कीड रोगापासून स्वसंरक्षण करू शकेल अशा संकरित वाणांची गरज निर्माण झाली होती. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात यावर संशोधन करत भाताची तीन नवीन वाणे विकसित केली आहेत. पुढील वर्षापासून ही वाणे शेतकऱ्यांच्या भेटीला येणार आहेत.

राज्यात कोकण आणि विदर्भ या दोन विभागात प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. कोकणात प्रामुख्याने खरीप हंगामात ही लागवड होत असते. ३ लाख हेक्टरवर दर वर्षी भात पिकाची लागवड केली जाते. ज्यात रायगड जिल्ह्यातील जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश असतो. दरवर्षी यातून साधारणपणे हेक्टरी अडीच हजार ते पावणे तीन हजार क्विंटल उत्पादन मिळते.

कोकणात बहुतांश शेतकरी पारंपरिक बियाणांचा भात शेतीसाठी वापर करतात. त्याची उत्पादकता कालांतराने कमी होत जाते. हवामानातील बदलांचा त्यावर परिणाम पटकन दिसून येतो. पारंपरिक बियाणांची रोग प्रतिकारक्षमता कमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान दर एक दोन वर्षांनी सुधारित आणि संकरित वाणांचा वापर करून भात पिकाची लागवड करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो.

हेही वाचा >>> लोकशिवार: पेरूची फलदायी लागवड!

कोकणात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीला सिंचनाची सुविधा नाही. शेती क्षेत्र कमी असल्याने शेतीचे यांत्रिकीकरण झालेले नाही. त्यामुळे शेतीला मजुरांची कमतरता जाणवते. दुसरीकडे वाढत्या शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेती क्षेत्र कमी होत चालले आहे, अशा आव्हानात्मक परिस्थितीत शेती टिकवून ठेवायची असेल तर शेतकऱ्यांना सुधारित आणि संकरित वाणांचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन कोकण कृषी विद्यापीठाने खास कोकणातील शेतकऱ्यांसाठी तीन नवी भाताची वाणे विकसित केली आहे.

कोकण संजय, कर्जत १० आणि ट्रॉम्बे कोकण खाला अशी नव्याने संशोधित करण्यात आलेल्या वाणांची नावे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय वाण प्रसारण समितीने या तिन्ही वाणांना मान्यता दिली आहे. तर राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीनेही या वाणांना यापूर्वीच मान्यता दिली आहे.

कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात या वाणांवर गेली तीन ते चार वर्षे संशोधन सुरू होते. पुढील हंगामापासून ही तीनही वाणे वितरणात येणार आहेत. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांच्या पथकामार्फत या तीन वाणांवर संशोधन करण्यात आले आहे.

आता या नव्याने विकसित केलेल्या वाणांची थोडक्यात वैशिष्ट्ये समजून घेऊयात.

कोकण संजय

हे वाण निमगरवा प्रकारातील असून, लागवडीपासून १२५ ते १३० दिवसांत पीक कापणीसाठी तयार होते. हे वाण लांबट आणि बारीक दाण्याचे असून, यातून प्रती हेक्टरी ५० ते ५५ क्विंटल उत्पादन मिळू शकणार आहे. कीड आणि रोगास हे वाण मध्यम प्रतिकारक असणार आहे. शिजल्यानंतर तांदळाची गुणवत्ता उत्तम असून हे वाण राज्यभरातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आले आहे.

नवीन वाण वरदान

कोकणातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही तिन्ही नवीन वाणे वरदान ठरतील, असा विश्वास भात विशेषज्ञ डॉ. भारत वाघमोडे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, हवामानातील होणारे बदल, त्याचा पिकांवर होणारा परिणाम, कीड रोगामुळे शेतीचे होणारे नुकसान याचा अभ्यास करून शास्त्रोक्त पध्दतीने या तीन वाणांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही वाणे नक्कीच फायदेशीर ठरतील, असा विश्वास प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

कर्जत १०

हे वाण गरवा प्रकारातील आहे. ज्याची लागवड केल्यापासून साधारणपणे १४० ते १४५ दिवसांत उत्पादन मिळू शकणार आहे. या वाणाची उत्पादकता हेक्टरी ४५ ते ५५ क्विंटल आहे. हे वाण पाणथळ जमिनीसाठी उपयुक्त असणार आहे. प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक असणार आहे. अख्ख्या तांदळाचे प्रमाण ६० टक्के पेक्षा जास्त असून शिजवल्यानंतर भाताची गुणवत्ता उत्तम आहे.

ट्रॉम्बे कोकण खारा

हे वाण निमगरवा प्रकारातील आहे. लागवडीपासून साधारणपणे १२५ ते १३० दिवसांनी याचे उत्पादन मिळणार आहे. हे वाण लांबट बारीक दाण्याच्या प्रकारातील असून, हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळणार आहे. कोकण विभागातील क्षारपड जमिनीसाठी हे वाण उपयुक्त असणार आहे. ६ ईसीपर्यंत क्षार सहन करण्याची क्षमता या वाणात असणार आहे.

meharshad07@gmail. com