प्रसिद्ध समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा विश्वास
‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम गेली आठ वर्षे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांपर्यंत दानशुरांना पोहोचवणारा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील दहा संस्थांची ओळख वाचकांना करून दिली जाते. आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ८२ संस्थांना जवळपास पंधरा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यंदाही या दानयज्ञाला भरभरून प्रतिसाद देत वाचकांनी दोन कोटी १४ लाख रुपयांची देणगी दहा संस्थांना दिली. या दानयज्ञाची सांगता प्रसिद्ध समाजसेविका डॉ. राणी बंग यांच्या उपस्थितीत झाली. या उपक्रमाला आणि वाचकांच्या औदार्याला दाद देतानाच कार्यकर्त्यांना आणि काही करण्यासाठी दिशा शोधणाऱ्यांना डॉ. बंग यांनी वाट दाखवली. या सोहळ्यातील डॉ. बंग यांनी केलेल्या, जाणिवा समृद्ध करणाऱ्या भाषणाचा गाभा..
‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून देणगीदारांनी दिलेल्या दानाचे मोल खूप मोठे आहे. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी अनेक शासकीय योजना आहेत. मोठय़ा कंपन्या, त्यांच्या आधारावर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्था यादेखील काम करत असतात. मात्र त्यामागे काही वेळा अडवणूक करण्याची धारणा असते. लालफितीचा कारभार असतो. अनेकदा राजकीय नेतेही मोठय़ा रकमांच्या देणग्या देतात. मात्र, त्यामागे त्यांचा काही विशेष असा हेतू असतो. त्यामुळे सामाजिक काम आणि सामाजिक निधी यांचे मूल्य कमी होते असे वाटते. ही तफावत ‘लोकसत्ता’ने नेमकी ओळखली आहे. बिल गेट्स, अझीम प्रेमजी यांच्यासारखे उद्योगपती सामाजिक कामांना भरभरून दाद देतात, त्यांचे कौतुक सार्वत्रिक होते आणि ते रास्तही आहे. पण ‘लोकसत्ता’ने सामान्य माणसात दडलेला कोटय़धीश पाहिला, सामान्य माणसाची श्रीमंती ओळखली आणि त्यांना सामाजिक काम करणाऱ्या लोकांबरोबर जोडले. काम करणाऱ्यांचे हात आणि दान देणाऱ्यांचे हात एकत्रित आणून सामाजिक कामाला मिळणाऱ्या निधीचे विकेंद्रीकरण केले. याला खरे तर लोकशाहीकरण म्हटले पाहिजे. त्यामुळे हा उपक्रम वेगळा ठरतो. ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम इतरही सर्व माध्यमांनी उचलून धरायला हवा. माध्यमे मोठमोठे सोहळे आयोजित करून स्वत:ची पाठ थोपटून घेतात त्यापेक्षा अशा एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची ताकद वाढण्यास खऱ्या अर्थाने मदत होईल.
सामाजिक कामासाठी भरभरून निधी देणाऱ्या दानशुरांचेही अभिनंदन करायला हवे. तसेच त्यांचे आभारही मानले पाहिजेत. आपण एखाद्या उपक्रमासाठी दान करतो. तेव्हा एखाद्या सामाजिक कामाला अप्रत्यक्षपणे आपण हातभार लावला आहे ही भावना समाधान देणारी असते. मात्र त्यापुढे जाऊन तुम्ही तुमची सोय, वेळ, शक्ती यानुसार अनेक ठिकाणी जी सामाजिक कामे सुरू आहेत त्यांत प्रत्यक्ष सहभाग घ्या. अप्रत्यक्ष सहभागापेक्षा कामाचा अनुभव घेतला तर अधिक समाधान मिळेल आणि जे काम करत आहेत त्यांना मदतीचे हजारो हात मिळतील. अनेकदा कामात तळमळीने मदत करणाऱ्या माणसांचीही उणीव जाणवते. इतर आर्थिकदृष्टय़ा प्रगत देशांच्या तुलनेत भारतात परोपकाराची परंपरा काहीशी कमी आहे. कारण वैयक्तिक मोक्ष आणि वैयक्तिक पुण्य हा धर्मातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. ते महत्त्वाचे आहेच. त्यामुळे आपल्याकडे एखादे धार्मिक काम, मंदिर उभारणीचे काम, गोशाळा यांसाठी भरभरून मदत मिळताना दिसते. मात्र, इतर धर्माकडे पाहिले तर त्यातही अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ज्या वैयक्तिक मोक्षाच्या पलीकडे आहेत. मुस्लीम धर्मात जकात नावाची परंपरा आहे, तो निधी गरजूंसाठी जातो. बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मात सेवा आहे. शीख पंथामध्ये लंगर आहे, त्या माध्यमातून अन्नदान होते. ज्यू धर्मात पन्नास वर्षांतून एकदा इतरांचे कर्ज माफ करण्याची संकल्पना आहे. हिंदू धर्मात वैयक्तिक मोक्ष आणि पुण्य याला अधिक महत्त्व दिले गेले होते. मात्र नजीकच्या काळात यापलीकडे जाऊन सामाजिक पुण्य आणि सामाजिक विधायक कामांना मदत करण्याची संस्कृती रुजली आहे. विशेषत: महाराष्ट्रात ही संस्कृती वाढीला लागली आहे. लोक इतकी भरभरून मदत करतात हे त्याचेच द्योतक आहे.
जवळपास दहा-बारा कोटी लोकसंख्येचा आपला महाराष्ट्र, साधारण ५० हजार खेडी, एक कोटी आदिवासी लोक, सहा कोटी स्त्रिया आणि मुली या सगळ्यांचे अनंत प्रश्न आहेत. प्रश्न अनंत आहेत, तर त्यांची उत्तरेही अनंत सापडली पाहिजेत. राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. जायकवाडी धरणाचे पाणी नाशिकला मिळावे, नगरला मिळावे की मराठवाडय़ाला मिळावे यावरून वादंग सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दर वर्षी जवळपास पन्नास ते साठ हजार बालमृत्यू होत आहेत. स्त्रिया घरात आणि घराबाहेर सुरक्षित नाहीत. धरणे आणि विकासाच्या नावाखाली हजारो आदिवासी विस्थापित होत आहेत आणि आता ते कमी म्हणून वाघही यातून वाचलेले नाहीत. अशा वेळेला असंख्य लोकांनी कामासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सामाजिक काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांचे काम अतुलनीयच आहे. पण आपल्या देशातील समस्या इतक्या जास्त आहेत की त्यासाठी नागरिकांनी विशेषत: तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्चमध्ये ‘निर्माण’ हा उपक्रम आम्ही सुरू केला. आपले करिअर, व्यवसाय करताना स्वधर्माची जाणीव व्हावी. ज्या समाजाचा आपण भाग आहोत, त्या समाजासाठी जिथे आहोत तेथे राहून काही करण्याची दिशा युवकांना मिळावी यासाठी हा उपक्रम सुरू केला. केवळ महाराष्ट्रच नाही तर छत्तीसगड, ओरिसा, उत्तर प्रदेश, गुजराथ, आसाम, झारखंड या ठिकाणीही निर्माणमधील शेकडो युवक-युवती सामाजिक काम करायला लागले आहेत. ही सामाजिक कामाची नवी स्टार्टअप्स आहेत. त्यांना योग्य खत-पाणी मिळाले तर या रोपटय़ांचे वृक्ष होतील. त्यासाठी भरभरून दान करत राहा.
पर्यावरणाच्या प्रदूषणाची आपण चर्चा करतो. मात्र माझ्या दृष्टीने सर्वात गंभीर पातळीवर पोहोचलेले प्रदूषण कोणते असेल तर ते ‘शांततेचे प्रदूषण’ आहे. ‘चुप्पी’.. बोलायचे नाही, भूमिका घ्यायची नाही.. मी, माझे, माझ्यासाठी एवढाच विचार करायचा. समाजातील प्रश्न दुसऱ्या कुणी सोडवावेत, शासनाने सोडवावेत अशी भूमिका घेतली तर हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. त्यांची व्याप्ती इतकी वाढत जाईल की ते आमच्या घरापर्यंत येऊन भिडतील. दारूबाबत मी महिलांना हेच सांगायचे की, माझा नवरा दारू पीत नाही मग मी कशाला काही करू, हा विचार करू नको. दुसरा दारू पितो ते कधी तरी माझ्याही घरापर्यंत पोहोचणार आहे. दुसरीकडे आग लागली आणि आपण शांत राहिलो तर ती आग पसरत आपल्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे शांत राहणे हे सर्वाधिक घातक आहे. सुदैवाने महाराष्ट्रात दानाची, सामाजिक कामाची, चळवळींची, क्रांतीची परंपरा आहे. त्याला मदत करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. देवधर्म करणाऱ्या आपल्या समाजात या नव्या धार्मिक पद्धतीची वाढ ही स्वागतार्ह बाब आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचकांचे म्हणून कौतुक करावेसे वाटते.
काम करत असताना अनेकदा निराशेचे प्रसंग येतात, पण निराश होऊ नका. त्याचबरोबर आपण खूप काही मोठे करत आहोत असा अहंकार बाळगू नका. माझ्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीने मला दिशा दिली. माझे माहेर खूप श्रीमंत. लग्न झाल्यावर सामाजिक कामाची मला ओळख झाली. वडील आम्हाला लहानपणी सांगायचे, तुमचा हात हा पसरलेला किंवा घेणारा नको तर तो पालथा असावा, म्हणजेच देणारा असावा. लग्न झाल्यानंतर ते माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितले. ‘राणी आजपर्यंत मी तुला सांगत आलो की तुझा हात देणारा असावा. पण आता मी तुला सांगतो तुझा हात देणारा नको तर तुझी ओंजळ नेहमी पसरलेली ठेव. त्या ओंजळीत तुझ्याकडे जे आहे ते सर्व ठेव. ज्याला जे हवे ते तो घेईल. सामाजिक काम करताना कधी तरी अहंकार निर्माण होतो. आम्ही लोकांसाठी काही करतोय अशी भावना निर्माण होते. देणाऱ्याचा हात वर आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो. उपकृत होणे कुणालाही आवडत नाही. म्हणून तुझी ओंजळ पसरलेली असावी जेणेकरून ज्याला जे हवे ते त्याला तुझ्या ओंजळीतून घेता येईल.’ आपण सगळे सामाजिक काम करतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो याची जाणीव ठेवा. कोणत्याही फळाची वासना न ठेवता काम करा. मी निराशावादी अजिबात नाही. तरुण पिढीवर माझा विश्वास आहे. ही पिढी काही करत नाही अशी टीका होते. मात्र त्यात त्यांचा दोष नाही, त्यांच्या पालकांचा आहे. आजच्या पिढीसमोर आदर्श उभे करण्यात आपण कमी पडलो. मात्र त्यांना दिशा दिली तर ते खूप चांगले काम उभे करतील असा मला विश्वास वाटतो. ज्ञानयोगी आणि दानयोगींच्या सहकार्याने खूप चांगले काम या समाजात उभे राहील.
श्रीराम पुजारी संगीत – संग्रहालय, सोलापूर
श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयाची स्थापना बारा वर्षांपूर्वी करण्यात आली. संस्थेकडे १४०० पेक्षा जास्त गिगाबाइटचा संग्रह आहे. यात शास्त्रीय, उप-शास्त्रीय, नाटय़, सुगम तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय नेत्यांच्या भाषणे तसेच काही दुर्मीळ चित्रफितींचा संग्रह केलेला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या उपक्रमामध्ये संस्थेची माहिती छापून आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या, फोन आले, चौकशी करण्यात आली. दानयज्ञातून मिळालेला निधी म्हणजे दानसेनाने कानसेन घडवण्यासाठी केलेले सहकार्य आहे. हा निधी अद्ययावत ध्वनिमुद्रणासाठी वापरण्यात येईल. तसेच माईक, संगणक घेण्यात येतील. – डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रमुख कार्यवाह
सर्पराज्ञी, बीड
‘लोकसत्ता’च्या दुर्गा पुरस्कारामुळे आमचा सर्पराज्ञी प्रकल्प प्रकाशझोतात आला होता. जखमी पशू-पक्ष्यांना आश्रय देऊन, त्यांच्यावर उपचार करून मग त्यांच्या मूळ अधिवास असलेल्या ठिकाणी सोडले जाते. पुरस्कारामुळे बीड जिल्ह्यातील तसेच आजू-बाजूच्या इतर जिल्ह्यांतून पशू-पक्षी जखमी अवस्थेत असेल तर लोक आम्हाला आवर्जून कळवतात. आमच्या कार्याला प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर अनेकांनी धान्य, पशांच्या रूपात हातभार लावला. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या उपक्रमात आमची निवड झाली, याचा आनंद आहे. मिळालेला निधी पशू-पक्ष्यांच्या उपचारासाठी, त्यांना निवारा बनवण्यासाठी आणि बरे झाल्यावर सोडून दिलेले जे प्राणी परत येतात त्यांना वाढवण्यासाठी वापरण्यात येईल. ‘लोकसत्ता’ आमच्या कार्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्याचा आम्हाला मोठा आधार वाटतो. – सिद्धार्थ सोनावणे, संस्थापक
सोबती पॅरेंट्स असोसिएशन, पालघर
अपंगत्व असलेल्या मुलांसाठी ज्या वेळी अनेक शाळा, संस्थांचे दरवाजे बंद झाले त्या वेळी थकलेले पालक एकत्र आले आणि सोबती पॅरेंट्स असोसिएशन ही व्यंग मुलांच्या पालकांची संघटना सुरू झाली. या संस्थेकडून अपंग मुलांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाते. व्यंग मुलांसाठी कौटुंबिक वातावरणात काळजी घेणारे, सांभाळ करणारे केंद्र चालवले जाते. या केंद्रात त्यांना प्रशिक्षित शिक्षक, प्रशिक्षित मनुष्यबळाच्या साहाय्याने शिकवले जाते. त्यांच्याकडून विविध वस्तू बनवून घेतल्या जातात. त्यांचे परावलंबित्व दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व गोष्टींसाठी कार्यकत्रे, स्वयंसेवकांबरोबर पशांचेही पाठबळ आवश्यक असते. ‘सर्वेकाय्रेषु सर्वदा’मुळे मिळालेल्या निधीतून या केंद्रामधील अनेक त्रुटी दूर करता येतील, मुख्य म्हणजे अपंगत्वाची साधने मुलांसाठी घेता येतील. -उषा बाळ, संचालिका
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे</strong>
न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये काही बहुउद्देशीय संस्थांची स्थापना केली होती, त्यांपकीच महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था ही एक. मराठी भाषा आणि साहित्याला उत्तेजन देणाऱ्या या संस्थेने यंदा १२५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेची परिपूर्ण माहिती प्रसिद्ध केली. त्यामुळे अनेकांना संस्थेचे उद्दिष्ट आणि कार्य खऱ्या अर्थाने समजले. दानयज्ञातून मिळालेल्या निधीतून भविष्यातील अनेक प्रकल्पांना चालना मिळणार आहे. मराठीतील विविध विषयांवरील माहितीकोशांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच न्या. रानडे अध्यासनांतर्गत न्या. रानडे यांच्या राजकीय, सामाजिक, अर्थशास्त्रीय इत्यादी अशा सर्वच पलूंचे संशोधन करून समग्र माहिती बहुखंडी ग्रंथातून प्रकाशित करणे, न्या. रानडेंवर माहितीपट बनवणे, त्याचबरोबर आदिवासी आणि इतर बोली भाषा, संस्कृती दृक्श्राव्य माहितीपटाद्वारे जतन करण्याचे प्रकल्पांवर कार्यान्वित करणे आदी कामे केली जाणार आहेत. समाजात दानशूर व्यक्ती खूप असतात, त्यांना एकत्र आणण्याचे ‘लोकसत्ता’चे काम स्वागतार्ह आहे. – डॉ. अविनाश चाफेकर, सचिव
वसुंधरा विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग
मुलांमधील सर्जनशीलतेला वाव मिळावा, त्यांनी मूलभूत विज्ञान शाखेकडे वळावेत, या उद्दिष्टाने येथे विविध उपक्रम राबवण्यात येतात. जेव्हा ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’मध्ये वसुंधरा विज्ञान केंद्रावर लेख छापून आला तेव्हापासून रोज दोन ते तीन जण केंद्राला भेट देतात. या विज्ञान केंद्राला शैक्षणिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी दानयज्ञातून मिळालेल्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. विज्ञान संग्रहालय, विज्ञान प्रयोग शाळा इत्यादींसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. ‘लोकसत्ता’मध्ये विज्ञान केंद्रावर लेख आल्याचा अभिमान वाटतो. – अविनाश हावळ, विश्वस्त
बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन, दिल्ली
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या २२ वर्षांपासून काम करणारी ही संस्था आहे. रुग्णवाहिका सेवा, अनाथ किंवा घर नसलेल्या मुलींना शिक्षण-प्रशिक्षण देणे, वसतिगृह चालवणे इत्यादी कार्ये संस्था करत आहे. येथील मुलींना सक्षम बनवलं तर त्यांचं घर सक्षम होईल. ‘लोकसत्ता’ने या पूर्वीदेखील या कामाबद्दल प्रसिद्धी दिली होती. ज्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना काम समजले, कामाबद्दल विश्वास निर्माण झाला. ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या लेखातून तिथली संपूर्ण परिस्थिती, काम लोकांना समजले. यातून मिळालेल्या निधीतून वसतिगृह बनवण्याच्या कामात खऱ्या अर्थाने साहाय्य होणार आहे. -अधिक कदम, संस्थापक
हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड, कोल्हापूर</strong>
अंपगांचे सर्वागीण पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने काम करणारी ही संस्था आहे. अपंगांना हक्काचे साधन मिळवून देणे, सौम्य अपंगत्व असलेल्यांच्या शस्त्रक्रिया करणे, अपंगांसाठी वसतिगृह चालवणे, त्यांना शिक्षण, प्रशिक्षण देऊन समाजात उत्पादक घटक म्हणून उभे करण्याचा उद्देश आहे. ‘लोकसत्ता’ने कर्मयोगी आणि दानयोगी यांच्यामध्ये सेतू बांधण्याचे केलेले काम हे कौतुकास्पद आहे. ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ उपक्रमाअंतर्गत मिळालेला निधी अपंगांना रोजगार मिळवून देण्यासाठी काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे. – डॉ. नसीमा हुजरुक, संस्थापक
स्नेहग्राम, सोलापूर
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहग्रामच्या माध्यमातून निवासी शाळा सुरू केली. येथे कोणीही कार्यकत्रे, स्वयंसेवक काम करत नाहीत. पाणतळी बनवणे, झाडे लावणे इत्यादी सर्व गोष्टी मुले करतात. येथे आजूबाजूला कोणतेही गाव नाही. वन्य प्राण्यांचा धोका असतो. अशा वेळी ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’च्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा वापर भक्कम इमारत बांधण्यासाठी, मुलांना चांगल्या सोयी देण्यासाठी केला जाणार आहे. लोकांनी पशांबरोबर कल्पनाही दान करायला हव्यात. – महेश निंबाळकर, संस्थापक
रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट, वाई
मतिमंद मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करतो. यासाठी नव्या तंत्रांचा वापर केला जातो. तसेच या मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी बौद्धिक चाचण्या तयार करून त्यानुसार शिक्षण दिले जाते. ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’च्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून शिक्षकांना प्रशिक्षण देऊन या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी हे पसे मुदत ठेवीमध्ये गुंतवून त्याच्या व्याजाने रोजचा व्यवहार, मुलांच्या येण्याच्या जाण्याची सोय, शिक्षकांचे पगार यासाठी वापरला जाईल. – डॉ. पंडित टापरे, संस्थेचे उपाध्यक्ष
दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ</strong>
स्वयंरोजगार क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था आहे. शेतकऱ्यांना आधार देणे, त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणे असे कार्य ही संस्था करते. शाश्वत शेतीअंतर्गत खत तयार करणे, फवारणीचे औषध तयार करणे इत्यादी गोष्टी संस्थेत शिकवल्या जातात. शेतकऱ्यांच्या मुलांना आíथक, तांत्रिक साहाय्य केले जाते. शेतीतील संशोधनाने कृषी क्षेत्रातील नराश्य संपवणे शक्य आहे. ‘लोकसत्ता’च्या या दानयज्ञातून मिळालेला निधी हा शाश्वत शेतीसाठीचे प्रयोग आणि कृषी संशोधनासाठी वापरण्यात येणार आहे. – गजानन परसोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी