संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. सुदैवाने यंदाच्या निवडणुकीत कोणतेही वादविवाद झाले नाहीत. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली असून निवडणुकीनंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली.

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी प्रवíतत केलेली, अगोदर   ग्रंथकारांचे संमेलन म्हणून अवतीर्ण होऊन नंतर ‘साहित्य संमेलन’ म्हणून प्रस्थापित झालेली गोष्ट मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एखाद्या मान्यवर लेखकाची निवड होत असते. ही निवड सन्मानपूर्वक व्हावी, ती करताना वादविवाद होऊ नयेत, अशी अनेकांची सदिच्छा आहे. तथापि, ही निवड निवडणूक प्रक्रियेतूनच होत असल्याने या सदिच्छा केवळ मनात राहतात. पात्रता असूनही निवडणूक नको असलेले चांगले लेखक या भानगडीत पडतच नाहीत. काही जण पडून पाहतात, पण निवडणूक ‘लढविणे’ ही गोष्ट त्यांना मानवत नसल्याने पराभूत  होतात. या प्रक्रियेत सुधारणा व्हायची तेव्हा होवो, पण तूर्त तरी त्याला पर्याय नाही.
आता थोडेसे माझ्या बाबतीत. साहित्य आणि संस्कृती यांच्या व्यवहारात बरीच वर्षे खर्ची घातलेल्या माझे पहिल्यापासूनचे मत आहे की, संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची व्यक्ती निवडताना तिच्या स्वत:च्या पात्रतेच्या विचाराबरोबर स्थळ आणि काळ यांचाही विचार करायला हवा. अशा प्रकारच्या विचाराला साहित्यशास्त्रात औचित्यविचार असे म्हणतात, हे जाणकारांना वेगळे सांगायची गरज नाही.
१९९६ साली संत ज्ञानेश्वरांच्या समाधीला सातशे वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने त्या वर्षीचे साहित्य संमेलन श्रीक्षेत्र आळंदी येथे भरविण्याचे ठरले तेव्हा मला अर्थातच आनंद झाला; पण मला असेही वाटले की, या संमेलनाचे अध्यक्षपद संतसाहित्याच्या व विशेषत: ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला दिले जावे. तेव्हा वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या डॉ. भा. पं. बहिरट यांचे नाव आम्ही सुचविले. त्यांच्या नावाला विरोध झाला, हेदेखील समजून घेता येण्यासारखे आहे; पण मुख्य प्रवाहातील काही संबंधितांनी ‘कोण बहिरट?’, ‘हे काय संतसाहित्य संमेलन आहे काय?’ असे प्रश्न उपस्थित केले. बहिरटांसारख्या ज्येष्ठ अभ्यासकाचा पराभव पाहण्याची आमचीही इच्छा नव्हतीच. त्यामुळे त्यांचे नाव आम्ही मागे घेतले. तथापि, संतसाहित्यासंबंधीचे घोर अज्ञान पाहून मला स्वत:स वाईट वाटले. ते दूर करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना करून तिच्या माध्यमातून संतसाहित्य संमेलनांचे आयोजन करून पाहिले; पण या प्रकाराने मला हवा असलेला संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांच्यामधील संवाद अपेक्षित प्रमाणात होत नाही असा अनुभव आला.
दरम्यान, ८८वे साहित्य संमेलन संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान या गावी भरणार असल्याची बातमी आली. आता परत माझ्याविषयी सांगायचे झाल्यास साहित्यिकाचे महत्त्व संमेलनाच्या अध्यक्षपदावर अवलंबून असते, असे मला कधीच वाटले नव्हते व त्यामुळे ती माझी महत्त्वाकांक्षा नव्हतीच. या व्यासपीठाकडे मी भूमिका मांडण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ म्हणून पाहतो. साहजिकच घुमानच्या संमेलनाचे अध्यक्षपद संतसाहित्याशी नाते असलेल्या व्यक्तीस मिळाले तर त्याचा उपयोग ही भूमिका मांडण्यासाठी करता येईल, अशी माझी धारणा  झाली.
मात्र याचा अर्थ असा अध्यक्ष केवळ कीर्तनकार किंवा प्रवचनकार असावा असा नव्हे. त्याला आधुनिक साहित्याची जाण हवी आणि या दोन प्रवाहांचे नाते सांगण्याची क्षमताही त्याच्यात हवी याबद्दलही मला संशय नव्हता. आत्मश्लाघेचा दोष पत्करूनही सांगतो, की हे काम मी करू शकेन असा विश्वासही मला वाटला. खरे तर हे काम मी गेली ३०-४० वर्षे करीत आलो आहे. अगोदर फुटकळ लेख लिहिल्यानंतर मी ‘तुकारामदर्शन’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात इतर काही गोष्टींबरोबर महाराष्ट्राने आधुनिक काळात प्रवेश केला तोच मुळी तुकोबांचे बोट धरून, असे दाखवून देण्यात मी यशस्वी झालो होतो. तुकोबांच्या परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्राचा वेध घेताना मी ‘लोकमान्य ते महात्मा’ हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला. तो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असला तरी ‘तुकारामदर्शन’मधील सूत्रच या नव्या संघर्षांत कसे अनुस्यूत आहे हे मी दाखवले. हे सूत्र केवळ मराठी साहित्यापुरते मर्यादित नसून महाराष्ट्राच्या समाजजीवनाला पुरून उरले आहे, हेदेखील त्यातून आपोआपच ध्वनित झाले.
महाराष्ट्राचा वेध प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून घेऊन झाल्यावर एकूणच महाराष्ट्राच्या जडणघडणीचा शोध घ्यावा, असे मला वाटले आणि महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी ‘गर्जा महाराष्ट्र’ ग्रंथ सिद्ध केला. त्यात मी सातवाहनपूर्व काळापासून १९६० पर्यंतच्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, भाषिक, सांस्कृतिक जडणघडणीचे विश्लेषण केले.
माझ्या या सर्व उपद्व्यापाचा आधार संतसाहित्य हाच आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. हे लेखन चालू असताना मी महाराष्ट्रातील दलितांच्या आणि बहुजनांच्या राजकारणाची चिकित्सा करणारी ‘उजळत्या दिशा’ आणि ‘शिवचरित्र’ ही नाटकेही लिहिली.
थोडक्यात काय, की महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा हा माझ्या आस्थेचा विषय आहे. माझी अल्पस्वल्प शक्ती पणाला लावून मी विषयाची तड लावीत आलेलो आहे व हे करताना मी महाराष्ट्राच्या संस्थात्मक व सार्वजनिक जीवनातही माझ्या परीने वावरतो. समन्वयाचा पुरस्कार करताना जरूर तेथे संघर्ष करण्यातही कमी पडलो नाही.
हे मुद्दे विचारात घेऊनच मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो. मी आजवर केलेल्या सेवेची पावती मला मिळेल याची खात्री बाळगून उतरलो आणि मतदारांनी माझी निराशा केली नाही. मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यापुरते आणि तेही ललित साहित्यापुरते मर्यादित असू नये. तो खुशालचेंडूच ठरू नये, असे मला वाटते. त्यात मराठी माणसांचा विचार केला जावा. साहित्याचा व भाषेचा विचार माणसांना वगळून करता येत नाही.
तेराव्या शतकात संत नामदेवांनी पंजाबात मराठी भाषेचा आध्यात्मिक प्रभाव दाखवला. अठराव्या शतकातील मराठय़ांनी मराठी भाषेचा राजकीय प्रभाव दाखवला. त्याचीच पुनरावृत्ती सामाजिक, राजकीय क्षेत्रांत फुले आणि टिळक यांनी पुढच्या दोन शतकांत केली. या साऱ्या प्रक्रियेत महाराष्ट्र आणि पंजाब यांचे संबंध कसे राहिले हे मला सांगायचे आहे. जागतिकीकरणाच्या दबावाने आणि जातीय अस्मितांच्या उद्रेकाने गोंधळलेला, बावरलेला मराठी समाज मी पाहतो आहे. त्याला वगळून कोणत्या साहित्याचा विचार आपण करू शकतो? निदान घुमान येथे तरी तेवढय़ापुरते मर्यादित राहू नये, ही माझी भूमिका होती.
ही भूमिका मान्य झाली असे निकालावरून म्हणता येते. आता ती मांडण्यात कसोटी माझी आहे; पण नामदेवरायांच्या या लेकरावर संतांची कृपादृष्टी असल्याचे मला माझ्या पूर्वजाने- तुकोबांनीच सांगितले असल्याने माझ्यावर दडपण नाही. ‘लाडकी लेक मी संतांची। मजवर कृपा बहुतांची।’ असे तुकोबांचे ते वचन आहे.

Story img Loader