डॉ. होमी भाभा यांनी देशातील मूलभूत विज्ञान संशोधन कार्यक्रम, तर विक्रम साराभाई, सतीश धवन यांनी अंतराळ कार्यक्रम उभा करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या पश्चात हे काम ज्यांनी पुढे नेले त्यांच्यापैकी एक म्हणजे डॉ. यू. आर. राव. देशातील अंतराळ संशोधन संस्थेचा पाया रचण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे. अंतराळ संशोधन संस्थेचे यश आपणास आज दिसते त्याच्या यशाचे गमक आहे ते डॉ. राव यांच्यासारख्यांनी दिलेल्या दिशेमध्ये. त्यांच्या निधनाने अंतराळ विज्ञानातील एक तारा निखळला. त्यांचे सहकारी व टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील निवृत्त वैज्ञानिक डॉ. आर. के. मनचंदा  यांनी डॉ. राव यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा.. 

‘‘भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि जगातील प्रगत देशांनी एक ना अनेक प्रतिबंध आणण्यास सुरुवात केली. हे प्रतिबंध म्हणजे आमच्यासाठी एक नवी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे,’’ असे सांगत डॉ. यू. आर. राव यांनी त्या काळातील वैज्ञानिकांना अंतराळ विज्ञानात संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या क्षेत्रात भारताला सक्षम करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. राव आणि माझी पहिली भेट झाली ती टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत. तेव्हा मी भौतिकशास्त्र विभागात क्ष-किरण खगोलशास्त्रावर काम करत असे. त्यांचा अभ्यास विषयही तोच. ते तेव्हा भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख होते. मी माझा पीएचडीचा प्रबंध सादर केला, त्याला मान्यता मिळून माझ्या मुलाखतीची वेळ आली होती. त्या वेळी परदेशातील एक आणि देशातील एक असे दोन तज्ज्ञ मुलाखत घेत असत. माझी मुलाखत घेण्यासाठी जपानमधील एक तज्ज्ञ होते आणि देशातील तज्ज्ञ म्हणून डॉ. राव होते. मला पीएचडी मिळाल्यानंतर मी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत पूर्णवेळ कामास सुरुवात केली. देशाने नुकतेच अंतराळ संशोधनात पाऊल ठेवले होते. अंतराळ संशोधन संस्थेची नुकतीच स्थापना झाली होती. ही संस्था कशी असेल, तिचे काय काम असेल याची आखणी सुरू होती. त्यातील काही ज्येष्ठ वैज्ञानिकांत डॉ. राव यांचा समावेश होता. हे सर्व नियोजन सुरू असतानाच विक्रम साराभाई यांचे निधन झाले. देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे, अंतराळ कार्यक्रमात भरारी मारण्याचे स्वप्न साराभाई यांनी पाहिले होते. त्यासाठी देशभरात विविध ठिकाणी संस्थात्मक उभारणीचे काम सुरू होते. हे स्वप्न एकाएकी दिशाहीन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. साराभाई ज्या संस्थांचे प्रमुख होते त्यावर दुसऱ्या व्यक्तींची नियुक्ती होईपर्यंत त्या सर्व पदांची जबाबदारी टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. एम. जी. के. मेनन यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्या वेळी डॉ. राव यांचे संस्थेत सातत्याने येणे होत असे. प्रत्येक वेळी ते आले की, माझ्या प्रयोगशाळेत येत असत. तेथे आमच्या संशोधनाविषयी गप्पा रंगत. मग कधी बाहेर जेवायला जाणे, तर कधी फिरायला जाणे सुरू झाले. यातून आमचा स्नेह अधिक दृढ होत गेला. तसे पाहता डॉ. राव हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे होते; पण त्यांनी मला याची कधी जाणीव करून दिली नाही. हेच त्यांच्या स्वभावातील वेगळेपण होते.

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
review of ramachandra guha s speaking with nature book
दखल : मानवी भविष्यासाठी…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

याच काळात स्थापन झालेल्या अहमदाबाद येथील ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’मध्ये प्रा. यशपाल यांनी नासाच्या ‘एटीएस-६’च्या माध्यमातून ‘उपग्रहाधारित अध्ययन’ प्रयोग सुरू केला. यामुळे आपल्या देशात उपग्रह तयार करून तो अवकाशात सोडण्याची आवश्यकता सर्वाना वाटू लागली. यासाठी बेंगळूरु येथे स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात यावे असा प्रस्ताव तयार झाला. त्याच वेळी सतीश धवन यांनी इस्रोच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तर बेंगळूरु येथील उपग्रहनिर्मिती केंद्राची धुरा डॉ. राव यांच्यावर सोपवण्यात आली. या केंद्रात ‘आर्यभट्ट’ नावाचा उपग्रह तयार करण्याचे काम सुरू झाले. याच दरम्यान धवन यांनी भारताने उपग्रह तयार करून स्वत:च अंतराळात सोडावे यासाठी प्रक्षेपण स्थळ उभारण्याचे ठरविले. जगभरातील विकसित देशांना तो धक्काच होता. भारत उपग्रहनिर्मिती करतो म्हटल्यावर जगातील विकसित देशांनी भारताला सहकार्य करण्यास नकार दिला. यामुळे देशाला उपग्रहनिर्मितीसाठी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची गरज निर्माण झाली. यासाठी डॉ. राव यांनी तेव्हाचे वैज्ञानिक आणि उद्योजक यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम केले. उपग्रह किंवा अंतराळ संशोधनासाठी आवश्यक त्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक वस्तू बनवून उद्योगांना काय फायदा, असा प्रश्न उद्योग विचारू लागले. अशा प्रश्नांना उत्तर देत डॉ. राव यांनी उद्योगांकडून त्यांना पाहिजे त्या वस्तूंची निर्मिती करून घेतली. ‘आर्यभट्ट’ अंतराळात सोडण्यापूर्वी ‘अ‍ॅपल’ नावाचा एक प्रयोगशील उपग्रह अंतराळात सोडण्यात आला होता. त्याच्या यशानंतर येथील वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी आणखी उपग्रहांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या केंद्रात ‘भास्कर’ या उपग्रहाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत माझा थेट सहभाग होता. त्या वेळी डॉ. राव यांच्याशी रोज संवाद होऊ लागला. आमचे ‘भास्कर’चे काम सुरू असतानाच धवन यांचे निधन झाले. यानंतर अंतराळ संस्थेची धुरा डॉ. राव यांच्यावर सोपविण्यात आली. त्या वेळेस अंतराळसंस्था ही बाल्यावस्थेत होती. त्यांच्यासमोर देशातील आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने होती. त्या काळात पीएसएलव्हीच्या कामाची नुकतीच सुरुवात झाली होती. याचबरोबर देशभरात अंतराळ क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये नाना कामे सुरू होती. ती आव्हाने डॉ. राव यांनी लीलया पेलली आणि संस्थेला नवी दिशा दिली. डॉ. राव यांच्याकडे यापूर्वी अंतराळ संशोधनाचा विशेष अनुभव होता. त्यांना ‘नासा’च्या पायोनीअर ६, पायोनीअर ७ आणि पायोनीअर ८ या परग्रहावरील मोहिमेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्याचा फायदा त्यांच्या या कामामध्ये झाला. यानंतर ते विज्ञानाचे व्यवस्थापक झाले. यामुळे संशोधनासाठी त्यांना फारसा वेळ देता येत नसे. मात्र ते आमच्याशी नेहमी त्यांच्या क्षेत्रातील संशोधनावर चर्चा करीत असत. अनेकदा वादही होत. मात्र त्यातून काही तरी नवीन समोर येत असे. अंतराळ संशोधनाचे पूर्णत: स्वदेशीकरण करण्यामध्ये डॉ. राव यांचे महत्त्वाचे योगदान होते. ‘‘आपल्या देशाची अंतराळ संस्था इतकी पुढे गेली पाहिजे, की जगभरातील देशांना उपग्रह सोडण्यासाठी आपल्या देशातील यानांचा वापर करावा लागेल. तसेच आपल्या देशातील वैज्ञानिकांना उपग्रह सोडण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागता कामा नये,’’ हे डॉ. राव यांचे मुख्य स्वप्न होते. ते स्वप्न आज प्रत्यक्षात आले आहे. डॉ. राव यांनी ‘जीएसएलव्ही-१’ आणि ‘जीएसएलव्ही-२’च्या रचनेचे आणि विकासाचे काम सुरू केले होते. क्रायोजेनिक इंजिनाची गरजही त्यांनी मांडली होती. त्यांच्या काळात अंतराळ संस्थेने अनेक नवी शिखरे सर केली. त्यात कधी अपयशही आले. मात्र अपयशाने ते कधी खचून गेले नाहीत. हसऱ्या चेहऱ्याने ते समोर येत व आमच्यासारख्या वैज्ञानिकांना सांगत की, यात नेमके काय चुकले आहे ते शोधा. म्हणजे नेमकी तीच चूक पुन्हा होणार नाही.

चांद्रयान मोहिमेला दिशा देण्यामध्येही डॉ. राव यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ते निवृत्त झाल्यानंतरही आम्ही नेहमी विविध विषयांवर चर्चा करत बसायचो. माझी आणि त्यांची शेवटी भेट झाली तेव्हा त्यांनी ‘नेचर’ या नियतकालिकातील लेखावर माझ्याशी चर्चा केली. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी विज्ञानाची कास सोडली नाही. डॉ. राव यांनी उत्तम वैज्ञानिक म्हणून काम केलेच, पण विज्ञानातील उत्तम प्रशासक या नात्याने त्यांनी अंतराळ संशोधन संस्थेचा मजबूत पाया रचला. त्या पायामुळेच अंतराळ संस्थेचे आजचे यशाचे शिखर आपण पाहू शकत आहोत.