जगभरात प्रत्येक गोष्टीचे नॅनोकरण सुरू असताना लसींचेही नॅनोकरण होणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन जगभरात संशोधन सुरू आहे. यामध्ये मुंबईतील रसायनशास्त्र संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या वंदना पत्रावळे यांचा अग्रक्रम लागतो आहे. त्यांनी ब्रुसिलोसिस या दुर्धर आजारावर प्रतिबंधात्मक नाकावाटे शरीरात सोडणारी लस तयार करण्याचे काम सुरू केले असून त्याला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे.
ब्रुसिलोसिस या आजारावर उपचारांसाठी लसीचे संशोधन व्हावे यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्यावतीने या विषयात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जगभरातील २७०० वैज्ञानिकांनी प्रतिसाद दिला. यातून पत्रावळे यांची निवड झाली. ब्रुसिलोसिस हा आजार जनावरांकडून माणसांकडे येत असतो. शरीराची हाडे खिळखिळी करून सोडणाऱ्या या आजाराने जगभरात लाखो लोक हैराण आहेत. दुभत्या जनावरांकडून या आजाराचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होत असतो. तसेच प्राणीजन्य पदार्थ खाल्यामुळेही या रोगाची लागण होते. हा रोग संसर्ग असल्यामुळे या रोगाची भीती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन यावर प्रभावी औषध शोधणे ही जागतिक गरज बनली. यातूनच पत्रावळे आणि त्यांच्या विद्यार्थिनी स्वाती व्यास आणि प्रियांका प्रभू यांनी या संशोधनाला सुरुवात झाली. पत्रावळे या तयार करत असलेल्या लसीचे वैशिष्टय़ म्हणजे ही लस माणूस आणि जनावर अशा दोघांसाठी उपयुक्त असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरातील २७०० संशोधकांना मागे टाकत नॅनोलसीकरणाच्या संशोधनात गेट्स फाऊंडेशनची तब्बल एक लाख अमेरिकन्स डॉलर्सच्या अभ्यासवृत्तीवर मुंबईतील मराठी प्राध्यापिकेने आपले नाव कोरले. या प्राध्यापिका रसायनशास्त्र संस्थेत काम करत असून त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी नाकावाटे देता येणारी ही लस तयार करण्याचा चंग बांधला आहे.

इतकेच नव्हे तर ही लस नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सेंद्रिय द्रव्याचा वापर होणार नसल्याची माहिती पत्रावळे यांनी दिली. यामुळे संस्थेने पत्रावळे यांची निवड केली असून त्यांना या संशोधनासाठी तब्बल एक लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी त्यांना १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून हे संशोधन आता पूर्णत्वाच्या दिशेने असल्याचे पत्रावळे यांनी स्पष्ट केले. ही लस आर्थिकदृष्टय़ा परवडणारी करण्याकडे या संशोधन गटाचा भर असल्याचेही पत्रावळे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी पत्रावळे यांनी मलेरिया, कर्करोग, मेंदूचे विकार आदी संसर्गजन्य आजारांवर प्रभावी औषधांची निर्मिती केली म्हणून पत्रावळे आणि त्यांच्या गटाला नुकतेच इटली येथे पार पडलेल्या ‘नॅनोइटली-१३’ या परिषदेत ‘वेनेटो नॅनोटेक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे त्यांना या संशोधनाला प्रोत्साहन मिळाल्याचे त्या सांगतात.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vandana b patravale