ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्याबरोबरच्या सहजीवनाविषयी पत्नी, लेखिका सुधा गोवारीकर यांनी जागवलेल्या आठवणी. ११ जानेवारी २०१४ रोजी चतुरंगमध्ये ‘झाली फुले कळ्यांची’ या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा पुनर्मुद्रित अंश, एका दिवंगत शास्त्रज्ञाचं माणूसपण पुन्हा आठवावं, यासाठी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसंतराव आणि माझं सहजीवन पारंपरिक रीतीने सुरू झालं आणि जबाबदाऱ्यांची वाटणीही पारंपरिक आणि सरळ! त्यांनी अर्थार्जन आणि मी घरसंसार. पहिली दोन र्वष परदेशात सहजपणे निघून गेली. एकमेकांचा परिचय झाला आणि मला नवीन जगाचं दर्शन झालं. भारतात परतल्यावर आमची खरी कसोटी लागली. सहवास नसलेलं सहजीवन सुरू झालं. ते भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्रिवेंद्रमला दाखल झाले, त्यांच्या मागोमाग मीही! आम्ही दोघंही आपापल्या परीने आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करू लागलो.
वसंतरावांचं काम अवघडच होतं. जिथे काही नव्हतं तिथे काही तरी घडवायचं होतं; पण या कामात संवादभाषा आणि विषयातलं ज्ञान या दोन्हींत अडचण नव्हती. कामाचे तास साधारण १२ ते १४ इतके असत. माझी स्थिती दयनीयच होती. कामवाल्या, भाजीवाले, वाणी, इतर दुकानदार यांच्याशी माझी गाठ होती. त्याकरिता स्थानिक भाषेची गरज होती. मला तर त्या भाषेचा गंधही नव्हता. मग थोडं इंग्रजी, थोडं हिंदी आणि बाकी हातवारे यांच्यावर काम भागवावं लागे. पण त्यात हवाहवासा वाटणारा ‘सह’वास वाटय़ाला येत नव्हता.
त्या वेळी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे वसंतराव मुळात कुटुंबवत्सल होते. घरी कितीही उशिरा आले तरी मुलींना गाडीत बसवून एक फेरफटका मारायचा असा त्यांनी एक अलिखित नियम केला. त्या वेळी एखादं आईस्क्रीम किंवा काही सरबत वगैरे व्हायचंच. याला मुलींनी ‘भटक्या मारणं’ असं नाव दिलं होतं. तसंच शनिवार-रविवारी त्यांना काम असे. त्याकरिता स्वतंत्र खोली असूनही वसंतराव घरातल्या जेवणाच्या टेबलावर काम घेऊन बसत. आजूबाजूला आरडाओरडा, पळापळी चाले, पण त्यांची समाधी कधी भंग होत नसे.
घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही संध्याकाळच्या भटक्यांचा आस्वाद मिळे. माझी आई माझ्या घरी फक्त एकदाच आली. त्या वेळी एक रात्र वसंतराव घरीच आले नाहीत. मला माझ्या आईची काळजी. तिला काय वाटेल, घरी जाऊन ती काय आठवेल, हेच विचार रात्रभर छळत होते. शेवटी ती आई होती व तिला आपल्या मुलीची चिंता वाटणारच. त्या दिवशी साहेब सकाळी ७ नंतर उगवले आणि आल्याबरोबर ‘रेडिओ लाव’ म्हणाले. बातम्यांत जावयाचं नाव ऐकून आई रात्रीची गोष्ट विसरली. मी सुटकेचा नि:श्वास टाकला. भारत आपल्या इंधनाच्या जोरावर अग्निबाण अंतरिक्षात पाठवू शकेल हे सिद्ध करणारा एक छोटा अग्निबाण त्या पहाटे उडविला गेला होता. साल होतं १९६९.
पुढे पुढे ते आपल्या कामात अधिकच गुरफटू लागले. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. त्रिवेंद्रमला आल्या आल्या त्यांनी ‘सायन्स टुडे’ या मासिकाकरिता ‘अग्निबाण’ या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. मला वेळ मिळतो आणि करायला काही नसतं ही गोष्ट वसंतरावांच्याही लक्षात आली आणि आपले हात बांधल्याने हिच्यासाठी आपण काही करू शकत नाही ही जाणीवही होत होती. एक दिवस ‘सायन्स टुडे’मधल्या लेखांचं भाषांतर कर, असं त्यांनी मला सुचवलं. प्रथमदर्शनी हे अवघड वाटलं. विज्ञान न शिकलेल्या मला ते लेख समजून घेऊन भाषांतर करणं जमेल का? पण मग लगेचच वाटलं, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. मला न समजलेल्या गोष्टी त्यांनीच समजावून द्याव्यात. मला आणि त्यांना एकत्र बसून बोलायला एक कारण मिळालं. मुली, घर, शाळा, वसंतरावांचं जेवण आणि झोप यापेक्षा वेगळा विषय! मग अधूनमधून माझं पाठ सुरू झालं. ‘सह’चा अभाव थोडा कमी झाला. त्या लेखमालेत इस्रोची ओळख करून देणारं एक प्रकरण घालून मी भाषांतर पूर्ण केलं. पुणे विद्यापीठाच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमांतर्गत ते लेख पुस्तकरूपात प्रसिद्धही झाले.
लिखाणाचा हा अनुभव गाठीशी बांधल्याने मला आत्मविश्वास आला. १९८० साली भारताने स्वत:च्या अग्निबाणातून एक छोटा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडला. त्याकरिता आपल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्रिवेंद्रममध्ये चाललेल्या अंतरिक्ष कार्यक्रमाची होत असलेली नेत्रदीपक प्रगती आपल्या मराठी बांधवांना कळावी या हेतूने मी लेख लिहू लागले. मी कधी कधी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही बारकावे मला तिथे दिसत. व्यवस्थापन, आपल्या गटाला पुढे घेऊन जाण्याचं कौशल्य, कामाची जिद्द हे पैलूही दिसत, पण मला सर्वात भावलेला त्यांचा गुण म्हणजे सहृदयता. अगदी सुरुवातीच्या काळात स्फोटके वापरताना काळजी घेण्याकरिता लागणाऱ्या सुविधा फारच अपुऱ्या होत्या. त्या वेळची एक गोष्ट. इंधन बनत असताना लहानसा स्फोट झाला. रात्री त्यांना फोन आला. ते लगेच निघाले. पोहोचेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली होती. सगळेच त्याकरिता झटत होते. एकाचा हात भाजला होता, तोही आपली दुखापत विसरून त्यांना मदत करीत होता. वसंतराव पोहोचले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं. त्यांनी त्या माणसाच्या पाठीवर हात फिरवला. झालं! त्याला रडूच फुटलं. इतका वेळ त्याला आपल्या हाताकडे लक्ष द्यायला वेळच झाला नव्हता.
पुढे आम्ही दिल्लीला गेलो. येथे आल्यावर ‘भारतीय मौसम विभाग’ हा वसंतरावांच्या अखत्यारीत होता. पावसाची अनुमाने अचूक येत नाहीत. सर्वत्र त्याची चर्चा होते, हे वसंतरावांना सहन होत नसे. येथे काम करणारे अधिकारी तज्ज्ञ होते. असे असूनही पावसाचे अंदाज बरोबर का येऊ नयेत, हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्याची परिणती म्हणजे चर्चा, पूर्वीच्या १०० वर्षांतली अनुमाने आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी आणि नव्याने संशोधन. रोज रात्री कामाच्या वेळेनंतर त्या सगळ्याचा अभ्यास होई. शेवटी मंडळींनी पावसाकरिता लागणारे १६ घटक निश्चित केले. त्यावर आधारित एक मॉडेल तयार झाले. त्यानुसार पहिले अनुमान प्रसिद्ध केले. साल होतं १९८८. ते तर अचूक ठरलेच, पण त्यानंतर १३-१४ र्वष त्या मॉडेलनुसार केलेले अनुमान बहुतांशी बरोबर येत गेले. सहकाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे, त्यांच्याबरोबर कामात झोकून द्यायचे हा वसंतरावांचा गुण पुन्हा सिद्ध झाला.
पाहता पाहता १९९३ साल उजाडलं. निवृत्तीची वेळ झाली, पण निवृत्त झाले म्हणून काम संपलं असं आजपर्यंत झालेलं नाही. १९९८ पर्यंत विद्यपीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं. त्यानंतर लगेचच खतांवर विश्वकोश करण्याचं काम हाती घेतलं. आजपर्यंतच्या आणि या कामात एक फरक होता. या कामात मी अधिकृतपणे सहभागी झाले. पाचांपैकी एक लेखिका झाले. मग मात्र आमचा सहवासच सुरू झाला आहे.
गेल्या ४९ वर्षांवर नजर टाकली तर आमचे स्वभावगुण एकमेकांना पूरक होते असं लक्षात येतं. दोघंही रागीट नसल्याचा आम्हाला खूप फायदा झाला. ते वेळ देऊ शकले नाहीत म्हणून त्यांना पर्वा नाही, असं मला कधीच वाटलं नाही. तसंच आम्ही दोघं सोशीक आहोत म्हणून आमच्यात गैरसमज, वादावादी, भांडणं सहसा झाली नाहीत आणि म्हणून सुरुवातीची उमेदीची र्वष सहवासाविना घालवावी लागली तरी आम्ही अवास्तव दु:खी न होता नेहमी पुढे पाहत राहिलो.
(संपादित)