अ. भा. मराठी नाटय़ परिषदेची यंदा होत असलेली निवडणूक आरोप-प्रत्यारोपांच्या भयंकर चिखलफेकीने रंगली आहे. इतकी, की एखाद्या सहकारी साखर कारखान्याची वा पतपेढीचीच ही निवडणूक आहे की काय, असे वाटावे इतके गलिच्छ राजकारण त्यात खेळले जात आहे. ताजी बातमी आहे- मुंबईतल्या पोस्टातून तब्बल अडीच हजार मतपत्रिका गायब झाल्याची! ‘उत्स्फूर्त’ पॅनलचे मोहन जोशी यांचे मित्र असलेल्या पोस्टातील एका अधिकाऱ्याला हाताशी धरून हे कृत्य केले गेले असावे, असा आरोप विनय आपटे यांच्या ‘नटराज’ पॅनलतर्फे करण्यात आला आहे. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांच्याकडेच या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी धाव घेतली आहे. खरोखरच असे घडले असेल तर ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्दबातल ठरवून धर्मादाय आयुक्तांनी नव्याने पारदर्शी पद्धतीने नाटय़ परिषदेची निवडणूक घेण्याची आवश्यकता आहे.
नाटय़ परिषदेच्या सदोष निवडणूक प्रक्रियेचा मुद्दा कायमच चर्चिला जातो. सदोष मतदारयाद्या, अनेकांना मतपत्रिकाच न मिळणे, मतदारांकडून एकगठ्ठा मतपत्रिका गोळा करून निवडणूक जिंकण्याची तजवीज करणे.. अशा असंख्य तक्रारी यासंबंधात केल्या जातात. परंतु एकदा का निवडणूक संपली, की कुणीही त्याबद्दल ब्र काढत नाही. खरे तर नाटय़ परिषदेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी सध्याच्या घटनेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. किंबहुना, त्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्याकडे नवी घटना बनवण्याचे कामही मोहन जोशी परिषदेत पहिल्यांदा निवडून आले तेव्हाच दिले गेले होते. त्यानुसार त्यांनी नवी घटना तयार करूनही दिली. परंतु ही नवी घटना अस्तित्वात आणण्यासाठी ज्या गोष्टी रीतसर आणि वेळेवर व्हायला हव्या होत्या, त्याच (मुद्दाम?) न केल्या गेल्याने ती अद्यापि धूळ खात पडून आहे.
सध्याच्या घटनेतील निवडणूक प्रक्रियेनुसार मतदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर खूण करून ती मतपत्रिका पोस्टाने किंवा हस्ते-परहस्ते नाटय़ परिषद कार्यालयात पाठवावी असा नियम आहे. आणि नेमका त्याचाच गैरफायदा आतापर्यंत नाटय़ परिषदेतील विविध गट-तटांकडून घेतला जात आहे. यंदाच्या निवडणुकीतही हाच फॉम्र्युला सर्वजण अवलंबत आहेत. निरनिराळ्या पॅनल्सचे लोक ‘आपल्या’ मतदारांच्या मतपत्रिका भरून घेऊन माणसे पाठवून त्या गोळा करीत आहेत. जोवर नाटय़ परिषदेच्या घटनेतच मूलगामी बदल करून पारदर्शी निवडणूक प्रक्रियेची तरतूद होत नाही तोवर हे असेच चालू राहणार.
‘अखिल भारतीय’ स्तरावरील या निवडणुकीत फक्त मुंबई विभागातील १६ जागांसाठी (कधी नव्हे इतक्या!) तब्बल ६४ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. पैकी सहाजणांनी नंतर माघार घेतली. त्यामुळे आता ५८ जण आखाडय़ात उरले आहेत. नाटय़ परिषद काबीज करण्यासाठी चार पॅनल्स (एक अर्धवट पॅनल!) दंड थोपटून एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. मोहन जोशी, विनय आपटे आणि प्रमोद पवार त्यांचं नेतृत्व करत आहेत. ‘नाटय़सेवा’ करण्यासाठी इतक्या मोठय़ा संख्येने लोक उत्सुक आहेत, ही खचितच आनंदाची बाब आहे. परंतु यानिमित्ताने राजकारण्यांप्रमाणे परस्परांचे कपडे काढण्याची जी स्पर्धा रंगली आहे ती कलाक्षेत्राला नक्कीच भूषणावह नाही. अर्थात त्याची सुरुवात मोहन जोशी यांनीच प्रथम केली. त्यांनी जाऊ तिथे विद्यमान नाटय़ परिषदेतील कारभार आणि कारभाऱ्यांबाबत खऱ्या-खोटय़ा आरोपांची एकच राळ उडवून दिली. परंतु आपणही आठ वर्षे नाटय़ परिषदेचा कारभार सांभाळला आहे; आणि त्यावेळी आपण कशा प्रकारे मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार केला; ज्यांनी नाटय़ परिषदेत आपल्याला निवडून आणण्याकामी महत्त्वाची भूमिका निभावली, त्या दामू केंकरे यांच्यासारख्या सभ्य, सुसंस्कृत नाटय़तपस्व्याचीच आपण कशी मानखंडना केली, हे ते आज साफ विसरलेले दिसतात. एवढंच नव्हे तर ज्या ‘सार्वजनिक पराक्रमा’मुळे नामुष्की होऊन परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांना जावे लागले ते तर त्यांच्या पार स्मृतीतूनच पुसले गेलेले दिसते. गेली पाच वर्षे नाटय़ परिषदेचा कारभार घटनाबाह्य़ पद्धतीने सुरू असल्याचा जो ठपका धर्मादाय आयुक्तांनी ठेवला आहे, त्याला मोहन जोशी यांनीच परिषदेच्या घटनेची पायमल्ली करून आपल्या कार्यकालाला घेतलेली बेकायदा मुदतवाढ कारणीभूत आहे. परंतु याचा दोषारोप आता ते परिषदेच्या विद्यमान धुरिणांवर करू बघताहेत. मोहन जोशी यांच्या कार्यकालात त्यांची तळी उचलून धरणारे प्रमोद पवार आज त्यांच्या आणि नाटय़ परिषदेच्या धुरिणांच्या विरोधात नानाविध आरोप करत आहेत. प्रमोद पवार यांच्यावरही निर्माता संघाचे दिलीप जाधव यांनी, विश्व नाटय़संमेलनाला गेलेल्या प्रतिनिधींना वाटण्यात आलेल्या बॅगांसंदर्भात अस्तित्वातच नसलेल्या दुकानाचे खोटे बिल सादर केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. या पाश्र्वभूमीवर मोहन जोशी यांच्या ‘त्या’ सार्वजनिक पराक्रमासंबंधातील चौकशी अहवाल जाहीर न केल्याबद्दल जोशी जे आकांडतांडव करीत आहेत, त्यासंदर्भात एक-सदस्यीय चौकशी समितीचे हेमंत टकले यांनी केलेला खुलासा सुसंस्कृतपणाचा दाखला देणारा आहे. ‘एका कलावंताच्या चारित्र्यावर पुन:पुन्हा शिंतोडे उडू नये म्हणूनच केवळ आपण हा अहवाल प्रसारमाध्यमांकडे जाहीर केला नाही,’ असे ते म्हणतात.
नाटय़ परिषदेच्या या निवडणुकीत स्वत:ला संवेदनशील कलावंत म्हणवणाऱ्यांचे पाय कसे मातीचेच आहेत हे सिद्ध झाले आहे. परिषदेचे विद्यमान अध्यक्ष हेमंत टकले हे राजकारणी असूनही त्यांनी मोहन जोशी प्रकरणात चौकशी अहवाल जगजाहीर न करण्याच्या घेतलेल्या निर्णयातून त्यांनी सुसंस्कृततेचे उदाहरण त्यांच्यासमोर ठेवले आहे. कलाक्षेत्राचे नेतृत्व त्या क्षेत्रातील व्यक्तींनीच करायला हवे, यासाठी आपण यावेळी नाटय़ परिषदेची निवडणूक लढवीत नसल्याचे टकले यांनी स्पष्ट केले आहे.
नाटय़ परिषदेच्या गेल्या तीसेक वर्षांतील अध्यक्षांच्या कारभाराचा पंचनामा करायचा झाला तर परिषदेतील सडक्या राजकारणाने ती कशी पोखरली गेली आहे याचेच विषण्ण करणारे चित्र पाहायला मिळते. त्याचा इथे ऊहापोह करायचा झाला तर एक बृहद् ग्रंथच लिहावा लागेल. असो.
असे असले तरीही ही निवडणूक एका अर्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नाटय़ परिषद ही समस्त रंगप्रवाहांची मातृसंस्था आहे असे जरी तोंडदेखले म्हटले जात असले तरीही ती तशी नाही, हे वास्तव आहे. ती केवळ व्यावसायिक नाटय़धारेचे प्रतिनिधित्व करते. नाटय़ परिषदेने हौशी, प्रायोगिक, समांतर, बालरंगभूमी, दलित-शोषितांची रंगभूमी अशा सर्वच नाटय़प्रवाहांना आपल्यात सामावून घेत त्यांच्यासाठी मूलभूत कार्य करावे, अशी दामू केंकरे यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मोहन जोशी यांच्याकडे सातत्याने आग्रहही धरला. परंतु मोहन जोशींनी त्यांना कायम वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यातूनच नाटय़ परिषदेच्या या कार्यशैलीविरोधात संताप उभाळून नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रखर आंदोलन करण्यात आले. मोहन जोशी यांना रंगभूमी, तिचे विविध प्रवाह, त्यासाठी नाटय़ परिषदेने कोणत्या प्रकारचे मूलगामी कार्य करणे अपेक्षित आहे, याबद्दल ना कधी आस्था होती, ना ती समज होती! द्रष्टेपण (व्हिजन) तर राहिलेच बाजूला! आणि कुणी त्यांना ते समजावू गेले तरी ते समजून घेण्याची गरज त्यांनी कधीच वाटली नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत मोहन जोशी परिषदेतून पायउतार झाल्यापासून हेमंत टकले-विनय आपटे यांनी विविध रंगप्रवाहांना परिषदेच्या परिघात आणण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू केले. गेल्या दोन नाटय़संमेलनांतून समांतर धारेतील रंगकर्मीना आदरपूर्वक दिले गेलेले स्थान हे त्याचेच फलित आहे.
अर्थात ही केवळ सुरुवात आहे. अजून बऱ्याच गोष्टी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी या निवडणुकीत आपल्या पॅनलमध्ये विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, राजन भिसे अशा मंडळींना आवर्जून समाविष्ट केले आहे. ज्यांची मुळे प्रायोगिक-समांतर रंगभूमीत आहेत! ज्यांना रंगभूमीच्या विविध प्रवाहांची जाण आहे, त्यांच्यासाठी काय करायला हवे याबद्दलचे भान आहे. त्याबाबतची एक वैचारिक बैठक त्यांच्यापाशी आहे. ही मंडळी नाटय़ परिषदेत सक्रीय झाली तर कदाचित उद्याच्या मराठी रंगभूमीचे चित्र काही वेगळे झालेले पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मोहन जोशी यांच्या पॅनलमधील राहुल भंडारे, प्रसाद कांबळी यांच्यासारखे तरुण निर्मातेही नाटय़ परिषदेत काही नवे  घडवून आणण्यासाठी योगदान देऊ शकतात. म्हणूनच ही निवडणूक कधी नव्हे इतकी महत्त्वाची आहे. नाटय़ परिषद पुढे जाणार की मागे, हे तीत ठरणार आहे.

Story img Loader