येत्या ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारीला पंढरपुरात होणाऱ्या ९४ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाच्या निमित्ताने रंगभूमीच्या सद्य:स्थितीची झाडाझडती घेणारा लेख.
नाटक हे जीवनाचं चित्र असेल आणि आजच्या वेगाने बदलणाऱ्या माणसाच्या जगण्याचं चित्रण मराठी नाटकांतून येणार नसेल तर ते नाटक लोकांना आपलंसं वाटणार कसं? उद्याचं नाटक कसं असेल? या प्रश्नाचं उत्तरही उद्याचा समाज, उद्याचे राजकारण, उद्याची परिस्थिती कशी असेल, यावरच अवलंबून असेल. नाटक काय किंवा अन्य कला काय, समाजापासून अशा वेगळय़ा काढताच येणार नाहीत. आजच्या किती नाटकांतून आजचं जीवन प्रकट होतं?
वृत्तपत्रांच्या जाहिरातींतून नाटकांना उधाण आल्यासारखं वाटतंय. मराठी चित्रपटाच्या जाहिरातीही त्यांच्याशी स्पर्धा करीत आहेत. दर चॅनली दोन-चार मालिका एपिसोडांची दळणं दळत बसल्या आहेत. या सगळय़ांच्या माऱ्यात नाटकाला टिकायचं असेल तर ते कुठल्याही जादूने किंवा मोठमोठय़ा जाहिरातींनी टिकणार नाही.
आजचे व्यावसायिक निर्माते चांगल्या संहिता नाहीत म्हणून नेहमीच रडगाणे गातात. हा आरडाओरडा करणारे निर्माते त्यासाठी स्वत: कसला प्रयत्न करताहेत? कंपन्या आपली निर्मिती अधिकाधिक गुणवान होण्यासाठी स्वत:चे खास संशोधन विभाग उभे करतात. तिथे वेगवेगळे संशोधन केले जाते आणि त्यातून मग उत्कृष्ट निर्मितीची पैदास होते. आमच्या नाटय़निर्मात्यांना बुकिंगचे आकडे बघण्याशिवाय, मोठमोठय़ा जाहिराती देण्याशिवाय दुसरे काही करता येत नसेल तर त्यांना संहिता चांगल्या मिळत नाहीत, अशी ओरड करण्याचा मुळी अधिकारच नाही. चांगल्या संहिता मिळत नसतात; त्या मिळवाव्या लागतात.
आज रंगमंचावर ‘छापाकाटा’ हे नाटक उत्तम प्रतिसाद मिळवतंय. याचं कारण त्याची लेखिका इरावती कर्णिक हिची नाटय़तंत्रावर असलेली जबरदस्त हुकूमत आहे. आणि ही तिने प्राप्त केलीय ती नाटय़लेखनाच्या दीर्घ मुदतीच्या कार्यशाळांचा अभ्यासक्रम पार पाडून!
आज सर्वाधिक गरज उत्तम नाटककाराची आहे. कालच्या वा आजच्या पिढीतले मान्यवर, गुणवंत नाटककार हे पं. सत्यदेव दुबे, सतीश आळेकर यांच्या कार्यशाळांनी दिलेले आहेत हे विसरून चालणार नाही. वामन केंद्रे आणि शफाअत खान यांनी अलीकडेच नाटय़लेखनाची चार दिवसांची एक कार्यशाळा विद्यापीठ स्तरावर आयोजित केली होती. पण हे सर्वजण लिहिण्याचा अनुभव असलेले नाटककार होते. म्हणूनच ते आठवडा-दोन आठवडय़ांच्या कार्यशाळेने नाटकाचं तंत्र आत्मसात करू शकले. त्या कार्यशाळा या पदव्युत्तर होण्यासाठी होत्या. आज नाटय़लेखनातली पदवी प्राप्त करण्यासाठी त्या व्हायला हव्या. आज मुंबई-पुण्याबाहेरचे अनेकजण नाटककार होऊ इच्छितात. त्यांच्याकडे चांगले विषय आहेत, कल्पना आहेत. पण त्या प्रभावी नाटकाच्या स्वरूपात कशा मांडाव्यात, याचं शिक्षणच त्यांना उपलब्ध नाही. त्यामुळे चांगली नाटकं जन्मापूर्वीच गतप्राण होतात.
केवळ संमेलने भरवण्याऐवजी नाटय़ परिषदेने किंवा नाटय़निर्माता संघाने ही जी व्यवसायाची, रंगभूमीची प्राथमिक गरज आहे, ती पुरी कशी करता येईल यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. नाटय़शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांतून आता नाटय़लेखनावरची चार-दोन व्याखाने देऊन भागणार नाही, तर नाटय़लेखनाचा पूर्ण वर्षांचा अभ्यासक्रम योजणे आवश्यक आहे.
पूर्वी सशक्त नाटकं यायची त्याचं आणखी एक कारण- तेव्हा नाटकं करणाऱ्या संस्था होत्या; निर्माते नव्हते. त्या संस्थांचं मंडळ होतं. त्यांच्यासमोर नाटकाचं वाचन होऊन, त्यावर चर्चा होऊन मगच नाटक निवडलं जायचं. आज नाटकांचंही व्यापारीकरण झालं आहे. निर्माता एकटाच नाटक कुठचं करायचं ते ठरवतो. आता निर्मात्यांच्या नाटय़जाणकारीबद्दल म्या पामरे अधिक काय बोलावे?
जे चित्रपटात दाखवता येणार नाही आणि जे दूरदर्शनवर पाहता येणार असं काहीतरी नाटकानं देणं आवश्यक आहे. ‘नाटकाचा चित्रपट करू नका,’ असं पूर्वी बोललं जायचं. आज ‘नाटकाच्या दूरदर्शन मालिका करू नका,’ असं सांगायची पाळी आली आहे. नाटकाचे ‘दूरदर्शन’ झाले आणि ‘फू बाई फू’ झाले तर प्रेक्षक नाटक बघायला अनेक अडचणी पार करून कशाला येतील? आज ते येताहेत याचं कारण त्यांचं नाटकावरचं प्रेम हे आहे. फार काळ त्याच्याही सहनशक्तीचा अंत पाहता येणार नाही, हे नाटय़निर्मात्यांनी लक्षात घ्यायला हवं.
आजचं काय किंवा उद्याचं काय, नाटक नॉन-रिअॅलिस्टिक झालं तरच ते प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवू शकेल. ‘नांदी’ किंवा ‘अवघा रंग एकचि झाला’ ही संगीत नाटकं, ‘चार दिवस प्रेमाचे’ किंवा संतोष पवारांची नाटकं, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘घाशीराम कोतवाल’ ही सगळी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवणारी नाटकं बिनवास्तववादी होती. वास्तववादी नाटकं म्हणजे एपिसोडिक नाटकं नव्हेत. पात्रांच्या मानसिकतेचा वेध घेणारी वास्तववादी नाटकंच यशस्वी होतात.
प्रायोगिक रंगभूमी ही सकस रंगभूमीची जननी आहे. मुंबई हे मराठी रंगभूमीचं मुख्य केंद्र आहे. आणि या मुंबईत नाटय़ परिषदेला स्वतंत्र वास्तू असूनही इतकी वर्षे उलटली तरी प्रायोगिक रंगभूमीसाठी एक साधे छोटे नाटय़गृह त्यांना बांधता आलेले नाही. पुण्यात प्रायोगिक रंगमंचासाठी तीन-चार छोटी, सुसज्ज नाटय़गृहे उपलब्ध आहेत आणि त्या सर्वातून प्रायोगिक नाटके सातत्यानं प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत असतात. प्रायोगिक रंगमंचासाठी मराठी रंगभूमीचे भीष्माचार्य दामू केंकरे यांनी निकराचा लढा देऊनही नाटय़ परिषदेला ते उभे करता येऊ नये, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
प्रेक्षकांच्या जगण्याचा वेग आज बदलला आहे. सुखकर प्रवास दुर्लभ झाला आहे. वाहतुकीचे अडथळे पार करून नाटय़गृहावर वेळेवर पोहोचणं कठीण झालं आहे. तरुणवर्गाच्या कामाच्या वेळा पूर्वीसारख्या सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशा राहिलेल्या नाहीत. त्या अगदी रात्री १२-१ वाजेपर्यंतच्या झाल्या आहेत. असे सर्व अडथळे पार करून प्रेक्षक नाटय़गृहात ३०० किंवा ४०० रुपयांचं तिकीट काढून येतो तेव्हा त्याच्या मोबदल्यात आपण त्यांना किती सुमार करमणूक देतो, याचा विचार निर्मात्यांनी करायला हवा. सतत नाटय़गृहांच्या भाडय़ाच्या, विजेच्या वाढलेल्या दरांच्या, अनुदानाबद्दलच्या तक्रारी शासनाकडे करण्यापूर्वी रंगभूमीच्या विकासासाठी आपण काय करतो आहोत याचा आत्मशोध निर्मात्यांनी आधी घ्यायला हवा. नाटय़गृहाच्या तारखा दामदुपटीनं मिळवणं आणि प्रयोग लावणं हेच जर त्यांचं एकमेव उद्दिष्ट असेल तर त्यांना रंगभूमीबद्दल बोलायचा काहीही अधिकार नाही. अखेर नाटक हा व्यवसाय असला तरी तो बाजार नव्हे, धंदा नव्हे. तो एक सांस्कृतिक व्यवहार आहे. एवढे जरी येत्या नाटय़संमेलनाच्या निमित्ताने नाटय़निर्मात्यांना कळलं तरी संमेलन सफल झालं असं म्हणता येईल. मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी जाणकार नाटय़समीक्षकांचीही नितांत आवश्यकता असते. आज त्यांचीही वानवा आहे. प्रयोगसंख्या, बुकिंग आणि जाहिराती या गोष्टींव्यतिरिक्त नाटय़निर्माते रंगभूमीच्या प्रगतीसाठी कधी काही करतील काय?
नाटय़निर्मात्यांनो, तुम्ही काय करीत आहात?
येत्या ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारीला पंढरपुरात होणाऱ्या ९४ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाच्या निमित्ताने रंगभूमीच्या सद्य:स्थितीची झाडाझडती घेणारा लेख.
First published on: 26-01-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dramatist what you are doing