ड्रोन या साधनाचा वापर आता व्यावसायिक कारणांसाठीही मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून, यात कृषी क्षेत्रही आघाडीवर आहे. राज्यात ड्रोनद्वारे पिकांवर औषध, कीटकनाशके फवारणीचा व्यवसाय वेगाने विस्तारत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी युवक-युवती आणि काही खासगी कंपन्या ड्रोनद्वारे फवारणीची सेवा देण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
राज्यात ड्रोनद्वारे पिकावर औषध, कीटकनाशके फवारणीचा व्यवसाय वेगाने विस्तारत आहे. कृषी क्षेत्रात वापरले जाणारे ड्रोन हे प्रशिक्षण, परवाना आणि विमा या सर्वांचा विचार केल्यास सात ते १० लाखांच्या घरात जाते. अल्प वा मध्यम भूधारक शेतकऱ्यास या एकाच गोष्टीसाठी एवढी गुंतवणूक शक्य नसते. हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी युवक-युवती, शेतकरी उत्पादक आणि काही खासगी कंपन्याही ड्रोनद्वारे फवारणीची सेवा देण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
ग्रामीण भागात ड्रोनद्वारे औषधफवारणी ही काही आता अप्रूप वाटण्यासाऱखी गोष्ट राहिलेली नाही. नाशिक, अहिल्यानगर असो, की छत्रपती संभाजीनगर; औषध फवारणीसाठी सर्वत्र त्यांचा वापर वाढत आहे. अलीकडेच नाशिकमध्ये कृषिथॉन हे कृषी प्रदर्शन पार पडले. या ठिकाणी ड्रोन कंपन्यांच्या कक्षात शेतकऱ्यांची उसळलेली गर्दी त्यांची उत्सुकता दर्शवत होती. शेतीकामात वापरल्या जाणाऱ्या ड्रोनच्या किमती सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे कृषी ड्रोनचे पहिले खरेदीदार हे प्रामुख्याने फवारणीची सेवा देण्याच्या व्यवसायात उतरणारे आहेत. यात ग्रामीण भागातील सुशिक्षित शेतकरी युवक-युवती, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. या व्यवसायातील संधी संबंधितांच्या लक्षात आली आहे. महाराष्ट्र कृषी उद्याोग विकास महामंडळानेही विभागवार फवारणी सेवा देणाऱ्या संस्थांची नियुक्ती करत संपूर्ण राज्यात सवलतीच्या दरात कृषी फवारणी ड्रोनची सुविधा उपलब्ध केली आहे.
हेही वाचा >>> लोकशिवार : फायदेशीर सीताफळ
शेतीकामात मजुरांची टंचाई हा वर्षभर भेडसावणारा प्रश्न. मजूर मिळाले, तर फवारणीस वेळ लागतो. कीटकनाशक, औषध फवारणीवेळी थेट संपर्कात आल्याचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. हे प्रश्न ड्रोनद्वारे निकाली निघतात. मजुरीवर जितका खर्च होतो, त्यापेक्षा निम्म्या खर्चात ड्रोनद्वारे औषध फवारणी होते, याकडे आयोटेकवर्ल्ड एव्हिएशनचे निरज साळुंके लक्ष वेधतात. एक एकर क्षेत्रात फवारणीसाठी मजुरांना एक ते दीड तास लागतो. ते काम ड्रोन १० मिनिटांत करते. ऊस, सोयाबीन, धान अशा पिकांत पाणी भरलेले असते. मका, ऊस अशी काही पिके कापणीपर्यंत डोक्यापेक्षा उंच होतात. या ठिकाणी साप, बिबट्याच्या भीतीचे सावट असते. फवारणी करता येत नाही. ड्रोनमुळे हे प्रश्नच उद्भवत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ड्रोन फवारणीत पिकाला औषध, कीटकनाशकाची आवश्यक तेवढी मात्रा फवारली जाते. अपव्यय टळतो. महागड्या औषधांपेक्षा स्वस्तातील औषध फवारणीचे निकालही चांगले असल्याने शेतकरी वर्गात विश्वासार्हता वाढत आहे. ड्रोनद्वारे औषध फवारणीसाठी राज्यात साधारणत: ५०० ते ८०० रुपये प्रतिएकर दर आकारले जातात. शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी असल्याने व्यावसायिकांना चांगला परतावा मिळत आहे.
केंद्र सरकारच्या ड्रोन दीदी योजनेत राज्याला एकूण ४० ड्रोन मिळाले. यातील एक नाशिकच्या निफाड येथील किसान हेल्प शेतकरी उत्पादक कंपनीचा आहे. आतापर्यंत या कंपनीने सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे औषध फवारणी केल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू मोरे सांगतात. हंगामात ड्रोनद्वारे फवारणीसाठी इतकी मागणी होती, की शेतकऱ्यांना सात ते आठ दिवस प्रतीक्षा करावी लागली. कंपनीत ड्रोन वैमानिक म्हणून दीपाली मोरे जबाबदारी सांभाळतात. कंपनीचे ड्रोन महिनाभर वैजापूर येथे तुरीच्या शेतात कार्यरत होते. एरवी जे औषध २०० लिटर पाण्यात मिसळून फवारले जाते, ते ड्रोनद्वारे केवळ १० लिटर पाण्यात मिसळले जाते. त्यामुळे अधिक प्रभावी ठरते. ड्रोन दीदींना महिन्याकाठी ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. इफ्कोच्या माध्यमातून मिळालेल्या ड्रोनमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागल्याचे दीपाली मोरे यांनी नमूद केले.
बाभळेश्वर (कोटमगावलगत) येथील भाऊसाहेब टिळे यांचाही तसाच अनुभव आहे. त्यांच्या दोन एकर क्षेत्रातील मक्याला अळी लागली होती. डोक्यापर्यंत मका वाढला होता. फवारणी शक्य नव्हती. ड्रोनद्वारे फवारणी केल्यावर आसपासचे शेतकरी जमा झाले. त्यांनी आपापल्या शेतात फवारणी करून घेतली. फवारणीच्या दुसऱ्याच दिवशी टिळे यांच्या मक्यावर एकही अळी राहिली नव्हती. ड्रोनच्या फवारणीमुळे त्यांचे पीक वाचले. मका विकल्यानंतर ते पेढे घेऊन ड्रोनधारकांकडे गेले होते. सध्या तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला असून, संबंधितांकडून फवारणीची मागणी वाढली आहे. श्रीगोंदा तालुक्यात कृषी उद्याोग विकास महामंडळाने १०० एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी केल्याचे महामंडळाचे अधिकारी राहुल पवळे यांनी म्हटले आहे.
नाशिकसह सर्व जिल्ह्यांत ड्रोनची संख्या वाढत आहे. नाशिकमध्ये एकाच कंपनीचे आठ ड्रोन प्रतीक्षा यादीवर आहेत. ड्रोन खरेदी करणाऱ्यांना ते चालविण्यासाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन वैमानिकाचा परवाना मिळतो. एक ड्रोन दिवसाला अधिकतम ४० एकरवर फवारणी करू शकते. काही अद्यायावत, पण महागडे ड्रोन क्षेत्राचा नकाशा आखून दिला, की स्वत: मार्ग निश्चित करून फवारणी करतो. औषध संपल्यानंतर पुन्हा खाली उतरतो. ते भरून दिल्यावर जिथे फवारणी थांबली होती, तिथून नव्याने काम सुरू करतो. ड्रोन फवारणी व्यवसायात तरुण शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. अनेक भागांत बारमाही पीक घेतले जाते. ड्रोनमुळे वेळ, पैसे व औषधांची बचत होऊन शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतात. अवघड क्षेत्रावर फवारणी करता येते. शिवाय एकसमान फवारणी होते. शेतीमालाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने ड्रोनद्वारे फवारणीकडे शेतकरी आकृष्ट होत आहेत. सध्या पिकांखालील क्षेत्राच्या तुलनेत ड्रोनची संख्या अत्यल्प आहे. सर्व शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणे अशक्य होते. गावोगावी जेव्हा एक-दोन ड्रोन होतील, तेव्हा सध्याचे फवारणीचे दर निश्चितपणे कमी होतील, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
sathe.aniket@gmail.com