|| दीपक नागरगोजे

मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती यंदा अधिकच भीषण राहणार असून त्याचे दूरगामी परिणाम शहरांनाही भोगावे लागणार आहेत. म्हणून आताच शहरी आणि ग्रामीण नागरिक, सरकार, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक प्रश्नांवर उत्तर असणारे पाणी या विषयावर व्यापक काम करण्याची गरज आहे.

मराठवाडय़ातील या वर्षीचा दुष्काळ अधिक तीव्र आहे. गेल्या काही वर्षांत पडलेल्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ अधिक सहन करायला लावणारा असून अन्न, पाणी, आरोग्य, आर्थिक, स्थलांतर, रोजगार अशा सर्वच बाबतीत जनजीवनावर गंभीर परिणाम करणारा आहे. दुष्काळाची दाहकता बघण्यासाठी बालाघाटात फेरफटका मारत होतो. डोंगराच्या कपारीत लपलेल्या हटकरवाडीत शिरलो. वाळून गेलेल्या खुरटय़ा गवताने भकास झालेले डोंगरमाथे, ओसाड माळरानाची उजाड शेते, अजिबातच पाऊस नसल्याचे चित्र स्पष्ट करीत होती. भग्न अवस्थेत असलेली किती तरी दिवसांपूर्वी बांधलेली दगड-मातीची पत्र्याचे छत असलेली घरे प्रचंड दारिद्रय़ाची आणि स्थलांतराची साक्ष देत होती. गावात माणसेच दिसत नव्हती. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक घरातली कर्ते पुरुष आणि महिला ऊसतोडणीसाठी गेलेल्या. विचारायला आणि बोलायला माणूस दिसेना. तेव्हा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो. चौथीपर्यंतच्या शाळेत फक्त २७ विद्यार्थी. तेही तेथील शिक्षकांनी आणि शांतिवनच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले म्हणून गावात राहिलेले. पोरांना गप्पा मारण्यासाठी शाळेच्या खोलीसमोर असलेल्या पत्र्याच्या पडवीत बोलावले. प्रत्येकाची खुशाली विचारू लागलो. अपवाद वगळता जवळजवळ सर्वच मुलांचे आई-वडील ऊसतोडणीसाठी गावापासून शेकडो मैल गेलेले. ‘परत कधी येतील?’ या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नव्हते. ‘आईवडिलांची आठवण येते का?’ विचारले तर सगळ्यांचे चेहरे बारीक झाले. तुम्ही कुणाकडे राहता.. तर कुणी आजीचे, कुणी आजोबांचे, कुणी इतर नातेवाईकांचे नाव सांगत होते. जेवण कसे करता.. कोण बनवते.. यावर या लेकरांनी दिलेली उत्तरे शून्यात घेऊन जाणारी होती. चौथीच्या वर्गात शिकणारी राधिका स्वत: हाताने स्वयंपाक तर करीतच होती, पण त्याबरोबर ती तिचा छोटा भाऊ  आणि नव्वद वर्षांच्या आजोबांनाही खाऊ  घालत होती. गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. गाव डोंगरात असल्याने तीव्र उताराचा रस्ता. यामुळे टँकर गावात येत नाही. घागरभर पाण्यासाठी ती आणि तिचा भाऊ  दूर एक किलोमीटर शेतात रोज पायपीट करतात. सरपण आणण्यासाठी डोंगर फिरतात. ही गोष्टच अवाक करणारी. त्या चिमुरडीने दिलेली माहिती मला नवीन काही नव्हती. कारण बालाघाटातील अनेक लेकरांच्या या कथा गेल्या वीस वर्षांपासून पाहिलेल्या आहेत; पण इवल्याशा लेकरावर ती कष्ट उपसण्याची आलेली वेळ म्हणजे आपल्या देशातील बालहक्क किती असुरक्षित आहेत याचे वास्तव दर्शविणारी आहे. ते कष्ट उपसण्याची त्या इवल्याशा लेकराची तयारी हे अगदी बालवयातच अवेळी त्याच्यावर लादलेले प्रौढत्व होय. शाळेत असलेल्या कुठल्याही लेकराच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा दिसत नव्हता. कुपोषित अल्पवयीन आईच्या पोटात राहिल्यापासूनच त्याचे झालेले कुपोषण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. रोज भाजी काय खाता? तर बटाटे किंवा पिठले आणि बाजरीची भाकरी यापेक्षा दुसरे एकही उत्तर एकाही लेकराकडून आले नाही. किती तरी मुले आईवडिलांनी शाळा बुडवून कारखान्यावर सोबत नेली होती. शाळेतील लेकरांच्या व्यथा ऐकून गावातील घराघरांत जाऊ  लागलो. एका घरात खाटेवर पडलेला माणूस दिसला. जेमतेम चाळीस वर्षे वय असेल. आजारी आहेत का? काय झाले? विचारले तर, ‘ऊसतोड करण्यासाठी कारखान्यावर गेलो होतो. उसाने भरलेली बैलगाडी उताराला लागली. बैल आखडले गेले नाहीत. वेगामुळे मी पुढे पडलो. बैलगाडी अंगावरून गेली. गाडीच्या टायरने कमरेचा चुरा झाला. कायम अपंगत्व आलंय. काम तर गेलंच, पण माझी शुश्रूषा करण्यासाठी एक माणूस कायम जवळ ठेवावं लागतंय. दवाखान्यात तीन लाख रुपये सावकाराकडून व्याजाने काढून खर्च केला. कारखाना आणि मुकादमाने वर हात केले. त्यांनी काहीच मदत नाही केली. कुटुंबाची उपासमार होऊ  लागली. सावकाराचा तगादा सुरू झाला. वैतागून बायको एकटय़ाला सोडून गेली. आता आत्या आहे ही. ती करतेय माझं..!’ त्याची ही कथा ऐकून मन सुन्न झाले.

बाहेरील एका पडीक वाडय़ात गेलो तर शरीर जीर्ण झालेल्या अवस्थेतील आज्जी दिसली. साधारणत: नव्वदी पार केली असेल. आज्जी हाताने स्वयंपाक करीत मिळेल ते खात होती. इतक्या दूरवरून पाणी आणण्याची तिची शारीरिक क्षमता नव्हती. कुणाकडून तरी घागरभर पाणी मिळाले तर ते पुढे मिळेपर्यंत पुरवून पुरवून वापरायचे हे तिचे चालू होते. मुलगा-सून ऊसतोडणीला गेलेले असल्याने एकटी राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. आजीला विचारले तर ती म्हणाली, ‘गावातील म्हातारी माणसं अशीच जगतात. धडधाकट माणसं गावातच आमच्याजवळ राहिली तर काय खातील? पोराबाळांना काय खाऊ  घालतील? त्यांना ऊसतोडणीसाठी जावावंच लागलं!’ आजीने सांगितलेले हे उत्तर गावात भेटलेल्या इतर वृद्ध मंडळींनीही सांगितले. कधी कधी तर म्हातारी माणसे अन्न-पाण्यावाचून मरून पडलेलीही लवकर लक्षात येत नाही..! त्यांचे हे सांगणे आपल्या अंगावर शहारे आणणारे जरी असले तरी त्यांना याचे काहीच नवल वाटत नव्हते. पिढय़ान्पिढय़ा हे असेच जगण्याची त्यांना सवय झालेली. कुणाकडे ना तक्रार, ना फिर्याद..

दोन-चार वृद्ध मंडळींशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, आता हंगामी स्थलांतर करण्यापेक्षा लोक कायम स्थलांतर करण्याकडे वळू लागले आहेत. वर्षांतील सात ते आठ महिने दूरदेशी राहायचे आणि केवळ गाव आहे म्हणून चार महिन्यांसाठी गावात राहायला यायचे यापेक्षा एखाद्या मोठय़ा शहराचा आसरा घेऊ न मिळेल ते काम करीत त्याच शहरात राहायचे याकडे लोकांचा कल जास्त प्रमाणात जाऊ  लागला आहे. सतत पडणारा दुष्काळ, शेती पेरण्यासाठी होणारे बियाणे, खते, मजुरी यांचे वाढते खर्च, बेभरवशाचा पाऊस आणि त्यातून येणारी नापिकी ही आपल्या शेतीची परिस्थिती. अशी शेती करणे म्हणजे इच्छा नसतानाही आत्महत्येचा मार्ग धरणेच होय. यामुळे गावात रोजगार मिळत नाही. उपासमार होते. ऊसतोडणीसाठी जावे लागते. पोराबाळांचे शिक्षण होत नाही. त्यांनाही बरोबर घेऊन जावे लागते. लहान वयातच इच्छा नसतानाही पोरींची लग्ने करून द्यावी लागतात. ‘कमी वयात लग्न करता येत नाही असा सरकार कायदा सांगतं, पण त्यावर पर्याय सांगत नाही. मोठी होणारी पोरं आई-बापाने सांभाळायची कशी.. ऊसतोडणीसाठी जाताना गावात ठेवायची ती कुणाच्या भरवशावर आणि सोबत घेऊन गेल्यावर तेथील मुकादम, टोळीतील लोक, बागायतदार, कारखाना कर्मचारी त्यांची पोरं यांच्या वाईट नजरेतून वाचवायची कशी..? आम्ही लेकरांना सुरक्षित राहण्याच्या आणि दर्जेदार शिक्षणाच्या व्यवस्था मागतो ते तर सरकार देत नाही आणि वर कायदा दाखवतं. अशाने प्रश्न सुटतात का..? यापेक्षा या भागात राहणंच नको. काय आहे इथं तरी. शेती तर सोडा, साधे प्यायला पाणी मिळत नाही. लेकरांची शिक्षणं होत नाहीत.’ आपल्या पिढय़ान्पिढय़ा जे भोगीत आल्या ते आपल्या पुढील पिढीने तरी भोगू नये यासाठी कायम स्थलांतर हा मार्ग कित्येक कुटुंबे स्वीकारू लागली आहेत, हाच या वृद्धांच्या चर्चेतील एकूण सूर होता.

हाटकरवाडी येथील परिस्थिती ही बालाघाटातील प्रत्येक गावातील परिस्थितीचे चित्र स्पष्ट करते. पूर्वी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने जे गाव सोडून गेले ते पुन्हा गावात फिरकले नाहीत; पण आता झपाटय़ाने बदलणारे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण आणि दर दोन-तीन वर्षांनी पडणारा दुष्काळ यामुळे येथील जनजीवनावर विपरीत परिणाम झाले आहेत. उपासमार टाळण्यासाठी होणाऱ्या हंगामी स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाची वाट लागली, कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू वाढले, अल्पवयीन लग्न, लैंगिक, आर्थिक शोषण, हिंसाचार, महिलांचे आरोग्य, सकस आहार आणि सुरक्षितता असे किती तरी प्रश्न आ वासून उभे राहिले. या गंभीर प्रश्नांना टाळण्यासाठी आता कायम स्थलांतर हा मार्ग लोक शोधत आहेत. यामुळे स्थलांतर करणाऱ्या लोकांचे प्रश्न सुटतील, मात्र येथील शेती आणि इतर नैसर्गिक साधनांची वाट लागून गावे मात्र ओस पडतील हे नक्की. दुसरीकडे इतकी मोठी शेती पडीक टाकून शहराकडे जाणारे हे तांडे शहराला तरी पोटात घेता येतील का? अगोदरच बकाल होत चाललेली शहरे या वाढीव लोकसंख्येच्या ताणामुळे स्वत:ला सावरू शकतील का? शहरात येणारे हे मनुष्यबळ अशिक्षित आहे. त्यांची पुढची पिढी शिकून तयार होईपर्यंत तरी अधिक बुद्धीची कामे ते करू शकणार नाहीत. म्हणजे पुन्हा व्यवस्थेवरील ताण वाढणार आणि पुन्हा नवीन प्रश्न उभे राहणार. म्हणजेच प्रश्न बालाघाटातील खेडय़ांशी संबंधित असला तरी त्याचे दूरगामी परिणाम शहरांनाही भोगावे लागणार आहेत. म्हणून आत्ताच शहरी आणि ग्रामीण नागरिक, सरकार, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक प्रश्नांवर उत्तर असणारे पाणी या विषयावर व्यापक काम करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या प्रयोगांतून पाणी साठवणे आणि त्याचा सिंचनासाठी उपयोग केल्यानंतर दुष्काळी परिस्थितीवर नक्की मात करता येईल. ज्यामुळे शेती सुधारेल, आर्थिक सुबत्ता येईल. लोकांचे सर्व प्रकारचे स्थलांतर रोखता येईल, मग सर्व प्रश्न सुटतील. प्रातिनिधिक स्वरूपात शांतिवनने लोकसहभागातून काही गावे दत्तक घेऊन शक्य होईल तेवढे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना सर्वाची सर्व प्रकारची साथ हवी आहे. आपल्या कामातून काही तरी बदल घडविण्यासाठी..

Story img Loader