प्रदीप नणंदकर
विविध आजारांबरोबर ‘ड्रॅगन फ्रूट’ याचीही आपल्याकडे मोठी चर्चा होऊ लागली. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका आदी देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतातही यशस्वी लागवड होऊ लागली आहे. उस्मानाबाद जिल्हय़ातील मुरूड येथील एका शेतक ऱ्याने फळबागेतील दाखवलेला हा नवा मार्ग..
‘करायला गेला मारुती अन् झाला माकड ’ अशी शेतीची अवस्था निर्माण झाल्यामुळे शेतकरी कायम ‘दूध पोळले तरी ताक फुंकून पिण्याच्या’ अवस्थेत असतो. अधिक उत्पादन झाले तर बाजारपेठेत भाव पडतात. जेव्हा भाव वाढतात तेव्हा उत्पादन कमी झालेले असते, त्यामुळे शेतक ऱ्यांच्या हातात परंपारिक शेतीत काही पडत नाही. त्यामुळे शेतीत नवनवे प्रयोग केले जात आहेत. कमी पाण्यात येणारे ‘ड्रॅगन फ्रूट’ हे फळ आता महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर येऊ लागले असून त्याची शेती आता चांगलीच विकसित झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हय़ातील मुरूड जवळील जागजी येथील प्रयोगशील शेतकरी नितीन सावंत यांनी प्रारंभी २०१७ साली या फळाची एक एकरची लागवड केली. ती यशस्वी झाल्यानंतर दोन वर्षांनंतर पुन्हा एक एकरची लागवड केली व यावर्षी मार्च महिन्यात सहा एकरची लागवड केली असून आपल्या शेतीबरोबरच त्यांनी नर्सरी विकसित केली आहे व तीनशे शेतकऱ्यांना त्यांनी ही शेती करण्यास प्रवृत्त केले असून त्याबद्दलचा सर्व तांत्रिक सल्ला ते स्वत देत आहेत. एकरी ३ लाख रुपये हमखास उत्पन्न देणारी ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती फायदेशीर ठरत असून आता शेतकरी या नव्या फळशेतीकडे वळतो आहे.
या फळाला आता तालुक्याच्या बाजारपेठेतही मागणी असून १०० ते २०० रुपये किलोने या फळाची बाजारपेठेत विक्री होते. फळ विक्रीसाठी शेतकऱ्याला फार लांबची बाजारपेठ शोधावी लागत नाही असे आता सार्वत्रिक अनुभवास येत आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ हे थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल व श्रीलंका या देशात लोकप्रिय आहे. या फळामध्ये ‘प्रोटिन’चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. शरीरातील ‘कोलेस्ट्रॉल’ नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ‘ड्रॅगन फ्रूट’ फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याबरोबरच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया देशात केली जाते. कंबोडीया, तवान, मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया याचबरोबर उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस याठिकाणीही याची लागवड होते. आता भारतातही याची लागवड वेगाने वाढते आहे.
‘ड्रॅगन फ्रूट’ ही निवडुंग प्रकारातील वेल आहे. वरून लाल रंग व आतील गर पांढरा, वरून लाल रंग व आतील गर लाल व वरून पिवळा रंग व आतील रंग पांढरा अशा तीन प्रकारात हे फळ येते. हे फळ पित्तनाशक असल्याने आशियाई देशात याला ‘पिताया’ या नावानेही संबोधले जाते. या फळामध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण अधिक आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ‘व्हिटॅमिन बी’ याचे प्रमाण या फळात मोठय़ा प्रमाणावर आहे. सौंदर्यप्रसाधनातही या फळाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. फेसमास्क, केसमास्क यात याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. हे फळ आंबट असले तरी यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. कर्करोगाला अटकाव करणारेही हे फळ असल्याचे सांगितले जाते.
अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून या फळाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. बाजारपेठेत या फळाची हमखास मागणी लक्षात घेता या फळाची शेती केली जात आहे. नितीन सावंत हे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातारा जिल्हय़ात शिक्षक आहेत. पाच वर्षांपूर्वी जत तालुक्यात त्यांनी ही शेती पाहिली. प्रारंभी निवडुंगाची शेती केली जात असल्याबद्दल त्यांना कुतूहल होते व ही शेती फायद्याची असल्याचे लक्षात आल्यानंतर जतसारखाच मराठवाडय़ाचा दुष्काळी भाग असल्याने आपल्या भागात ही शेती चांगल्या प्रकारे होईल हे त्यांच्या मनात आले व त्यांनी जतवरून रोपे आणून २०१७ साली स्वतच्या शेतात एक एकरची लागवड केली. लागवडीच्या वेळी १० बाय ८ अंतरावर सहा फूट उंचीचे सिमेंटचे खांब रोवावे लागतात. ३० वर्षे ही वेल टिकते, त्यामुळे तितके वर्षे टिकणारे खांब वापरावे लागतात. एका खांबाला चार रोपे लावली जातात व एका एकरमध्ये २ हजार रोपे लागतात. सिमेंटच्या खांबाला वरच्या बाजूला रिंग वापरली जाते व त्या रिंगेतून चार वेली वाढवल्या जातात. एका एकरात लागवडीसाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च येतो. यात ३० वर्षांसाठी लागणाऱ्या सिमेंटच्या खांबाची गुंतवणूक आली, शिवाय रोपाचा खर्च आला.
पहिल्या वर्षभरातच या वेलीला फळ येते. प्रारंभी कळी, नंतर फूल व फळ असे त्याचे रूपांतर होते. ४५ दिवसानंतर कळीचे पूर्ण रूपांतर फळात होते व ते फळ विक्रीसाठी उपलब्ध असते. पहिल्या वर्षी एका वेलीला १० ते १५ किलो फळे येतात. जून ते ऑक्टोबर असे सहा बहार येतात. पहिल्या वर्षी सुमारे १०० रुपये किलोचा भाव धरला तरी सरासरी २ लाखाचे उत्पादन होते. दुसऱ्या वर्षी सहा टन उत्पादन म्हणजे ६ लाख रुपयाचे तर तिसऱ्या वर्षी १० टन म्हणजे १० लाख रुपयांचे उत्पादन होते. जून, जुल या दोन महिन्यात फिलिपाईन्सवरून या फळाची मोठय़ा प्रमाणावर आयात होते, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमी असतो. मात्र ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत आयात घटल्याने देशांतर्गत मालाला चांगला भाव मिळतो आहे.
५० रुपये किलो इतका कमी भाव मिळाला तरीदेखील तीन वर्षांनंतर एकरी ३ लाखांपेक्षा अधिक उत्पादन मिळते. हे निवडुंगवर्गीय पीक असल्याने याला पाणी कमी लागते. शिवाय पाण्याचा ताण बसला तर वेल वाळत नाही. फक्त उन्हाळय़ात याची जपणूक करावी लागते. काही ठिकाणी ‘फॉगर’चा वापरही शेतकरी करतात. सिमेंट खांबांऐवजी लोखंडी खांब वापरले तर उन्हाळय़ात वेलींच्या मुळांना उष्णतेचा त्रास होऊन त्या जळण्याची शक्यता असते म्हणून सरसकट सिमेंटचे पोल वापरण्याचा सल्ला दिला जातो.
प्रत्येक शहरात आता या फळाला मागणी वाढली आहे. सफरचंदाच्या कित्येक पट औषधी गुण असल्याने या फळाचा वापर लोक करू लागले आहेत. नितीन सावंत हे आपल्या नर्सरीतून जे शेतकरी रोपे घेऊन जातात त्यांना एक वर्षभर त्यांच्या शेतात जाऊन सहावेळा भेटी देऊन मोफत मार्गदर्शन करतात, त्यामुळे आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांना त्यांनी रोपे देऊन ३०० एकरावर लागवड केली आहे. महाराष्ट्रात सध्या विविध जिल्हय़ात सुमारे १८०० एकरावर ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड झालेली आहे. ती जर १८ हजार एकरावर पोहोचली तर ड्रॅगन फ्रूटचे भाव सध्यापेक्षा ५० टक्के घटतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे, तरीदेखील शेतकऱ्यांना ही शेती परवडते. एकरी इतके मोठे उत्पन्न देणारी दुसरी कोणतीच शेती नाही.
नवे प्रयोग करत राहायला हवे. त्यातूनच आपल्याला दिशा मिळत जात असल्याचे सावंत सांगतात. त्यांचे दहावी शिकलेले भाऊ पूर्णवेळ शेतीत आहेत. सावंत हे नोकरी सांभाळून त्यांना मार्गदर्शन करतात. पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतीत असे नवे प्रयोग करणे हे नक्कीच हितावह आहे.
pradeepnanandkar@gmail.com