|| प्रदीप आपटे
ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास राज्यात साहाय्यक शल्यज्ञ म्हणून १७८० साली दाखल झालेल्या विल्यम रॉक्सबर्गमुळे इथल्या वनस्पतींचे बहुअंगी संशोधन आणि अभ्यास होऊन आधुनिक भारतीय वनस्पतीशास्त्राचा पाया घातला गेला.
‘माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा ‘ हे ‘वेड्या ‘कुंभारा’बद्दल खरे असेल नसेल, पण वनस्पतीबद्दल शब्दश: खरे आहे. एका जागी उभे राहून आयुष्य कंठणारे हे वानसजीव स्वत:चे पोषण स्वत:च करतात. या ‘पादपां’ना पाय नाहीत. वारा, पाणी, पाखरे, प्राणी (माणूस त्यात आहेच) यांच्या मार्फतच ते स्थलांतर करू शकतात. काही कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरच्या अगोदर एकवट असलेल्या जमिनीचे खंड झाले. फुटून पसरत गेले. प्रत्येक तुकड्यावर उदयाला आलेल्या आणि तगलेल्या जीवसृष्टीची म्हणजे ढोबळ शब्दांत प्राणी आणि वानस साम्राज्याची निरनिराळी ठेवण आहे. एकाच वेळी साधर्म्य आणि वैधम्र्य असणारे खंड आहेत. तर काहींमध्ये अफाट फारकत आहे. हे वैविध्य कसे उपजते? कधी व किती टिकते? कधी उदयाला येते? कशाने लोप पावते? या वैविध्याचा ध्यास घेतलेले आणि नोंद केलेले अनेक धाडसी आणि कल्पक महाभाग झाले. त्यांनी या साधर्म्य वैधम्र्याची ‘व्यवस्था’ लावणाऱ्या उतरंडी बांधल्या. त्यापैकी आता रूढावलेला सर्वमान्य व्यवस्थेचा जनक म्हणजे कार्लुस लिनिअस. जीवशास्त्र शिकणाऱ्याला हा लिनिअसप्रणीत परवचा तोंडात आणि बुद्धीत गोंदून घ्यायला लागतो.
पृथ्वीवरच्या या अफाट वैविध्याची आपल्याला अगदी जुजबी कल्पना असते. एखादा प्रवासी अनोळखी प्रांतात जातो त्या परक्या प्रांतात काय अनोखे नसते? प्रथम नजरेत भरतो तेथील मातीचा रंग, डोंगर जमिनीचे चढउतार, माणसांची ठेवण आणि त्याहीपेक्षा प्राणीसृष्टी आणि झाडझाडोरा. कुठल्याही प्रदेशाच्या चित्राला वनस्पती आणि वृक्षांची मुद्रा असते. अलेक्झांडरच्या सैन्यासोबत असलेले फिरस्ते वृत्तकार इतिहासकार होते. हिन्दुस्थानाबद्दल लिहितांना त्यांना अनेक गोष्टींनी चकित केले होते. त्यांना कापूस आणि ऊस या वनस्पती ठाऊकच नव्हत्या! त्यांनी नोंदले आहे ‘येथे लोकर येणारी झाडे आहेत आणि मधाचे बांबू आहेत’!
मूळ दृष्टी व्यापारी
मसाल्याच्या वनस्पती नावाच्या अनोख्या जगामुळे हिन्दुस्थानाकडे आणि आशियाई बेटांकडे व्यापाऱ्यांचा मोहरा वळला. परकीयांच्या सागरी येरझाऱ्या आणि वर्दळ रूढावली. डचांनी हुकुमतीत घेतलेल्या आताच्या इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडचाही इतिहास त्याच वळणाने घडला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीला हिन्दुस्थानात प्रदेश काबीज करण्याचा अवसर लाभला. कंपनीची राजवट आली. मूळ व्यापारी कळ आणखी हाव धरून बळावली. या नव्या राज्यकर्त्यांना इथल्या भूभागात आणखी कोणत्या वनस्पतींचा बाजार उभारता-मांडता येईल याचा सुगावा पाहिजेच होता. डचांनी हा शोध घेत वनस्पतींची नोंद झपाट्याने सुरू केली होती. तोच पायंडा इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने पत्करला. त्यांनी मद्रास वखारी प्रांतात क्योनिश नांवाच्या वानसतज्ज्ञाची नेमणूकही केली.
त्या काळी जीवसृष्टीतली झाडे, प्राणी, कीटक, समुद्र किंवा झरे, पाणथळी जीव असे काहीही असो. अशाचा लळा, ध्यास आणि ज्ञान लाभलेल्यांना निसर्गप्रेमी ऊर्फ नॅचरलिस्ट हे एकच बिरुद वापरले जायचे. तसा हा क्योनिश. हा तर कार्लुस लिनिअसचा थेट शिष्य होता. त्या काळात रोगव्याधींवर प्रामुख्याने वनस्पतींचाच उपचारी तोडगा असे. परिणामी सगळे शल्य वैद्यकदेखील वेगवेगळ्या वानसांची जाण शोधायचे आणि बाळगायचे. एडिंबरोच्या वैद्यक विद्यालयात अलेक्झांडर मनरो नांवाचा प्राध्यापक शल्यविशारद आणि जॉन होप नांवाचा वनस्पतीतज्ज्ञ होता. त्याने तेथे एक वनस्पती संग्रहालय सांभाळले होते. त्यांनी विल्यम रॉक्सबर्ग (जन्म १७५१) या आपल्या एका लाडक्या विद्याथ्र्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या बोटीवरच्या शल्यविशारदाचा सहकारी म्हणून धाडले होते. रॉक्सबर्गने वयाच्या २०व्या वर्षापासून या सफरी केल्या आणि सर्जनची परीक्षा झाल्यावर १७८० साली ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास राज्यात साहाय्यक शल्यज्ञ म्हणून दाखल झाला.
वनस्पती संशोधन, अभ्यास
कालांतराने त्याची आंध्र प्रदेशाच्या कोरोमंडल भागात कंपनीचा ताब्यातील समलकोट उद्यानात वनस्पतीज्ञ मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. येथेच त्याने आपल्या वानसी संकलन, प्रयोग, निरीक्षण यांचा झपाटा आरंभला. ऊस आणि नीळ यांच्या लागवडींचे त्यांच्या जैविक सुधारणेचे यशस्वी प्रयोग केले. दुष्काळावर मात करायला साबुकन्द लागवडीचा खटाटोप आरंभला. त्यानंतर तो कोलकातातील रॉयल उद्यानाचा प्रमुख बनला. (आताचे नांव जगदीश बोस उद्यान). त्या उद्यानाची आखणी, विस्तार, तिथे आणल्या गेलेल्या विविध वृक्षवेलींची उपस्थिती ही सगळी त्याच्या कल्पक दूरगामी दृष्टीची देणगी आहे. कंपनीचे आर्थिक हित ज्या वनस्पतींच्या मुबलकतेने वधारेल अशा अनेक वनस्पतींच्या लागवडीसाठी त्याने जंग जंग पछाडले. अनेक ठिकाणाहून त्याच्या बिया/रोपे मिळविली. वानगीदाखल त्याने दोरखंड आणि जाळी बनविण्यासाठी लागणाऱ्या तंतुमय वनस्पतींचा त्याने घेतलेला छडा विशेष होता. इंग्लंड आणि फ्रान्समध्ये युद्ध पेटले होते. जहाज आणि अन्य वाहतुकीसाठी लागणाऱ्या दोरखंडांचा तुटवडा भासू लागला होता. रशियातील पुरवठा आकसला होता. त्याने भारत आणि आशिया उपखंडातील ‘भांग-अंबाडी’ ताग यासारखे सगळ्या प्रकारचे वानसे त्याच्या उपप्रकारांसह धुंडाळले आणि त्यांचे उत्पादन घेऊन पाहिले. त्यांचे धागे काढून त्यांचे दोर कशा दर्जाचे बनतात याची चाचणी केली. त्या सगळ्याची तपशीलवार कथा सांगायची तर मोठा ग्रंथ होईल. पण त्याचे कर्तृत्व, त्याच्या संशोधन प्रयोगशीलतेचा आवाका ढोबळ वनस्पती वर्गांमध्ये सांगायचा तर धाग्यांची पिके, मसाल्याची पिके, रंगद्रव्य देणाऱ्या वनस्पती आणि किडे-कीटक, रेशीम कीटक आणि त्यांना पोसणारी मलबेरीसारखी वनस्पती, बांधकाम आणि जहाज बांधणीसाठीचे साग मोहोगनीसारखे दाट घनफळी मोठ्या ओंडक्यांचे वृक्ष इतका पसरला आहे. यात त्या अनेक वनस्पतींचे प्रकार (व्हरायटी) त्याच्यामुळे भारतात निवडल्या गेल्या. काही आसपासच्या खंडातून आणल्या गेल्या. या प्रजाती-जातींमधली आज दिसणारी विविधता आणि कृत्रिम निवडीचे वैविध्य ही त्याच्या प्रयत्नांची आणि कर्तृत्वाची निशाणी आहे. कुठल्याही वनस्पतीवर्गातील जाती आणि प्रकार हुडकायचे. त्यांच्यातले पोटभेद निरखायचे. त्यातले अधिक हमखास फळणारे, जास्त उत्पादन देणारे प्रकार हेरायचे. त्यांची रोपे, बिया वाढवून त्यांचा प्रसार करायचा. त्यांची निगराणी करणारे तंत्र विकसित करायचे. लागवडीत रोपांची संख्या, त्यामधले अंतर, वेलीचे साजेसे पोषक आधार वृक्ष कोणते अशा सगळ्या पैलूंना गवसणी घालणारे प्रयोग त्यात होते. खेरीज हे सर्व साध्य करायला लागणारे वित्त, मजूर, कुशल कारागीर याची तजवीज करण्यासाठी ‘कंपनीच्या’ संचालक मंडळांशी मनधरणी करण्याचे व्यवस्थापकीय काम पण त्याचेच! त्यामुळे कंपनीच्या निर्यातक्षमतेला लक्षणीय बळ मिळाले.
भारतीय वनस्पतीशास्त्राचा पाया
पण या जबाबदाऱ्यांखेरीज त्याच्या चौकस बुद्धीमुळे वनस्पतीविज्ञानाला लागणाऱ्या अन्य अनेक वैज्ञानिक उठाठेवी त्याने मोठ्या उत्साहाने पेलल्या. वनस्पती गोळा करणे, त्यांची ठेवण, वैशिष्ट्ये, धाटणी त्यातल्या सूक्ष्म तफावती आणि फरक हेरणे हा त्याचा खाक्या होता. स्वत:च्या रेखाटनाच्या बरोबरीने तो स्थानिक चित्रकारांना हाताशी धरून त्या वानसांची रंगीत चित्रे बनवून घेऊ लागला. १७९० मध्येच त्याने ७०० रंगीत चित्रे बनवून घेतली होती. हा सगळा खटाटोप त्याने समलकोटला असतानाच आरंभला. तिथेच त्याची क्योनिशबरोबर गाठ पडली आणि दोघांची गट्टी झाली. जतन आणि संग्रहाला लिनिअस वळणाची व्यवस्था लाभली. ही चित्रे आणि वनस्पती जतन- संग्रहाची शिस्त सांभाळणारे संग्रहालय त्याने बाळगायला सुरुवात केली. चित्रांच्याच्या दोन वा जास्त प्रती वा संच किंवा नकला बनवून घेतल्या जात. त्यातली एक प्रत मॉरिशस आणि लंडनच्या शाही क्यू उद्यानाला धाडली जात असे. धाडलेल्या प्रती जहाजी प्रवासात खराब होतील, बरबाददेखील होतील म्हणून निरनिराळ्या जहाजांतून त्यांच्या एकापेक्षा जास्त प्रती धाडण्याचा शिरस्ता त्याने संभाळला. उष्ण कटिबंधातल्या वनस्पतींची समशीतोष्ण कटिबंधात यशस्वी लागवड होतेच असे नाही. पण तरी चिकाटीने जिवंत रोपे धाडण्याचा आणि लागवडीचा संभव अजमावण्याचा पण प्रयास करणे जारी असे. पाच-सहा महिन्यांचा जोखमी सागरी प्रवास करून पोहोचपर्यंत रोपे कशी तग धरतील याचा विचार करून निराळ्या माती शेवाळयुक्त पेट्या बनवून घेतल्या जात. या सगळ्याची साक्ष कोलकोत्यातील हुगळी काठचे जगदीश बोस उद्यान, लंडनजवळचे क्यू वनस्पती उद्यान-संग्रहालय, एडिंबरोमधील उद्यान-संग्रहालय इथे बघायला मिळते. सेंट हेलेना बेटात त्याने नोंदलेल्या वनस्पती यादीवर चार्लस् डार्विनने आपल्या बिगलप्रवासात मोठी भिस्त ठेवलेली आढळते. आज अनेक वनस्पतींच्या द्विनामी बिरुदांमध्ये रॉक्सबर्गी अशी त्याची गौरवी उपाधी दिसते. त्याला आधुनिक भारतीय वनस्पती ज्ञानाचा पाया घालणारा शास्त्रज्ञ म्हटले जाते. त्याच्या प्रयोगशीलतेचे एक अंग मात्र बहुतेकांना फारच कमी माहीत असते. तो भारतात आल्यापासून त्याच्या घरात आणि कार्यालयात दाबमापक आणि उष्णतामापक यंत्रे लावलेली असायची. त्याची रोज तीन वेळा नोंद लिहून ठेवायची शिस्त त्याने पाळली. त्याच्या काळात युरोपातील छोटे हिमयुग अजून पुरेसे ओसरले नव्हते तो भारतात असताना अनेकदा अवर्षणाने दुष्काळ पडले. त्याच्या दाब आणि तापमानविषयक नोंदीवरून तो पावसाच्या हेलकाव्यांचे अनुमान करीत असे. दूर दक्षिण आफ्रिका व अन्य बेटांवरील पाऊसमान आणि भारतातले अवर्षण अथवा अतिवर्षण यांचा संबंध आहे. शिवाय त्यांच्यामध्ये काही पुनरावृत्तीचे हेलकावे आहेत असे त्या काळात सुचविणारा वैज्ञानिक म्हणून रॉक्सबर्ग आता ओळखला जातो. त्याच्या नोंदी आता अल निनोच्या इतिहासासाठी वापरल्या जातात!
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.
pradeepapte1687@gmail.com