आम्ही दोघेही प्राथमिक शिक्षक असल्या कारणाने बालमानसशास्त्र काय असते याची पुरेपूर जाणीव आम्हाला होती. मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास चांगला व्हायचा असेल तर प्राथमिक शिक्षण हे हसतखेळत आणि आनंदी वातावरणात व्हायला पाहिजे. असं आपलं बालमानसशास्त्र सांगते. जगातल्या जवळपास सगळ्याच प्रगत देशांत प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. मग आपणच का आपल्या मातृभाषेला कमी लेखावं?  हाच विचार करून आम्ही आमचा मुलगा आर्यन याला इगतपुरीच्या नूतन मराठी शाळा या प्राथमिक शाळेत टाकले आणि पाच वर्षांच्या अर्विनलासुद्धा मराठी माध्यमातच टाकणार आहोत. आर्यन आता चौथी इयत्तेत शिकत असून त्या त्या इयत्तेच्या सर्व विषयांच्या क्षमता तो चांगल्या प्रकारे प्राप्त करीत आहे. विशेष म्हणजे तो इंग्रजी चांगले वाचतो, बोलतो, समजून घेतो आणि स्वत: इंग्रजी वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूला इंग्रजी माध्यमाच्या भरपूर शाळा आहेत आणि अगदी सामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांची मुलंसुद्धा इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतात; पण तरीसुद्धा आमचा मुलगा मराठी माध्यमात शिकतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.   – अंकुश तळपे, इगतपुरी (नाशिक)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञानही मिळते

मी नामांकित कंपनीमध्ये नोकरी करतो. आम्हा दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे. माझी मुलगी समीक्षा चौथीमध्ये ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, चिंचवड येथे शिकते. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. घरात आणि शाळेत मराठी असल्याने मुलांचे विषय ज्ञान चांगले आहे.  इंग्रजी ही पण अनेक भाषांपैकी एक भाषा म्हणून आम्ही पाहतो व त्याचा जास्त बाऊ  करत नाही. इंग्रजी भाषासुद्धा ती हळूहळू आत्मसात करते आहे.  मातृभाषेतून शिक्षणामुळे तिला विचार करणे शक्य होते, विषयाबद्दलचे ज्ञान वाढते. ते व्यक्त करणे खूप सहजतेने होते. पाठ करणे गरजेचे नसते. शाळा तर उत्तम आहेच, पण व्यावहारिक ज्ञानाबरोबर पालकांचे विचार व विद्यार्थ्यांची प्रगती यांची येथे सांगड घातली जाते.     – सागर प्रकाश ईटकर, चिंचवड

जगणं समृद्ध करणारी मातृभाषा!            

मी ‘लोकसत्ता’ पेपर वाचत बसलो होतो. त्यामध्ये वन महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री महोदय झाडाला पाणी घालत असलेली जाहिरात आलेली होती. ती मी पाहत असतानाच माझा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा अनुराग आला आणि म्हणाला ‘‘बाबा, हे सरकार काही काम करत नाही, तिकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे इकडे झाडाला पाणी घालीत बसले आहेत.’’ मी शासनात काम करत असल्याने त्याला शासनाने केलेली उपाययोजना, नेमकी परिस्थिती काय असते हे सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि सरकार काहीच करत नाही, हा त्याचा गैरसमज दूर केला.

परंतु वयाच्या ८ व्या वर्षी तिसरीत शिकणारा मुलगा असे भाष्य करू शकतो, याचे कारण तो मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारा मुलगा आहे. आपल्या मुलाला सुसंस्कृत माणूस बनवायचे आहे, हे ध्येय स्पष्ट असल्याने जाणीवपूर्वक त्याला मराठी माध्यमाच्या महात्मा गांधी विद्यामंदिर, बांद्रा (पूर्व) या नामांकित शाळेत घातले. या शाळेमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच जीवनशिक्षणही दिले जाते. मराठी शाळेत शिकत असल्याने शाळेतले शिक्षण आणि प्रत्यक्ष जगण्यातले अनुभव यांची सांगड घालणे त्याला सहज शक्य झाले.  जे तो घरी, समाजामध्ये अनुभवातून शिकत होता, पाहत होता, तेच त्याला शाळेत शिकायला मिळत होते, त्यामुळेच त्याची आकलनशक्ती वाढत गेली. तो इंग्रजी कवितासुद्धा तोंडपाठ म्हणतो; पण ती केवळ घोकंपट्टी नसते, तर तिचा अर्थदेखील समजावून सांगू शकतो. माझी मुलगी अनन्या याच वर्षी तीन वर्षांची झाली आणि तिला मी अनुरागच्याच शाळेत घातले, जाणीवपूर्वक. कारण मला तिलाही सर्वागीण विकास झालेला सुसंस्कृत माणूस बनवायचे आहे.   – अतुल नरहरी कुलकर्णी, मुंबई</strong>

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education in marathi language
Show comments