हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com
रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागात आढळणारा जिताडा मासा हे येथील खास मत्स्य वैशिष्टय़. आपल्या रुचकर चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या माशाला रायगड आणि परिसरातील बाजारात नेहमीच मागणी असते. परंतु चांगल्या विपणनाअभावी या माशांचे उत्पादन आणि त्याच्या बाजारपेठेचा आजवर चांगला विकास होऊ शकला नाही. यासाठी समूह विकास प्रकल्पाची गरज आहे. यासाठी आता शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागात आढळणारा जिताडा मासा हे येथील खास मत्स्य वैशिष्टय़. आपल्या रुचकर चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या माशाला रायगड आणि परिसरातील बाजारात नेहमीच मागणी असते. परंतु चांगल्या विपणनाअभावी या माशांचे उत्पादन आणि त्याच्या बाजारपेठेचा आजवर चांगला विकास होऊ शकला नाही. यासाठी समूह विकास प्रकल्पाची गरज आहे. यासाठी आता शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
अलिबाग तालुक्यातील खाडीपट्टय़ात आढळणारा जिताडा मासा हा आपल्या रुचकर चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खारेपाट विभागातील शेतकरी शेततळय़ामध्ये या प्रजातीच्या माशांचे उत्पादन घेत असतात. पावसाळय़ाच्या सुरुवातीला जिताडय़ाची पिल्ले आणून शेततळय़ात सोडली जातात. पावसाळय़ानंतर तयार झालेले मासे जवळपासच्या बाजारामध्ये विकले जातात. या माशाला स्थानिक बाजारात मोठी मागणी असते. किलोमागे पाचशे ते सातशे रुपयांचा दर मत्स्यउत्पादक शेतकऱ्यांना मिळत असतो. मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील पर्यटक अलिबागला आल्यावर या माशावर हमखास ताव मारत असतात. पण चांगल्या विपणनाअभावी अभावी हा मासा अलिबाग, पेण तालुक्यापुरताच सीमित राहतो.
ही बाब लक्षात घेऊन आता या जिताडा माशाच्या संवर्धनसाठी समूह विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी शासकीय पातळीवर प्रयम्त्न सुरू झाले आहे. मत्स्यव्यवसाय आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या जिताडा उत्पादक शेतकऱ्यांसाठी समूह विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
खारेपाटात घरोघरी तसेच शेतघरांलगत लहान मोठे मत्स्यतलाव असतात. हे तलाव आकाराने अतिशय लहान असतात. घरात पुरेल आणि उरेल येवढेच मत्स्य उत्पादन या शेततळय़ामधून घेतले जाते. जुजबी ज्ञान आणि पारंपरिक पद्धतीने या माशांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. त्यामुळे या उत्पादनाला व्यावसायिकतेची जोड देणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पेण आणि अलिबाग तालुक्यात सुमारे १ हजार शेततळी आहेत. मात्र शेत तळय़ांच्या ‘सेंट्रल अॅक्वाकल्चर अॅथॉरिटी’कडे नोंद झालेली नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ आजवर या मत्स्य उत्पादकांना मिळालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन ‘मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट अॅॅथॉरिटी’ तसेच ‘सेंट्रल अक्वाकल्चर अथॉरीटी’ या संस्थेकडे आता तळय़ांची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट अॅथॉरिटी’कडे जवळपास ३०० शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता समूह विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिताड संवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.
जिताडय़ांची शेती ज्या तलावांमध्ये केली जाते, त्या सर्व तलावांची नोंद अशाप्रकारे झाली तर त्याला समूह विकास कार्यक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळू शकतात. जिल्ह्यात जिताडा मत्स्यबीज केंद्र कुठेही नाही त्यामुळे हे बीज मिळवण्यापासूनच अडचणींना सुरुवात होते. सिंधुदुर्गातील केंद्रातून ही पिल्ले आणावी लागतात किंवा खाडीतील पिल्ले आणून त्यांचे संवर्धन करावे लागते. ही बाब लक्षात घेऊन इथं जिताडय़ाचे मत्स्यबीज केंद्र उभारणे गरजेचे आहे.
सध्या जिताडय़ाना केवळ रायगड जिल्हयातच मागणी आहे. त्यामुळे इथले शेतकरी इथल्या गरजेपुरतेच जिताडय़ाचे उत्पादन घेतात. परिणामी जास्त मेहनत घेऊनही त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला मर्यादा पडतात. यासाठी त्याचा प्रचार प्रसार करणेही तितकेच गरजेचे आहे. त्याकरिता शासन पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत.
समूह विकास प्रकल्प (क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) यशस्वी करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सध्या अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत. त्यांना याचे महत्त्व पटवून दिले तर ते याकडे वळतील आणि जिताडय़ाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. शासनाकडून विविध शासकीय योजनांचाही लाभ त्यांना मिळू शकेल. मार्केटिंग, इन्सुलेटेड व्हॅन (शीत वाहने), बर्फ कारखाना, मत्स्यबीज केंद्र, माशांना लागणारे खाद्यनिर्मिती असे पूरक व्यवसाय यातून सुरू होऊ शकतील. यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन स्थानिकांचे जीवनमान उंचाण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.
जिताडय़ाचे कालवण
रायगड जिल्ह्यात जिताडय़ाच्या कालवणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. सामाजिक आणि राजकीय परंपरा लाभली आहे. पूर्वीचे एखादे राहिलेले काम करून घ्यायचे असल्यास त्यास जिताडा देण्याची परंपरा रुजली होती. ही परंपरा अजूनही कायम आहे. राजकारण असो अथवा समाजकारण आजही जिताडय़ाच्या कालवणाचे महत्त्व अबाधित आहे. शासकीय कार्यालयातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिताडा उपयोगी ठरत असल्याची चर्चा रंगतांना दिसते. अलिबागमधून आजही अनेक पुढाऱ्यांसाठी मुंबईत जिताडय़ाचे डबे पाठवले जातात. केवळ जिताडय़ामुळे अनेक राजकीय मासे गळाला लागल्याच्या कहाण्या जिल्ह्यात ऐकायला मिळतात.
श्रमिक मुक्ती दलाने जिताडा संवर्धन प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यास काही प्रमाणात यशही मिळत आहे. पण करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी यामुळे माशाला मुंबईची बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याने या वर्षी जिताडय़ाच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाने स्पष्ट केले आहे.
जिताडा माशाचे उत्पादन वाढून इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी सर्वप्रथम सर्व शेततळय़ांची शासन दरबारी नोंद करण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रामचे लाभ मिळू शकतील. विविध शासकीय योजना, सबसिडी अन्य सुविधा मिळतील. शिवाय या व्यवसायावर अवलंबून अन्य पूरक व्यवसाय देखील सुरू करता येतील.
– सुरेश भारती, सहायक उपायुक्त मत्स्यव्यवसाय
जिताडय़ाचे व्यवसायिक उत्पादन घेतले, तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यातून कृषी पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यासाठी आम्ही गेले दोन वर्षे प्रयत्न करत आहोत. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु त्यासाठीच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. शासन पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळत नाही. मात्र आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
– राजन भगत , समन्वयक जिताडा संवर्धन प्रकल्प