|| संतोष प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तमिळनाडूचे राजकारण हे मुख्यत्वे व्यक्तीकेंद्रित असते. अण्णा दुराई, कामराज, एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी, जयललिता या नेत्यांभोवतालीच राजकारणाची चक्रे फिरत राहिली. ५० वर्षांपेक्षा जास्त या राज्यात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला स्वबळावर सत्ता मिळालेली नाही. द्रमुक किंवा अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांमध्येच स्पर्धा असते. जयललिता आणि करुणानिधी या दोन जनाधार असलेल्या नेत्यांचा ठरावीक अंतराने मृत्यू झाला आणि तमिळनाडूच्या राजकारणाचे सारे चित्रच बदलले. जनमानसावर प्रभाव असलेल्या नेतृत्वाचा तमिळनाडूत सध्या तरी अभाव आहे. नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी चित्रपट अभिनेते रजनीकांत, कमल हासन, विजयकांत हे प्रयत्नशील आहेत. रजनीकांत अजूनही फॅन क्लबच्या बाहेर आलेले नाहीत. कमल हासन यांनी राजकीय पक्षाची स्थापना करून दौरे सुरू केले आहेत. सत्ताधारी अण्णा द्रमुक वा विरोधी द्रमुक, भाजप, काँग्रेस तसेच अन्य प्रादेशिक पक्ष या साऱ्यांनाच आघाडीशिवाय तरणोपाय दिसत नाही. सध्या आघाडीच्या जुळवाजुळवीवरच सर्व पक्षांचा भर दिसतो. तमिळनाडूत आता एका पक्षाचे दिवस संपले, असा अर्थ काढला जात आहे.
केरळ, तमिळनाडू, राजस्थानसारख्या काही राज्यांमध्ये प्रत्येक निवडणुकांमध्ये सत्ताबदल होतो. तसेच लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये एकाच आघाडीला कौल मिळतो. तमिळनाडूत ही परंपराच जवळपास रूढ झाली होती. अपवाद ठरला २०१६च्या विधानसभा निवडणुकीचा. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदलाची तीन दशकांची परंपरा खंडित झाली आणि अण्णा द्रमुक पक्षाला पुन्हा सत्ता मिळाली. यानंतर झालेल्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकने राज्यातील ३९ पैकी लोकसभेच्या ३७ जागा जिंकून राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावली. लोकसभा निवडणुकीत एकाच आघाडीला किंवा पक्षाला कौल देण्याची तमिळनाडूत परंपराच पडली होती. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत सर्व ३९ जागा द्रमुक आघाडीने जिंकल्या होत्या. १९९८ मध्ये अण्णा द्रमुकचे, तर १९९९ मध्ये द्रमुक-भाजप आघाडीचे वर्चस्व होते. २००४ मध्ये द्रमुक-काँग्रेस आघाडीने सर्व जागा जिंकल्याने केंद्रात काँग्रेस आघाडीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. यंदाही सर्व जागा जिंकण्याचा अण्णा द्रमुक-भाजप आणि द्रमुक-काँग्रेस आघाडीचा प्रयत्न आहे. तथापि, तमिळनाडूतील बदलत्या राजकीय परिस्थितीत कोण किती पाण्यात आहे, याचा अंदाज अद्याप तरी आलेला नाही.
जयललिता यांच्या मृत्यूनंतर सत्ताधारी अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. शशिकला यांना पक्षाची सूत्रे आणि मुख्यमंत्रिपद मिळविण्याची घाई झाली होती; पण मुख्यमंत्र्यांचे कार्यालय फोर्ट सेंट जॉर्जऐवजी बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी त्यांची रवानगी थेट बंगळूरुच्या तुरुंगात झाली. मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची सूत्रे असली तरी दोघांकडेही एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्यासारखा करिश्मा नाही. यातच शशिकला यांचे भाचे दिनकरन यांचे अण्णा द्रमुकसमोर आव्हान आहेच. विधानसभेत काठावरचे बहुमत आणि जनमत जयललिता यांच्या मृत्यूनंतर किती साथ देईल याचा अंदाज येत नसल्याने अण्णा द्रमुक नेतृत्वाने सपशेल नांगीच टाकली. भाजप आणि वेनियर समाजात स्थान असलेल्या पीएमकेबरोबर आघाडीत अण्णा द्रमुकने बऱ्याच तडजोडी केल्या. ३७ खासदार असलेल्या अण्णा द्रमुकने आपल्या ताब्यातील १० जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. विजयकांत यांच्या पक्षासाठी आणखी जागा सोडण्याची तयारी आहे. म्हणजेच ३७ खासदार असलेल्या अण्णा द्रमुकच्या वाटय़ाला २५ किंवा त्यापेक्षा कमी जागा येऊ शकतात. दिनकरन यांच्याबरोबर गेलेले अण्णा द्रमुकमधील १८ आमदार पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरले. या मतदारसंघांमध्ये लोकसभेबरोबरच पोटनिवडणुका अपेक्षित आहेत. या सर्व जागा गमाविल्यास अण्णा द्रमुक सरकारचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. यामुळेच भाजप, पीएमके या पक्षांना हव्या तेवढय़ा जागा सोडताना विधानसभा पोटनिवडणुकीत या पक्षांचा पाठिंबा मिळविला आहे. कारण यातील चांगल्या संख्येने जागा जिंकल्या तरच अण्णा द्रमुक सरकार टिकू शकेल. सरकार गडगडल्यास अण्णा द्रमुकचे राजकीय भवितव्य कठीण असेल.
अण्णा द्रमुक-भाजप-पीएमकेच्या युतीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीतील जागावाटपांची घोषणा झाली. द्रमुक ३०, तर काँग्रेस नऊ जागा लढणार आहे. शेजारील पुड्डेचरीतील एक जागा काँग्रेसच्या वाटय़ाला गेली. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला किंवा वादावादी झाली तसा प्रकार करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये तेवढा झालेला नाही. करुणानिधी यांचे पुत्र अलिगिरी यांनी बंडाचे निशाण फडकविले असले तरी त्यांना पक्षात कोईम्बतूर वा दक्षिण भाग वगळता अन्यत्र तेवढा पाठिंबा नाही. करुणानिधी यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून स्टॅलिन यांचे नेतृत्व आधीच पुढे आणले होते. तमिळनाडूची सत्ता हेच स्टॅलिन यांचे ध्येय आहे. यासाठीच लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सर्व ३९ जागाजिंकण्याचे द्रमुकचे स्वप्न आहे.
दक्षिणेत कर्नाटक वगळता अन्य कोणत्याच राज्यात भाजपला हातपाय पसरता आलेले नाहीत. नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचा लाभ उठविण्याचा भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. यातूनच भाजपने अण्णा द्रमुकशी युती केली. गेल्या वेळी कन्याकुमारीमध्ये विजय मिळाला होता. या वेळी युतीत भाजपच्या वाटय़ाला पाच जागा आल्या आहेत. आसाम गण परिषद आणि महाराष्ट्रवादी गोमांतक या प्रादेशिक पक्षांचा हात धरून अनुक्रमे आसाम आणि गोव्यात भाजपने हातपाय पसरले आणि कालांतराने प्रादेशिक पक्ष संपले. पुढे भाजपने या राज्यांमध्ये सत्ता संपादन केली. हेच सूत्र तमिळनाडूत वापरले जाऊ शकते.
चित्रपट अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम आणि शशिकला यांचे भाचे दिनकरन यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. कमल हसन यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर दिनकरन यांना भविष्यात अण्णा द्रमुकचे नेतृत्व करायचे असल्याने त्यांना द्रमुकशी आघाडी करून चालणार नाही. कारण पक्षाचे पारंपरिक मतदार पुढे साथ देणार नाहीत.
देशाच्या अन्य भागांत गतवेळच्या तुलनेत जागा कमी झाल्यास तमिळनाडूत मित्रपक्षांचे ३०पेक्षा जास्त खासदारांचे संख्याबळ मिळावे ही भाजपची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी यांचे तमिळनाडूतील वाढलेले दौरे हा त्याचाच भाग आहे. द्रमुक की अण्णा द्रमुक कोण वरचढ ठरते यावर राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरेल.