पक्षांचे युद्धकक्ष
निवडणूक म्हणजे युद्धच. प्रचाराची धुमाळी, टीकेच्या तोफा, आश्वासनांचे नगारे आणि घोषणांच्या तुताऱ्या अशा गदारोळात खेळली जाणारी लोकशाहीतील लढाई. या लढाईत हल्ली दूरचित्रवाणी आणि इंटरनेट यांना कधी नव्हे इतके महत्त्व आले आहे. म्हणूनच निवडणुकीचे डावपेच आणि धोरणे जेथे ठरतात त्या खलबतखान्यांमध्येही आज माध्यम आणि संगणकतज्ज्ञांशिवाय पान हलत नाही. किंबहुना जुन्या खलबतखान्यांची जागा या नव्या, आधुनिक तंत्रमंत्रावर चालणाऱ्या वॉर रूमने घेतली आहे.
कसे असतात हे युद्धकक्ष? कसे चालते तेथील काम? यावर एक नजर..
कधी काळी वैयक्तिक संपर्क, स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजकीय समीकरणे ठरवीत असतकॉँग्रेसचे नवे सत्ताकेंद्र
कधी काळी वैयक्तिक संपर्क, स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजकीय समीकरणे ठरवीत असत. जनमानसाशी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा संपर्क होता. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसची काम करण्याची पद्धत बदलली. आधुनिक तंत्रज्ञानाचा  पुरेपूर वापर करून विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने पक्षावर पकड घट्ट केली आहे. काँग्रेसमध्ये दोन सत्ताकेंद्रे एकाच वेळी समान प्रभावशाली असण्याची ही पहिलीच वेळ नाही. गांधी कुटुंबीयांचे प्रमुख वारसदार राहुल गांधी हेच असल्याने स्वाभाविक त्यांच्या शब्दाला पक्षात सर्वाधिक मान आहे. त्यामुळे गुरुद्वारा रकाबगंज रस्त्यावरील काँग्रेस वॉर रूम राहुल गांधी यांच्या तुघलक लेनवरील निवासस्थानी हटविण्यात आली.
रकाबगंज गुरुद्वारामुळे हा रस्ता ओळखला जातो. १५, रकाबगंज हा काँग्रेसच्या जुन्या वॉर रूमचा पत्ता. बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती यांचे निवासस्थान व संसद भवन हाकेच्या अंतरावर! इंग्रजांनी योजनापूर्वक ल्युटन्स झोनची निर्मिती केली होती. संसदेच्या जवळच निवासस्थान असल्याने कुणाही नेत्याला रात्र-बेरात्री बग्गी पाठवून इंग्रज अधिकारी बोलावून घेत असत. तीच पद्धत काँग्रेसने पुढे चालवली. वॉर रूम ही संकल्पना जयराम रमेश यांची. केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षांमध्ये अंतर्गत काय चालले आहे, देशातील समस्या, किमान जिल्हास्तरावरची बिनचूक माहिती एकत्रित करून डावपेच ठरविण्याची रमेश यांची ही संकल्पना राहुल यांना आवडली. त्यानंतर १५, रकाबगंजच्या बंगल्यात सुरू झाली काँग्रेसची वॉर रूम. तशी ही २००९ ची संकल्पना. पण त्याला व्यावसायिक स्वरूप आणले ते जयराम रमेश यांनीच. माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील २५ युवकांना घेऊन ही वॉर रूम सुरू झाली. दोन मोठे हॉल. ‘वाय-फाय’युक्त संगणक. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेसह. एका सभागृहात विधानसभा निवडणुका, तर दुसऱ्या सभागृहात लोकसभा निवडणुकीची तयारी. काँग्रेसचे हे नवे रूपडे अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांना रुचण्यासारखे नव्हते. त्यातून ‘आतले व बाहेरचे’ असे शीतयुद्ध सुरू झाले. सरतेशेवटी राहुल गांधी काँग्रेस उपाध्यक्ष झाल्यावर रकाबगंज रस्त्यावरील वॉर रूम त्यांच्या तुघलक लेनवरील निवासस्थानी हलविण्यात आली. जयराम रमेश हेच वॉर रूमचे सर्वेसर्वा आहेत.
तुघलक लेनवरील वॉर रूममध्ये सहजासहजी प्रवेश नाही. पन्नासेक संगणक, अध्र्या भिंतीवर पसरलेले मोठमोठाले टीव्ही, प्रमुख इंग्रजी- हिंदी वृत्तपत्र, असे या वॉर रूमचे स्वरूप आहे. नव्या वॉर रूममध्ये पंचविसेक जणांची भर पडली आहे. त्यात इंग्रजी विशेषत: मुद्रित माध्यमातील डझनभर पत्रकार. या पत्रकारांचे एकच काम, दिवसभरातल्या राजकीय वृत्तांचे संकलन करणे. राज्यनिहाय यादी बनवणे. महत्त्वाचे, अति-महत्त्वाचे विषय समजून घेऊन त्यावर छोटेखानी टिपण तयार करणे. दिवसभरातील संकलित माहिती जयराम रमेश यांच्यापर्यंत पोहोचविली जाते. सध्या तर वॉर रूमध्ये रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे. देशात काँग्रेसविरोधात भूकंप, त्सुनामी होणार आहे की ढगफुटी, अशा राजकीय संकटांची चाचपणी या वॉर रूममध्ये केली जाते. नरेंद्र मोदींना थोपविणे अवघड आहे, असे विधान जयराम रमेश यांनी वॉर रूममधून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच केले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी काँग्रेसवर राहुल गांधी व त्यांच्या चमूचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.    
 वॉर रूममध्ये जयराम रमेश यांच्याखालोखाल चलती असते ती कनिष्क सिंह यांची. राजस्थानचे माजी राज्यपाल एस.के. सिंह यांचे चिरंजीव असलेले कनिष्क आयटीतज्ज्ञ आहेत. त्यांच्या जोडीला मोहन गोपाल, सुमन दुबे, प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय प्रीती शाह, सॅम पित्रोदा यांचा वावर वॉर रूममध्ये असतो. सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी दीपेंदर हुडा व राज्यसभा सदस्य संदीप दीक्षित यांच्यावर आहे. वॉर रूम सांभाळणारी टीम व तळागळातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून असणाऱ्या जुन्या-जाणत्या नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. फक्त काँग्रेससोबत अपरिहार्य असलेल्या गांधी कुटुंबीयांमुळे दक्षिण व उत्तर ध्रुवावर राहणारे हे नेते एकत्र येतात. जोरदार प्रचार केला तर यश मिळेल असा जुन्या-जाणत्या नेत्यांचा आग्रह, तर अभ्यास करून प्रतिक्रियेचा अंदाज बांधून प्रचाराची दिशा ठरविण्याचा वॉर रूमचा ‘आदेश’. अशा संघर्षांत ही वॉर रूम सुरू आहे. ‘भारत निर्माण’ प्रचार अभियानाला वॉर रूमचा विरोध होता, परंतु माहिती व तंत्रज्ञानमंत्री मनीष तिवारींच्या आग्रहामुळे हे अभियान सुरू झाले. त्याऐवजी राहुल गांधी यांच्या नावाने प्रचार अभियान सुरू करण्याचा आग्रह वॉर रूमचा होता. शेवटी, व्हायचे तेच झाले. ‘भारत निर्माण’ मागे पडून राहुल गांधी यांच्याभोवतीच प्रचार एकवटला गेला. तेव्हापासून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला. दोन्ही नेत्यांच्या जवळ असणाऱ्यांमध्ये महत्त्वाचे नाव आहे अजय माकन. काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख. त्यांचादेखील वॉर रूमच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग असतो.
तुघलक लेनच्या वॉर रूममध्ये सध्या तरी निराशेचे वातावरण आहे. सोनिया व राहुल प्रचारात व्यस्त असल्याने स्वाभाविकपणे वॉर रूमची सूत्रे प्रियांकांच्या हाती आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर राहुल यांना निर्णय घेण्यासाठी प्रियांका यांची मोठी मदत होते. जोडीला जयराम रमेश असतातच. राहुल यांनी एका इंग्रजी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीसाठी आवश्यक गृहपाठ करवून घेण्याची जबाबदारी प्रियांका, जयराम रमेश व सॅम पित्रोदा यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी ती कशी पार पाडली, याची खमंग चर्चा १०, जनपथ ते २४, अकबर रस्त्यापर्यंत अद्याप सुरू आहे.
वॉर रूममध्ये जयराम रमेश यांनी हेरून काही जणांना आणले. परदेशातून काही आयटीतज्ज्ञ, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनादेखील वॉर रूममध्ये आणून बसविले.  लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो, राहुल गांधी यांचे नेतृत्व देशात व पक्षात उभारण्यासाठी वॉर रूममधील योद्धे कामाला लागले आहेत. काँग्रेसमधील बदलत्या सत्ताकेंद्राला सर्वच काँग्रेस नेत्यांची मूक संमती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा